परिभाषा सुखाची

Paribhasha Sukhachi

स्पर्धा            राज्यस्तरीय करंडक कविता स्पर्धा 
     
 विषय              सुखाची परिभाषा 
 कवितेचे नाव      परिभाषा सुखाची 
                    
 जिल्हा                मुंबई 


 तु मै मै" केल्याशिवाय जमतच नाही, 
 एकमेकांशिवाय आपल्या दोघांनाही करमत नाही.तसेही तुझ्याशिवाय मला तरी दुसरे कोण आहे बाई.. 

साठीतील आज्जी पासष्टीतील आजोबाच्या दोघांच्या सुखाची हि परिभाषा... 

आज्जी वदली ,मी खमकी म्हणुन टिकले.मी म्हणूनच सहन 
करते. तुमच्या संसाराचा गाडा मीच ओढते, माझ्या जागी दुसरी कोणी असती तर तिने केंव्हाच पलायन केले असते ... 

बघायचे का तुला, आणतोच दुसरी बघ कसे जमते. परत दोघांत भांडता भांडता दोघात एकच हास्याची खसखस 
पिकणार. सुखाची परिभाषा इथे सुखावणार... 

साठीतील आज्जी आणि पासष्टीतील आजोबा, दोघांच्या सुखाची हि परिभाषा. 

शब्दाला शब्द वाढवतात,एक बोलायला दुसरे कुठे तरी शांत 
बसते. तु बोलणार मी ऐकून घेणार असे लहान लहान मुलांपरी दोघेही भांडतात ...

 पंचेचाळीस वर्षे मी सहन केले, सुरवात,शेवट हे सगळं माझ्या आता अंगवळणी पडले.आज्जीचा एकच हेका, तुम्हीच व्हा शांत आधी, हा परत तिचा ठेका.मी नाही नमते घेणार हट्ट असे आजीचा.मी पण नाही निश्चय आजोबांचा.. 
     
आज्जी आजोबांची टॉम आणि जेरीची जोडी,त्याला आंबटगोड रसाची गोडी.सतत भांडणाला कारण शोधणारी
सुरूवात कोणीही करणार पण भांडणाचा शेवट मात्र गोडच होणार. 

 साठीतील आज्जी पासष्टीतील आजोबा दोघांच्या सुखाची 
परिभाषा 

रोज तोच तोच विषय नव्याने चगळणार,अगदी स्वर्गीय 
आईवडील पणा भांडणात हमखास अवतरणार. आयुष्यभर केलेल्या कष्टाची मतमोजणी करणार.

 मग हाती काय लागले याची गोळाबेरीज होणार. सदोदित 
मतांची दक्षिण उत्तर दिशा... 

 साठीतील आज्जी आणि पासष्टीतील आजोबा दोघांच्या सुखाची परीभाषा.. 

 परिस्थितीवर काढता न आलेला राग मग दोघे एकमेकांवर काढणार. हळूच एक जण मग पडतील बाजू घेणार. आज्जीच्या डोळ्यातील गंगायमुना आजोबा आपल्या हाताच्या तळव्यांने पुसणार सुखाची परिभाषा इथे थोडी हळवी होणार...

अजून काय हवं म्हणत, दोघेच दोघांची समजूत काढणार.
घोटभर चहाबरोबर परत प्रेमाची अभिलाषा...

साठीतील आज्जी आणि पासष्टीतील आजोबा  दोघांच्या सुखाची परिभाषा. 

गाडी थोडी रूळावर आली कि, परत काहीतरी कुरबुरी, 
विसराळू पणावर कुरघोडी. मग आजोबा तावातावाने बाहेर निघणार.आज्जी तणतणत स्वयंपाकघरात जाणार...

 मग आज्जी आजोबांच्या आवडीचे आंबड गोड वरण करणार तर, आजोबा आज्जीच्या आवडीचं सोनचाफ्याची फुलं,
आवडीची जिलेबी घेऊन येणार...

 परत तु, तु, मै, मै, करत जेवण करणार. आजोबा आज्जीच्या सुखाची परिभाषा इथे परत रंगत धरणार. 

शेवटी सुरुवात जरी वादावादीत झाली तरी रात्र मात्र हळवी असणार. औषधे घेतलीस का? आजोबा आज्जीला विचारणार. 

 तर आज्जी आजोबांची बी. पी.ची गोळी.हळदीचं कोमट दुध आणि पाण्याचा लोटा न विसरता आजोबांच्या पलंगाजवळ ठेवणार... 

म्हातारपणाची ही काठी थोडी मधून मधून आवाज हा 
करणारच, पण कुरकुरत का होईना दोघेही एकमेकांची काळजी घेणार...

साठीतील आज्जी आणि पासष्टीतील  आजोबा दोघांच्या सुखाची परिभाषा इथे संवेदनशील होणार...

मग आजोबा आज्जीला समजवणार, आधी कोण,नंतर कोण,जाणार नाही कळणार, आजचा दिवस आपला समजून सुखाने जगावा. प्रत्येक क्षण आनंदात घालवावा...

येताना काय बरोबर आणलेस म्हणून जाताना ते हक्काने घेऊन जाणार? आलो रित्या हाती तसेच आपण परतणार.. 

आहेस तो पर्यंत सर्वज्ञात मानले. 
गेला त्या क्षणाला प्रेत झाले.
कमवलेले सगळे इथेच सोडणार.
जाताना चार खांदेकरी तुला उचलणार
दहा दिवस तुला आठवणार. 
नंतर तुझा फोटो भिंतीवर टांगणार.. 

वेळ आहे कोणाला.तुझ्या आठवणीत गुंतून राहण्याला.सुखाची परिभाषा इथे थोडी अलिप्त झाली... 

आजोबा आजीला समजावीत होते. निजताना आज्जीची
आजोबांनी समजूत घातली.उद्या पासून बिल्कूल भांडायचे नाही.आजी आजोबांना वचन देऊन झोपून गेली...

 सकाळी सूरू होणारी तु, तु मै, मै. आता मार्गस्थ झाली.कारण वचनात बांधील होऊन,आजी झोपेतच अनंतात विलीन झाली... 

 आजोबांची सुखाची परिभाषा 
आता आठवणीच्या कप्प्यात गेली.