परीघापलिकडले नाते - भाग 5 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, marathi, katha, story, Arnav, Aryan, Anay, Anshika, boarding, hostel, school, family, relation, kutumb, kautumbik, friendship, love, spardha, fashion, design"अनय, अरे झाला ना आता एक महिना अर्णवला जाऊन.  प्रिन्सिपॉल आणि वॉर्डन ने सुचविल्याप्रमाणे आपण इतके दिवस झाले भेटलोही नाही आहोत त्याला. या रविवारी जाऊ या का त्याला भेटायला?", अंशिका अनयला विचारत होती. अंशिका आणि अनयलाही त्याची आठवण येत होती.

"अंशिका, तुला आठवतं न त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला? महिना दीड महिना त्याला इथे नीट ऍडजस्ट होऊ द्या, थोडी इथली सवय होऊ द्या, तुम्ही लगेच भेटायला आलात तर त्याला घरची, तुमची आठवण येतच राहील आणि मग जास्त त्रास होईल त्याला जुळवून घ्यायला. हवं तर तुम्ही फोनवर विचारू शकता, आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सांगूच. किंवा काही अडचण आली तर फोनही करू. तुम्ही काही काळजी करू नका, असे म्हणाले होते ना ते?", अनय अंशिकाला समजावण्याचा प्रयत्न करत होता.

"झाला ना रे आता एक महिना, आणि जाईपर्यंत आणखी दोन तीन दिवस आहेत ना. झाला आहे तो ऍडजस्ट आता. मी वॉर्डनला मध्ये मध्ये फोन करून विचारत असते. एकदम ठीक आहे आणि बऱ्यापैकी ऍडजस्ट झालाय असं म्हणाल्या त्या .

"बरं, ठीक आहे , जाऊ या रविवारी", अनय म्हणाला. मी माझे बाकीचे प्रोग्रॅम कॅन्सल करतो.

"हो, मलाही माझे शेड्युल थोडे ऍडजस्ट करावे लागेल, पण नक्की जाऊ या", अंशिका .

*****

ठरल्याप्रमाणे रविवारी अनय आणि अंशिका अर्णवला भेटायला होस्टेलमध्ये गेले. अर्णव जय, निकी आणि इतर मुलांबरोबर मैदानावर खेळत होता. शिपायाने त्याला बोलावून आईबाबा भेटायला आल्याचं सांगितलं .

अर्णवने तिथूनच अनय, अंशिकाला बघितले आणि तो खुश झाला. आणि धावतच त्यांच्या कडे यायला निघाला. येता येता त्याला आठवलं की कसे अनय अंशिका त्याला एकट्याला रडताना सोडून निघून गेले होते. त्याच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची जागा आता दुःख आणि रागाने घेतली. तो त्यांच्यासमोर येऊन फक्त उभा राहिला.

"अर्णव, बेटा कसा आहेस?", अनय .
"माझा बेबी कसा आहे आता? अंशिका. दोघांनी एकदमच विचारत त्याला जवळ घेण्यासाठी हात पुढे केले.

अर्णव त्यांच्याकडे न झेपावता, होता तिथेच उभा राहत पडलेल्या चेहऱ्याने पण ठामपणे म्हणाला, "  ठीक आहे... अन बेबी नाहीये मी".

"ओह, मोठ्ठा झाला का माझा बेबी अर्णव?", अंशिका लाडाने म्हणाली.

"सांगितलं ना, मी बेबी नाहीये", अर्णव रागाने म्हणाला.

"बरं, हे बघ , तुझ्यासाठी काय आणलंय? चॉकलेट आहेत, कुकीज आहेत, या तुझ्या दोन favourite छोट्या कार आहेत", अनय प्रेमाने म्हणाला.

"मला नाही पाहिजे, घेऊन जा तुम्ही परत", अर्णव अजूनही रागातच होता.
"मला घरी न्यायला आले आहात का तुम्ही ? नाही न? मग मला काही नको", अर्णव.

"ओह, बरं मग हे लाडू? दामूकाकांनी दिले होते बुवा अर्णवसाठी" , अंशिका आता त्याचा राग घालवण्याचा प्रयत्न करत होती. लाडूंचा डबा तिने उघडून त्याच्यासमोर धरला होता.

"दामूकाकांनी दिले? माझ्यासाठी?" , अर्णव आनंदाने अन आश्चर्याने म्हणाला. त्याचा राग आता थोडा निवळल्यासारखा वाटत होता.

"चल ना, आपण कॅन्टीनमध्ये बसून खाऊ", अनय म्हणाला.

तिघेही कॅन्टीन कडे जाऊ लागले. तेवढ्यात रिया खोलीतून आली आणि तिला हे सगळे जण दिसले.  ती धावतच त्यांच्याकडे आली आणि जाता जाता ते बोलू लागले. रिया अनयला विचारायला लागली.
"अंकल, तुम्ही अर्णवचे बाबा आहे न? आणि आंटी तुम्ही आई न ? मला दिसले होते तुम्ही अर्णव आला ना त्यादिवशी", रिया.

"हो, बेटा. नाव काय तुझं? ", अनयने विचारले.

"लिया. मीच त्यादिवशी अर्णवला सांगितलं की तू ललू नको,  मग तो ललला नाही", रियाने उत्साहाने सांगितले.

"अरे , वा! छान !  मग तर तू अर्णवची इथली सर्वात पहिली फ्रेंड झालीस ना? ", अनयने आनंदाने म्हटले. त्याला तिच्या बोलण्याची मजा वाटली.

"हो, तो माझा फ्रेंड आहे, मी खेलते त्याच्याशी आणि त्याला हेल्प पण कलते मी", रिया म्हणाली.

"छान हं बेटा, असेच छान रहायचे सगळ्यांनी",अंशिका म्हणाली.

बोलता बोलता ते कॅन्टीनमध्ये पोचले होते . एक टेबल बघून तिथे सर्वजण बसले. अनयने कुकीज काढून त्यातले अर्णव आणि रियाला दिले.

"Wow ! अंकल, फ्रुट अँड नट कुकीज आहेत न हे? मला तल खूप आवडतात " , रिया कुकी खात खात म्हणाली.

"हो का? आता यातले खा हं, पुढच्या वेळी तुझ्यासाठी पण आणेन मग", अनय हसून म्हणाला.

अंशिकाने डब्यातून लाडू काढून अर्णवला आणि रियाला दिला. तेवढ्यात आर्यन, जय आणि निकी अर्णवला शोधत शोधत तिथे आले.

"ओह, तो तू यहां है. हम लोग कितना ढुंढ रहे थे तुझे. मुझे लगा कहां चला गया?, बता के जाना चाहिये न ", निकी.

"हां , वो मै जलदी में वैसेही आ गया, सॉरी", अर्णव.

"हॅलो अंकल, हॅलो आंटी", निकी.

"बाबा, हे माझे फ्रेंड्स आहेत. हा निकी, हा आर्यन आणि हा जय", अर्णवने तिघांची ओळख करून दिली.

"हॅलो, नाइस टू सी यु बच्चा लोग !", अनय सर्वांकडे बघत स्माइल करत म्हणाला. अंशिकाने त्यांनाही लाडू दिला.

"थँक यू आंटी", तिघेही म्हणाले.

"हे सगळे मला खूप हेल्प करतात बाबा, आणि खेळतात पण माझ्याशी", अर्णवने सांगितले.

"आणि आर्यन, अर्णव आणि मी एकाच वर्गात आहोत", रियाने सांगितले.

"आर्यन बेटा अन रिया बेटी पण त्याच वर्गात आहे का? व्हेरी गुड, मग तर काही फिकीरच नाही आता, हो की नाही अनय?", अंशिका खुश होऊन म्हणाली.

"हो ना, बरं झालं सर्वांशी भेट झाली ", अनय.

तोपर्यंत मुलांची संध्याकाळी खाण्याची वेळ झाल्यामुळे इतर मुलेसुद्धा कॅन्टीनमध्ये येऊ लागली. अर्णव आणि बाकी सगळेजण सुद्धा रांगेत उभे राहून प्लेट घेऊन परत टेबलवर आले. अनय- अंशिका त्यांना शिस्तीने रांगेत उभे राहून घेताना पाहत होते. अर्णवसहित सर्वांनी आपापली प्लेट नीट संपवून धुण्यासाठी ठेवली आणि हात धुवून परत येऊन बसले. अनय, अंशिका चे निरीक्षण सुरूच होते. अर्णवला तिथे जे असेल ते तक्रार न करता निमूटपणे खाताना, शिस्तीला जुळवून घेताना बघून दोघांचेही हृदय भरून आले होते. त्याचा अभिमान वाटत होता.

दोघेही वॉर्डनला भेटून धन्यवाद देऊन परतीच्या प्रवासाला लागले.*******

काही दिवसांनी...

"अनय, बारा वाजलेत ना रात्रीचे, अजून किती वेळ काम करत बसणार आहेस? झोप ना आता." अंशिका हाताला क्रीम लावत , खोलीतून बाहेर येत म्हणाली.

"हो, थोडं काम आहे अजून. तू झोप", अनय लॅपटॉप मध्ये बघतच म्हणाला.

"Ok. मला उद्या सकाळी लवकर एका ठिकाणी नवीन फॅब्रिक बघायला जायचं आहे . लग्नाच्या च्या ड्रेसेसची आणि लेहंगा वगैरेंची नवीन ऑर्डर आली आहे. मी झोपते मग", अंशिका.

अर्णवला भेटून आल्या नंतर अंशिका आणि अनय पुन्हा आपापल्या दिनचर्येत व्यस्त झाले होते. आता अंशिकाला तिचे स्वप्न पूर्ण करण्याचे वेध लागले होते. त्या दिशेने तिची घोडदौड सुरूच होती.दुसऱ्या दिवशी बुटीकमध्ये अंशिका कारागिरांना सूचना देत होती ....

"दशरथ काका , ते त्या दिवशी गहिऱ्या निळ्या रंगाचं सिल्कचं फॅब्रिक आलंय ना, ते पार्टी वेअर इव्हनिंग गाऊन्स साठी घ्या.
हे बघा हे दोन तीन डिझाइन्स मी काढून ठेवले आहेत. हा नेक , हा बॅक नेक असा करायचा आहे. 

त्यावर सिल्वर कुंदन चे ऑल ओव्हर वर्क करायचे आहे. म्हणजे त्याला बघता रात्रीच्या गर्द निळ्या आकाशात चांदण्या चमचमताहेत असं फीलिंग यायला हवं. एलिगंट दिसायला हवा एकदम", अंशिका.

"हो, मॅडम. खूप सुंदर दिसेल . माझं हे काम होतच आलंय, ते झालं की हेच घेतो करायला", दशरथ काका म्हणाले.

"असा एक, आणि या दुसऱ्या डिझाइन च्या गाऊनवर बारीक शुभ्र मोत्यांचे वर्क करायचे आहे. ते मी प्रमिला मावशींना समजावून सांगितले आहे. तुमचा शिवून झाला की त्यांच्याकडे द्या, तोपर्यंत त्यांचेही त्या साडीवरचे वर्क करून होईल", अंशिका.

"एलिना, माने काका आले नाहीयेत का ग अजून?", अंशिका एलिनाकडे वळून म्हणाली.

"थोडया वेळात येतील असा फोन आला होता त्यांचा", एलिना.

"बरं , ते आले की सांग त्यांना, काही दिवसांपूर्वी आपण लिनन च्या फॅब्रिक मध्ये जे फॉर्मल आणि कॅजुअल टॉप्स आणि लेडीज फॉर्मल शर्टस तयार केले होते ना, तसे आणखी तयार करायचे आहेत . आपल्या ऑफिस वेअर डिझाइन्सची मागणी खूप वाढते आहे. मी काही सोबर आणि एलिगंट डिझाइन चे फॅब्रिक आणले आहेत. आणि हे डिझाइन चे स्केचेस सुद्धा दे त्यांना", अंशिका

"Ok, मॅडम, सांगते मी त्यांना", एलिना.

"वैशाली, तुझे मशीन एम्ब्रॉयडरी आणि पॅच वर्क चे किती कुर्ते झालेत? ", अंशिका वैशालीकडे वळून म्हणाली.

"मॅम , जवळपास सगळे झालेत , दोन तीनच करायचे राहिले आहेत आता", वैशाली झालेल्या कुर्त्यांचा गठ्ठा दाखवत म्हणाली.

"छान ! तुझं हे काम झाल्यानंतर प्रमिलामावशींना मदत करशील.

"सर्वजण अगदी मन लावून काम करत आहात. I am proud of you all" , अंशिका समाधानाने म्हणाली तसे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

"आपल्या ब्रँड लाँचिंग चा शो अगदी दणक्यात व्हायला हवा , आता जास्त वेळ राहिलेला नाही , सगळे जोरात तयारीला लागू या", अंशिका.

"रितेश, तुला या वेळी नेहमीपेक्षा थोडया मोठ्या हॉल आणि स्टेज ची अरेंजमेंट करायची आहे हं. ते इंव्हिटॅशन कार्ड्स आलेत का प्रिंट होऊन? वेळेत पाठव सर्वांना", अंशिका .
रितेशने मान डोलावली.

"हो मॅडम, खूप रिस्पॉन्स सुद्धा येईल आपल्याला, बघा तुम्ही", दशरथ काका.

" लाँचिंग झाल्यानंतर तुम्हा सर्वांसाठीसुद्धा एक सरप्राईज आहे" , अंशिका स्माईल करत म्हणाली.

******

काही दिवसांनी अंशिकाच्या फॅशन ब्रँड 'अंश' (Ansh) चे दिमाखदार लाँचिंग झाले.  कार्यक्रमाला अनय-अंशिकाच्या नेहमीच्या क्लाएंट्स सहित इतर प्रतिष्ठित व्यक्तींनाही निमंत्रण असल्यामुळे भरपूर लोक उपस्थित होते. त्यात चित्रपट क्षेत्रातील काही कलाकारांना सुद्धा आमंत्रण दिले होते.  अंशिकाने मॉडेल्स करवी ऑफिस फॉर्मल्स, वेस्टर्न ड्रेसेस, वेडिंग लेहेंगा, डिझायनर साड्या, इव्हनिंग गाऊन्स इत्यादी प्रत्येक प्रकारच्या पेहरावातल्या खास आणि एलिगंट डिझाइन्स प्रस्तुत केल्या.

"Wow! This one is so elegant!" ...

"So Beautiful !!" ...

"Lovely !! ...I am definitely going to have this sari for wedding in my family" ...

"Wow , हे ऑफिस वेअर सुद्धा किती comfortable वाटताहेत नाही? ...

"आणि कॅज्युअल वेअर सुद्धा स्मार्ट दिसताहेत"...

शो यशस्वीपणे सादर झाला. नेहमीप्रमाणे तिच्या डिझाइन्स सर्वांना आवडल्या होत्या. अंशिकाची मेहनत आणि आत्मविश्वासाची सर्वजण तारीफ करत होते. अनयच्या क्लाएंट्स नी सुद्धा त्याला शो आवडल्याचे आवर्जून सांगितले . सर्वांच्या मेहनतीचे चीज झाल्यामुळे अंशिका आणि तिची टीम खुश होती.

अंशिकाने लगोलग पूर्ण टीम आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी उद्या डिनर पार्टी ठेवल्याचे टीमला सांगितले. शो नंतरची आवराआवर करून टीम पार्टीच्या मूडमध्येच घरी गेली.

दुसऱ्या दिवशी पार्टीमध्ये अंशिकाने सर्व टीमला पगारवाढ देत असल्याचे जाहीर करून ब्रँड लाँचिंग बद्दल एक छोटेसे गिफ्ट दिले.  टीम ने आनंदाने जल्लोष करून तिच्या निर्णयाचे स्वागत केले.


क्रमशः

© स्वाती अमोल मुधोळकर


कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

हा पार्ट कसा वाटला ते नक्की कळवा.

 

🎭 Series Post

View all