आईबाबांचा घटोत्कच

Clashes between mom and dad and their defects on little ones.

#आईबाबांचा_घटत्कोच

शनिवारी माझ्या दोन्ही मुलांची,आर्य व वेदाची पालकसभा होती. मी माझ्या नवऱ्याला,अजितला म्हंटलं की तू आज जरा उशिरा जा. मला शाळेत ठीक साडेसात वाजता बोलवलं होतं पण अजित ऐकेना. कसला तोरा आलेला कोण जाणे? मी आधी आंघोळ करणार मग तुला काय करायचं ते कर म्हणू लागला.

मी म्हंटलं,"बरं,तू आधी आवर तुझं. मी जात नाही शाळेत. तुझ्या ऑफिसला जायच्या वाटेवरच शाळा आहे. तू पाचदहा मिनटं टिचरला भेटून ये. नाहीतरी आमच्या शाळेत प्रत्येकाची मिटींग वेगवेगळी घेत असल्याने अर्धाएक तास बसून रहाण्याची गरज नव्हती. माझ्या म्हणण्यावर हो म्हणायचं सोडा,उलटं माझ्यावरच भडकला. मला  कायच्या काय बडबडू लागला. मग माझाही संयम सुटला. मीही ओरडू लागले. मुलं झोपली होती. मी तोंड धुतलं,कपडे बदलले व दोघांच्या डायरीज घेऊन बाहेर पडले. घराची एक चावी माझ्याकडे होतीच. 

मी मेन रोडला येऊन रिक्षा पकडली. शाळा तशी दूरच होती. रिक्षा सुरु झाली. माझ्या डोळ्यात सारखं पाणी येत होतं . मला खूप चीड आली होती अजितची. अजित कधी रागावला की माझ्या माहेराचा उद्धार करायचा. 

ते मला मुळीच आवडत नव्हतं. मी त्याला सतरांदा सांगितलं होतं की तू चिडलास तर जे काय बोलायचं ते मला बोल. माझ्या माहेरच्यांना बोलायचं नाही पण ऐकेल तो अजित कुठचा! रिक्षात मी सारखे डोळे पुसत होते. बाहेरचा निसर्ग पहाण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते.

शाळा जवळ आली तसे मी रिक्षावाल्याला पैसे दिले व उतरले. शाळेत जाईस्तोवर डोळे रुमालाने नीट पुसले..आर्य व वेदा दोघांचीही प्रगती विचारली. दोघांनाही छान गुण मिळाले. घरी जायचा माझा अजिबात मुड नव्हता. वाटत होतं लांब कुठतरी जावं,खूप दूर खूप दूर किंवा..असो पण तेवढं बळ नव्हतं अंगात. गपचूप आले घरी. 

मी रडत गेल्याने अजितही धास्तावलेला. एव्हाना पिल्लं उठून खेळत बसलेली. मी घरी नसली की आई बाहेर गेलेय व लवकरच येणार याची कल्पना असते त्यांना व तसं रात्री मी त्यांना शाळेत जाणार असल्याचं सांगुनही ठेवलेलं. मी घरात नसले की दोघंही शांत रहातात. मी असले की मात्र धुडगूस घालतात.  मी घरात शिरताच अजितने आपले शूज घातले व गुपचूप गेला कामावर. 

मी मुलांना न्हाऊ घातलं. मी न्हाले. देवाला नमस्कार केला. आर्य दुसरीत व वेदा सिनियर केजीत आहे. दोघांना थालिपीठ व लोणी खाऊ घातलं व अभ्यासाला बसवलं. अजितचा उपवास असल्याने तो असाच विनाडब्याचा गेला होता. आर्यचा अभ्यास त्याच्या वयाच्या मानाने खूप आहे. बेरीज,वजाबाकी,गुणाकार,इंग्लिश आणि बरंच काही. होमवर्कही बराच असतो. बिचारा दमतो अभ्यास करुन.

 वेदा सिनियर केजीत असल्याने आर्यच्या मानाने तिचा अभ्यास कमी आहे तरी तिची नाजूक बोटं वन टू हंड्रेड लिहून दुखतात. शिवाय स्पेलिंगही असतात लिहायला. किती तो होमवर्क. दोनेक तासतरी मला या दोघांचा होमवर्क घ्यायला लागतात. मग थोडा वरणभात करुन भरवते.

 आर्यला भरवून हवं असतं तर वेदाला स्वतःच्या हाताने खायचं असतं. खाते कुठची नुसती शीतांची रांगोळी घालून ठेवते मग परत ते साफ करायचं. तुम्ही म्हणाल दुपारी झोपत असतील सुट्टीला. छे हो. जुन्या बेगा आहेत त्यांच्याच. त्यात रिकामे डबे,पुस्तकं भरतात नि ए रद्दीवाले,भंगारवाले असं ओरडत खेळत बसतात. कधी आर्य पेशंट होतो व वेदा त्याला तपासते. गोळ्या,औषध देते..कसं घ्यायचं ते सांगते. तिच्या आत्याने डॉक्टर सेट दिला आहे तिला. भातुकलीही खेळतात. 

शेजारची पिंकी व आराध्यही येतो. मी त्यांना थोडा खाऊ देते खेळायला. कधी भडंग,चकली कधी लाडू,शेव असंच काही. वेदा व परी ओढणीची साडी नेसून घेतात, माझ्याकडून व त्या दोघी बायका व आर्य व आराध्य त्यांचे नवरे होतात. 

मला माझं बालपण आठवतं. अशीच तर होते मी,जाम धडपडी..अगदी करट्यांमधे माती घालून त्यांत फांद्या रोवून बगिचा बनवायचे. एकदा एका मित्राने एका डबीत दूध व पेंन्सिलचा शार्प केलेला फुलोरा साठवला की खोडरबर होतो असं सांगितलेलं. मी वेडी किती..मी तेही केलेलं व रोज पहायचे खोडरबर झाला की नाही ते. पैसा पेरला की झाड येतं असं कोणी सांगितलेलं. मला स्वप्नात ते पैशांच झाड दिसायचं. पैसेच पैसे. आता हसू येतं सगळ्या गोष्टींच.

 आर्य व वेदासारखे आऊट ऑफ मार्क्स नव्हते माझे. खूप कमी मार्क्स मिळायचे. होमवर्कही बऱ्याचदा अपुर्ण असायचा. मोठी होत गेले तसतशी सुधारले. अभ्यास केला पाहिजे ही जाणीव होऊ लागली. आराध्य व परी आपापल्या घरी गेले. वेदाने चुलबोळकी आवरुन ठेवली. ही चुलबोळकी लाकडी आहेत,सावंतवाडीची. मला आईने गावाहून पाठवलेली.

 पुन्हा मला सकाळचा किस्सा आठवला. वाटलं थोडं लवकर उठून आंघोळ करायला हवी होती मग नंतरच रामायण घडलं नसतं पण अजित काल रात्री खूप उशिरा घरी आलेला. त्यानंतर जेवणखाण,ओटा आवरणं,भांडी मग निजायलाही उशीर झाला त्यामुळे सकाळी जाग नाही आली आणि ना एक सांगू मला साखरझोप फार आवडते. त्यावेळी मी अगदी लहान होते. वयाचं बंधन नाही रहात मला पण अजित मला नुसता रागावला असता तर चाललं असतं. रागावला की माझ्या माहेराचा उद्धार का करतो! तुझ्या आईने तुला काहीच शिकवलं नाही म्हणतो. 

आईबद्दल काही म्हंटलं की मला खूपखूप राग येतो त्याचा. मीही त्याच्या आईवरून बोलू पहाते. बोलण्यासारखं बरंच असतं पण जीभ आडवी येते. कोणत्याही मोठ्या माणसाबद्दल वाईट बोलायचं नाही हे संस्कार आडवे येतात मग डोळे भरुन येतात,भांडता येतच नाही मला. शब्द गोठतात माझे..घुसमट होते..कसं कळत नाही या अजितला! मला आवडतो तो..खूप आवडतो आणि आपलं माणूस अगदी कुजकं बोललं की जिव्हारी लागतं. 

आर्य व वेदा खेळता खेळता झोपले. मी कपडे धुवून वाळत घातले. फरशी पुसून घेतली व स्वैंपाकाला लागले. वरणभात,भेंडीची भाजी व पोळ्या केल्या. थोडी शेवयाची खीर केली. अजितला आवडतात म्हणून भिजवलेले बदाम कातरुन टाकले.  जरा पातळच ठेवली. नंतर दाट होते.

 समोरच्या वहिनींनी वेदचे मार्क्स विचारले खिडकीतून. मी सांगितले तसे त्यांनी त्यांच्या प्रियांशचे मार्क्स सांगितले. प्रियांशला वेदपेक्षा जास्त मार्क्स असल्याचा आसुरी आनंद मला त्यांच्या चेहऱ्यावर दिसला. त्या नेहमी अशाच करतात. प्रत्येक वेळी मार्क्सची तुलना करतात..तागडीत घालून भाजी तोलतात तशी व कुत्सित हसतात व इतर बायांना, प्रियांशला आर्यपेक्षा जास्त मार्क्स मिळतात हे सांगत बसतात. मला खूप राग येतो त्यांचा. वाटतं नाकावर गुद्दा मारावा त्यांच्या किंवा खूप काही बोलून दाखवावं त्यांना पण छे जीभ रेटत नाही पुन्हा संस्कारच आड येतात अरे ला का रे करण्याची व्रुत्ती नाही माझी.

आर्य व वेदा टेरेसमध्ये खेळत असतात.
आर्य: वेदा तुला कळलं का आईबाबांच भांडण झालंय. त्यांची कट्टीफू झालेय ते. तुला कसं कळणार तू झोपली होतीस. मी अंथरुणात डोळे मिटून ऐकत होतो. बाबा नेहमी असाच करतो आईशी कट्टी घेतो. आईला बेड बेड वर्ड्स बोलतो मग आईपण बोलली त्याला पण आईला जमत नाही भांडायला मग ती रडत बसते. 

वेदा: दादा,बाबा चांगलाय आपला. 

आर्य: वेडीएस तू. तू पार्सिलिटी करते. क्रिकेटमधे करतात तशी. मला दोघंही आवडतात पण तरीपण बाबा वाईट वागत असेल,उगाचच आईला ओरडत असेल तर नाही आवडत मला. मला ना बाबाच काय कोणपण आईला ओरडलेलं नाही आवडत. आज माझा मुड ऑफ झालाय. 

संध्याकाळ झाली तशी मी देवाजवळ दिवा लावला. आर्य व वेदा माझ्यासोबत शुभंकरोती म्हणू लागली. थोड्याच वेळात अजित आला. मी दार उघडलं. नेहमीसारखी स्माईल नाही दिली. सकाळचं भांडण लक्षात होतं माझ्या.   मी किचनमधे जाऊन उगीचच खुडबुडत बसले. अजितला वातावरणातला दमटपणा जाणवला.

अजित(स्वगत): छ्या,उगाचच भांडलो सकाळी ज्योशी. आता ही अशीच घुम्यासारखी रहाणार. सगळा विकएंड खराब. तो बॉसपण ना खतरूड मेला. माझी चुकी नसताना काल मला झापलं त्याने. काम कोणाच्या टेबलचं नि राग कोणावर! 

ऑफिसातल्या बायकांना सिम्पथी दाखवतो आणि आम्हाला धारेवर धरतो. त्यात काल लोकल तासभर लेट आली. ही मरणाची गर्दी. अंग नुसतं आंबून जातं. नुसती चिडचिड होतेय माझी पण ते जरा चुकलच माझं हिच्या आईबाबांना भांडणात आणायला नको होतं मी. काय करणार,स्वतःवर ताबाच रहात नाही.

 घरी लहानपणापासून आईवडलांची भांडणातली विधानं ऐकत आलोय तीच बोलतो पण माझी आई खमकी वडिलांना जशास तसं उत्तर द्यायची. हिला भांडताच येत नाही. प्रत्येक वाक्य सिरयसली घेते नि बसते रडत.

 साला,तिला यायला तासभर उशीर झाला तर कसली फाटलेली माझी. परत येणार नाही म्हणून सांगून गेलेली. वाटलं कुठे गेली की काय. रेल्वेचा रुळपण डोळ्यासमोर उभा राहिला. ज्यो नसली तर या जीण्याला काय अर्थय! त्या सायबाचं काय जातय बोंबलायला. अरे जरा माणुसकीने वाग म्हणावं. कशाला अशी मन:स्थिती बिघडवतो आमची. 

भिडे माझा कलिग,त्याची तर अजून बेकार हालत. बायको गेली माहेरी निघून. आता रोज फोन करुन विनवतो तिला घरी ये म्हणून. माझी ज्यो अशी नाही. आमच्यात कितीही भांडण झालं तरी ते चार भिंतीतच. ती माहेरी एका शब्दाने सांगत नाही. कालच मेहुण्याचा फोन आला होता. किती आदराने बोलत होती ती सगळी माझ्याशी! मेहुणा,त्याची बायको,सासू,सासरे. त्यांना माहिती नाही मी रागाच्या भरात त्यांची कशी आरती ओवाळतो ते.

**

आर्य व वेदाला मी हाक मारली व बाबांना जेवायला वाढलय या म्हणून सांगायला सांगितलं. वेदा तिच्या बाबाला घेऊन आली. जेवताना वेदा तिच्या बाहुलीच्या गमतीजमती सांगत होती. तिच्या बाहुलीला नवीन गाऊन शिवून हवा होता शिवाय थोडं मेकअपचं सामान हवं होतं.

 आर्यने आज काहीच मागितलं नाही. तो गप्पगप्प जेवला. सोसायटीतली दोघंतीघं काही वेळात आली. मी त्यांना आत बोलावलं. पाणी वगैरे दिलं असं कोण दुसरं आलं की आम्ही अगदी नॉर्मल वागतो. मी विकासशी व इतर मेंबरशी चार गप्पा मारल्या. त्यांना सरबत वगैरे आणून दिलं. आमच्या भांडणात टाईमप्लीज घेतलेली.

 आर्य सगळं बघत होता. त्याचं माझ्याकडे अगदी बारीक लक्ष. रात्री माझ्या गालांवर हात फिरवत एक पाय माझ्या अंगावर टाकून निजला. वेदा बाबाच्या कुशीत होती. माझ्या डोळ्यातून टिपं गळत होती. मला माहिती होतं नेहमीसारखंच अजित सॉरी म्हणणार नाही. तो ग्रुहित धरतो मला पण बरेचदा ही घुसमट असह्य होते मला.

 वाटतं लहानपणच बरं होतं पण मग आर्य,वेदा कसे मिळाले असते मला नि अजितही तसा वाईट नाहीए पण असा वेड्यासारखा वागतो. मी कसंतरी झोपायचा प्रयत्न केला. सकाळी अजितने पाणी भरुन ठेवलेलं. मी जरा उशिराच उठले. 

अजित: पक्कड कुठे गेली गं? 

मी: उजव्या ड्रॉवरमधे बघा.

अजित: खालची मोरी भरली बघ पाण्याने.

मी: पंप मारा. थांबा मी आले. 

अजितने पंप मारला. मी खाली बसून वायपरने पाणी लोटलं. कधी बोलू लागलो ते कळलच नाही.

टेरेसमधे कॉफी पीत कुंडीत फुललेली गुलाबं पहात होतो. अजित मला त्याच्या एका मित्राचे कारनामे सांगत होता. मी हसत होते.

इतक्यात वेदा येऊन अजितच्या मांडीवर बसली व आर्यला बोलवत म्हणाली,"दादा हे बघ. आईबाबांची बट्टी झाली. आम्ही हसलो. आर्य डोळे चोळत आला व म्हणाला,"अरे खरंच की. मला वाटलं यांचा आता घटोत्कच होणार मग आपण आईकडे रहाणार व बाबा सण्डेला आपल्याला दोनचार तास भेटायला येणार.

मी व अजित जोरात ओरडलो,"अरे असं काही होणार नाही. व्ही आर युनायटेड."

****

नमस्कार,
ही एक आजुबाजूच्या बघण्यातून सुचलेली काल्पनिक कथा. खरंतर स्त्रीने तिच्या सासरच्याव पुरुषाने त्याच्या सासरच्या माणसांचा मान हा ठेवलाच पाहिजे. 

भांडणात दोन्हीकडच्या माणसांना विशेषतः आईवडीलांचा उद्धार करणं टाळावं. कायकी नवराबायको एक होतात पण त्यांच्या मुलांच्या मनावर भांडणांचे दूरगामी परिणाम होत असतात.

त्यात टिव्हीतील मालिका पाहून आर्यसारख्या एखाद्या निष्पाप बाळाला आईबांचा घटत्कोच होणार वाटलं तर त्यात नवल ते काय!

------सौ.गीता गजानन गरुड.