परीघापलिकडले नाते पर्व दुसरे - भाग 4 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, family, love, relations, kautumbik, katha, spardha, marathi, Arnav, Riya, Anay, Anshika, hostel, college, school, boarding


....आर्यन सांगू लागला...
"अरे, मलाही ती मुले भेटली होती आणि त्यांनी हेच सांगितलं की नेहमी फॉर्मल शर्ट घालायचा , टी शर्ट नाही चालणार, हे अन ते. असा राग आला होता यार. मी काय घालायचं हे ठरवणारे ते कोण? ", आर्यन वैतागत म्हणाला.

"आणि त्यानंतर काय झालं ते तर ऐका . कॉलेजच्या गेट समोरच्या रस्त्यावरून एक गुराखी आपल्या दोन म्हशींना घेऊन जात होता. ते इथून थोडया अंतरावर गवत असलेली एक मोकळी जागा आहे ना, तिकडे जात असावा बहुधा.

.... तर ह्या गेटपाशी बसलेल्या पठ्ठ्यांनी मला सांगितले की त्यातली मोठी काळीभोर म्हैस आहे ना, तिच्या समोर गुडघ्यावर बसून आय लव्ह यू म्हणून ये.

इकडे तर इतकी मोठी म्हैस, आणि तिचे लांब शिंग पाहूनच माझी पंढरी घाबरली होती. हिला माझा राग आला आणि हिने एखादी जरी लाथ मारली तर झालंच म्हणून समजा !" , आर्यनच्या चेहऱ्यावरचे हावभाव तर एकदम बघण्यासारखे होते .

मग ? गेलास की काय? रियाने डोळे विस्फारून आश्चर्याने विचारले.

हो मग...  करणार काय? वाऱ्याच्या वेगाने गेलो , पटकन गुडघ्यावर बसून म्हणालो कसं तरी अन पळतच आलो .

"मग? काय म्हणाली ती?", रियाने हसू दाबत विचारले.

"कोण?", आर्यन.

"अरे, कोण काय? म्हैस काय म्हणाली?", रिया मिस्किलपणे म्हणाली.

"अग तिने तर कबूल केले ना, मान हलवून .

'ह्यां ssssssव ' सुद्धा म्हणाली मोठयाने. 

रागाने की आनंदाने ते मात्र तिलाच ठाऊक .
पण ऐकायला मी थांबतोच कसला तिथे.... तुला सांगतो अर्णव, मोजून दहा सेकंदातच मी धावत जाऊन , खाली बसून आय लव्ह यू म्हणालो आणि आलोसुद्धा", आर्यन आता मात्र हसत हसत सांगत होता.

"काय यार माझं नशीब , प्रपोज भी करना पडा तो किसे !
हा ss य", आर्यन उलटा हात कपाळावर लावून दुःखाने 'हा ss य' ची ऍक्शन करत म्हणाला.

त्याच्या नाटकीपणाला सगळे खळखळून मनमुराद हसले. अर्णवच्या चेहऱ्यावरची खिन्नता आता दूर कुठेतरी गायब झाली होती....

"बाप रे, किती कठीण प्रसंग होता ना आर्यन? ", हसतच रिया म्हणाली.

सर्वांचे खाणे जवळपास झालेच होते. तेवढ्यात मिष्टीचे लक्ष घड्याळाकडे गेले.

"अरे, चलो जलदी, हसते हसते टाइम कैसे निकल गया पता ही नही चला. ब्रेक खत्म हो रहा है", मिष्टी घड्याळ दाखवत म्हणाली. सगळे घाईने पुन्हा लेक्चर साठी गेले.

सर्वजण वर्गात बसलेले होते. दोन लेक्चर्स नंतर तिसरे लेक्चर ऑफ मिळाले. तीन चार सिनिअर मुले वर्गात आली. त्यांनी मुलांची ओळखपरेड घेतली आणि प्रत्येकाला काही तरी सादर करायला सांगत होते. मिष्टीला त्यांनी गाणे गायला सांगितले. मिष्टीने सुंदर रित्या गाणे सादर केलेले पाहून त्यातला एक जण म्हणाला,

" अरे, ये तो अच्छी सिंगर निकली".

त्यानंतर एकाने रियाला माधुरी दीक्षित चा अभिनय करायला लावला. रियाने हम आपके हैं कौन मधल्या माधुरीच्या भूमिकेसारखा अभिनय केला. सर्वांनी दोघींसाठीही टाळ्या वाजवल्या.  तेवढ्यात पुढील लेक्चर घेणारे सर वर्गात आले आणि सिनिअर मुले बाहेर पळाली.


कॉलेज संपल्यावर रिया, मिष्टी आणि अर्णव आपापल्या घरी तर आर्यन हॉस्टेल ला गेला.

असेच खेळीमेळीत दोन चार दिवस गेले आणि नंतर मात्र अगदी नियमित अभ्यास, प्रॅक्टिकल्स, असाइनमेंट्स सुरू झाले. अर्णव, रिया, मिष्टी, आर्यन अभ्यास, प्रोजेक्ट साठी कधीकधी एकमेकांच्या घरीही जात. भराभर दिवस जात होते. पहिली सेमिस्टर परीक्षासुद्धा जवळ आली. आता मुलांना तयारीसाठी काही दिवसांची सुट्टी मिळाली होती. मुले रात्रीचा दिवस करून अभ्यास करत होती. एकेका विषयासाठी तीन चार मोठमोठी जाडजूड पुस्तके , नोट्स इत्यादींचे वाचन सुरू होते. शेवटी एकदाची परीक्षा संपली आणि पुन्हा कॉलेज सुरू झाले. मुले आता या कॉलेज च्या दिनक्रमात पुन्हा रुळली होती.

कॉलेजचे दिवस कसे फुलपाखरासारखे भुर्रकन उडून जातात. बघता बघता मुलांचे फायनल इयर सुरू झाले होते. आर्यन आणि अर्णवने मागच्या वर्षी कॉलेजच्या फुटबॉल टीम मध्ये प्रवेश केला होता. यावर्षी इंटरकॉलेज चॅम्पियनशिप होणार होती. त्यात बऱ्याच स्पर्धा होणार होत्या. सहभागी होणारी सर्व मुले त्याच्या तयारीला लागली होती.

"अर्णव तू कोणत्या स्पर्धेत सहभागी होणार आहेस?", आर्यन.

"मी नाही घेत आहे स्पर्धेत भाग, फुटबॉल खेळेन ना", अर्णव म्हणाला.

"अर्णव , ही आपला शेवटची संधी आहे न कॉलेजमधली. घे ना एखादया स्पर्धेत भाग. तुला आठवतं ना साठे सरांनी आपल्याला काय सांगितलं होतं ते?",  रिया.

"अर्णव, तू  गाणं गा ना एखादं, गिटार च्या साथीने. किती छान वाजवतोस. खूप छान होईल तुझा परफॉर्मन्स", आर्यन.
शेवटी अर्णव तयार झाला.

स्पर्धेचा दिवस आला आणि स्पर्धा सुरू झाल्या. मिष्टीने कला प्रदर्शनात तिचे पेंटिंग्स ठेवले होते. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. घसा थोडा खराब असल्याने तिला गाणे गाता येणार नव्हते. आर्यनने कार्यक्रमाचे संचालन करण्याचे काम आपल्या हाती घेतले होते.

नृत्यस्पर्धा सुरू झाली. ऑफ व्हाइट आणि सोनेरी रंगाचा मोहक ड्रेस आणि त्यावर सोनेरी आभूषणे घातलेली रिया डौलदारपणे स्टेजवर आली आणि कथ्थक फ्युजन केलेलं तिचं नृत्य सुरू झालं. 'काहे छेड़ छेड़ मोहे...'  या गाण्याच्या ओळींबरोबर तिची पावले थिरकू लागली.  लयबद्ध हालचालींबरोबरच घुंगरांचा मंजुळ आवाज घुमत होता. तिच्या चेहऱ्यावरच्या मोहक हावभावांवरून प्रेक्षकांची नजर हटत नव्हती. तिने टाळ्यांच्या कडकडाटात बक्षीस मिळवले.

काही वेळाने आर्यन बॅक स्टेजला थांबून अर्णवला त्याच्या परफॉर्मन्स साठी खुणावून बोलवत होता. अर्णव प्रेक्षकांमध्ये बसलेला होता . त्याने आर्यनला 'थांब, नंतर करतो ' अशी खूण केली. मग आर्यनने तोपर्यंत दुसऱ्या एक दोन मुलांना परफॉर्मन्स साठी बोलावले. थोडया वेळाने रिया आणि मिष्टी प्रेक्षकांमध्ये येऊन बसल्या. अर्णवने आर्यन ला खूण करून तो तयार असल्याचं सांगितलं. अर्णवचे नाव पुकारले गेले.
अर्णव गिटार ची साथ देत
'तू ही रे .. तेरे बिना मै कैसे जिऊँ
आजा रे युंही तडपा न तू मुझको...'
हे गाणे गाऊ लागला. डोळे मिटून अत्यंत भावनिक होऊन गायलेले त्याचे गाणे संपले तरी भारावलेले प्रेक्षक काही मिनिटे त्या गाण्याच्या मूडमध्ये, स्तब्धच राहिले होते , इतके त्याचे गाणे सुंदर झाले होते . टाळ्या आणि वन्स मोअर च्या गजरामुळे अर्णवने पुन्हा एक कडवे गायले. आर्यनने कार्यक्रमाचे संचालन आपल्या खुमासदार शैलीत करून कार्यक्रम आणखी रंगतदार होण्यास हातभार लावला होता .

स्पर्धांनंतर दुसऱ्या दिवशी फुटबॉल चॅम्पियनशिपची फायनल मॅच सुरू होती. अर्णवच्या कॉलेज बरोबर दुसरी एक टीम खेळत होती. दोन्ही संघांचे सारखेच गोल होऊन अगदी अटीतटीची लढत सुरू होती. शेवटच्या मिनिटाला कोण जिंकणार याकडे सगळे अगदी श्वास रोखून बघत होते. अशातच अर्णवने कसोशीने प्रयत्न केला आणि शेवटचा गोल करण्यात तो यशस्वी झाला . गोल झाला पण अर्णव दुसऱ्या टीममधल्या खेळाडूच्या पायात पाय अडकून धाडकन पडला. त्याने आपल्या कॉलेजला ट्रॉफी मिळवून दिली, पण त्याला दुखापत झाली होती ....

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

संपूर्ण कथेतील पात्र आणि घटना पूर्णपणे काल्पनिक असून त्या कल्पनेतच असू द्याव्या. त्यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. आढळल्यास लेखिकेची जबाबदारी नसून तो निव्वळ योगायोग समजावा.

हा पार्ट कसा वाटला ते जरूर कळवा.

🎭 Series Post

View all