परीघापलिकडले नाते - भाग 2 (मराठी कथा : marathi story)

Parighapalikadle, Nate, Parigh, parigha, kautumbik, kutumb, spardha, katha, marathi, story, Anay, Anshika, Arnav, Riya, Love, relation, family, kutumba, boarding, schoolपहिल्या भागात आपण बघितले की अनय आणि अंशिकाने अर्णवला बोर्डिंग स्कूलला आणून सोडले .
अर्णवला वॉर्डन आत घेऊन गेली आणि त्याची मुलांशी ओळख झाली. अर्णवला त्याच्या घरापेक्षा अगदीच वेगळ्या असलेल्या वातावरणाला सामोरे जाताना अडचणी येत होत्या. रिया, आर्यन, जय आणि निकी हे त्याचे नवीनच झालेले मित्र त्याची मदत करत होते. पण अर्णवला घरची आठवण येत होती. आता पुढे ...

******

"टिंग टिंग टिडिंग टिंग टिंग " अनयचा फोन वाजला. त्याच्या ऑफिस मधल्या मॅनेजरचा फोन होता.
"सर, मेहता गृप ऑफ इंडस्ट्रीज कडून ई-मेल आलाय. त्यांना आपण पाठवलेले सगळे सॅम्पल पसंत पडले आहेत आणि  उद्यापर्यंत ऑर्डरचे सगळे डिटेल्स पाठवतो म्हणाले आहेत", मॅनेजर.

"गुड. मग आता आपल्याला तयारीला लागायला हवं. ही मोठी ऑर्डर आहे आणि मेहता गृप ऑफ इंडस्ट्रीज त्या मानाने नवीनच क्लाएंन्ट आहेत आपले. मला  क्वालिटीमध्ये अजिबात compromise नकोय. नेहमीप्रमाणे आताही सगळ्या मालाची क्वालिटी नीट तपासूनच पुढे पाठवा. ही ऑर्डर यशस्वी झाली तर पुढेही बिझनेसमध्ये संबंध चांगले राहण्यास मदत होईल", अनय ने मॅनेजरला सूचना दिली.
"येस सर", मॅनेजर.

"ठीक आहे , त्यांचा पुढचा काही इ-मेल आला तर लगेच कळवा मला", अनय.

अनय मुंबईतील एक प्रथितयश उद्योजक होता. मोठ्या हिंमतीने आणि कष्टाने त्याने आपल्या उद्योगाचा डोलारा उभारला होता. हुशारी , कल्पकता आणि ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार उत्पादने पुरवून समाधानी ठेवण्याची वृत्ती या सर्वांच्या जोरावर त्याने अल्पावधीतच आपला उद्योग विस्तारित केला होता. स्वतःचा उद्योग म्हटल्यावर कामाला काही ठराविक वेळेची मर्यादा अशी नसतेच जणू. नोकरी म्हणजे आठ दहा तासांचा व्यवसाय अन व्यवसाय म्हणजे चोवीस तासांची नोकरी. आपल्या कामात दिवसरात्र व्यस्त राहणे हीच त्याची दिनचर्या . नवनवीन उत्पादने कशी बनवता येतील,  ग्राहकवर्ग कसा वाढवता येईल यासाठी  तो सतत प्रयत्नशील असायचा.


" हॅलो, हं एलिना, बोल ", अंशिका फोनवर बोलत होती.
"मॅम, ते कारागीर म्हणत आहेत की मरून रंगाचं सिल्कचं जे फॅब्रिक आपण लेटेस्ट वेडिंग ड्रेसेस मध्ये वापरलंय ना, ते संपत आलंय. आपल्याला त्या ड्रेसेस ची शहा अँड सन्स कडून आणखी एक मोठी ऑर्डर आली आहे", एलिना.

"हं Ok . शहा अँड सन्स हे आपले सुरवातीपासूनचे क्लाएन्ट आहेत. एलिना तू एक काम कर, नवीन ऑर्डरसाठी किती फॅब्रिक लागेल त्याचा कारागिरांना विचारून अंदाज घेऊन ठेव.
त्यासोबत इतर रंगांचे फॅब्रिक, लायनिंग, आणखी काही साहित्य, लेस, मोती, कुंदन वगैरे लागणार असेल तर त्याचीही लिस्ट काढून ठेव. मी काही नवीन प्रकारच्या सोनेरी लेस आणलेल्या आहेत , त्याही मी दाखवीन",  अंशिका.

"ओके मॅम, आपला पुढच्या आठवड्यात जो  वेडिंग ड्रेसेसचा शो आहे ना, त्याचे ड्रेसेस तयार आहेत ", एलिना.

"ठीक आहे तू मॉडेल्स ना फोन करून  ट्रायल आणि रिहर्सल च्या वेळा ठरवून त्यांना बोलावून घे.
मी येतेच आहे थोड्या वेळात, मग ऑर्डरही करू आणि ट्रायलही बघू. बाय ", अंशिका.

अंशिका ही फॅशन डिझायनर असून तिचे बुटीक चालवत असे.  छोट्याशा बुटिकपासून सुरवात करून तीसुद्धा एक विख्यात फॅशन डिझायनर झालेली होती. तिलासुद्धा नवनवीन डिझाइन्स बनवण्याची आवड होती . कल्पकतेने  वेगवेगळ्या प्रकारच्या कापडाचा उपयोग करून ती ड्रेस , वेस्टर्न ड्रेस आणि साड्या इत्यादी डिझाइन करून कारागिरांकडून बनवून घेत असे. तिने आपल्या हाताखाली चार पाच जणांची एक टीम बनवली होती. तिच्या डिझाइन्सचे ती मध्ये मध्ये फॅशन शो आयोजित करत असे. तिच्या डिझाइन्स ना उच्चभ्रू परिवारातील लोक, मोठया दुकानांचे दुकानदार इत्यादी खरेदी करत असत. तिला मग पुढे त्यांच्या ऑर्डर्स देखील मिळत असत. अंशिकानेसुद्धा नाव कमविण्यासाठी बरीच वर्षे मेहनत घेतली होती.

आठ वर्षांपूर्वी अनय आणि अंशिकाची भेट अंशिकाच्याच एका शो मध्ये झाली होती. तो तिथे आपल्या मित्रांसोबत आला होता.
देखणी, गोरीपान, एकदम stylish अंशिका पहिल्या भेटीतच त्याच्या मनात भरली होती. तिचा आत्मविश्वास त्याला भावला होता.  सर्वकाही व्यवस्थित योजनापूर्वक आयोजित करण्याची, उपस्थित लोकांशी व्यावसायिक दृष्टीने वागण्याची हातोटी हे सगळे त्याला दिपवून गेले होते. पुढे मैत्री, आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.  देखण्या आणि प्रथितयश उद्योजक असलेल्या अनयमध्ये अंशिकाचेही मन गुंतत चालले होते. त्याच्या मनमोकळ्या स्वभावामुळे अंशिकालाही तो आवडला होता. काही दिवसांनी अनयने अंशिकाला लग्नासाठी विचारले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अनयने नागपूरला जाऊन आईवडिलांना भेटून त्याबद्दल सांगितले.

"अनय, बाळा. हे बघ, व्यवसाय , जिद्द वगैरे असणं हे सर्व ठीक आहे रे. पण मी काय म्हणते, आपल्याला काही कमी आहे का? तुझा बिझनेस एवढा चांगला चालतोय ना. इकडच्या कितीतरी मुली सांगून येत आहेत तुला. तू अंशिकाचे काय डोक्यात घेऊन बसला आहेस? मी इकडे आपल्या समाजातलीच, ओळखीतली एखादी छान मुलगी बघते ना तुझ्यासाठी, तुझं घर, संसार नीट सांभाळेल अशी. तुझ्या पसंतीनेच होईल सगळं. अन कसं आहे, एकदा थोडं स्थिरस्थावर झालं की काही ना काही करता येतच मग पुढे", अनयची आई अनयला समजावत होती.

"तुझी आई बरोबर बोलतेय अनय. त्या मुलीबद्दल, परिवाराबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही ना", अनयचे बाबा.

"आई, बाबा, मी तिला चांगलं ओळखतो. आमचे प्रेम आहे एकमेकांवर. अंशिकाचे आईवडील नाशिकजवळ गावी राहतात. तुमचा होकार असेल तर मी त्यांनाही भेटून घेईन", अनय काहीशा हट्टाने म्हणाला.

"बघ, बाळा,संसार तुलाच करायचा आहे. तुम्ही आपापल्या कामात व्यस्त राहणार. आम्ही तर काय, अधूनमधून येऊ तिकडे थोडंफार आणि आरोही तर भोपाळला आहे ", अनयची आई.

"आई , मी पण तिच्याशी फोनवर बोललीय दोन तीनदा. बराच वेळ गप्पा मारल्या आम्ही. मलाही ती छान वाटली ग. माझ्या दादूची आवड छानच असेल ना, काय हरकत आहे वेगळ्या समाजातली असेल तरी. स्वभाव चांगला असला की झालं ना", अनयची बहीण आरोही म्हणाली.

शेवटी अनय आणि आरोहीच्या हट्टामुळे त्यांनी अनय आणि अंशिकाचे लग्न करून दिले. अनय, अंशिका मुंबईतील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये बंगला घेऊन त्यात राहू लागले.

तेव्हापासून दामूकाका अनयकडे केअरटेकर म्हणून काम पाहत असत. अर्णवला सुद्धा लहानपणापासून त्यांनी सांभाळले, खेळविले होते. अर्णव आता सहा वर्षांचा झाला होता. त्याला त्याच्या आवडीप्रमाणे खायला नूडल्स, पास्ता, सँडविच, सूप, जे हवे ते जेवण दामूकाका बनवून देत. त्याला लहानपणी बागेत किंवा आसपासच्या मुलांशी खेळायला घेऊन जात .

"अर्णव, ये, चित्र काढायचे का आपण?, अंशिकाने अर्णवला बोलावले.
"हो , हो. तू शिकवणार आहेस मला?", अर्णव आनंदाने म्हणाला.
"हो, ये, आपण दोघे मिळून चित्र काढू. मग मी सांगते तुला कसे रंग भरायचे ते", अंशिका.
" हं , हे मी आणले सगळे रंग, वही आणि पेन्सिल. सांग कसं काढायचं", अर्णव.
"कसलं चित्र काढू या?", अंशिकाने अर्णवला विचारले.
"अं... आपण ना विमान काढू या... झूss म", अर्णव हाताने झू ss म करत म्हणाला.
" हं, हे असं काढायचं, अशा खिडक्या आणि असे विंग्स काढायचे, आता तू काढ या कागदावर" , अंशिका.


अंशिका जमेल तेव्हा अर्णवला घेऊन बसत असे . त्याला चित्राच्या पुस्तकातून गोष्टी सांगत असे. त्याच्याशी खेळत असे. शाळेचा अभ्यास घेत असे. चित्र काढायला शिकवत असे. अनय घरी असताना दोघे बापलेक क्रिकेट खेळत, कधीकधी फुटबॉल किंवा बॅडमिंटन, व्हिडिओ गेम खेळत.

क्रमशः
*******
© स्वाती अमोल मुधोळकर

अर्णवला  बोर्डिंग स्कूलला का पाठवले असावे?
अर्णव तिथल्या शिस्तबद्ध वातावरणात रुळेल का ?
तुम्हाला काय वाटतं ?

या आणि तुमच्या मनातल्या इतर प्रश्नांची उत्तरं बघू या पुढच्या भागात. कथेचा हा पार्ट कसा वाटला नक्की कळवा.

कथेचे सर्वाधिकार लेखिकेकडे राखीव.

"...अन जगायचे राहून गेले"  या माझ्या याआधीच्या कथेला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. 

🎭 Series Post

View all