ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी दुपारी आर्यन, अर्णव, मिष्टी आणि रिया चौघे एकत्र अभ्यास करायला बसले. वॉर्डनने त्यांना आपले लक्ष राहील अशा जागेवर टेबल खुर्ची ची व्यवस्था करून दिली होती.
"सरांनी तीन विषयांच्या प्रश्न पत्रिका दिल्या आहेत. आज कोणता विषय घेऊ या?", आर्यन.
"आज गणित घेऊ या?", रियाने विचारले.
"हं, चालेल", अर्णव, आर्यन, मिष्टी.
"आधी अर्धा तास आपण या तीन धड्यांचे पुनरावलोकन (रीव्हीजन ) करू या. नंतर सुरवात करू या", रिया.
सगळ्यांची रिव्हीजन करून झाल्यावर ...
"आता चार वाजलेत ना, बरोबर पाच वाजेपर्यंत हा पेपर आपण सोडवू. हे घ्या", आर्यन.
सगळे पेपर सोडवू लागले.
एक तासाने अर्णव म्हणाला, " ए स्टॉप रायटिंग, वेळ संपली".
अर्णवचा पेपर संपून दहा मिनिटे झाली होती . पण बाकीच्यांचे सोडवणे सुरूच होते.
"झालं", मिष्टी.
"अर्णव, तुझा पेपर लवकर झाला? बरोबर आहे , गणित तर आवडतं आहे न आपलं!", रिया मिस्किलपणे म्हणाली.
"हो दहा मिनिटं झाली माझं होऊन", अर्णव.
"अरे मला हे एक गणित सोडवता येत नव्हते, त्याचाच विचार करत होते. सांग ना हे कसं सोडवलंस", रियाने विचारले.
"अग, हा फॉर्म्युला चुकला न तुझा. मग कसं सुटेल गणित?",
अर्णवने ते गणित समजावून सांगितले. पुढे एक दोन आर्यनने तर एक मिष्टीने आपल्या अडचणी विचारल्या. सर्वांनी चर्चा करून आपापल्या अडचणी सोडवून घेतल्या.
सर्वांनाच अशाप्रकारे अभ्यास करताना छान वाटत होते. अर्णव ही खूष दिसत होता.
आता मात्र सर्वांना भूक लागल्या मुळे ते कॅन्टीनमध्ये गेले आणि प्लेट्स वाढून आणून खायला बसले.
"मजा आली न आज असा अभ्यास करायला? मला तर खूप छान वाटते आहे", रिया.
"हो आणि छान झाला न अभ्यास पण?", आर्यन. अर्णवच्या चेहऱ्यावर त्याला बऱ्याच दिवसांनी हसू उमललेले दिसत होते.
"अब कल मराठी का करते हैं साथ में. रिया तेरी languages की पढाई अच्छी है, तू कल सबको कविता का अर्थ वगैरे बताना", मिष्टी म्हणाली.
"हो, चालेल. उद्या मराठीचा अभ्यास करू या, एकत्र बसून".
खाणे आटपून सर्वजण परत गेले.
****
दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्वजण एकत्र बसले होते. रिया ठरल्याप्रमाणे ओळ वाचून कवितेचा अर्थ, भावार्थ सांगत होती. बाकीचे मध्ये आपल्या अडचणी विचारत होते. चर्चा झाल्यावर सर्वांनी पेपर सोडवला. आलेल्या अडचणींवर पुन्हा थोडीफार चर्चा झाली. आता सर्वजण मस्तीच्या मूडमध्ये आले होते. पण आता अर्णव मात्र पुन्हा शांत आणि थोडा उदास वाटत होता. खाली बघत तो एका बिनकामी कागदाचे बारीक बारीक तुकडे करत आपल्याच विचारात बसला होता. रियाने आर्यन ला खुणविले आणि त्याचे अर्णवकडे लक्ष वेधले. आर्यन ने मी बघतो अशी खूण केली.
"लिया, ए लिया, किती अभ्यास करायला लावतेस आम्हाला मराठीचा. थकलो बुवा आता", आर्यन मिस्किल पणे रियाला चिडवत म्हणाला.
"आ ss र्यन, माझे नाव रिया आहे", रिया डोळे मोठे करून आर्यनला मोठयाने म्हणाली.
"हो ना, तेच तर म्हटलं ना मी, लि sss या", आर्यन हसत पुन्हा तिला चिडवत म्हणाला.
"ए मी लहान होते ना तेव्हा, म्हणून मला रिया म्हणता येत नव्हते", रिया ओशाळत म्हणाली.
"हो का? तू लहान आणि आम्ही तर खूपच मोठे होतो ना तेव्हा, लि ss या?", आर्यन हसत हसत म्हणाला.
"आर्यन, थांब तू, बघतेच आता तुला", असं म्हणत रिया खुर्चीवरून उठून आर्यन ला मारायला पुढे झाली. आर्यन तिथून पटकन उठून खोलीच्या दुसऱ्या बाजूला पळाला. रिया हात उगारून त्याच्या मागे जाऊ लागली.. आर्यन पुढे अन रिया मागे ... शेवटी आर्यन च्या हातावर रियाची चापट बसली ... आणि नंतर दोघेही येऊन आपल्या जागेवर बसले. अर्णव आणि मिष्टी त्या दोघांची गंमत पहात बसले होते. मिष्टी खळखळून हसत होती तर अर्णवसुद्धा आपली उदासी विसरून हसायला लागला होता.
"तुम्ही दोघे ना, अगदी टॉम अँड जेरी आहात" , अर्णव हसत म्हणाला. सगळे हसू लागले. रियाला अर्णवला हसताना बघून समाधान वाटत होते.
"अर्णवने किती प्रयत्न केले होते लहानपणी मला 'र' म्हणायला शिकवण्यासाठी. शोधून शोधून मला 'र' चे शब्द म्हणायला लावायचा. माझं नाव पुन्हा पुन्हा म्हणायला लावायचा", रिया म्हणाली.
"हो, ना . हा आर्यन तुला चिडवत असायचा ना, मग मला आवडायचे नाही ते", अर्णव म्हणाला.
"आणि finally मला रिया म्हणता आले तेव्हा इतका आनंद झाला होता ना तुला! माझ्यापेक्षाही जास्त ! ", रिया गालात हसत अर्णवला म्हणाली.
"अग तू लवकर तुझं नाव नीट सांगायला शिकावे म्हणून चिडवायचो मी तुला. पण खरं सांगायचं तर खूप गोड वाटायचं ते ऐकायला", आर्यन हसत म्हणाला.
"असं का? बरं , कळलं हं", रिया हसत म्हणाली.
*****
असेच हसत खेळत अभ्यास करता करता दिवस पुढे जात होते. कुलकर्णी सर आणि प्रिन्सिपॉल सर अर्णवमध्ये होत असलेला सकारात्मक बदल बघून , आपला उपाय बरोबर लागू पडला म्हणून आनंदात होते.
शेवटच्या चाचणी परीक्षेत अर्णवने पुन्हा चढाई करून बाजी मारली होती.
.
.
काही दिवसांनी...
दहावीच्या परीक्षेत अर्णवने बाजी मारून सत्त्याण्णव टक्के मिळवले होते. रिया आणि आर्यन ने शहाण्णव टक्के तर मिष्टीने पंच्याण्णव टक्के मिळवले होते. दुसऱ्या दिवशी शाळेच्या नावाबरोबर या सर्वांचा फोटो पेपरमध्ये छापून आला होता. सर्वजण खूप आनंदात होते.
दुसऱ्या दिवशी अनय प्रिन्सिपॉल आणि सर्वांसाठी पेढे घेऊन आला.
"सर, तुम्ही अर्णवला समजावले नसते, नीट सांभाळून घेतले नसते तर आज हा दिवस असा बघायला मिळाला नसता. तुम्हा सर्वांचे आभार मानावे तितके थोडे आहेत सर. हे घ्या पेढे", अनय प्रिन्सिपॉल आणि इतर सर्व स्टाफ ला पेढे देत म्हणाला.
"मुलांच्या भविष्यासाठी झटणे हे आमचे कामच आहे. आपण वेळेवर योग्य ती पावले उचलू शकलो याचा आनंद वाटतो मला. यात रिया, आर्यनचा सुद्धा मोलाचा सहभाग आहे , बरं का! आमचा एकही शब्द खाली पडू न देता सावलीसारखे सोबत राहिले अर्णवच्या. त्याला अभ्यासात सुद्धा गुंतविले आणि त्याला विचारांच्या गर्तेत पुन्हा जाऊच दिले नाही. थोडाही उदास वाटला तर लगेच हसवायचे. अशी निरागस मैत्री छान जपलीय त्यांनी", प्रिन्सिपॉल.
त्यानंतर अनयने वॉर्डन कडे गेला.
"मॅडम, ज्या ममतेने तुम्ही सर्व मुलांना सांभाळता, तिला खरच तोड नाही. तुम्ही अर्णवकडे लक्ष ठेवले, त्याच्या वागण्यामध्ये जाणवलेल्या बदलाची वेळेवर माहिती दिलीत त्यामुळे आपण वेळेवर पावले उचलू शकलो. त्याला परत पूर्वीसारखे हसते खेळते बनवण्यासाठी तुमचाही मोलाचा हातभार आहे", अनयने वॉर्डन चे आभार मानत पेढे दिले.
"खरं, आहे सर, एकदा ही मुले इथे आली ना, की जणूकाही आमचीच मुले असल्यासारखे वाटते. सर्वजण जीव लावतात अगदी", वॉर्डन म्हणाली.
"त्यामुळेच तर आम्हाला निश्चिन्त राहून आपलं काम करता येतं", अनय . वॉर्डनशी आणखी थोडेफार बोलून तो निघून गेला.
.
.
काही दिवसांनी सुटी संपल्यावर मुले पुन्हा येऊन आपापल्या रोजच्या रुटीन मध्ये रमली. अभ्यासाबरोबरच अर्णव , आर्यन फुटबॉल मॅचेसमध्ये पुन्हा भाग घेऊ लागले होते, तर रियाचं नृत्य आणि संगीत सुरू झालं होतं. मिष्टी तिच्या पेटिंग आणि संगीताच्या क्लास मध्ये गुंतली होती. आर्यन आठवड्यातून तीन दिवस पोहण्यासाठीपण जायला लागला.
यावर्षी रियाने वादविवाद स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. 'Role of teachers in building the nation' या विषयावर तिने साठे सर, कुलकर्णी सर, प्रिन्सिपॉल या सर्वांना डोळ्यासमोर ठेवून भरभरून बोलत प्रतिस्पर्ध्यांची बोलती बंद केली होती. स्पर्धा गाजवून शाळेसाठी बक्षीस मिळवूनच रिया परतली होती. मिष्टीने देशभक्तीपर गीतांच्या स्पर्धेत 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणं सुंदर रित्या गाऊन बक्षीस पटकावले होते.
दिवस भराभर पुढे जात होते. बारावीच्या परीक्षेला आता काहीच दिवस उरले होते. अभ्यास , प्रॅक्टिकल्स यांची गडबड सुरू होती. आपल्या अडीअडचणी चौघेही एकत्र बसून चर्चा करून सोडवत असत.
काही दिवसांत बारावीची परीक्षा पार पडली. शेवटचा पेपर झाला. दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापल्या घरी जाणार होते. त्यांचा बोर्डिंग मध्ये शेवटचा दिवस असणार होता. आता सर्वांना परीक्षा संपण्याच्या आनंदापेक्षा एकमेकांपासून दुरावण्याचे दुःखच जास्त होत होते.
सगळे जड अंतःकरणाने आपले एकमेकांच्या मदतीने आपले सामान पॅक करत होते. काही उपयोगी असणाऱ्या वस्तू नववी दहावीतल्या मुलांना देत होते. सगळे आवरून सर्वजण आता कॅन्टीनमध्ये जमले होते.
"फाइनली सब टेन्शन खत्म. पर फिर भी थोड़ा अजीब सा लग रहा है. खुशी कम और दुख ही ज्यादा हो रहा है", मिष्टी म्हणाली.
"किती सुंदर होते न आपले इथले हे दिवस ! कित्ती मजा मस्ती करायचो आपण", रिया म्हणाली.
"हो ना, खरच उद्या पासून आपण भेटू पण शकणार नाही लवकर", आर्यन. नेहमी खेळकर असणारा आर्यनसुद्धा आज उदास वाटत होता.
"तुम्ही सगळेजण माझ्यासोबत असल्यामुळे मी असा घरापासून दूर इथे राहू शकलो. तुमच्याइतका स्ट्रॉंग नाही आहे मी . खूप सपोर्ट केलंय तुम्ही मला. खरच खूप मिस करेन मी तुम्हाला सर्वांना. खूप वाईट वाटतय मला असं सर्वांना सोडून जाताना", अर्णवचा चेहरा पडलेला दिसत होता. डोळ्यात पाणी तरळलं होतं.
तिघांनाही त्याच्या चेहऱ्यावरची खिन्नता बघवत नव्हती. नेहमी त्याला समजवणाऱ्या रियालाही आज काही सुचत नव्हते. तिलासुद्धा वाईट वाटत होतेच ना. तिच्या टपोऱ्या काळ्याभोर डोळ्यात आता पाणी यायला लागले होते.
अर्णव भावनिक होऊन आर्यनच्या गळ्यात पडला.
"I want you all to be with me further in the college, and always. Please ना, आपण पुढेसुद्धा एकत्रच शिकूया ना, मी नाही राहू शकणार तुमच्याशिवाय. खूप जड जाईल मला", अर्णवला आता हुंदका आला होता.
इकडे रिया आणि मिष्टी एकमेकींना मिठी मारून रडत होत्या.
वातावरण एकदम भावनिक झाले होते.
तेवढ्यात आर्यन काहीतरी विचार करत म्हणाला, " हो आपण असंच करू या. नाहीतरी आपल्याला सर्वांना इंजिनिअरिंग करायचे आहे. तर मग एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन घेऊ या ना".
"होईल का तसं? मिळेल का आपल्याला एकत्र?", रिया त्यांच्याकडे बघत म्हणाली.
"प्रयत्न तर करूच शकतो ना? चलो फिर, अब ये फायनल करते हैं, क्यों मिष्टी, तेरा क्या खयाल है?", आर्यन.
"फायनल", मिष्टी.
हे ठरल्यावर सर्वांना आता थोडं बरं वाटत होतं.
क्रमश:
© स्वाती अमोल मुधोळकर
काय होईल पुढे? बघू या.
कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.
हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा.
माझी या आधीची कथा '...अन जगायचे राहून गेले' ही सुद्धा नक्की वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा