परीघापलिकडले नाते पर्व दुसरे - भाग 1 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, parva, dusre, Arnav, Riya, Anay, Anshika, kautumbik, kutumb, marathi, katha, story, spardha, family, relation, friendship, school, boarding

सर्व वाचकांना सस्नेह नमस्कार. सर्व प्रतिक्रियांसाठी धन्यवाद. अर्णवबद्दल हुरहूर वाटते आहे, जीव कळवळतो आहे , त्याच्या आयुष्यात चुकल्या चुकल्या सारखं वाटतय ना? याचाच अर्थ आहे की अर्णवला तुम्हीही जीव लावताय आणि हा विषय लिखाणातून तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोचला आहे.

या कथेत मूलतः कोणत्याही पात्राचा स्वभाव वाईट नाही. परंतु एका वळणावर अनय आणि अंशिकाचे समीकरण चुकत गेले, दोघांनीही अर्णवच्या शैक्षणिक भविष्याचा तर विचार केला, पण मनाचा विचार करण्यात कुठेतरी कमी पडले. अनय अंशिकाचे समीकरण सावरण्यासाठी, त्यांनी स्वतः लक्ष घातले नाही किंवा काहीतरी चुकतंय हे लक्षात आणून देण्यासाठी परिवारातील अनुभवी व्यक्तींनी सुद्धा catalyst सारखे राहून समजावण्याचा प्रयत्न केला नाही. आणि परिणामतः अर्णवच्या मनाची अशी अवस्था झाली.

कथेचा नेहमीसारखा सुखांत नसला तरी या विषयाची गंभीरता अधोरेखित करणारा, विचार करण्यास प्रवृत्त करणारा शेवट असावा असा माझा दृष्टिकोन होता. म्हणून अर्णवबद्दल थोडीशी हिंट देऊन मी पुढचे पर्व वाचायला आवडेल का अशी विचारणा केली होती. त्यात अर्णवबद्दलच्या उत्सुकतेला न्याय देण्याचे माझे प्रयोजन होते.

कौटुंबिक कथेचा हा विषय मनात आला, आणि यावर लिहायला हवे असे वाटले. तेव्हापासून ते कथा पूर्ण होईपर्यंत किंवा अजूनही मनाला जी हुरहूर आहे ती व्यक्त करण्याचा हा एक प्रयत्न होता.

यापुढेही कथेला, अर्णवला, रियाला वाचकांचे असेच प्रेम मिळत राहील अशी आशा करून पुढे लिहायला घेते....

********

प्रिन्सिपॉल च्या केबिन मध्ये....

"मिस्टर भावे, या परिस्थितीत अर्णवचा विचार करता, मला असे वाटते त्याच्या मित्रांशीसुद्धा एकदा बोलून अर्णवला नक्की काय वाटतं आहे ते बघण्याचा प्रयत्न करावा लागेल", प्रिन्सिपॉल.

"मी आताच रियाशी या बाबतीत बोललो आहे सर, त्यामुळेच मला कळले की अर्णव कशामुळे खचलेला आहे", अनय.

ओके, तर अर्णव रियाशी मनातलं थोडंफार बोलतो ना? ", प्रिन्सिपॉल.

"हो, रिया आणि आर्यन हे चांगले मित्र आहेत त्याचे, जे काय बोलतो ते त्यांच्याशीच बोलतो", अनय.

ठीक आहे. मी एक गोष्ट सुचवू का?", प्रिन्सिपॉल.

"सांगा ना सर", अनय.

"मला वाटतं, तुम्ही अर्णवबरोबर आजचा दिवस एकत्र घालवा. उद्या मीही त्याच्याशी बोलेन. वॉर्डन मॅडमचे आणि कुलकर्णी सरांचे तर लक्ष आहेच. आणि त्याबरोबरच मी त्याच्या मित्रांनाही थोडी कल्पना देऊन त्याच्याकडे लक्ष ठेवायला सांगतो, त्यांची थोडी जास्त interaction होईल त्याच्याशी. त्यायोगे त्याच्या मनातल्या या भावना व्यक्त होण्यास मदत होईल आणि तो विचारांच्या गर्तेत पुन्हा जाऊ नये यासाठी ते त्याच्या आसपास राहतील. सोबत अभ्यास करतील. त्यामुळे अभ्यासाच्या व्यतिरिक्त इतर विचार येणार नाहीत. तो सावरेपर्यंत हा काळ जरा निभावून घ्यावा लागेल", प्रिन्सिपॉल म्हणाले.

"कुलकर्णी सर, तुम्हांला काय वाटतं, असं केलं तर मदत होईल ना ? सोबत चर्चा करून अभ्यास केला तर त्यांना एकमेकांचा फायदाच होईल ना?", प्रिन्सिपॉल.

"सर , तसे चालू शकेल , जवळपास सर्व विषयांचा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला आहे, आता मुलांकडून सराव करून घेणे चालले आहे. मी जमेल तेवढ्या विषयांच्या worksheets त्यांना देतो, म्हणजे ते एकत्र बसून घड्याळ लावून सोडवतील. त्याला थोडीफार अशी सोबत मिळाली तर त्याच्या मनाला उभारी मिळायला मदत होईल आणि एकमेकांमुळे सर्वजण जोमाने अभ्यासाला लागतील. प्रत्येकाचा वेगवेगळ्या विषयात हातखंडा आहे त्यामुळे सर्वांना एकमेकांची मदतच होईल", कुलकर्णी सर.

"ओके, सर, तुम्ही सांगताय तसे करून बघू या", अनय. अनय दुसऱ्या दिवशी परत निघून गेला.

त्यादिवशी ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी प्रिन्सिपॉल सरांनी  अर्णव , आर्यन आणि रिया यांना केबिनमध्ये बोलावले. कुलकर्णी सरसुद्धा तिथे होतेच.

"मुलांनो , कसा चाललाय अभ्यास? तयारी नीट होतेय की काही अडचण आहे?", प्रिन्सिपॉल नी सर्वांना विचारले.

"व्यवस्थित सुरू आहे सर, बऱ्यापैकी कोर्स पूर्ण झालेला आहे . आता वाचन आणि सराव करतो आहोत", आर्यनने सांगितले.

"गुड... मला वाटतं तुम्ही दिवसातून काही वेळ एकत्र अभ्यास करावा, त्याचा फायदा होईल तुम्हाला सर्वांना. कुलकर्णी सर तुम्हाला सांगतील कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते", प्रिन्सिपॉल.

"मी तुम्हाला काही वर्कशीटस , प्रश्नपत्रिका वगैरे देईन. त्यातली रोज एक विषय घेऊन त्याची प्रश्नपत्रिका सर्वांनी आपापल्या वहीत सोडवायची. सोडवताना घड्याळ लावून बरोबर त्यावर दिलेल्या वेळेतच ती प्रामाणिकपणे सोडवायची आहे. पूर्ण सोडवून झाल्यावर प्रत्येकाने आपल्याला अडलेले प्रश्न एकमेकांना विचारायचे, त्यावर चर्चा करायची आणि तो मुद्दा व्यवस्थित समजून घ्यायचा. सोडवलेली प्रश्नोत्तरे माझ्याकडे दुसऱ्या दिवशी सकाळी द्यायची", कुलकर्णी सर.

"छान आयडिया आहे सर, अशा पद्धतीने अभ्यास करायला कंटाळा पण येणार नाही आणि अभ्यास, सरावसुद्धा नीट होईल. सर, मी मिष्टीला पण बोलावले तर चालेल का? आम्ही बरेचदा सोबत अभ्यास करतो ", रियाला कल्पना आवडली होती.

"हो चालेल. आर्यन, रिया, तुम्ही या माझ्याबरोबर. मी पुढील तीन चार दिवसांच्या प्रश्न पत्रिका देतो ", कुलकर्णी सर.

आर्यन आणि रिया कुलकर्णी सरांबरोबर गेले.

सरांनी त्यांना सांगितले, " तुम्ही अशाप्रकारे एकत्र अभ्यास करताना अर्णवकडे सुद्धा लक्ष ठेवायचे आहे. त्याला अभ्यासात गुंतवायचे आहे. तो कधी आपल्याच विचारात बुडालेला, उदास दिसला तर त्याला बोलते करून त्याच्या मनात काय चालले आहे ते ऐकून घ्यायचे आहे. किंबहुना त्याला तसे होऊच द्यायचे नाही. तो इतक्यात जरा डिस्टर्ब दिसतो आहे ना, त्याला सावरायला आपण मदत करू या, आणि अभ्यासही नीट करू या. काय, कळलं का?".

"हो सर", आर्यन आणि रिया.

"हे घ्या , तीन विषयांच्या worksheets आहेत. या सोडवून तीन दिवसांनी मला द्या", कुलकर्णी सर.

"ओके सर", आर्यन आणि रिया दोघेही म्हणाले आणि परत जायला निघाले.

इकडे प्रिन्सिपॉल सर अर्णवशी संवाद साधण्याचा, त्याला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होते. ते त्याला बाहेर घेऊन गेले. चालता चालता ते त्याच्याशी बोलू लागले. काही वेळात एक शांत जागा बघून तिथे दोघेही बसले.

"अर्णव, कसा आहेस बाळा? काही अडचण आहे का कोणत्या विषयामध्ये?", प्रिन्सिपॉल.

"काही अडचण नाही सर, मी ठीक आहे", अर्णव.

"काहीही असेल, काही अडचण असेल, एखादी गोष्ट सतावत असेल, शाळेतली, घरची, स्वतः बद्दलची, मित्रांची, कुठलीही... तर तू माझ्याशी बिनधास्त बोलू शकतोस... माझ्याकडे मन मोकळं करू शकतोस... कधीही... भिऊ नकोस मला...मी रागावणार नाही अजिबात... उलट काही अडचण असेल तर मदत करेन सोडवण्यासाठी...", प्रिन्सिपॉल.

अर्णव विचारात पडला होता.

"सांग बर आता, कुठली गोष्ट तुला सतावते आहे?", प्रिन्सिपॉल प्रेमाने म्हणाले.

"सर ... ते ..... मला आईबाबा दोघेही हवेत सर... मला एकतर आईबरोबर रहावं लागतं, नाहीतर बाबांबरोबर. आता तर इथे भेटायला येतात तेव्हाही एकटेच येतात ते. इतर मुलांसारखे माझे आईबाबा सोबत का राहत नाहीत सर... मला खूप वाईट वाटतं... एकटं वाटतं मला ", अर्णव खाली मान घालून म्हणाला.

" हं, बेटा, हे बघ, ते दोघेही तुला भेटायला येतात, तुझ्याबरोबर राहतात, तुझी काळजी घेतात, म्हणजे दोघांचेही तुझ्यावर खूप प्रेम आहे. खरं की नाही?", प्रिन्सिपॉल.

"हो", अर्णव.

" एकमेकांशी वाद होत राहून  मनात कटुता येण्यापेक्षा वेगळे राहण्याचा मार्ग त्यांनी स्वीकारला आहे, एवढंच .... काही गोष्टी आपल्याला आयुष्यात परिस्थितीनुसार स्वीकाराव्या लागत असतात. प्रत्येक गोष्ट आयुष्यात आपल्या मनासारखी होईल असं नसतं....
असे का नाही , असे का नाही ? असा विचार करून दुःखी होण्याऐवजी, जे आहे त्यात काय काय चांगलं आहे ते बघावं बाळा. मग आपल्याला पुढला मार्ग हळूहळू सापडत जातो.

ते दोघे जरी एकत्र राहत नसले, तरी तुझ्यावर त्यांचे किती प्रेम आहे, हो ना? तुझ्या अभ्यासाची, भविष्य उज्ज्वल व्हावे याची किती काळजी घेतात ते दोघेही... आठवण येते म्हणून व्यस्त असतील तरी जमेल तसे तसे वेळ काढून तुला भेटायला येतात ... प्रेमाने विचारपूस करतात....तुला जे हवे ते आणून देतात.... तू नीट राहतो आहेस हे बघून एक समाधान मनात घेऊन परत जातात....  फक्त तू एवढंच करायचस ... त्यांचे प्रश्न त्यांना सोडवू द्यायचे.... वेळ आली की सगळं ठीक होईल... त्यासाठी उदास व्हायचं नाही.... आपले हे दिवस छान अभ्यास करण्याचे, खेळण्याचे , नीट करिअर घडवण्याचे आहेत ना.... त्यातच लक्ष ठेवायचं. हे महत्त्वाचे दिवस पुन्हा येत नसतात ना?" , प्रिन्सिपॉल.

"हो", अर्णव विचार करत म्हणाला.

"तू एकटा नाहीस. तुला कधीही काहीही बोलावेसे वाटले तर मला सांग, किंवा तुला आवडेल त्या मित्राजवळ आपलं मन मोकळं केलंस तरी चालेल. पण त्यानंतर मात्र आपलं लक्ष आता कुठे केंद्रित करायचं आहे?", प्रिन्सिपॉल.

"अभ्यासावर", अर्णव.

"गुड, कळले ना तुला?", प्रिन्सिपॉल.

"हो", अर्णव.

"सांग मला काय काय कळले?", प्रिन्सिपॉल.

"हे, की माझे आईबाबा माझ्यावर खूप प्रेम करतात त्यामुळे त्याची काळजी करण्याची गरज नाही. वेळ आली की सगळं ठीक होईल. आणि मी आता इकडे अभ्यासावर आणि इकडच्या रुटीन वर लक्ष केंद्रित करायचं", अर्णव.

"अगदी बरोबर. मग आता कशाची वेळ झाली आहे?", प्रिन्सिपॉल.

"फुटबॉल खेळण्याची", अर्णव.

"चल मग पळ आता खेळायला", प्रिन्सिपॉल स्माईल करत म्हणाले. अर्णवच्या चेहऱ्यावरचा अवघडलेपणा, काळजी, भीती जाऊन आता स्माईल, आणि किंचित ठामपणा दिसत होता. कदाचित परिस्थितीला जुळवून घेणे शिकायचे असे त्याने ठरवले असावे....

अर्णव तिथून निघाला ते थेट मैदानातच... आज खूप दिवसांनी तो मनापासून खेळत होता...


क्रमश:


© स्वाती अमोल मुधोळकर

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.
 

🎭 Series Post

View all