परीघापलिकडले नाते पर्व दुसरे - भाग 10 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, parva, dusre, marathi, katha, story, spardha, family, love, relation, kautumbik, kutumba, Riya, Arnav, Anay, Anshika

"अनय, अंशिकावहिनींनाही कदाचित ही जाणीव झाली असेल तर? .... कधी कधी समोरची व्यक्ती फक्त आपल्या एका हाकेची वाट बघत असते.... देव करो आणि असच असो", राहुल.

"अंकल, मीही तुम्हाला यासाठी लागेल ती मदत करायला तयार आहे. माझ्याकडे एक प्लॅन आहे. अर्णव जर्मनीला गेल्यावर आपण तो अमलात आणू या".

रियाने अनय आणि राहुल ला आपला प्लॅन सांगितला.
"ठीक आहे रिया. तुझा प्लॅन तर चांगला आहे. करू या आपण तसे", अनय.

"पण अंकल, यातले अर्णवला आधीच काहीही कळायला नको. Done ना अंकल?", रिया.

"ओ येस, येस, डन", अनय लगेच म्हणाला. आता त्यालाही एक आशेचा किरण दिसत होता.

काही वेळातच अर्णव खाण्यासाठी बरेच पदार्थ घेऊन आला. रियाने सर्वांना प्लेट्स दिल्या. रसमलाई आणि गुलाबजाम बघून अनय मिस्कीलपणे अर्णवला म्हणाला, " स्वारी भलतीच खुशीत दिसतेय आज ... गेल्या कित्येक दिवसांपासून गोड पदार्थांना हातही न लावणारा अर्णव आज दोन दोन मिठाई घेऊन आलाय ".

"बाबा.... ते.... रियाला रसमलाई आवडते आणि मला गुलाबजाम .... म्हणून....", अर्णव आता किंचित लाजत हसत होता.

आता राहुलच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू उमटले. सगळ्यांनी आनंदाने हसत खेळत खाणे संपवले. नंतर अनय आणि अर्णव घरी परत आले.

पाहता पाहता अर्णवचा जर्मनीला जाण्याचा दिवस उजाडला. रियाचे ऑफिसमध्ये लक्ष लागत नव्हते. तिने लवकर काम संपवले आणि अर्णवकडे गेली. तशी यावेळी रियाने हक्काने अर्णवची सगळी तयारी करून दिली होती. खाण्याचे जास्त दिवस टिकणारे काही पदार्थ, नेहमी उपयोगी पडतील अशी औषधे, गरम कपडे इत्यादी सगळे तिने आठवणीने दिले होते. तरीदेखील मनात चलबिचल होत होती. पूर्ण एक वर्षाचा विरह सहन करण्याच्या कल्पनेनेच आज तिचे मन भरून आले होते. तिच्या चेहऱ्यावरून अर्णवलाही ते जाणवत होते. अर्णवची अवस्थाही काही वेगळी नव्हतीच म्हणा. आता तर कुठे दोघांनी प्रेम व्यक्त केले होते आणि लगेच हा एवढा मोठा विरह !

रियाचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेऊन तो तिला म्हणाला, " रिया, थांबशील ना माझ्यासाठी? वाट बघशील ना ग माझी?".

आता मात्र दोघांनीही केव्हापासून थोपवून धरलेल्या अश्रुंनी डोळ्यांची साथ सोडली होती. "अर्णव", दाटून आलेल्या अस्फुटशा आवाजात रिया म्हणाली, "नेहमी लक्षात ठेवशील ना अर्णव, आहे कोणीतरी अशी एक वेडी...

जी तुझ्या वाटेकडे
डोळे लावून बसली आहे...
तुझ्याविना तुझ्याचसाठी
तुझी होऊन जगते आहे

ओठांत तिच्या तुझेच नाव
नि हृदयात चित्रही तुझे
आतुर होऊन स्पर्श तुझा
झुळुकेत शोधते आहे"

"रिया ss", अर्णवचा आवाज अत्यंत भावुक झाला होता.

"लवकर येशील ना अर्णव?" रिया.

"बस, यूं गया और यूं आया, स्वीटहार्ट !  और अब तो रोज हक से सताऊंगा न तुझे फोनपर.... छोडुंगा थोडेही", अर्णव तिला समजावत थोडे खुलवण्यासाठी म्हणाला. आता रियाचा मूड थोडा ठीक झाल्यासारखा वाटत होता.
अर्णवला विमानतळावर सोडून रिया परत घरी आली.

दुसऱ्या दिवशी पासून तिचा रोजचा दिनक्रम परत सुरू झाला. आता त्यात अर्णवच्या रोजच्या फोनचीही अर्थातच भर पडली होती. आता तिला आपल्या दुसऱ्या ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरु करायचा होता.

काही दिवसांनी तिने अनयला फोन केला.
"हॅलो अंकल, आपला प्लॅन लक्षात आहे ना?" रिया.
"हो, आजच आई बाबा आणि आरोहीशी बोलतो आणि सांगतो तुला", अनय.

अनयने घरी त्याच्या आईला फोन केला.
"आई, बाबा कसे आहात तुम्ही? ", अनय.
"ठीक आहोत, नेहमीप्रमाणेच दिनक्रम चालू आहे आमचा. तू सांग , काय म्हणतोस?", अनयची आई.

अनयने आईला अर्णव रियाबद्दल आणि त्याच्या आणि अंशिकाबद्दल सगळे सांगितले. "आई, मला झालेली चूक दुरुस्त करायची आहे. मी अंशिकाला एकत्र येण्यासाठी विचारायचं ठरवतो आहे", अनय.

"देवच पावला म्हणायचा !! आम्हा म्हाताऱ्यांना काळजी लागून राहिली होती तुमची , बस आता डोळे मिटण्यापूर्वी तुमचा सर्वांचा एकत्र सुखी संसार बघायची इच्छा आहे आमची", आई.

"असं बोलू नकोस ग आई, अजून तर तुम्हाला पतवंडांना खेळवायचे आहे. आई, खरच तू मागचं सगळं विसरून स्वीकारशील ना अंशिकाला पुन्हा मनापासून? आमच्या चुका पदरात घेऊन पुन्हा आशीर्वाद देशील ना आम्हाला?", अनय.

"हो. काळजी करू नकोस बाळा, सगळं ठीक होईल. तू बोलून घे तिच्याशी", आई.

"आई तुम्ही सगळे इथे या ना , मी एक प्लॅन करतो आहे, मी तिकीट काढतो तुमचे", अनय.

"ठीक आहे", आई.

अशाच प्रकारे अनयने आरोही आणि अंशिकाच्या आईवडिलांनाही बोलावून घेतले. रिया सर्वांना भेटायला अनयकडे आली. सर्वांना तिने नमस्कार केला.
" लाखात एक आहे हो माझी होणारी नातसून, नेहमी सुखी रहा" , अनयच्या आईने तिला आशीर्वाद दिला.

रियाने सर्वांना आपला प्लॅन समजावून सांगितला. मात्र अंशिकाला यातले काहीही कळू न देण्याची प्रेमळ पण सक्त ताकीद सर्वांना दिली.

बघता बघता तो दिवस आला. आज अंशिकाचा वाढदिवस होता. अनय आणि रियाने मिळून त्याच्या बंगल्यासमोरच्या हिरवळीवर पार्टीचे आयोजन केले होते. संध्याकाळी अनय अंशिकाचे आई वडील, रिया , राहुल, आरोही, आणि अंशिकाचा सर्व स्टाफ हे सगळे पार्टीसाठी उपस्थित होते. या सर्वांनाच अनयने पार्टीचे आमंत्रण दिले होते. 

रियाने अंशिकाला कॉल केला ," हॅपी बर्थडे आंटी".
"थँक यू बेटा", अंशिका.
"आंटी , मला तुम्हाला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा द्यायच्या आहेत. प्लीज इकडे बंगल्यावर या ना लवकर", रिया.
हो, नाही करत शेवटी अंशिका आली.

येताच तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एवढी मोठी पार्टी , त्यात दोन्हीकडचे नातेवाईक आवर्जून आलेले पाहताच तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. त्यांना भेटून होताच रिया हसतच अंशिकाला म्हणाली,
" आधा सरप्राइझ तो अभी बाकी है आंटी" .

पुढे गेल्यावर अंशिकाला संपूर्ण स्टाफ ने आणि नातेवाईकांनी एकसाथ मोठ्याने गात शुभेच्छा दिल्या.

"बार बार दिन ये आये, बार बार दिल ये गाये ... तुम जिओ हजारो साल ये मेरी है आरजू .... हॅपी बर्थडे टू यू"

अंशिकाने केक कापून अनय रिया सहित सर्व नातेवाईकांना आपल्या हाताने भरवला. जेवणखाण होऊन पार्टी संपल्यावर अंशिकाचा स्टाफ घरी गेला. आता सर्व नातेवाईकच राहिले होते. सर्वजण अंशिकाशी आधी इतकेच प्रेमाने बोलत होते. सर्वांचे आपल्यावर अजूनही प्रेम आहे हे बघून अंशिका भारावून गेली होती.

"रिया, तू सर्वांना घरात घेऊन जा. आई , मी आणि अंशिका आलोच थोडं फिरून ", अनय म्हणाला.

रिया सर्वांच्या नकळत अनयला खुणेनेच "ऑल द बेस्ट" म्हणाली.

अनय आणि अंशिका अनयच्या गाडीत बसून निघाले. अनय गाडी चालवत होता . अंशिका बाजूला बसली होती. अनयने हळू आवाजात संगीत लावले होते.

"अनय, खूप छान सरप्राईज होते, तुला लक्षात होतं? ", अंशिका.

"ऑफ कोर्स अंशिका, तुझा पन्नासावा वाढदिवस आहे ना ग, तो खासच असायला हवा होता मला. पण या सगळ्या तयारी मध्ये रियाचाही मोठा सहभाग आहे हं", अनय.

"घरचे सर्वजण इतक्या दुरून फक्त माझ्यासाठी आले आहेत. खूप आनंद झालाय मला", अंशिका.

"खरंच अंशिका? " , अनय.
"हो, सर्वांना असे बघून भारावून गेले होते मी अगदी. सर्वजण अजूनही तितकेच प्रेम करतात माझ्यावर. आणि माझ्या स्टाफने सुद्धा मला थोडीही खबर लागू दिली नाही", अंशिका.

एक शांत जागा पाहून अनयने गाडी बाजूला घेऊन थांबवली.

"अंशिका, मला थोडे बोलायचे होते तुझ्याशी. ", अनय.
"हं, बोल ना", अंशिका.

"आपण आपली चूक सुधारू या का? बराच काळ एकमेकांशिवाय निघून गेला आहे ना. असे एकटेपणात सुख नाही ग. तू आयुष्यात सोबत नसशील तर सगळं असूनही नसल्यासारखेच वाटते . आपले सुरवातीचे सुंदर दिवस आठव ना अंशिका. परत एकत्र येऊन आपले घरटे नीट बांधू या का? उरलेल्या आयुष्यभरासाठी माझी साथ देशील का ? आपला अर्णवसुद्धा आपल्याला एकत्र बघण्यासाठी आतुर झालाय ग. आपल्या एकत्र नसण्याने पार कोलमडून गेलाय. त्या दिवशी त्याला रडताना चुकून बघितले मी ... पण बरं झालं, त्यामुळे माझे डोळे एकदम खाडकन उघडले. त्याला इतका त्रास होतोय त्याचं भावविश्व इतकं उध्वस्त झालंय हे तरी कळलं.  अंशिका, हमसून हमसून रडत होता ग तो. त्याच्या पुढच्या आयुष्यातलं सुख तरी आपण त्याला मिळवून देऊ या . रियासोबतच त्याचं खरं सुख आहे ग. पण रियाही अशा कमजोर पाया असलेल्या नात्यात गुंतायला घाबरते आहे. तिचेही म्हणणे बरोबरच आहे. अर्णवच्या मनातली भीती नष्ट व्हायला हवी . तरच त्यांच्या नात्यात मोकळेपणा येऊ शकतो. आपण एकत्र आलो तर सगळ्या गोष्टी सुधारतील. खूप आनंदी राहू आपण सगळेच.
माझ्यासाठी, अर्णवसाठी ... परत येशील ना अंशिका? तुझ्या हृदयाचे दरवाजे माझ्यासाठी पुन्हा उघडशील का? ", अनय भावुक होऊन बोलत होता.

"अनय, खरच तुला अजूनही माझी आठवण येते?", अंशिकाचा स्वर जडावला होता.

"हो. तुझ्याशिवाय, आपल्या माणसांशिवाय हे ऐश्वर्य, इतका मोठा बंगला , सगळं खायला उठतं ग. जीवाचा एवढा आटापिटा करूनही हाती काही राहिलं नाही असं वाटतं, गेली कित्येक वर्षे सगळं अपूर्ण असल्यासारखं वाटतंय", अनय.

"अनय ,मला असे वाटले की तू आता मनाने माझ्यापासून खूप दूर निघून गेला आहेस . तेव्हा मी निघून तर आले. माझे एक एक स्वप्न पूर्ण करत गेले. पण त्यानंतरही जे समाधान मला आपल्या सुरवातीच्या दिवसांमध्ये मिळायचे ते समाधान कधी मिळालेच नाही ... काही वर्षातच मला जाणवले होते की प्रेमाची व्यक्ती, जोडीदार , आपली माणसे ही सोबत नसल्यावर यश मिळाले तरी त्या सुखातही अपूर्णता आहे . कुठेतरी काहीतरी कमी आहे हे नेहमीच जाणवायचे. खूपदा वाटले की परत यावे ...  पण तू रागावशील ,ओरडशील असं वाटलं अन मग हिंमतही नाही झाली. आणि काय करणार , निघूनही मीच आले होते. आता परत कुठल्या तोंडाने येणार होते?  असे वाटायचे कदाचित तुझ्या मनात आता माझे ते स्थानही राहिले नसेल . कित्येकदा संध्याकाळी डोळे भरून यायचे. मन अधीर होऊन आपले सुरवातीचे सुखाचे क्षण आठवायचे.  पण कुठेतरी मनात एक वेडी आशाही होती ... की एकदा तरी तू मला परत ये म्हणावंस ... आणि मी धावत तुझ्याकडे परतून यावं. का नाही बोलावलंस मला अनय? या क्षणाची खूप वाट पाहिली मी", अंशिका अनयच्या खांद्यावर विश्वासाने डोके टेकवत म्हणाली.

"नाही हिंमत झाली ग माझी . खूप रागावलो होतो ना मी तुझ्यावर त्यादिवशी, म्हणून तर निघून गेली होतीस तू. पण आता जाणवले , की अशा रीतीने आपण दोघेही आयुष्यातला अनमोल वेळ वाया घालवतो आहोत. खरंच प्रेमाची व्यक्ती हाकेच्या अंतरावर असतानाही एकटे आयुष्य घालवणे यात कोणते शहाणपण आहे? ही शिकवण मिळवण्यासाठी आयुष्याची कितीतरी वर्षे खर्ची घातली आहेत आपण... ", अनय तिचा हात हाती घेत म्हणाला.

"पण आता तसं नाही होणार, आपण नेहमी सोबत राहू", अंशिकाच्या आवाजात आता निश्चय दिसत होता.

"थँक्स अंशिका. चल आता निघू या? घरी सगळे वाट बघत असतील, बराच उशीर झालाय" , अनय.

"हं चल", अंशिका.
दोघेही परत अनयकडे आले. सर्वजण हॉलमध्ये बसून त्यांची वाटच बघत होते. बाहेरच्या गेटपासून ते बंगल्याच्या दरवाज्याजवळ पोचेपर्यंत दोघांनाही हातात हात घेऊन येत  असलेले बघून सगळे सुखावले. आरोही लगेच समोर येत हसून म्हणाली , "हं, हं, थांबा थोडं, आई, रिया इकडे या ".
आईने दोघांनाही ओवाळले.  आरोहीने अंशिकाला उखाणा घ्यायला लावला .

"कधी कधी आयुष्य आपल्याला मोठी शिकवण देऊन जाते,
अनयरावांचे नाव घेते, सावरते मी माझे परिघापलिकडले नाते "

"वा, वा, खूप सुंदर", आरोही आनंदाने म्हणाली.

नंतर आरोही रियाला म्हणाली, "होणाऱ्या सूनबाई, तुम्हीही मागे राहू नका , काय मागायचे ते मागून घ्या आता".

रिया अंशिकाला म्हणाली, " लहानपणापासूनच तुम्हाला बघितले की असे वाटायचे, की माझी आई असती तर तुमच्यासारखीच असती ना? तुम्ही जसे अर्णवचे लाड करायच्या तसेच तिनेही माझे लाड केले असते ना? तुम्हाला बघून खूप आठवण यायची मला तिची. म्हणून तुम्ही दोघे अर्णवला भेटायला आलेले दिसलात की लगेच यायचे मी तिथे तुम्हाला भेटायला. मी ... मी तुम्हाला 'आई ' म्हटले तर चालेल?" .

अंशिकाने सहमती दर्शवत तिला जवळ घेतले.

"अरे, वा, अंशिका 'आई' आणि मी 'अंकल ' काय? हे बरोबर नाही हं" , अनय हसत म्हणाला.

रियालाही हे लक्षात आल्यावर तिने हसून जीभ चावली आणि म्हणाली , "मग मी तुम्हाला पप्पा म्हटले तर चालेल का?".

"अरे, चालेल काय ....धावेल " , अनय म्हणाला.

"शाब्बास रे पठ्ठी", रियाच्या पाठीवर थाप मारत आरोही म्हणाली.

"मग आता आत येऊ शकतो ना आम्ही , आरोही?", अनय.

"हो , हो , या. तुमचेच घर आहे " , आरोही मिस्किलपणे म्हणाली.

आत येऊन अंशिकाने सासू सासऱ्यांना नमस्कार केला. म्हणाली, "आई, आम्ही चुकलो, मला परत यायचे आहे आई. मला माफ कराल ना?".

"अंशिका, चुका सर्वांकडूनच होतात. पण त्या सावरणे महत्त्वाचे असते. जुन्या गोष्टींना विसरून आता परत एक नवी सुरवात करा. सुखाने रहा दोघेही", आई.

दोघांनी अंशिकाच्या आई वडिलांना सुद्धा नमस्कार करून आशीर्वाद घेतला. त्यांच्याही चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

सर्वजण आत येऊन बसले. रिया सर्वांना उद्देशून म्हणाली, "थोड्याच दिवसांमध्ये अर्णव परत येतो आहे. तर सर्वांना माझी एकच विनंती आहे की आपण ही गोष्ट तो येईपर्यंत त्याला कळू द्यायची नाही. सरप्राईज देऊ या त्याला. तो आल्या वर त्याला स्वतः हे बघताना झालेला आनंद आपणही अनुभवू या".

"ओके बॉस", अनय कपाळाला हात लावून salute ची खूण करत म्हणाला आणि सगळे हसले.

खूप दिवसांनी सर्वजण असे एकत्र जमल्यामुळे गप्पा मारताना सर्वांची झोप तर जणू उडुनच गेली होती.

******

काही दिवसांनी ....

क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर 

🎭 Series Post

View all