परीघापलिकडले नाते पर्व दुसरे - भाग 3 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, parv, dusre, family, love, relation, spardha, kautumbik, katha, kutumb, marathi, story, hostel, college, Arnav, Riya, Anay, Anshika, Aryan... काही दिवसांनी...

ड्रायव्हर काकांनी अर्णवला कॉलेजच्या गेटपाशी सोडले आणि ते गाडी घेऊन परत निघून गेले. पांढरे शुभ्र शर्ट, ब्लॅक पॅन्ट, ब्लॅक शूज, केस नीट सेट केलेले, हातात ब्लॅक डिजिटल स्मार्ट वॉच. खिशाला लावलेला उंची पेन, खिशात मोबाईल, हातात एक दोन मोठ्या वह्या ... अशा पेहरावात अर्णव गेटमधून आत येऊन पुढे जाणार , तोच

"ओय हिरो, दिसत नाही का आम्ही इथे बसलोय ते?",  गेटजवळच्या एका कट्ट्यावर बसलेल्या तीन चार आडदांड  मुलांपैकी एक जण अर्णवला म्हणाला.

मुलं कसली ? वय आणि एकंदरीत शरीरयष्टी बघता त्यांना 'काका' च म्हणावेसे वाटले अर्णवला तर. वर्षानुवर्षे नापास होत जाणारी ही मुले. आजपासून फर्स्ट इयर च्या मुलांचे कॉलेज सुरू होणार होते ना, तर आली होती नेहमीप्रमाणे नवीन मुलांना त्रास देण्यासाठी. अन अर्णव आल्या आल्याच नेमका तावडीत सापडला.

"अं..., हो... मी ...ते...", अर्णव त्यांच्याकडे पाहून जरा गडबडलाच.

"मग काही, नमस्कार - चमत्कार, हाय - हॅलो वगैरे ?" , मुलगा जरा करड्या आवाजात म्हणाला.

"हॅलो", अर्णव म्हणाला.

"Where is the third button of your shirt?", मुलगा.

"Here", अर्णव बटनाला हात लावत म्हणाला.

"सापडलं ना? गुड. आतापासून रोज , जोपर्यंत कॉलेज कॅम्पस मध्ये आहेस, तोपर्यंत फक्त या थर्ड बटन कडे नजर ठेवायची. कोणत्याही सिनिअर ला नजर वर करून बघायचं नाही. आवाज वाढवायचा नाही. काय , समजलं की नाही?",  मुलगा.

"हं", अर्णव.

"आता हे घे. त्या दोन मुली चालल्या आहेत ना, त्यातल्या ब्लॅक ड्रेस वालीला द्यायचं. धावत जायचं, अन गुडघ्यावर बसून हे द्यायचं. तिने घ्यायला हवं, परत आणलंस तर बघ", मुलगा. बाकीची मुले फिदीफिदी हसू लागली.

"पण मी... मी कसं.... मी ओळखत पण नाही त्यांना... मग कसं...",  अर्णव घाबरून म्हणाला. सरळ साधा अर्णव , असे उपदव्याप तर गावीही नव्हते त्याच्या.

"ओळखत नाही ना? .... म्हणून च द्यायचं... अशीच तर ओळख होईल ... तुझी नाहीतर आमची तरी होईल ...जा आता. जास्त बडबड करू नकोस. जा लवकर" , मुलगा जरबेने म्हणाला.

अर्णवने ते घेतलं आणि सांगितल्याप्रमाणे धावत जाऊन त्या दोन मुली जात होत्या त्यांच्यातील काळ्या ड्रेसवाल्या मुलीसमोर गुडघ्यावर बसला. ती आडदांड मुले तिकडे बघतच होती.  अर्णवला अचानक असे समोर बसलेले पाहून ती मुलगी दचकून मागे सरकली.

"ए काय आहे? कोण आहेस तू?", ती मुलगी आश्चर्याने म्हणाली.

अर्णवने ते फूल तिच्यासमोर धरले.
"मी तुम्हाला ओळखत नाही, पण प्लीज हे घ्या ना. ", अर्णव अजीजीने म्हणाला.

"कमाल आहे तुझी, मी कशाला हे फूल घेऊ, सॉरी मी नाही घेऊ शकत",  मुलगी.

"प्लीज, त्या मुलांनी पाठवलंय मला", अर्णव.
मुलींनी एकदा मागे वळून पाहिले . ती आडदांड मुले हसत हसत अर्णवचा केविलवाणा झालेल्या चेहऱ्याकडे बघत मजा घेत होती.

दुसरी मुलगी म्हणाली, "दीक्षा , तू ले ले फूल, परेशान कर रहे हैं वो लोग इसे".

दीक्षा ने फूल घेतले.
"Thank you so much. Don't worry, मी तुम्हाला त्रास देणार नाही", अर्णव उठत म्हणाला .

त्याने त्या आडदांड मुलांकडे बघितले. एकाने त्याला जाण्याची खूण केली. अर्णवला हायसं वाटलं. तो भराभर चालत फर्स्ट इयर च्या बिल्डिंग मध्ये गेला.

आर्यन आणि रिया आणि मिष्टी त्याला खालीच भेटले.
"अरे, तुला इतका उशीर कसा झाला अर्णव? लेक्चर ची वेळ होत आलीय, चला लवकर आता आणि हं, चेहरा का पडलेला दिसतोय तुझा?", रिया.

"सांगतो नंतर ब्रेक मध्ये. आता चला", अर्णव.

सर्वजण लेक्चर साठी गेले. लेक्चर मध्ये सर्वांची ओळख वगैरे झाल्यावर शिकवणे सुरू झाले. एकामागे एक असे चार वेगवेगळे लेक्चर्स झाल्यानंतर सर्वजण काहीतरी खायला कॅन्टीनमध्ये गेले. रिया आणि अर्णव ने दोन इडली सांबर ऑर्डर केले , आर्यन ने मिसळपाव तर मिष्टी ने पावभाजी ऑर्डर केली.  खात खात सर्वजण गप्पा मारायला लागले.

"अरे अर्णव, तू काहीतरी सांगणार होतास ना? का उशीर झाला तुला एवढा, आपण तर साडेनऊलाच यायचे ठरवले होते", आर्यन.

"मी तर आलो रे बरोबर, पण तरी इथे पोचता नाही आलं मला वेळेवर", अर्णव.

"का, काय झालं?", रिया.

"गेटमधून आत आल्या आल्याच काही धिप्पाड टारगट मुलांनी अडवलं होतं मला. कॅम्पस मध्ये नेहमी थर्ड बटन कडे नजर ठेवायला सांगितले", अर्णव.

"एवढंच ना? मग तुझा चेहरा इतका पडलेला आणि दमलेलाही का वाटत होता , अर्णव?", रिया.

"अग खूपच जरबेने बोलले ते माझ्याशी.... आतापर्यंत घरीच काय, बाहेरसुद्धा कोणी असं बोललं नाही कधी माझ्याशी.... भरीस भर म्हणून आणखी एक गोष्ट करायला लावली त्यांनी मला....", अर्णव.

"काय?", आर्यनने विचारले.

"धावत जाऊन गुडघ्यावर बसायचं ....आणि त्यांनी सांगितलेल्या एका मुलीला गुलाबाचं फूल द्यायचं .... हे सुद्धा करायला लावलं त्यांनी मला. अस्सा घाबरलो होतो ना मी ! ....मला तर वाटलं , एक चापट ठेवून देते की काय ती मुलगी मला!....
काय यार, काय वाटलं असेल त्या मुलीला? काय विचार करेल ती माझ्याबद्दल? मी असा मुलगा नाहीये ग रिया, येताजाता कोणालाही असा त्रास देणारा....  ती मुले मजा बघत बसली होती . माझा केविलवाणा चेहरा बघून फिदीफिदी हसत होती .... ", सगळं पुन्हा आठवून अर्णवच्या चेहऱ्यावर खिन्नता पसरली होती.

"ओह, अर्णव, फारच विचित्रपणा केला त्यांनी. फारच टारगट मुले होती वाटतं. अशा त्यांच्या विचित्र खेळांमुळे कोणाचं नुकसान नको व्हायला. अशा गोष्टींमध्ये कसला असुरी आनंद मिळवतात देव जाणे.  बरं झालं, मी आणि मिष्टी लवकर आलो. तेव्हा ती मुले नव्हती आलेली कदाचित.

"रिया, हम कल से रोज जलदी ही आया करेंगे. फालतू में उनसे कौन लड के अपना दिमाग खराब करेगा", मिष्टी.

"मला तर यावंसंच वाटत नाही आहे कॉलेजमध्ये उद्या पासून. कसे बोलतात यार ते", अर्णव उदासपणे म्हणाला.

"अर्णव, असं करून कसं चालेल? आपल्याला शिकायचं आहे ना? तुला तुझ्या बाबांचा बिझनेस पुढे चालवायला ती योग्यता तर मिळवावी लागेल ना? अशा छोट्या छोट्या प्रसंगांना घाबरून कसं चालेल? त्यांच्याकडे लक्ष न देता दूरच राहायचं अशा मुलांपासून. आयुष्यात वेगवेगळ्या प्रकारचे, स्वभावाचे लोक भेटतात. जे आवडत नाहीत, वाईट स्वभावाचे असतील त्यांच्या नादी लागून आपला वेळ आणि मूड कशाला  घालवायचा?" , रिया.

थोडं थांबून ...
"आपले आईवडील आपल्या शिक्षणासाठी करत असलेल्या कष्टांची जाण आणि त्यांचा मान ठेवत, शिकून स्वतः ला समृद्ध करणे, आपल्या पायावर उभे राहणे, हेच फक्त आपलं ध्येय  ठेवायचं. मग या बाकीच्या गोष्टी कस्पटासमान वाटू लागतात", रिया.

"राईट", मिष्टी.
"हं", अर्णव.

"चिल ब्रो, त्यांनी मला काय करायला लावले हे ऐकशील तर .... त्यापुढे तुझे तरी चांगले होते असं म्हणशील तू.

"काय? तुलाही काहीतरी विचित्रपणा करायला लावला का?", अर्णवचे डोळे विस्फारले होते.

"हो", आर्यन.

"काय?" अर्णव.

"सांगतो", आर्यन सांगू लागला ....

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा.

🎭 Series Post

View all