परीघापलिकडले नाते - भाग 3 (मराठी कथा : marathi story)

Parigh, parighapalikadle, nate, Parigha, bhag, katha, marathi, story, spardha, kautumbik, kutumb, family, love, kids, Arnav, Anay, Anshika, Riya, school, boarding, hostel, warden



दुसऱ्या दिवशी सकाळी अलार्म वाजला आणि मुले उठली. अर्णव झोपेतच होता. जयने त्याला उठविले.
"अर्णव उठ, पटकन तयार हो" , जय.
" झोपू द्या न थोडावेळ" , अर्णव.
"अर्णव शाळेची वेळ होईल  ", जय.

"पाच मिनिटं ना प्लीज", अर्णव.
"दामूकाका, तुम्ही माझा चॉकलेट मिल्कशेक बनवा . मी तोपर्यंत उठतो ", अर्णव.

"उशीर झाला तर शिक्षा होते हं , उठ लवकर, आणि हं, दामूकाका नाहीयेत इथे. आपल्याला शाळेसाठी तयार होऊन नाश्ता करायला कॅन्टीनमध्ये जायचंय ", जय.

"अं?", अर्णव डोळे चोळत उठला. बघतो तर काय आजूबाजूला मुलांची लगबग सुरू होती. कोणी ब्रश करत होते, कोणी अंघोळ करून आले होते, कोणी आपली पुस्तकं बॅगमध्ये भरत होते. बिचारा अर्णव, आता त्याला आठवलं की आपण तर बोर्डिंग मध्ये आलोय. आजूबाजूच्या मुलांनी पांघरूण घडी करून नीट ठेवलेले बघून त्यानेही आपल्या पांघरुणाची घडी केली आणि नीट ठेवले.

ब्रश घेऊन अर्णव फ्रेश होण्यासाठी गेला. मुलांनी अंघोळीसाठी आपापले नंबर लावून ठेवले होते.
"ए तुझ्यानंतर मी, मला आवाज दे",
"तेरे बाद मेरा नंबर हां?",
"मुझे पहले जाने दो ना, जलदी बाहर आ जाऊंगा, मेरे बाद तुम चले जाना",
"ए लवकर आटप ना, मला उशीर होतोय", दार वाजवत एक जण दुसऱ्याला म्हणत होता. त्या आतल्या मुलाचे बाथरूम सिंगिंग सुरू होते.

मुलांचे अशा आरोळ्या, आवाज देत एकामागे एक तयार होणे सुरू होते. सकाळी सकाळी इतकी गडबड, हे सगळं तर अर्णवला नवीनच होतं. तो आश्चर्याने इकडे तिकडे बघत होता.

"अर्णव, हे बघ हा गरम पाण्याचा  टॅप आहे, शॉवर असं लावायचं, जा, कर तू आता", जय आपलं एकेक काम आटपत त्याला सांगत होता.

"उई ssss ! हे तर खूपच कोमट पाणी येते आहे शॉवर मधून" , ओला झालेला अर्णव अंदाज न आल्याने दचकून म्हणाला.
"हो, तसंच येतं आता. थोडं नळातून घे म्हणजे थंडी वाजणार नाही ", जय.

कसेबसे अर्णवने आपलं आवरलं आणि युनिफॉर्म घालून, बॅग घेऊन तयार झाला. तेवढ्यात निकी, आर्यन आणि जय आलेच बोलवायला.

"Bro, तू तो एकदम रेडी है, very good. चलो चलते हैं कॅन्टीन में. मुझे तो बहुत भूख लगी है", निकी म्हणाला. मध्येच हिंदी, इंग्रजी बोलण्याची त्याची एक लकब होती.

सगळेजण कॅन्टीन मध्ये पोचले. रांगेत उभे राहून वाढून घेतले. आणि टेबल समोर येऊन बसले. रियासुध्दा युनिफॉर्म घालून तयार होऊन आली होती. ती आणि तिची मैत्रीण मिष्टीसुद्धा त्यांच्यासोबत बसली. 

नाश्त्याला पोहे बघून अर्णव पुन्हा नाराज झाला.
"इथे असंच बनवतात का सगळं? मला डोसा पाहिजे, पोहे नाही आवडत मला", रडवेला होत अर्णव म्हणाला.

"तू पण खा न पोहे, बघ सगले खात आहेत , मी पण खात आहे, डोसा फ्लायडे ला (friday) मिलेल आपल्याला ", रिया.
"पोहा अच्छा तो है अर्णव . खा ले न अभी जलदी से, नही तो स्कूल के लिये देर हो जायेगी",  निकी त्याला समजावत म्हणाला.

नाश्ता करून सगळे शाळेत आपापल्या वर्गात गेले. अर्णव आर्यन आणि रियासोबत पहिल्या वर्गात गेला. मागच्या एका रिकाम्या बेंचवर जाऊन बसला. नवीन मुलगा बघून सगळेजण अर्णवभोवती गोळा झाले.
"तुझं नाव काय?" ,
"तू कुठून आलास?",  इत्यादी प्रश्न मुले विचारू लागली. त्यांचा तो गोंधळ बघून अर्णव अजूनच बावरला.
"अर्णव, मुंबईला राहतो मी", अर्णवने सांगितले .

तितक्यात शिक्षक वर्गात आले.
मुलांनी सांगितले "सर , हा नवीन मुलगा आलाय, अर्णव ".

सरांनी अर्णवची चौकशी केली आणि नंतर शिकवायला लागले. अर्णव नाराजीनेच ऐकत होता. अर्णवने थोडा वेळ शिकवण्याकडे लक्ष दिले. मग मध्येच त्याला खिडकीतून बाहेरच्या एका झाडावर असलेले चिमणीचे घरटे दिसले . इतका वेळ उदास असलेला अर्णव किंचित खुलला. घरट्यातल्या चिमणी आणि दोन पिलांना बघून त्याच्या चेहऱ्यावर किंचित हसू फुलले.

मधली सुटी झाली . जेवण झाल्यावर सगळी मुले मुली खेळण्यासाठी बाहेर गेली . अर्णवला कोणाशीही बोलावेसे, खेळावेसे वाटत नव्हते. तो खिडकीजवळ येऊन घरट्यातल्या पिलांकडे बघत राहिला. चिमणीचे एक एक दाणा आणून त्यांना भरवणे सुरू होते.

सुटी संपून दुसरे शिक्षक वर्गात आले आणि पुन्हा शिकवणे सुरू झाले. अर्णव नुसताच पुस्तक काढून बसला होता. त्याला त्याच्या आधीच्या शाळेची, मित्रांची आठवण येत होती.

कशीबशी शाळा संपली. रिया, आर्यन आणि अर्णव  उठले. पाठीला बॅग अडकवून आर्यनने अर्णवच्या खांद्यावरून गळ्यात हात घातला आणि ते परत हॉस्टेलला यायला निघाले.

अर्णवला वाटले, झाली एकदाची शाळा, आता तरी तो खोलीमध्ये बसून राहू शकेल . कोणाशीही न बोलता एकटेच राहावे असे त्याला वाटत होते. पण कसले काय. खाऊनपिऊन झाल्यावर एक तासाच्या सुट्टीनंतर खेळायला सोपे पडतील असे कपडे घालून मुलांना जावे लागे. वेगवेगळे खेळ, नृत्यकला, गायन, वाद्य वाजवणे, पोहणे इत्यादीसाठी मुलांना मार्गदर्शन करणारे शिक्षक उपलब्ध असायचे. मुले दोन तीन तास वेगवेगळे खेळ इत्यादी खेळून पुन्हा मनाने ताजेतवाने होत.

रिया नृत्य शिकण्यासाठी जात असे. ती आपल्या मैत्रिणींबरोबर त्या डान्स हॉल मध्ये गेली आणि अर्णव आपल्या मित्रांसोबत मैदानावर पोचला. जय आणि निकी आधीच इतर मुलांबरोबर फुटबॉल खेळण्यात रंगले होते , फुटबॉल चे कोच सर सुद्धा त्यांच्याबरोबर खेळत त्यांना शिकवत होते. अर्णव एकटाच एका बाजूला पायरीवर जाऊन इतर मुलांना खेळताना बघत बसला. थोडया वेळाने सरांचे त्याच्याकडे लक्ष गेले. त्यांनी अर्णवला खेळायला बोलावले. पण अर्णव नाही म्हणत तिथेच बसून राहिला. काही वेळाने सर त्याच्याकडे येऊन बाजूला पायरीवर बसले. हळूच हसून त्याच्या पाठीवर थोपटून ते म्हणाले,

"What is your name? "
"My name is Arnav" , अर्णव खाली बघत पायाच्या बोटांनी मातीमध्ये खेळत म्हणाला.
" Oh, nice . Your father told me that you like football and cricket. Do you like?", सर.
"Yes and I like guitar also", अर्णव.
"Why dont you play with us then? Come, let us play.", सर.
"No. I don't want to play. I want to go to home " , अर्णव.

सरांनी त्याच्या पाठीवर थोपटले आणि ते खेळायला निघून गेले.
कोच सर मुलांच्या कलाने घेणारे होते. त्यांनी त्याला फार आग्रह न करता तिथे बसू दिले. त्यांना खात्री होती की सर्वांना असे खेळताना बघून एक दोन दिवसात अर्णवसुद्धा खेळायला येईल. अर्णव तिथेच बसून मुलांचा खेळ बघत होता. खेळ बघता बघता त्यात तो रंगून गेला आणि गोल झाला की त्याच्या चेहऱ्यावर स्माइल येत होते. तेवढ्यापुरते त्याला बाकी गोष्टींचा विसर पडला होता.

खेळणे झाल्यावर सर्वजण थोडासा नाश्ता करून परत खोलीत आले. आता अभ्यास करण्याची वेळ असे . मोठी मुले आपल्या अडीअडचणी त्या विषयाच्या शिक्षकांकडून सोडवून घेत. नंतर जेवण आणि थोडावेळ tv वरील एखादा माहितीपर कार्यक्रम बघून मुले परत खोलीत येत. थोडाफार राहिलेला अभ्यास, गप्पागोष्टी , दुसऱ्या दिवशीची तयारी इत्यादी करून झोपी जात.

अर्णवसुद्धा आपले एक पुस्तक काढून वाचत बसला.
त्याला अशा इतक्या शिस्तबद्ध वातावरणाची सवय नव्हती. एकदा शाळा सुटली की झाले. घरी तर तो आपल्या मनाचा राजाच! कधीही जे आवडेल ते, काहीही करू शकत असे. काय होईल, आवडेल का त्याला इथे?

क्रमशः
*******

© स्वाती अमोल मुधोळकर


घरी सगळे व्यवस्थित असूनही अर्णव ला इथे का पाठवले?
अर्णव इथल्या शिस्तबद्ध वातावरणात रुळेल का ?
काय होतं या सर्वांच्या आयुष्यात पुढे?

तुम्हाला काय वाटतं कंमेंट मध्ये कळवा.

या आणि तुमच्या मनातल्या इतर प्रश्नांची उत्तरं लवकरच बघू या पुढच्या भागात. कथेचा हा पार्ट कसा वाटला नक्की कळवा.

कथेच्या प्रकाशनाचे आणि वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव.
 

🎭 Series Post

View all