परीघापलिकडले नाते पर्व दुसरे - भाग 5 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, parva, dusare, marathi, katha, story, spardha, Arnav, Riya, Anay, Anshika, Aryan, college, hostel, boarding, family, love, relation, friendship, maitri, kautumbik, kutumb


....अर्णवला लागलेले बघून रियाचा जीव खालीवर होत होता.  त्याला फ्रॅक्चर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पाय बांधून अर्णवला आता वीसेक दिवस घरीच राहावे लागणार होते.  त्याचा अभ्यास बुडू नये म्हणून रिया एक दोन दिवसाआड त्याच्याकडे जाऊन तिच्या नोट्स देऊन यायची. कधी कधी आर्यनसुद्धा नोट्स द्यायचा. अर्णव मग ते बसल्या बसल्या होईल तसे पूर्ण करायचा. कधी रिया तर कधी आर्यन दोघेही त्याला औषध वेळेवर घेण्यासाठी रागवायचे.

असेच एक दिवस अनयकडे ...
पायाला प्लास्टर लावलेला अर्णव त्याच्या खोलीत बेडवर मागे उशीला टेकून बसलेला होता. सुटी असल्याने अनयही घरीच होता. अंशिका अर्णवची काळजी घ्यायला काही वेळासाठी आलेली होती. तेवढ्यात आर्यन, रिया आणि मिष्टी अर्णवला भेटायला आले.

"हाय ब्रो, कसा आहेस?", आर्यनने आल्या आल्या विचारले.

"तुम्ही सगळे आल्यावर कसा असणार? मजेत आहे मी. बसा ना ", अर्णवने समोरच्या सोफ्याकडे हात दाखवत म्हटले. थोड्याच वेळात त्यांचे हसणे खिदळणे आणि गप्पांचा आवाज बाहेरही यायला लागला. तो ऐकून अंशिका आणि अनयलाही राहवले नाही. अनयने दामूकाकांना सर्वांसाठी कॉफी आणि काही खायला आणायला सांगितले आणि ते अर्णवच्या खोलीत आले. 

"छान महफिल जमली आहे. काय गप्पा चालल्या आहेत?", अनयने खुर्चीवर बसत कुतूहलाने विचारले.

"अंकल , ते माझ्यावर एक खूप कठीण प्रसंग आला होता ना त्याबद्दल बोलत होतो", रिया मिस्किलपणे म्हणाली.

"काय? काय ते ? सांग ना", अनय डोळे मोठे करत आश्चर्याने म्हणाला.
अंशिकालाही आता उत्सुकता वाटत होती.

"अंकल, आम्ही लहान होतो ना, तेव्हा अर्णवने चंगच बांधला होता ना की मला 'र' म्हणायला शिकवणार. मग काय एक दिवस त्याने मला एक exercise दिला ", रिया.

"अर्णवने? कुठला exercise?",  अंशिकाने उत्सुकतेने विचारले.

"तुम्हाला तर माहीतच आहे की मला लहानपणी र म्हणता यायचा नाही. तर आंटी, एक दिवस हा पठ्ठ्या मला म्हणाला, रिया हे वाक्य म्हणून दाखव,
"रात्री रुळावरून रेल्वे रखडत धावली".

"मग काय विचारता... प्रयत्नांची शिकस्त केली मी....

कधी म्हणायचे ,
"लातली लुलावलून लेलवे लखडत धावली",
कधी,
" लातरी लुलावरून लेलवे रखडत धावली",
तर कधी,
"रातली लुलावळून रेल्वे लखडत धावली",
पुन्हा,
" लातरी रूलावलून लेलवे रखडत धावली",

आणि असेच कितीतरी प्रयत्न केले. कधी एक र जमायचा तर पुढचा नाही, पुढचा जमला तर त्याच्यापुढचा नाही , तोही जमला तर पहिला पुन्हा बिघडायचा ..... आणि सुमारे महिन्याभराने जेव्हा मला हे जमलं ना, अगदी हुश्श झालं होतं मला, उडयाच मारल्या होत्या मी खूष होऊन ", रिया.

हे सांगताना रियाचे टपोरे असलेले डोळे आणखीच मोठे झाले होते. तिचे मिस्किल नाटकी हावभाव बघून अनय- अर्णवसहित सर्वजण पोट धरून खळखळून हसू लागले.

"कशी होते ना मी लहानपणी !", रिया.
"हां, बहुत क्यूट थी तू, अब भी वैसीही है , कार्टून", मिष्टी हसत म्हणाली.

असेच काहीतरी करून ही मुले अर्णवला हसवण्याचा प्रयत्न करायची. मुलांच्या अर्णवबरोबर राहण्याने अनय अंशिकाला सुद्धा बरे वाटायचे. अर्णवही तेवढाच खुशीत दिसायचा. 


काही दिवसांनी अर्णव बरा होऊन कॉलेजमध्ये  येताच वर्गातल्या मुलांनी जल्लोष करून त्याचे स्वागत केले.

"रिया, कल छुट्टी है, और मेरा बर्थडे भी है. तो तू मेरे घर पूरा दिन रहनेवाली है, मैने मम्मीसे भी पूछ लिया हैं", मिष्टी रियाला आग्रह करत होती.

मिष्टी आणि रियाचं गूळपीठ तर सर्वानाच माहीत होतं. त्यामुळे मिष्टीच्या आईने नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता.

बाबांनीही परवानगी दिल्यावर रिया दुसऱ्या दिवशी मिष्टीकडे गेली. तिच्या आजी आजोबांना नमस्कार केला. आजींनी तिची विचारपूस केली.

"कैसी है रिया बेटी? सब ठीक है न घर पे?", दादी.
" हां दादी, हम सब अच्छे हैं. आप की और दादाजी की तबियत कैसी है?", रिया.
"ठीक है बेटा. रिया बहुत बताते रहती है तेरे बारे में. आया कर हमसे मिलने . अच्छा लगता है".
"हां दादी , आऊंगी ", रिया.
"मिष्टी, तेरी सहेली को कुछ खिला पिला", दादी.

मिष्टीच्या आई आणि काकूंनी मिळून आज मिष्टीच्या आवडीचे बरेच गुजराती पदार्थ घरी बनवले होते. आजी बसल्याबसल्या त्यांना भाजी वगैरे निवडून देऊन मदत करत होत्या. आजोबा पेपर वाचत बसले होते. अधून मधून तेही गप्पांमध्ये सामील होत होते. मिष्टीची लहान चुलत भावंडं दीदी, दीदी करत तिच्या आजूबाजूला घोटाळत होती.

दुपारी सर्वजण एकत्र जेवायला बसले. हसत खेळत , गप्पा मारत जेवणे झाली. रिया आणि मिष्टीला सर्वांनी प्रेमाने आग्रह करकरून खाऊ घातले. संध्याकाळी मिष्टीने तिच्या काकूंनी घरीच बनवलेला केक कापला आणि सर्वांना भरवला. आई, काकू आणि रियाने मिष्टीलाही केक भरवला. रियाने मिष्टीला कॉलेजमध्ये कामा येईल अशी सुंदरशी स्लिंग बॅग आणि ब्रेसलेट दिले. कुठलेही अवडंबर न करता घरच्या घरी, साधेच पण सर्वांनी मनापासून आणि प्रेमाने साजरा केला होता वाढदिवस. मिष्टी खूप आनंदात होती.

सर्वांनी रियाला दिलेल्या प्रेमामुळे रियाचे डोळे भरून आले होते. संध्याकाळी जाताना तिने मिष्टीला मिठी मारली.  "माझी आई असती तर... तर ... माझीही फॅमिली अशीच राहिली असती ... ", रियाच्या मनात आले .

"मुझे रिटर्न में तुमने बहुत बडा गिफ्ट दिया है मिष्टी. बर्थडे तेरा है लेकिन गिफ्ट मुझे मिला है , इतनी प्यारी फॅमिली में एक दिन आना भी बहुत बडी बात है मेरे लिये. थँक यू सो मच", डबडबलेल्या डोळ्यांनी रिया म्हणाली.

मिष्टीने हे ओळखूनच तिच्या वाढदिवसाचं निमित्त साधून रियाला बोलावलं होतं.

कशी असते ना, ही मैत्री..
दुःखाच्या अश्रूंना
आनंदाश्रूत परिवर्तित करणारी...
मन मोकळं करताना
हसता हसता रडवणारी
अन रडता रडता हसवणारी...
दुःखाचे कढ थोपवून धरणारी....
आनंदाचा झरा खळाळत ठेवणारी...
आपल्याला समजून घेणारं आहे कोणीतरी...
असा विश्वासाचा खांदा देणारी ...
हेवेदावे, द्वेष , मत्सर यांना थारा न देणारी...
निखळ, निरागस, आयुष्यभर पुरणारी ...
खूप सुंदर असते ही मैत्री ...

लहानमोठ्या व्यक्तींनी भरलेलं कुटुंब ... सर्वांचा एकमेकांसाठी असलेला जिव्हाळा, आदर अन प्रेम .... हे बघून .... स्वर्ग म्हणजे अजून काय असणार.... रियाला वाटून गेले.

क्रमश:

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे आणि कवितेचे सर्वाधिकार लेेखिकेकडे राखीव.

हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा.

🎭 Series Post

View all