परीघापलिकडले नाते - भाग 7 (मराठी कथा : marathi story)

Spardha, kautumbik, kutumb, family, parigh, parighapalikadle, nate, arnav, anay, anshika, riya



.... दुसऱ्या दिवशी सकाळीच अनय अर्णव आणि प्रिन्सिपॉलना भेटायला निघाला. दामूकाकांना सांगून अर्णव आणि रियासाठी त्यांचे आवडते कुकीज आणि इतर गोष्टीही सोबत घेतल्या होत्या. सुमारे साडेतीन चार तासांनी तो शाळेत पोचला. प्रिन्सिपॉल मीटिंग मध्ये होते. तोपर्यंत अर्णव आणि रियाला भेटून घ्यावे असा विचार करून त्याने दोघांनाही बोलावणे पाठवून कॅन्टीनमध्ये येण्यास सांगितले.

पाच मिनिटांत दोघेही अनय बसला होता तिथे आले.
"हे घ्या तुमचे आवडते कुकीज" , अनयने दोघांनाही कुकीज दिले.
विचारपूस आणि थोडया गप्पागोष्टी झाल्यानंतर

"अर्णव, आपल्या सर्वांसाठी सँडविच घेऊन येतोस का? आणि मला कसे सँडविच हवे असते तुला माहीत आहे, तसे त्यांच्याकडून बनवून घेऊन ये . आणि एक कॉफीसुद्धा सांगशील". अनय अर्णवला म्हणाला.

"हो, आणतो", अर्णव काउंटर कडे गेला, कॅन्टीनवाल्या काकांना सांगत तिथेच उभा राहिला.

खरं तर रियाशी अनयला अर्णवबद्दल बोलायचे होते म्हणूनच त्याने अर्णवला तिकडे पाठवले होते.

"रिया, माझा अर्णव कसा आहे ग?", अनयने विचारले.

"अंकल, गेल्या काही दिवसांपासून अर्णव डिस्टर्ब असल्यासारखा वाटतो. सहा सात महिन्यांपूर्वी तुम्ही एकटे येऊन भेटून गेलात, आणि त्यानंतर दोन महिन्यांनी आंटीही एकट्याच आल्या होत्या. तेव्हा त्याच्याशी बोलणे झाले होते माझे. जय आणि आर्यनचे आई वडील एकदोनदा येऊन गेले.
मध्यंतरी मिष्टीचा मोठ्या गुजराती परिवारातील सर्वजण मिष्टीला भेटायला आले होते. आई, बाबा, आजी, आजोबा, काका, काकू आणि तिचा  भाऊ सुद्धा आले होते. सर्वांना मी, आर्यन आणि अर्णवसुद्धा भेटलो होतो.

त्यानंतर मात्र अर्णव खूप उदास वाटायचा. म्हणून त्याच्याशी मी बोलले होते एकदा.

"अर्णव , तू उदास का दिसतोय? काही दिवसांपूर्वी अंकल आले होते आणि आज तर आंटी सुद्धा येऊन गेल्या ना तुला भेटायला?", रियाने अर्णवला विचारले होते.

"हो ना, रिया. पण किती वर्षे झाली आता, मला भेटायला माझे बाबा किंवा आई एकटेच येतात. मलाही वाटतं की दोघांनी एकत्र मला भेटावं, तेवढंच घरी गेल्यासारखं वाटतं थोडा वेळ का होईना. मिष्टीसारखा माझाही मोठा परिवार असावा, सर्वांनी एकत्र हसून खेळून रहावे, थट्टा-मस्करी, हसणे-बोलणे , भावा बहिणींनी एकमेकांच्या खोड्या करणे असं सगळं घरी असावं असं मला वाटतं. पण...
.
.
पण... मला तर नेहमी आई किंवा बाबा या दोघांपैकी एकालाच निवडावं लागतं. सुट्टी मध्येसुद्धा मला एकावेळी एकजणा बरोबरच रहावं लागतं.
.
.
Why do I always have to choose between Aai and Baba? It's so difficult Riya...मला दोघेही हवेत ग...
Why cant I have a normal family like everyone else? ", अर्णव असे म्हणून रडायला लागला होता.

हे सगळं रिया अनयला सांगत होती. अनयला ऐकून वाईट वाटत होते. त्याचेही डोळे पाणावले. पण आता काही इलाज नव्हता.

अर्णव सँडविच आणि कॉफी घेऊन आला. तिघांनीही गप्पा मारत खाणे संपवले. तेवढ्यात अनयला प्रिन्सिपॉल कडून बोलावल्याचा निरोप आला. आणि अनय त्यांच्या केबिनमध्ये गेला. अर्णवचे वर्गशिक्षक कुलकर्णी सर आणि होस्टेलच्या वॉर्डन तिथे बसलेले होते.

"Come in Mr. Bhave, please have a seat", प्रिन्सिपॉल समोरच्या खुर्चीकडे निर्देश करत म्हणाले.

"थोडं अर्णवबद्दल बोलायचं होतं म्हणून तुम्हाला बोलावलं आहे" , प्रिन्सिपॉलनी बोलायला सुरुवात केली.

"हं सर, बोला ना, काही प्रॉब्लेम आहे का?", अनयने विचारले.

" Mr. भावे, अर्णव आमच्या शाळेचा एक खूप हुशार विद्यार्थी आहे. साठे सर, कुलकर्णी सर आणि आमच्या इतर अनुभवी शिक्षकांच्या तालमीत त्याचे व्यक्तिमत्त्व सर्वच बाबतीत खुलत होते. पण गेल्या काही दिवसांमध्ये अर्णव म्हणावा तितका प्रतिसाद देत नाहीये. अभ्यासातील त्याचं लक्ष कमी झालंय. पंच्यांणव टक्क्यांहून सदुसष्ट टक्क्यांपर्यंत खाली आली आहे त्याची गुणपत्रिका", कुलकर्णी सरांनी अर्णवची आधीची आणि आताची गुणपत्रिका समोर केली.

"मिस्टर भावे, हे दहावीचे वर्ष आहे ना, त्याचे नुकसान होऊ नये यासाठी तुमच्या कानावर घालतोय, वॉर्डन मॅडम ना सुद्धा काही सांगायचे होते तुम्हाला", प्रिन्सिपॉल सरांनी वॉर्डन ला बोलण्यासाठी सांगितले.

" भावे सर, अर्णव काही दिवसांपासून डिस्टर्ब असल्यासारखा वाटतो. बरेचदा तो संध्याकाळी एकटाच उदास चेहऱ्याने पायरीवर बसलेला दिसतो. आपल्याच विचारात असतो. फारसा कोणाशी बोलत नाही , हसणे खेळणे कमी झालेय त्याचे. मागच्या वेळी तुम्ही येऊन गेलात त्यानंतर एकदा अंशिका मॅडमसुद्धा एकदा येऊन गेल्या. पण प्रत्येक वेळी तो आनंदी असण्याऐवजी उदासच वाटला मला. सर घरी वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही आम्हाला सांगू शकता. आपण सर्व आता इतक्या वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. We are like a family. आम्ही जमेल तसे त्याला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करू.

"Exactly, Mr. भावे, काही असेल तर तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता. आपण एका मोठया परिवारासारखे आहोत", प्रिन्सिपॉल म्हणाले.

"हो , घरी सध्या परिस्थिती ठीक नाही", अनय.

"काय झालं?, इफ यू डोन्ट माईंड , सांगा", प्रिन्सिपॉल.

"सर , मी तुम्हाला सगळं सांगतो" , अनय सांगू लागला.

"अर्णवला इथे घेऊन येण्याच्या एक दोन वर्षे आधीची गोष्ट आहे... तितक्यात मी आपल्या कारखान्याच्या कामामध्ये जास्त व्यस्त झालो होतो. घरी आल्यानंतर सुद्धा लॅपटॉप घेऊन रात्री उशिरापर्यंत काम करत बसायचो आणि नंतर थकून झोपून जायचो. अंशिकाचे सुद्धा काम खूप वाढले होते. तिला नवनवीन ग्राहकांच्या (clients) ऑर्डर्स मिळत होत्या. वेळेवर ऑर्डर्स बनवून द्याव्या लागायच्या. तिच्या डिझाईन्स ना चित्रपट क्षेत्रातल्या कलाकारांकडूनही मागणी येऊ लागली होती.  या सर्वांचा परिणाम म्हणून तिलाही रोज घरी येण्यासाठी उशीर व्हायला लागला होता. आल्यावर घरात काम करण्याची इच्छा आणि ताकद दोन्हीही राहिलेली नसे. शो असलेल्या दिवशी तर टीमबरोबर सगळं आवरून घरी येईपर्यंत रात्री उशीर झालेला असे.

त्यामुळे आम्हा दोघांमध्ये संवाद कमी होऊ लागला होता. दोघांनाही आपापल्या कामाचे, ग्राहकांना दिलेली वेळ पाळण्याचा ताण असे. त्यामुळे दोघांचीही आताशा चिडचिड होऊ लागली होती. एकमेकांवर उगाचच राग निघायचा. भांडणं व्हायची. त्यापेक्षा बोलणेही नको असे आम्हाला वाटायला लागले.
कधीकधी ताण सहन न होऊन मी मित्रांबरोबर ओल्या पार्टीतही जाऊ लागलो.

अर्णवला नीट वेळ देणे , त्याच्याशी खेळणे, अभ्यास घेणे हे दोघांनाही जमेनासे झाले. अर्णव वाट पाहून पाहून झोपून जाई. त्याला वाटायचे बाबांनी आपल्याबरोबर आधीसारखे खेळावे, आपल्याला बाहेर फिरायला न्यावे, उद्यानात इतर मुले जशी आईबाबांबरोबर येतात तसे आपल्यालाही त्यांनी न्यावे. आईने रोज झोपताना आधीसारखी गोष्ट सांगावी. आपल्यासोबत चित्र काढावे. रोज तो असे काहीतरी करण्यासाठी आमची वाट बघायचा. पण आम्ही घरी उशिरा येत असू आणि तो आमच्या येण्याआधीच झोपी गेलेला असे .

अंशिकाने खूप मेहनतीने नाव कमावले होते . तिचेही मोठे स्वप्न होते. तिला तिचा स्वतः चा ब्रँड 'अंश' सुरू करायचा होता.

एकीकडे मला आताशा वाटायला लागले होते, की अंशिकाने इतर बायकांप्रमाणे घरी जास्त वेळ द्यावा. घराकडे स्वतः लक्ष द्यावे. अर्णवला सांभाळावे. आपण घरी आल्यावर तिने हसतमुखाने स्वागत करावे. त्या दिवशी मी अंशिकाकडे बोलून दाखविले .

"अंशिका, आजकाल तू खूप उशिरा घरी येतेस, घरी आल्यावरही तुझ्या कामातच व्यस्त असतेस. मला नाही आवडत हे. घरी जास्त लक्ष द्यायला हवे आहे. जरा इतर विवाहित स्त्रियांसारखी वागत जा ना" मी मोठ्याने म्हणालो होतो.

" अनय, मी कामासाठीच बाहेर असते ना? तुला तर आधीच माहिती होते, माझे काम काय आहे , त्याच्या गरजा काय आहेत. आता तर माझा व्यवसाय फार महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. सगळे माहिती असूनसुद्धा तू मला लग्नासाठी विचारले होतंस ना? माझ्यातल्या धडाडी, जिद्द आणि आत्मविश्वास याच गुणांनी तर तुझे मन जिंकले होते ना? मग अशा महत्त्वाच्या टप्प्यावर मी कशी माघार घेऊ? " अंशिका उत्तरली.

"अंशिका, अर्णवकडे बघ. कसा हिरमुसलेला दिसतोय इतक्यात. "
"अनय, मी जेव्हा व्यस्त असते तेव्हा तूही लक्ष देऊ शकतोस ना त्याच्याकडे? हा काळ जरा निभावून घे ना. तो आपल्या दोघांचाही मुलगा आहे. माझा एकटीचाच नाही". अंशिकाचाही आवाज वाढला होता.

मी आता चिडलो होतो. तितक्यात अर्णव एक चित्राच्या गोष्टींचे पुस्तक घेऊन आला , आणि त्यातलं एक चित्र मला दाखवून "बघ ना", "बघ ना", असा हट्ट करायला लागला.

"बाबा , ही गोष्ट वाचून दाखवा ना मला, हे चित्र किती छान आहे." अर्णव.
" हो, थांब थोडं, बोलतोय ना आम्ही?" मी त्याला म्हणालो.
अर्णव थोडा वेळ तिथेच घुटमळत वाट बघत राहिला. थोडया वेळाने पुन्हा त्याने हट्ट केला,
" बाबा, वाचा ना लवकर "
"लवकर , लवकर" असे म्हणत अर्णव माझा शर्ट ओढायला लागला .
मी आधीच चिडलेला असल्यामुळे माझा पारा अजून चढला आणि अर्णवच्या पाठीत मी एक जोरदार धपाटा घातला.
बिचारा अर्णव रडत रडत आपल्या खोलीत जाऊन बसला.
अंशिका मला रागावत अर्णवकडे धावली. तिलाही वाईट वाटले होते. तिने अर्णवला प्रेमाने जवळ घेऊन थोपटले आणि एक चॉकलेट देऊन त्याला घराबाहेरच्या झोपाळ्यावर घेऊन बसली . इकडचे तिकडचे बोलून त्याला शांत करून झोपवले आणि थोडया वेळाने घरात आणले.

तोपर्यंत मी शांत झालो होतो. मला अर्णववर हात उचलल्याचे वाईट वाटत होते. काही विचार करून मी अंशिकाला सांगितले, " मी अर्णवला बोर्डिंग स्कूल मध्ये ठेवण्याचे ठरवले आहे. आपल्यात नेहमीच छोटीमोठी भांडणे , वाद होत आहेत. त्याच्या बाल मनावर यांचा अनिष्ट परिणाम होऊ नये असा माझा उद्देश आहे. याशिवाय तिथे तो त्याच्या वयाच्या मुलांमध्ये राहील, खेळेल तर आनंदात राहील. अभ्यास , खेळ आणि इतर त्याच्या आवडीच्या गोष्टी शिकेल, करेल. ते त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या आणि भविष्याच्या दृष्टीने योग्य राहील."
अंशिका काही न बोलता झोपायला निघून गेली, तिला कळत नव्हते पण मनाला माझे बोलणे थोडेफार पटतही होते.

दुसऱ्या दिवशी मी या बोर्डिंग स्कूल ची माहिती काढली, आणि फोन करून रविवारी अर्णवला घेऊन येत असल्याचे तुम्हाला कळवले.

रविवारला अजून तीन दिवस वेळ होता. मी आणि अंशिकाने आता या तीन दिवसांमध्ये अर्णवबरोबर शक्य तितका वेळ घालविण्याचे ठरवले. दोन तीन दिवस आम्ही त्याला बाहेर नेले, त्याच्याशी खेळलो. एकीकडे त्याचे सामान , काही आवडत्या वस्तू, खेळणी इत्यादी अंशिकाने बॅग मध्ये भरून ठेवले. परंतु त्याला दुसऱ्या गावी जाण्याबद्दल काहीही कळू दिले नाही.

रविवारी अर्णवला वाटले आपण तिघे फिरायला गाडीने नेहमीसारखे बाहेर जातोय. पण अनय, अंशिका त्याला बोर्डिंग स्कूल ला न्यायला निघालेले होते. अर्ध्या रस्त्यात पोचल्यावर मी त्याला कुठे जातोय ते सांगितले.
"तुम्ही पण तिथे राहणार ना , माझ्यासोबत ?" , अर्णव .
"तिथे तुझ्यासोबत खूप मित्र असतील. तुला रोज खेळायला मिळेल" , मी.
" आणि तुम्हीसुद्धा ना?", अर्णव.
"नवीन शाळेत जायला मिळेल तुला" , मी.
" नाही, मला नाही जायचं ....
मला नाही जायचं तिथे, मला घरीच राहायचं ", अर्णव रडवेला होऊन म्हणाला.
"बेटा, तुला आवडेल तिथे गेल्यावर" अंशिका.
बराच वेळ त्याचे रडणे आणि आम्हा दोघांचे समजावणे सुरू होते.
काही वेळाने आम्ही इथे पोचलो आणि दोघांनी ऍडमिशन आणि इतर बाबींची पूर्तता करून अर्णवला वॉर्डन मॅडमकडे सोपवले.


त्यानंतर काही दिवसांनी अंशिकाने 'Ansh' चे लाँचिंग केले. खूप मोठा शो, आणि कार्यक्रम झाला. सुरवातीला अंश च्या
लाँचिंग च्या तयारीत व्यस्त असलेली अंशिका लाँचिंग झाल्यावर आणखीच व्यस्त राहू लागली. तिचा व्यवसायाचा पसारा वाढतच गेला. आणि इकडे माझाही बिझनेस चा पसारा वाढत होताच. दोघेही आपापल्या कामातच व्यस्त होत गेलो आणि परिणामी आमच्यात नातं असं काही राहिलंच नव्हतं. अंशिकाने एक दिवस वेगळे होण्याची इच्छा प्रदर्शित केली. मी माझ्या घरच्यांना त्याबद्दल सांगितले. पण सुरवातीला आमचे लग्नच त्यांच्या मनाविरुद्ध झाले असल्याने कोणीही आमच्यामध्ये बोलण्याचा, आम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला नाही. आम्ही आपापल्या यशाच्या धुंदीतच होतो. आणि तशातच वेगळे झालो. ", अनयने बोलायचे थांबून टेबलावरील ग्लास मधले पाणी प्यायले.

"काय? विश्वास नाही बसत सर , की तुम्ही आणि मॅडम वेगळे झालात. सुरवातीला तुम्ही यायचात तर किती प्रेमाने एकत्र असल्यासारखे वाटायचे, हसून खेळून असायचे ", वॉर्डन.

"हो ना, प्रेमात पडलो होतोच आम्ही. नात्यातही बांधले गेलो. पण त्या नात्याचा परीघ आम्हाला सांभाळता आला नाही. आमचे नाते परिघापलिकडे कधी आणि कसे जात राहिले ते कळलंच नाही. आता मात्र हाती एकटेपणा शिवाय दुसरं काही राहिलं नाही", अनय भावुक होऊन म्हणाला.

सगळे स्तब्ध होते. काहीवेळ तिथे शांतता पसरली होती.

"हं, आता कळले की अर्णव हुशार असूनही सुरवातीपासूनच इतका अबोल, आपल्यातच राहणारा असा का आहे आणि आता इतका डिस्टर्ब का झालाय", वॉर्डन म्हणाली.

"तरीही तुम्ही त्याला तुमच्यातल्या वादापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. इथे योग्य हातांमध्ये सोपवून त्याच्या भविष्याची तरी काळजी घेतलीत. त्याबाबतीत त्याचे नशीब चांगले आहे. ज्या मुलांसमोर रोज असे कुटुंबातील वाद घडत असतील , त्यांच्याकडे लक्ष दिले जात नसेल त्या मुलांच्या मनाचे काय होत असेल?

या अनुषंगाने आम्ही आमच्या परीने अर्णवला नीट सांभाळण्याचा प्रयत्न करूच. त्याबद्दल निश्चिन्त राहा.

खरंच, आईवडिलांमधल्या, किंवा परिवारातील नात्यांमध्ये असलेल्या दुराव्याचा लहान मुलांच्या मनावर किती, कसा विपरीत परिणाम होतो, त्यांचे बालपण कसे कोमेजून जाते ते यातून लक्षात येते",  प्रिन्सिपॉल खेदाने म्हणाले.


******

समाप्त

© स्वाती अमोल मुधोळकर
संपूर्ण कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

ही संपूर्ण कथा कशी वाटली ते नक्की कळवा.
तसेच या कथेचे पुढचे पर्व वाचायला आवडेल का हेही कळवा. या कथेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व वाचकांचे मनापासून आभार. ????????

🎭 Series Post

View all