परीघापलिकडले नाते पर्व दुसरे - भाग 6 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, family, love, relation, kutumb, kautumbik, katha, spardha, marathi, story, Anay, Arnav, Anshika, design, Riya, college, hostel, school, parivar, boarding



अंशिकाच्या लहानशा बुटिकचे गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या डिझाइन स्टोअर मध्ये रूपांतर झाले होते. 'Ansh' चे तिने डिझाइन केलेले कपडे मोठमोठ्या मॉल्स मध्ये मिळू लागले होते. मुंबईखेरीज बंगलोर, दिल्ली, कोलकाता अशा शहरांमध्येदेखील तिचे शोज होत असत. दशरथ काका, माने काका, वैशाली, प्रमिलामावशी हे सगळे जुने कारागीर आता आपापली चार पाच जणांची स्वतंत्र टीम सांभाळत काम करत होते. शोज च्या निमित्ताने अंशिकाच्या परदेशातदेखील अध्येमध्ये चकरा होत असत.

******

बघता बघता मुलांचे फायनल इयर सुद्धा झाले. अर्णव अनयच्या ऑफिसमध्ये काम करू लागला होता. रिया, आर्यन आणि मिष्टी या सर्वांनाच कॅम्पस सिलेक्शन होऊन वेगवेगळ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली होती. बिग ब्रो निकी डॉक्टर झाला होता तर जय वकील.

तीन वर्षांनी ...

ब्लॅक शर्ट, क्रीम पॅन्ट आणि क्रीम कलरचा बारीक डिझाइन चा टाय , परफेक्टली ट्रिम केलेली बिअर्ड अशा फॉर्मल गेट अप मध्ये असलेला आर्यन आवडता परफ्यूम लावून ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होतोय तितक्यात रियाचा फोन आला.
"बोला रिया मॅडम, सकाळी सकाळी कशी काय आठवण झाली या पामराची?" हसत हसत आर्यन म्हणाला.

"Hiie आर्यन , कसा आहेस?  उठला आहेस ना , की मी डिस्टर्ब केलं तुला झोपेत? म्हटलं तुझा अलार्म वाजला नसेल तर आपणच उठवावं फोन करून ", रिया अवखळपणे हसत म्हणाली.

"काय मॅडम , सकाळचे सव्वाआठ वाजले आहेत आता. मी मॉर्निंग जॉगिंग , एक्सरसाईझ करून आलो आणि तयारसुद्धा झालोय ऑफिसमध्ये जाण्यासाठी", हसतच आर्यन म्हणाला.

"कसं चाललंय रे ऑफिस तुझं? वर्कलोड कसं आहे सध्या?", रिया.

"हं , थोडं जास्त आहे वर्कलोड सध्या , नवीन प्रोजेक्ट्स सुरू झाले आहेत  काही दिवसांपूर्वी , त्यामुळे. बरं मॅडम , तुम्ही हे विचारायला तर फोन केलेला नसणार ना?
बोला , जे विचारायचे आहे ते विचारा आता",  आर्यन आता चिडवण्याच्या मूड मध्ये आला होता.

"म्हणजे आर्यन, मी तुला सहजच आठवण आली म्हणून फोन करू शकत नाही काय?" , रियाने जीभ चावत म्हटले. रिया पण काही कमी नव्हती चिडवण्यात!

"हं , करू तर शकते, पण आठवण नक्की कुणाची आली हे पण कळतंय बरं मला. डोन्ट वरी , एकदम ठीक आहे तो. कालच फोन आला होता त्याचा." आर्यन मिस्किलपणे म्हणाला.

"अच्छा? काय म्हणाला रे तो? खूप दिवस झाले काही बोलणं नाही झालं " रिया अधीरपणे विचारती झाली.

"अग हो, हो, सांगतो , सांगतो. जरा श्वास तरी घेऊ देशील ?" आर्यन.

"हो, आता तर तू फुटेज खाणारच ना ! सांग ना लवकर", रिया खट्टू होत म्हणाली.

"खूप प्रेम करतेस ना त्याच्यावर?", आर्यन ने गंभीर होत विचारले.

रिया तर  बसल्या जागेवर आश्चर्याने उडालीच ! "काय ? काय म्हणालास तू? ते.... मी ... पण तुला हे कसं कळलं ? मी तर कोणालाही सांगितलेले, बोललेले नाही अजून".

"हं, रिया, मला हे खूप आधीच कळलं होतं. उगाच नाही तू दर आठ दिवसांत मला फोन करून त्याची चौकशी करतेस. फोन मला करतेस पण सगळं त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं असतं तुला. कसा आहे, काय चाललंय त्याचं इत्यादी इत्यादी." आर्यन.

"तीन वर्षांपूर्वी इंटरकॉलेज चॅम्पियनशिप च्या वेळी फुटबॉल खेळताना अगदी शेवटचा गोल केला आणि अर्णव दुसऱ्या टीममधल्या खेळाडूच्या पायात पाय अडकून पडला होता, त्याला दुखापत झाली होती, त्यावेळी सुद्धा किती घालमेल सुरू होती तुझ्या जीवाची. किती काळजी घेतलीस तू नंतर त्याची  आणि तो एक वेडा ! त्याला कळत नाही काही. तो मनात असेल तरी बोलेल की नाही शंकाच आहे . मला तर वाटतं रिया, तुलाच काहीतरी करावं लागेल. तूच आता त्याला सांगावं , आणि तुझं प्रेम कबूल करावं त्याच्याकडे. अजून किती वाट बघणार आहेस? ", आर्यन जरा गंभीर स्वरात बोलत होता.

"खरंच असं वाटतं का तुला?", रिया आता विचारात पडली होती.
"हो, मी सिरिअसली म्हणतोय ग", आर्यन म्हणाला.

" आणि हं. जरा लवकर पावलं उचल. तो कालच सांगत होता की पुढच्या आठवड्यात जर्मनी ला जातोय एक वर्षासाठी. प्रॉडक्ट डिझाइन च्या एका चांगल्या कोर्स ला ऍडमिशन मिळालीय त्याला. त्याचा त्यांच्या फॅक्टरी मध्ये काम करण्याचा अनुभव आहेच. त्यामुळे एकंदरीत कोर्स करून आल्यावर त्यांच्या बिझनेसला चांगला फायदा करून घेऊ शकेल असं म्हणत होता ", आर्यन.

"ओह!", रिया उद्गारली. "आर्यन, तुला काय वाटतं, त्याच्या मनात फिलिंग्स असतील का माझ्याबद्दल?", रिया ने विचारले.

"अर्णव त्याच्या मनाचा थांगपत्ता लागू देतो का ग कुणाला? त्यामुळे नक्की तर नाही सांगू शकत पण तुझा विषय निघाल्यावर त्याच्या आवाजात एक वेगळाच आनंद आणि उत्साह जाणवतो मला खूपदा. आडून आडून तुझ्याबद्दल विचारत असतो. आणि आणखी एक सांगू का, वर्षभरापूर्वी मिष्टीच्या लग्नाच्या दिवशी आम्ही सगळे जमलो होतो हॉलमध्ये . तू मिष्टीची तयारी करून देत होतीस त्यामुळे बाहेर यायची होतीस . जय, निकी सुद्धा आलेले होते. पण त्याचं विशेष लक्षच नव्हतं आमच्याशी बोलण्यात. त्याचे डोळे फक्त तुझी वाट बघत होते. तू येईपर्यंत त्याला चैन पडत नव्हती. आणि तू आलीस न , त्या क्षणी मी त्याला बघितलं तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि डोळ्यातली चमक अशी होती की अगदी सांगताही येणार नाही शब्दांत मला. पण कसं आहे , तो आपलं मन उघड करत नाही ना सहसा, त्यामुळे शंभर टक्के खात्री तर देऊ शकत नाही मी " , आर्यन घराला कुलूप लावता लावता कानाजवळ खांद्यावर फोन धरून बोलत होता आणि पायऱ्या उतरून खाली पार्किंग मध्ये गाडीजवळ आला.

"म्हणजे मला दोन तीनदा असे जाणवले ते उगाच नाही तर !" , रियाच्या चेहऱ्यावर स्मित फुलले. "माझा एकही डान्स परफॉर्मन्स अर्णव चुकवत नाही . त्यादिवशी इंटरकॉलेज डान्स कॉम्पिटिशन होती, तुला आठवत असेल. माझा कथ्थक चा डान्स परफॉर्मन्स होता. तिथून परत येताना दुसऱ्या कॉलेजच्या काही मुलांनी बोलून माझी छेड काढली होती. अर्णव इतका चिडला होता ना ! धावूनच गेला होता त्यांच्यावर. ती मुले एकदम चूप झाली मग".

"हो ना, आठवतं मला", आर्यन म्हणाला ," मी मागून येत होतो, काय झालंय हे मला कळे पर्यंत तो त्यांना भांडून, दम देऊन मोकळाही झाला होता. त्याला इतकं चिडलेला मी पहिल्यांदाच पाहिलं होतं तेव्हा", आर्यनला आठवलं.

"हो ना", रिया.

"रिया, अर्णवशी बोलल्यानंतर तुला गरज वाटली तर तू त्याच्या बाबांशीही बोलू शकतेस किंवा आईशीसुद्धा बोलू शकतेस. आपला अर्णव shy, लाजराबुजरा आहे पण ते दोघेही फ्रेंडली आहेत हे तुला तर माहितीच आहे. समजून घेतील ते तुम्हाला", आर्यन गाडीत बसता बसता म्हणाला.  "आणखी एक आयडिया देऊ का ?"

"हो, बोल ना", रिया.
"मला तर वाटतय तू अर्णवला न कळवता त्याच्या घरी जावंस . आधी काकांशी बोलून घे. उद्या त्यांना सुट्टी असेल. त्यांना तू उद्या येत असल्याचं सांग . अन अर्णव ला कळू देऊ नका म्हणावं. म्हणजे महाशय कुठे पळून जाणार नाहीत. सापडतील तुम्हाला घरी बोलायला. नाहीतर काय भरवसा त्याचा , तू भेटायचं म्हणालीस तर कामाचे बहाणे करेल उगाच , अन जाण्याआधी भेटणं राहून गेलं तर? त्यापेक्षा मी सांगतोय तसंच कर, एकदा तो जाण्याआधी प्रत्यक्ष बोलणं व्हायला हवं न तुमचं" . आर्यन ने सुचविले.

"ओह, बरं झालं रे तू सगळं सांगितलंस. थँक्स , तुझ्यासारखा मित्र आहे म्हणून बरं आहे. नाहीतर काय झालं असतं माझं कोणास ठाऊक! बघते , बाबांशी बोलते नि ठरवते जरा विचार करून. बाबा काल परवाच मला लग्नासाठी मुले बघण्याबद्दल विचारत होते तर मी सध्या नको म्हटलं , आणि आता मात्र ... कसं बोलणार ना आता?" , रिया.

"हं ते तर आहेच, पण बोलावं लागेल आता . अन थँक्स काय, आपले दोन चांगले फ्रेंड्स खुश होणार असतील तर मदत करणारच ना मी ? आयुष्यभराचा प्रश्न आहे.
ओके, मी आता निघतोय ऑफिसमध्ये, कुछ लगेगा तो ये बंदा मदद के लिए हाजिर रहेगा",  गाडी सुरू करत आर्यन पुन्हा मिस्किलपणे म्हणाला .

"थँक्स, बाय आर्यन, काळजी घे". रिया म्हणाली. पण आज आर्यनशी बोलल्यानंतर ती विचारात पडली होती. संध्याकाळी बाबांशी बोलू या असे तिने ठरवले आणि कामाला लागली.

*****

संध्याकाळी रिया ऑफिसमधून घरी आली. फ्रेश होऊन तिने स्वयंपाक करायला घेतला. स्वयंपाक करता करता बाबांशी कसे बोलावे हाच विचार रियाच्या डोक्यात घोळत होता.

थोडया वेळाने राहुल ऑफिसमधून घरी आल्यानंतर रियाने दोघांसाठीही ताटे वाढून घेतली आणि ते आणि डायनिंग टेबल वर जेवायला लागले . रिया कसला तरी विचारात गढून वाटीतलं टोमॅटो सूप चमच्यात आणि चमच्यातलं पुन्हा वाटीत असं करत बसली होती. डोळे एकटक कुठेतरी हरवल्यासारखे दिसत होते.

राहुल ने रियाला किंचित हलवले ," रिया, जेवणात लक्ष नाहीये तुझं, काय झालं, काही बोलायचं आहे का?".

"अं, हं, हो",  रिया भानावर आली.

"सांग ना बेटा, काही प्रॉब्लेम आहे का ऑफिसमध्ये?", राहुल.

"न .. नाही बाबा", रिया.

" मग काय झालंय , नेहमी किती अवखळपणे हसत बडबडत असतेस तू जेवताना, आज का शांत आहेस, काय विचार करते आहेस?" , राहुल.

"बाबा, ते... " , रियाला सुरवात कशी करावी ते कळेना.
"तुम्ही काल लग्नाबद्दल म्हणत होतात ना....", रिया शब्दांची जुळवाजुळव करत खाली मान करून बोलण्याचा प्रयत्न करत होती.

"हं, त्याबद्दल बोलायचं आहे? माझी बेटी लग्नाला तयार होते आहे तर  ! म्हणून लाजते आहेस का? " राहुलच्या चेहऱ्यावर स्मित झळकले.

"तसं नाही बाबा, मला ..." , रिया पुन्हा अडखळली.

"मला काय, कोणी आवडलाय की काय आमच्या राजकुमारीला ? ", राहुल.

"खरं सांगायचं तर... हो बाबा" , रिया .

"क्काय ? मी तर मस्करी करत होतो . कोण मुलगा आवडतो तुला ?" , राहुलचे डोळे विस्फारले होते.

"म्हणजे ... बाबा... मला... मला अर्णव आवडतो. माझं प्रेम आहे त्याच्यावर", रिया.

" oh तो ये बात है ? चांगला आणि गुणी मुलगा आहे तो. लहानपणापासूनच बघत आलोय मी त्याला. बोलला का तो तुझ्याशी तसं काही ?" ,राहुल.

"नाही ना. तो काही बोलला तर नाहीये, पण मला कधीकधी असं वाटतं की त्याचंही माझ्यावर प्रेम असावं. बाबा, माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. मी त्यालाही काही सांगितलं नाहीये , आणखी काही दिवस वाट बघून, आधी तुम्हाला विचारून, मगच मी बोलणार होते त्याच्याशी. पण आता मला घाई करावी लागेल असं दिसतंय. कारण तो जर्मनीला जातोय दीडेक वर्षांसाठी. येत्या पाच सहा दिवसात जाणार आहे", रिया सांगत होती.

" बाबा, तुम्ही मला लहानपणापासून वडिलांचे आणि आईचे असे दोघांचेही प्रेम दिले आहे. मी तुमच्या शब्दाबाहेर नाही बाबा. तुम्ही मला एक चान्स द्याल ना? मला समजून घ्याल ना? प्लीज बाबा", रिया आशेने राहुलकडे बघू लागली.

"बेटा, तू अर्णवला विचारण्याआधी मला विचारलंस यातच सगळं आलं. आईवडिलांचा आपल्या मुलांवर खूप विश्वास असतो बेटा. त्या विश्वासाला जपणं हे मुलांच्या हाती असतं. माझा विश्वास आहे तुझ्यावर . तू योग्य विचार करूनच लग्नासाठी मुलाची निवड करशील." , राहुल.

"तुझी आई असती तर तिने तुला नीट समजावून सांगितलं असतं. रिया, बेटा, प्रेम करणं सोपं असतं, पण ते निभावणं तितकंच कठीण ! प्रेम आणि क्षणिक आकर्षण यात गल्लत होऊ देऊ नकोस हं बेटा. प्रेम काळाच्या आणि खरेपणाच्या कसोटीवर उतरायला हवं.

आणखी एक असं, की मी असं ऐकलंय की अर्णवचे आईवडील एकत्र राहत नाहीत...
याचा तुमच्या नात्यावर काही परिणाम होऊ न देता तुम्ही आयुष्यभर एकमेकांची साथ देऊ शकाल का ? ....
तू अर्णवला समजून घेऊ शकशील का? ....
तू नीट सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घे आणि नंतर अर्णवशी बोल.

एक लक्षात असू दे, अर्णवचे उत्तर काहीही असो तू धीराने ऐकून घ्यायचे आणि शांतपणे सामोरी जायचे. खऱ्या प्रेमात अपेक्षा आणि बंधनं ही यायला नकोत. प्रेम हे जबरदस्तीने करविता येत नसते बेटा. त्याला त्याचा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दे. जे आपलं असेल ते आपल्याकडे चालून येतं. आपलं ज्या व्यक्तीवर प्रेम आहे ती आपल्या आयुष्यात सोबत असणं यातलं सुख आणि आनंद तर निर्विवाद असतातच. पण... ती व्यक्ती सोबत नसली तरी ती तिच्या आयुष्यात आनंदात आहे, यातही आपल्याला समाधान आणि सुख मानता येत असतं. ही वाट कठीण असली तरी अशक्य नसते",  राहुल शांतपणे रियाला सगळं समजावत होता.

"हो, बाबा. मी आतापर्यंत तरी अर्णवला समजून घेऊ शकले आहे. पण तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मी नीट लक्षात ठेवेन. तुमच्या विश्वासाला नेहमी सार्थच ठरवीन. न रागावता माझं ऐकून, मला समजून घेतलेत तुम्ही, थँक्स बाबा ". रियाला डोक्यावरचे अर्धे ओझे उतरल्यासारखे वाटत होते.

"बेटा, मी बाबा आहे ग तुझा, शेवटी तुझं हित , सुख आणि आनंद हेच बघणार ना मी?", राहुल तिला डोक्यावर थोपटत म्हणाला.

" बाबा, तुमचे खूप प्रेम आहे ना आईवर?" , रियाचे डोळे पाणावले होते.

"हो. तिची जागा मी आयुष्यात दुसऱ्या कोणालाही देऊ शकलो नाही. आम्ही सोबत असण्याचा काळ खूप कमी होता पण त्यात तिने जे भरभरून प्रेम मला दिले आहे त्याच्या जोरावरच मी आजही स्वतः ला सांभाळले आहे. तू चार वर्षांची असताना ती अचानकच गेली. तू लहान असताना आजोबा मला बरेचदा दुसऱ्या लग्नासाठी म्हणत असत. पण माझी कधी इच्छा नाही झाली. तिच्या आठवणीच माझ्यासाठी पुरेशा आहेत" , राहुलच्या डोळ्यातसुद्धा आता पाणी आले होते.

त्याचा मूड ठीक करण्यासाठी लगेच रिया म्हणाली, " बाबा, मी आहे ना, मी नेहमीच तुमच्या सोबत राहीन. एकटे पडू देणार नाही तुम्हाला. वैसे भी हमे आई ने बराबर सिखा के रखा है कि बाबा को कैसे सताना हैं, कैसे उनसे जिद कर के अपनी हर बात मनवानी है " .

रिया स्वतः हसत राहुलला ही हसवण्याचा प्रयत्न करत होती.
आणि तिची मात्रा बरोबर लागू पडली . राहुल हसत तिला म्हणाला , "हो, हो. चांगलंच माहिती आहे मला ते . जेव आता लवकर. थंड होतंय जेवण. आता मात्र रिया पटापट जेवायला लागली. जेवणे झाली की पुढच्या गोष्टींचा आराखडा तिला बांधायचा होता ना !

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

*****

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

कथेचा हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा. वाचकांच्या प्रतिक्रिया हीच लेखकाची प्रेरणा :-)

🎭 Series Post

View all