पालकत्व...

Good Parenting
बाळा होऊ कशी उतराई? तुझ्यामुळे मी झाले आई 

                    

     परमेश्वराने प्रत्येकाच्या घरी बालक रूपी छानसी भेटवस्तू पाठविलेली आहे.

ज्यामुळे स्त्रीला स्त्री जन्माचे सार्थक झाल्यासारखे वाटते.बालकामुळे आई-वडिल यांना जो आनंद मिळतो तो शब्दात सांगणे कठीणच ! ज्यांना असा आनंद मिळाला ते खरचं भाग्यवान!

          आपण पालक होतो हा एक प्रकारचा  बहुमानच आपल्याला मुलं झाल्यामुळे मिळालेला असतो,म्हणजे अप्रत्यक्षपणे  आपण त्या पाल्याचे आभार मानायला हवेत.एक वेळ आईबाबा होणं सोपंं पण मुलांचे पालक होणं अधिक अवघड आणि आव्हानात्मक आहे.उत्तम पालक होण्याचे कुठलेही विशिष्ट नियम अथवा पद्धती नाहीत त्यामुळे प्रत्येक पालक आणि त्याचे मुलं हे एक स्वतंत्र आणि वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमत्व आहे.

           बाळं राजाच्या आगमनापासूनच  त्याचे आईबाबा उत्तम पालक होण्यासाठी प्रयत्न सुरू करतात. मोठ्यांचे सल्ले

समवयस्क पालकांचे अनुभव,पुस्तके आणि आता इंटरनेटच्या माध्यामातून होतकरू  पालक अधिकाधिक प्रगल्भ होत जातात. वर्तमान युगात केवळ संतती प्राप्ती इतकाच पालकांचा मर्यादीत उद्देश नसतो तर निरोगी, संस्कारक्षम व बुद्धिमान अशी सर्वगुण संपन्न संतती सर्वांनाच हवी असते.

        \" शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी \"

               ज्याप्रमाणे इमारत उभी करताना इंजिनिअर प्लँन तयार करतो,त्याप्रमाणे बालकाचे पालकत्व स्वीकारतांना आई,बाबा कुटुंब,समाज यांना त्या बालकातील चांगल्या मुल्यांचे प्रगल्भ अपेक्षित असेल तर संतुलित आणि कौशल्यपूर्ण पालकत्वाचा वापर करून आपण आणि आपले बाळ यांच्यातील संवाद चातुर्य ,संवेदनशीलता,अभ्यासुपणा,चिकाटी,तन्मयता आपल्या अंगी बाणून त्याच्यातील शक्ती ओळखून ,निरीक्षण करून ,गुणांना वाव देवून आपल्या पाल्यामध्ये  आत्मविश्वास,योग्य निर्णयक्षमता,एकाग्रता, तन्मयता कशी वाढीस लागेल याकरिता कौशल्यपूर्ण पालकत्वाचा स्वीकार करायला हवा!

               पालक अर्थात

                 पा  -    पालन करणारा

                 ल  -     लक्ष देणारा

                 क  -   कर्तव्य करणारा

                    पालकत्व एक मोठे आव्हान बनलेले आहे.पालकत्व हे पिढ्यानपिढ्या हस्तांतरीत झालेल्या शहाणपणावर आधारीत असते आणि विशेष म्हणजे याचे औपचारीक शिक्षण कुठेही नसते. बाळाचे संगोपन विशेषतः पहिल्या वर्षातील संगोपन ही पालकत्वाची सत्वपरीक्षाच असते.सगळे अनुभव हसतमुखाने पार पाडावे लागतात. बाळाच्या मेंदूची वाढ पहिल्या काही महिन्यांमध्ये विलक्षण झपाट्याने होते. त्यामुळे बाळाला जेवढ्या जास्त गोष्टींचा अनुभव देऊ तेवढे चांगले ठरते.बाळाच्या संगोपनाचे प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष परिणाम ही होतात.आई - वडिलांचा विसंवाद ही मुल लक्ष देऊन ऐकत असते. याचे भान मुलांचे संगोपन करतांना ठेवायलाच हवे.

               मुलांचे संगोपन करतांना त्यांच्यावर असणारे आपले प्रेमही वेळोवेळी व्यक्त करणे गरजेचे ठरते.प्रेमाची भाषा, स्पर्शाची भाषा ,कौतुकास्पद शब्द पालकांची देहबोली या सर्वांचा प्रभाव मुलांवर पडत असतो.मुलांवर संस्कार करतांना कोणत्या बाबतीत ठामपणा आणि कोणत्या बाबतीत लवचिकता ठेवावी . याचा समतोल साधणे गरजेचे असते.मुलांवर नापसंती व्यक्त करण्यासाठी नकारात्मक भाषा वापरू नये. कुटुंबातील नात्याची वीण घट्ट असणे महत्त्वाचे आहे.मुलांना कुटुंबाची ओढ असली पाहिजे.पालकत्व ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे.यात पालकांसमोर रोजच नवे आव्हान असते. विशेषतः वाढत्या वयाप्रमाणे मुलांच्या भावनिक गरजांची दखल घेणे महत्त्वाचे ठरते.पालकांचा राग आणि मुलांचे भावविश्व यांचा फार जवळचा संबंध आहे. मुलांना वाढवितांना पालकांनी स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांकडून होणारे त्यांच संगोपन आणि त्यांना मिळणारं शिक्षण महत्त्वाचे  असतं,तरच मुले पुढील आयुष्यात यशस्वी घोडदौड करू शकतात.

                 पालन करणे म्हणजे पालकत्व ; पण कसे पालन? सारासार  विवेकबुद्धीने पाल्याचा शारीरिक ,मानसिक,बौद्धिक विकास साधण्यासाठीचे सर्व प्रयत्न पालन या बाबतीत येतात.आजची पिढी संगणक, मोबाइल या सारख्या साधनांच्या आधीन झाल्याने खरचं पालकांची जबाबदारी चिंतनीय झाली आहे.जो स्वतःच्या मुलाला त्याच्यातील दोष घालवून त्याच्यात चांगले गुण उतरण्यासाठी सतत जागरूक असतो, त्याला \" कृतार्थ  पालक \" म्हणावे.पाल्यावर अधिकार गाजवण्यापेक्षा त्याच्याशी मैत्री करावी,कारण मुलांना जितके प्रेमाने सांगू तितके ते अधिक सकारात्मक प्रतिसाद देतात . खरे म्हणजे लहान मुले अनुकरणप्रिय असतात,त्यामुळे त्यांच्यासमोर होणारी आपली प्रत्येक वागणूक अतिशय चांगली असावी लागते.आनंदी पालकच उच्च दर्जाची पिढी घडवू शकतात . पालक हा पाल्याच्या जीवनातील पहिला मित्र असतो.हल्लीच्या या झगमगीच्या काळात संस्कार करणे अतिशय आव्हानात्मक बाब झाली आहे.

                 पाल्यामध्ये पालक आपले लहानपण शोधत असतात.मला जे मिळाले नाही,ते सर्व माझ्या चिमुरड्यांना मिळावे, यासाठी झटण्याची त्यांची तयारी असते. मुलांची इच्छापूर्ती करताना त्यांना वास्तव जगाची कल्पना करून देणे,अपेक्षांचे ओझे न लादता मित्रत्वाच्या नात्याने प्रोत्साहन देणे आवश्यक असते. या प्रवासात आई-वडील आणि मुलांमध्ये सुसंवाद घडायला हवा. त्याच वेळी मुलांना स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून घडवत असताना या पाखराला आकाशी झेप घेण्यासाठीचे बळ ही आपणच द्यायला हवे.

                  आपण जर एखाद्या घरातील सकाळी उठल्यापासूनचा संवाद ऐकला तर काय लक्षात येत? संवाद कमी विसंवाद जास्त! कारण एकच - पालक जे सांगतात त्यातल बरचसं मुलांना ऐकायच नसतं आणि त्यामुळे पालकांची एकच तक्रार - \"आमची मुलं आमचं ऐकत नाहीत.\"पालक इतके वैतागतात की शेवटी म्हणतात , \" करा काय हवं ते\". काही पालक धपाटे घालतात, काही पालक उदास होतात.परिणामी सर्व घरच तणावाखाली येते आणि हा ताण घरापुरताच मर्यादीत राहत नाही , तर काही वेळेस तो घराबाहेरही जाणवतो.

               आजचे पालक सगळीकडून दबावाखाली आहेत.एकीकडून मुलांचे योग्य संगोपन हे खूपच जबाबदारीचे काम आहे तर दुसरीकडे समाजाच्या आशा! मुलांच्या सर्व दोषांचे खापर सुद्धा पालकाच्यांच माथी मारले जाते.आजची कुटुंब पद्धती ही विभक्त- आई-वडील दोघेही नोकरी करणारे!त्यामुळे घर आणि नोकरी दोन्ही जबाबदारी पार पाडणं म्हणजे तारेवरची कसरत!त्यात मुलांच वागणं योग्य नसेल तर उरला सुरला उत्साह पण मावळतो.

                  एक गोष्ट अगदी नक्की आहे की मुलांना वाढवण्याच्या पूर्वीच्या पद्धती आजच्या परिस्थितीत लागू पडत नाहीत.याचं कारण काय असू शकतं? अनेक पिढ्या अनेकानेक बदलांना तोंड देत मुलं वाढवतचं होती ना? मग आजच्या काळात हे काम जास्त कठीण का होतयं? काही लोक हे सर्व तांत्रिक बदलांमुळे तसेच सामाजिक व आर्थिक बदलांमुळे घडतयं अस मानतात. शिक्षक आणि पालक दोघेही मुलांना कसे वाढवावे याबाबत गोंधळलेले असतात. पुष्कळ जणांना वाटत की जुना जमाना परत यावा पण कालचक्र उलट फिरविता येत  नाही.घरातील मोठी माणसे आणि लहान मुले यांच्यात सुसंवाद,सामंजस्याचे नाते घट्ट होण्यासाठी त्यांना परस्परांबद्दल आदर असणे आवश्यक आहे.स्वतःच्या आत्मसन्मानाबरोबर इतरांचाही मान ठेवणे आवश्यक आहे.एकमेकांशी निश्ययपूर्वक पण प्रेमाने केलेल्या व्यवहारामुळे परस्परांचा आदर राखला जातो.मुलांचे गैरवर्तन सुधारण्यासाठी मोठ्यांनी आपण घालून दिलेल्या नियमांशी ठाम राहणे आवश्यक आहेच.चूक सुधारण्याची मुलांना संधी दिली जाते.त्यामुळे मुलांची पालकांवरील विश्वासाची भावना वाढते आणि नियम पालनातील ठामपणाचा मान पण राखला जातो.

                   प्रत्येक मातापित्यांना आपल्या मुलामुलींचे चांगले व्हावे अशी अपेक्षा असते.

आपली मुले स्वस्थ,निरोगी,आनंदी आणि बहुगुणी असावीत ही त्यांची अपेक्षा रास्त असते.सर्वच क्षेत्रात त्यांनी यशस्वी व्हावे.

त्यांच्या वाट्याला अपयश कधीच येऊ नये

प्रत्येक मुलाला आपुलकीने,माया,ममता करत लाडाकोडाने वाढविलेले असते.

आपल्या मुलांच्या चांगल्या वर्तनाचे,कामाचे

कौतुक अथवा शाबासकी देऊन प्रोत्साहन 

दिले जाते.

                अनेकदा आईवडिलांच्या आणि मुलांच्या अपेक्षामध्ये मतभेद असतो.अनेकदा

यशापयशाच्या मोजायच्या फूटपट्टया दोघांच्या वेगवेगळ्या असतात.मातापिता मुलांना प्रेम,माया,आपुलकी,प्रोत्साहन देऊ शकतात.परंतु मुलांना विचार देऊ शकत नाही.प्रत्येक मुलाची आवड-निवड,ध्येय,

आकांक्षा,अपेक्षा वेगळ्या असू शकतात.

पालकांनी आपल्या अपेक्षा,मते बळजबरीने

मुलांवर लादू नये.कल्पना,विचार आणि वर्तन  यांची उचित सांगड घातली तर मन, मनगट आणि मस्तक ही सशक्त राहण्यास मदत होईल.

              मुलांशी प्रत्येक वेळी  नकारात्मक

नजरेने न पाहता सकारात्मक नजर व विचारांनी त्याच्यांशी सुसंवाद साधण्यातच

आपल्या मुलांचा सर्वकष विकास होईल.

थोडासा व्यायाम,शारिरीक हालचाली आणि 

सुयोग्य संतुलित आहार यांचा समावेश 

दैनंदिन जीवनशैलीत करायलाच हवा.मुलांचे

शारिरीक,मानसिक आरोग्य सांभाळले गेले

पाहिजे.पालकच आपल्या पाल्याचे आद्य गुरु

असतात.प्रशिक्षक,मार्गदर्शक आणि हितचिंतक असतात.यश आणि अपयश एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात.दोन्हीचे

दायित्व स्विकारण्यासाठी मन खंबीर ठेवण्यासाठी साहाय्य करावे.मुलांना स्वातंत्र द्यायच पण वळण ही लावायचं!

               पूर्वीच्या काळी \"चांगली मुले \" कोण ? असं विचारल की उत्तर यायचं जी मुले मोठ्यांचे सर्व ऐकतात,ते सांगतील तसचं

वागतात,वाद घालत नाही , ती चांगली मुले!

अशा शब्दात त्यांच वर्णन केल जायचं.सध्या 

मात्र ही व्याख्या अशीच लागू होऊ शकत नाही.मुलांना मनापासून वाटते की,त्यांना पण

एक \"आवाज\" आहे.आणि तो आवाज इतरांनी ऐकावा.काही प्रसंगी तो जरा जास्त

ठासून ऐकवला जातो आणि हे काही पालकांना सहन होत नाही.मुलांची सध्याची

भाषा,त्यांचे हावभाव,त्यांची वागण्याची पद्धत

ही काही पालकांना \"मनमानी\" वाटते.पालक

सांगतील ते मुलांनी शिरसावंद्य मानावे आणि

निमूट सांगितल्या बरहुकुम वागावे,अशीच 

अपेक्षा असते.

                खरं म्हणजे काळाच्या ओघात, बदलत्या परिस्थिती नुसार घरातही खूपच बदल होतात नाही का?सामाजिक

नीतीमूल्यातही फरक पडणारच.कालचे लहान मूल म्हणजे छोटे आपणच की!ही जाणीव वाढायला लागल्यावर मुलांचं आईवडिलांबरोबरचं वागणं बदलायला लागलं,त्यात खूप मोकळेपणा आला,परस्पर

विश्वास वाढला.मुलांची पालकांशी बरोबरी

वाढल्यामुळे त्यांची भाषा,वागणे सगळचं 

बदललं आणि ते मूल \"हट्टी\" वाटायला लागले.

मुलं मनमानी करता आहेत,आपलं ऐकेनाशी

झाली आहेत,ही भावना वाढीस लागली,वाद 

वाढले,कोणी माघार घ्यायची हे ठरवता येईनास झालं!

               आज आपल्याजवळ पैसा आला.

आपल्याला जे मिळाल नाही ते त्या साऱ्या गोष्टी आपण मुलांना देऊ करतो.नोकरी निमित्त आपण आपल्या मुलांना पुरेसा वेळ

देत नाही.स्पर्धेच्या जगात पालक आपल्या

मुलांना वेगवेगळ्या वर्गांना पाठवतात

त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे  टाकतात

मुलांसाठी पालकांनी वेळ दिला पाहिजे.

चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजे.चांगले

संस्कार केले तर ते उद्याचे नागरिक बनतील.

जसा कुंभार मातीच्या गोळ्याला चांगला

आकार देतो आणि छान सुबक आकाराचे

मडके घडवतो.त्याचप्रमाणे मुलांना नुसता

जन्म देऊन भागत नाही,तर त्यांना योग्य आकार देण्यासाठी आई-वडिलांना झटावे

लागते.मुलांच्या मनात आदरयुक्त भीती नको

तर त्याऐवजी आदरयुक्त धाक असणं मुलांच्या निकोपवाढीसाठी आवश्यक असतं.

आजच्या पिढीनं थोडीशी जागरूकता दाखविली तर जुनी पिढी नव्या पिढीला सक्षम बनवू शकेल.

                  प्रत्येक व्यक्तीला आपल्या 

आयुष्यापेक्षा आपल्या संततीचे आयुष्य सर्वांथाने चांगल्या प्रकारचे असावे अशीच 

मनात इच्छा असते.स्वतःच्या कष्टमय जीवनाचा व्यक्तीस विसर पडेलही. पण केव्हा,जेव्हा त्या व्यक्तीची संतती त्याच्यापेक्षाही बुद्धिमान,कर्तबगारी,मातृ-पितृ

भक्ती,ईश्वरनिष्ठा इ.सर्वांथाने श्रेष्ठ झालेली, त्याने स्वतः पाहिली म्हणजे त्याला आपले 

जीवन कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळते.

याउलट संतती दुर्गुणी असल्यास त्या संततीमुळे आयुष्यभर मानसिक क्लेश सहन

करावा लागतो.आपल्या मुलाचा  स्वभाव,

वागणूक,प्रतिक्रिया पाहूनच पालक आपआपली भूमिका निभावत असतात.हे

करत असताना त्यांच्या अनेक चुका होतात,

तोल सुटतो,राग येतो,हताश होतात पण आपल्या बछड्याच्या प्रेमापोटी सारे विसरून

परत नव्याने पालकाच्या भूमिकेत शिरतात.

पालकत्व अर्थात parenting ही काही 

दिवसांची कामगिरी नसून दीर्घकाळाची

प्रक्रिया आहे.आपल्या मुलाला जन्म देऊन,

त्याचे प्रेमाने संगोपन आणि शिक्षण देऊन 

एक चांगली व्यक्ती घडविणे.

              पालकत्वाच्या वाटेवरून जातांना

वेळोवेळी पालकांना स्वयंशिस्त,निस्वार्थी,

द्याळू,क्षमाशील,सहनशील,परिवर्तनशील तर

असलेच पाहिजे,त्याबरोबर कुठलीही अपेक्षा

न ठेवता मुलांवर निःस्वार्थ प्रेम करता आले 

पाहिजे.फक्त आपलेच घोडे पुढे न दामटता

मुलांना बोलायची संधी देऊन त्यांचे ऐकून

घेतल्याने आपल्या पालकत्वाच्या कक्षा अधिक रुंदावतील यात शंकाच नाही.या

अवघड वाटेवरून चालताना मुलांवर पैसा

अधिक खर्च करण्यापेक्षा अधिक वेळ दिल्यास अनेक गोष्टी सोप्या होतील.

               सानेगुरूजींच्या आई म्हणजे

शामची आई यांनी शामला छोट्या छोट्या

गोष्टीतून जीवनातील अवघड गोष्टी सोप्या 

भाषेत समजावून सांगितल्या.यातूनच 

शामचे \"सानेगुरूजी\" म्हणजेच \"एक आदर्श

व्यक्तिमत्व\" घडत गेले.जिजाऊंनी देखील एका आदर्श पालकाची भूमिका व्यवस्थित 

पार पाडली.आई व वडील दोघांच्या भूमिका

व्यवस्थित पार पाडून छत्रपती शिवाजी महाराजांसारखे महान पुरूष घडवले.

                  आपल्या जीवनशैलीला 

अनुसरून केलेला सारासार विचार व अनुभव यातून सुजाण पालकत्व घडते.सुसंस्कारीत

समाज व पर्यायाने  राष्ट्र घडविण्यासाठी

सुसंस्कारीत पिढी घडविणे म्हणजेच खऱ्या

अर्थाने कुसंस्कारास आळा घालणे होय.

यामुळे समाजात घडणारा  भ्रष्टाचार,

अत्याचार,व्यभिचार,अनाचार इ. कुसंस्कारांना तिलांजली दिली जाईल.

         \"संस्कारांमुळे संस्कृती टिकते,

          संस्कृतीमुळे राष्ट्र टिकते.\"