परीघापलिकडले नाते पर्व दुसरे - भाग 11 अंतिम (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, kautumbik, katha, marathi, spardha, kutumb, family, love, relation, Riya, Arnav, Anshika, Anay, lagna, marriage, vivah


काही दिवसांनी ....

आज अर्णव एक वर्षाने जर्मनी हून परत येणार होता. रियाने आधीच बंगल्यावर येऊन झेंडूच्या फुलांच्या माळा लावून घर सजवले होते . लाल रंगाच्या हार्टच्या आकाराच्या फुग्यांनी आणि सुगंधित मेणबत्त्या लावून तिने अर्णवची खोली सुंदर सजवली होती.   भिंतीवर काही अंशिकाच्या वाढदिवसाच्या दिवशीचे सर्वांचे एकत्र फोटो तर काही अर्णवचे अनय अंशिकाबरोबरचे फोटोंचे कोलाज करून लावले होते. आता फक्त अर्णवच्या येण्याची सर्वजण वाट बघत होते.

अर्णवची गाडी गेटवर येताच रियाने सर्वांना खुणावून दाराशी बोलावले आणि एकदम दिसणार नाही असे उभे राहायला सांगितले. विमानतळावर आणि गेटवरसुद्धा त्याचे स्वागत करायला कोणीही आलेले नव्हते. हे बघून अर्णव थोडा हिरमुसला होता. त्याने ड्रायव्हर ला सामान आत पोचवायला सांगितले आणि तो दाराशी आला. अर्णव दारात येताच लपलेले अनय, अंशिका, आरोही, अर्णवचे आजी आजोबा , रिया सर्वजण एकदम पुढे आले. सर्वांना एकदम एकत्र बघून अर्णव आश्चर्यचकित झाला.

"सरप्रा sss ईज" , रिया हसून त्याला म्हणाली.

अर्णवच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. आजीने त्याला ओवाळून घरात घेतले. "आजीss", "आत्या ss" , आई, बाबा, अर्णवने एक एक करत सर्वांना मिठी मारली.

"हो, हो.... आता आम्ही इथेच राहणार आहोत तू बोहल्यावर चढेपर्यंत... सून तर खूपच खास शोधली आहेस आमची", आरोही.
अर्णव रियाकडे बघत गालात हसत किंचित लाजला.

"जा आता तू फ्रेश होऊन ये खोलीतून", अंशिका म्हणाली.

अर्णव खोलीत आला. त्याच्या मागोमाग रियासुध्दा तिथे आली. खोलीतील दृश्य बघून तो एकदम आश्चर्यचकित झाला. अर्णव सर्वांशी बोलत असताना रियाने हळूच वर येऊन मेणबत्त्या पेटवून ठेवल्या होत्या. अर्णव आत येऊन सर्व फोटो बघत होता.

"अँड धिस इज सरप्राईज नंबर टू sssss" , रिया

अर्णवच्या चेहऱ्यावर चा आनंद बघून रिया खूप सुखावली होती. अर्णवने तिचे हात हातात घेऊन त्यावर हलकेच किस केले.
"खूप खूप थँक्स रिया, खूप सुंदर सरप्राईज आहेत दोन्हीही. किती प्रेम करतेस ग माझ्यावर....  इतक्या वर्षांपासून दुरावलेल्या सर्वांना माझ्यासाठी एकत्र आणलेस तू .... थँक्स . आय लव्ह यू रिया. ", दोघांचेही डोळे पाणावलेही होते आणि इतक्या दिवसांचा विरह मिटल्याचा चेहऱ्यावर आनंदही होता... दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवले होते.

तेवढ्यात आरोही खोलीत येत त्यांना चिडवत हसून म्हणाली , "ओ लवबर्ड्स... चला सर्वजण नाश्त्यासाठी वाट बघत आहेत".
रिया लाजून खाली पळाली आणि अर्णव फ्रेश होण्यासाठी गेला.

सर्वांनी एकत्र बसून हसत खेळत नाश्ता उरकला. अर्णवने सर्वांना त्याने आणलेले गिफ्ट्स दिले.

अर्णव , आठ दिवसांनंतरचा लग्नाचा मुहूर्त निघाला आहे . तू तुझ्या मित्रांना वगैरे आमंत्रण देऊन ठेव. आणि आज आराम करून मग पुढच्या तयारीला लागायचे आहे.

*****

इकडे रियाकडेही आता राहुलने सर्व नातेवाईकांना बोलावले होते. रियाचे आजोबा, मामा, मामी, मावस बहीण इत्यादी सर्वजण पाच सहा दिवस आधीच आले होते. सर्वांनी मिळून रियाच्या दागिन्यांची, रुखवताच्या सामानाची, काही साड्या ड्रेसेसची खरेदी केली.

लग्नाचे सर्व विधी आणि स्वागत समारोहासाठी रियाचे शालू, साड्या आणि इव्हनिंग गाऊन मात्र अंशिकाने स्वतः खास डिझाइन करून बनवून घेतले होते. अखेर एकुलती एक लाडाची सून होती ना!

रियाने मिष्टीच्या माहेरच्या आणि सासरच्या परिवारालाही आवर्जून आमंत्रण दिल्यामुळे तेही लग्नाला उपस्थित होते. आर्यन, जय, निकी, मिष्टीसहित सर्व मित्रपरिवार, आणि दोन्ही कडच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत, मंगलाष्टकांच्या घोषात, सनई चौघड्याच्या निनादात रियाने अर्णवच्या गळ्यात वरमाला घातली. अर्णवनेही रियाच्या गळ्यात वरमाला घातली. विधिवत सप्तपदीचा कार्यक्रम पार पडला. अर्णव रियाच्या नवीन जोडीला सर्वांनी मनभरून आशीर्वाद दिले. रियाची पाठवणी करताना रिया आणि राहुलच्या डोळ्यांतले अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते... कसेबसे रियाच्या मामींनी आणि मिष्टीने त्यांना समजावले.

"फुलासारखे जपले आहे मी रियाला आतापर्यंत, माझ्या परीला मी तुमच्याकडे सोपवतो आहे. तिची यापुढे काळजी घ्याल ना?", राहुल पाणावलेल्या डोळ्यांनी अर्णव आणि अनयला म्हणाला.

"काही काळजी करू नका बाबा. तुमची परी आता माझी राणी झाली आहे. मी सुखात ठेवेन तिला. ", अर्णव राहुलचे दोन्ही हात धरत त्याला आश्वस्त करत म्हणाला.

"घ्या, आता चिरंजीवांनी एवढे मनापासून आश्वासन दिल्यावर आम्ही काही बोलण्याची गरजच नाही " , अनय हसून म्हणाला. आणि त्यामुळे सर्वांच्याच भावुक झालेल्या चेहऱ्यावर हसू उमटले.

"राहुल, तुम्ही काही काळजी करू नका. तिने जसा सर्वांना जीव लावला आहे, तसाच आमचाही जीव आहे तिच्यावर. काळजी घेऊ आम्ही तिची", अनय.

रियाने अर्णवच्या जीवनात सोनपावलांनी प्रवेश केला .


तीन वर्षांनी....

अर्णव हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होता. अंशिका आणि रिया स्वयंपाकघरात कामात होत्या. अर्णवने रिया ला आवाज दिला.

"रिया ss, ए रिया, प्रिन्स कुठे आहे? आणि ही आपली प्रिन्सेस उठली . ये इकडे..."
.....
रियाला त्याची हाक ऐकू गेली नसावी बहुधा मिक्सर च्या आवाजामध्ये.

"रिया sss" , अर्णव .

"आले , आले , रियांश पप्पांकडे आहे तोवर काम आटपून घेत होते. आजी आजोबांची जेवणाची वेळ होतेय ना, त्यामुळे कामात होते",  हाकेला उत्तर देत हॉलमध्ये येत रिया म्हणाली.

तेवढ्यात दोघांनाही एक नाजूक आवाज ऐकू आला...

"लिया..."

"अर्णव , अर्णव ... नव्याने तिचा पहिला शब्द उच्चारला .... माझे नाव घेतले तिने..... I am so happy अर्णव", रिया आनंदाने अर्णवला म्हणाली... दोघेही खूप खूष  होत नव्याजवळ आले होते

"पुन्हा म्हण बेटी... मी कोण ?? ", रिया.

"लिया..." , छोटीशी नव्या म्हणाली...

"And the story starts all over again ....", अर्णव रियाकडे बघत हसत म्हणाला. रियाही हसू लागली.

अशा रीतीने अर्णव रियाचे सुखी एकत्र कुटुंबाचे स्वप्न पूर्ण झाले  होते.  अनय - अंशिकाच्या परीघापालिकडे गेलेल्या नात्याला रिया - अर्णवच्या उमलत्या नात्याने खेचून परत परीघात आणले होते.


समाप्त


*******

© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव. हा पार्ट आणि संपूर्ण कथा कशी वाटली ते नक्की कळवा. अभिप्रायांच्या प्रतीक्षेत राहीन...कथेला आतापर्यंत दिलेल्या भरभरून प्रेमाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार. माझे इतरही साहित्य नक्की वाचा.

🎭 Series Post

View all