परतुनी येईल मी.. भाग २

"आज अचानक असं स्वप्नं कसं आलं मिहिरला? आणि खरंच मिहिरला स्वप्नातील काही गोष्टी आठवत नाही की, माझ्या पासून लपवतो आहे काही?" विशाल मनात विचार करत होता.
मागील भागात आपण बघितले…



"ओ, हॅलो. सकाळ झाली आहे. उठ आता नाहीतर ऑफिसला लेट मार्क लागेल. आधीच नवीन जॉब आहे आपला. त्यात उशीर नको." विशाल त्याला हलवत बोलला.


"हो बाबा. बरी आठवण केली. विसरलोच होतो की, आता आपण कॉलेजला नाही जात कधीपण दांडी मारायला." मिहिर उठून तयारीला गेला.


विशाल त्याला जाताना बघत होता. आपल्याच विचारात मग्न तो मिहिरच्या स्वप्नाचा विचार करत होता.


आता पुढे…


"आज अचानक असं स्वप्नं कसं आलं मिहिरला? आणि खरंच मिहिरला स्वप्नातील काही गोष्टी आठवत नाही की, माझ्या पासून लपवतो आहे काही?" विशाल मनात विचार करत होता.


"विशाल, आज एक मीटिंग आहे क्लायंट सोबत. तर आज लंचला मी नसेल तुझ्यासोबत." मिहिर तयार होत बोलला.


"ठीक आहे डिनर सोबत करू." विशाल शूज घालत बोलला.

दोघे सोबत ऑफिसला गेले. रस्त्याने जाताना दोघांमध्ये फारसे संभाषण झाले नाही.


"आजची ही डील जर फायनल झाली तर एक मोठी ऑर्डर मिळेल आणि ह्या महिन्याचे टारगेट पूर्ण होईल." मिहिर विचार करत होता.


"मिहिर आज मीटिंग ला जाणार म्हणजे मोठी ऑर्डर असेल. कोणा सोबत आहे मीटिंग विचारवं लागेल. म्हणजे अंदाज येईल." विशाल देखील मनात बोलत होता.


"काय रे कसला विचार करतो आहे?" विशालने मिहिरची तंद्री भंग करत विचारले.


"काही नाही रे, आजच्या मीटिंग बद्दल विचार सुरू आहेत." मिहिर बोलला.


"ओह. कोणासोबत आहे मीटिंग?" विशालने खडा टाकला.


"मोठे व्यापारी आहेत. त्यांच्या नवीन ऑफीसच्या कन्स्ट्रक्शनचे काम आहे. सोबत इंटिरिअर डिझायनिंग पण करायचे आहे. हा कॉन्ट्रॅक्ट मिळाला तर मोठी डील मिळेल." मिहिर बोलला.


"काय नाव आहे त्यांचं?" विशाल अधिक खोलात विचारपूस करत होता.

तितक्यात मिहिरचा फोन वाजला.


"हॅलो.."

"येस सर,
येस येस,
शुअर सर,
येस विलं बी देयर टुडे.
डोन्ट वरी." मिहिर बोलत होता. चेहेऱ्यावर छोटीशी स्माईल होती सोबतच तणाव पण होता.

विशाल मिहीरचा फोन ऐकण्याचा प्रयत्न करत होता पण पलीकडून कोण आणि काय बोलत आहे हे त्याला समजत नव्हते.


मिहिर फोनवर बोलता बोलता दोघे ऑफिसच्या समोर पोहोचले आणि विशालने विचारलेला प्रश्न अनुत्तरित राहिला.


"चल कामाला लागू." मिहिर बोलला.


"हो चल. आज मला पण खूप काम आहे." विशाल घड्याळाकडे बघत बोलला.


दोघे आपापल्या कामात मग्न झाले.

मिहिरने ऑफिसमध्ये त्याच्या बॉसची भेट घेतली. आजच्या मीटिंग बद्दल पूर्व सूचना देत मिहिर त्याच्या कामाला लागला. वेगवेगळ्या प्लॅन्सचे कॅटलॉग त्याने त्याच्या बॅग मध्ये ठेवले. सोबतच ज्यांच्याशी भेट घायची आहे त्यांची मागणी, कन्स्ट्रक्शनची जागा आणि त्या बद्दल त्यांच्या असलेल्या अपेक्षा ह्या सगळ्यांचा एकदा आढावा घेतला आणि सोबतच एक नवीन प्लॅन कसा होईल.ह्याची थोड्यात रुपरेषा बनवून घेतली. मिहिर वेळेच्या जरा आधीच ऑफिस मधून निघण्यासाठी तयार झाला.


"चल विशाल. निघतो मी. तू जेवण करून घे." मिहिर विशालच्या डेस्क जवळ जात बोलला.


"अरे निघाला पण? मीटिंग तर दुपारी आहे ना?" विशाल


"हो पण जाई पर्यंत होईलच वेळ. त्यात मला कोणती रिस्क नको आहे म्हणून अर्धा तास आधीच निघतो." मिहिर बोलला.


"हो बरोबर आहे. वेळेच्या आधी गेलेलं चांगलं. उशीर नको व्हायला." विशाल मिहिरच्या खांद्यावर हात ठेवत बोलला.


"हो तेच ना. म्हणून लवकर जातो जरा."


"ऑल द बेस्ट मित्रा." विशाल बोलताना मोहिरच्या डोळ्यात बघत होता.


"थँक्यू मित्रा. खरंच गरज आहे आज मला शुभेच्छांची." मिहिर


"काय रे नेहमी असं टेन्शन येतं नाही तुला? आज का इतकं टेन्शन घेतो आहेस?" विशाल ने विचारले.


"मला पण कळत नाहीये रे. पण आज खूप टेन्शन आलं आहे मला."


"काळजी करू नकोस. होईल मीटिंग छान." विशाल त्याची पाठ थोपटत बोलला.


"हो. चल येतो आता." मिहिर


"ओके. तू परत ये मग सोबत जाऊ घरी." विशाल बोलला.


"ठीक आहे, बाय." म्हणत मिहिर निघून गेला.


"इतकं टेन्शन मध्ये ह्याला कधी बघितलं नाही कधी. आज का असा कासावीस वाटतो आहे? कोणासोबत मीटिंग आहे ते पण कळलं नाही." विशाल विचार करत होता. त्यातच तो परत कामाला लागला.


दुसरीकडे मिहिर मीटिंगच्या ठिकाणाच्या दिशेने निघाला. मीटिंग एका फाईव स्टार हॉटेलमध्ये होती.


हॉटेलच्या गेटच्या एंट्रॅन्स पासून दोन्ही बाजूनी थोड्या थोड्या अंतरावर छोटे पाण्याचे फाऊंटन होते. थोडे पुढे गेल्यावर मेन इंट्रॅन्स क्या अगदी समोर एक मोठा फाऊंटन होता. हल्लीच्या मॉडर्न लूक पेक्षा हा फाऊंटन वेगळा होता. त्याला बघून वाटतं होते की खूप प्राचीन असेल. मिहिर त्या फाऊंटन कडे बघत गाडीने मेन गेट जवळ आला. तिथे आल्यावर त्याने गाडीच्या चाव्या सिक्युरिटीला देत गाडी पार्क करण्यास सांगितली आणि आत जाऊ लागला. पण त्याचे पाय जागीच थांबले. तो अचानक मागे वळाला. त्याची नजर त्या फाऊंटन वर स्थिरावली होती. जणू त्याने तो फाऊंटन आधी बघितला आहे असे त्याला वाटतं होते. तो पायऱ्या उतरून खाली त्या फाऊंटन जवळ गेला. खूप जुनं नातं असावं ह्या फाऊंटन शी अशा पद्धतीत त्याने त्याच्या कठड्यावरून हात फिरवला. एक वेगळाच अनुभव होता तो. जणू हे सगळं त्याने आधी अनुभवले होते. मिहिर त्यात हरवला होत.


"मिस्टर मिहिर?" मागून आवाज आला.


"हा. येस." अवजाने मिहिर एकदम भानावर आला.


"मिस्टर इनामदार इज हिअर." त्या गृहस्थाने सांगितले.


"ओह. कमिंग." म्हणत मिहिर आत जायला निघाला. त्याने परत एकदात्या फाऊंटनला वळून बघितले.

"पण मी इथे कसा आलो? मी तर आत जात होतो. अचानक काहीतरी बोलावत असल्या सारखे वाटले आणि मी इथे कधी पोहोचलो कळलेच नाही." मिहिर मनात विचार करत होता. त्याला कळलेच नाही तो आपोआप कसा मागे त्या फाऊंटन जवळ का आला?


मिहिर हॉटेलच्या आत गेला. तिथल्या स्टाफ मधील एक मुलगा त्याला हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील एका रूममध्ये घेऊन गेला.

साधारण साठीच्या जवळपास वयाचे मिस्टर इनामदार तिथे त्याची वाट बघत होते.


"मे आय कमिंग?" मिहिर ने रूमच्या डोअर मध्ये उभे राहून विचारले.


"येस यंग मॅन." मिस्टर इनामदार त्यांच्या खुर्चीत बसत बोलले.


"मी, मिहिर राजे." मिहिर ने हसत मिळवत स्वतः ची ओळख सांगितली.


"मी. शेखर इनामदार. प्लीज सीट डाऊन." मिस्टर इनामदार बोलले.


"सॉरी सर. मला उशीर झाला." मिहिर बोलला.


"नाही नाही. तुम्ही वेळेच्या आधीच आला होता. मिस्टर मिहिर. पण खाली तुम्ही ते फाऊंटन न्याहाळत होतात. त्यात वेळ कसा गेला तुम्हाला कळले नाही." मिस्टर इनामदार.


"सॉरी सर. पण तुम्हाला कसं कळलं?" मिहिर


"मी वरून. बघत होती तुम्हाला. चला कामाचं बोलूया मिस्टर मिहिर?" मिस्टर इनामदार बोलले.


"येस सर." म्हणत मिहिर ने इमानदारांच्या प्रश्नाची उत्तरं देत. त्यांचे मन जिंकले.

मिहिरने दाखवलेले वेगवेगळे प्लॅन्स त्यांना आवडले. मिहिर च्या हुशरिचा त्यांना अंदाज आला होता. तब्बल दोन तास चालेल्या मीटिंगमध्ये मिस्टर इनामदार त्याला फक्त मिहिर ह्या एकेरी नावाने हाक मारू लागले होते. त्या नंतर त्यांनी सोबत जेवण केले, तेव्हा देखील ते प्लॅन्स बद्दल बोलत होते.


"सो. मिहिर तुझ्याकडे छान छान आयडिया आहेत. पण निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. सगळे निर्णय माझे मोठे बंधू घेतात. तू आत्ता मला जसं कन्विन्स केलं तसं माझ्या मोठ्या भावाला म्हणजे मिस्टर आदित्य इनामदर ह्यांना तुला कॉन्विन्स करावं लागेल." बोलता बोलता मिस्टर इनामदार मिहिरला खिडकी जवळ घेऊन गेले. त्या खिडकीतून तो फाऊंटन स्पष्ट दिसत होता.

"हो सर नक्कीच." बोलता बोलता मिहिर ने खिडकीच्या बाहेर बघितले आणि त्याला तो फाऊंटन दिसला तसा तो परत विचारात मग्न झाला.

"का असं वाटतं आहे की, हा फाऊंटन मी आधी बघितला आहे? अर्थात ते शक्य नाही कारण ह्या ठिकाणी मी प्रथमच येतो आहे. फाऊंटन बघून एक अनामिक ओढ वाटे आहे मला त्याची. का असं?" मिहिर मनात बोलत होता.


मिस्टर इनामदार त्याला बघत होते. त्याच्या चेहेऱ्यावर उमटणारे भाव ते वाचत होते.


"काय झालं मिहिर?" मिस्टर इनामदार बोलले.


"काही नाही सर." मिहिर भानावर येत बोलला.


"मग असा का बघतो आहेस त्या फाऊंटन कडे. मघाशी आत येताना देखील परत तिथे गेलास. काय झालं? बिनधास्त सांग." मिस्टर इनामदार


"विशेष काही नाही सर. हा फाऊंटन बगून असं वाटतं आहे की, मी कुठेतरी बघितला आहे हा. जुनी ओळख असल्या सारखं वाटतं." मिहिर बोलला.


"अरे बघितला असेल कुठे तरी असाच एखादा. म्हणून वाटतं असेल." मिस्टर इनामदार


"नाही सर. मझ्या आठवणीत तरी कुठे बघितला नाही मी असा फाऊंटन. इथे तर मी पहिल्या वेळेस येतो हे आणि ह्या आधी असं कुठे बघिण्यात येणं शक्य नाही कारण मी अनाथ आहे. त्यामुळे अनाथालयाच्या बाहेर कधी पडलो नव्हतो कॉलेजला जाई पर्यंत." मिहिर बोलला.


"अच्छा. हा फाऊंटन पण इथेच आहे ह्या हॉटेलची सुरुवात झाली तेव्हा पासून. तो पण कुठे गेला नाही. बरं तू उद्या सकाळी नऊ वाजता तू आमच्या घरीच ये." मिस्टर इनामदार त्याला विसिटिंग कार्ड देत बोलले. त्यावर त्यांचा घरचा पत्ता होता.


"ठीक आहे सर. येतो मी आता. उद्या भेटू" मिहिर बोलला.


"मिहिर. आपल्या आजच्या आणि उद्याच्या मीटिंग बद्दल कोणाला काही सांगू नकोस. जो पर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. तुझ्या मित्राला देखील नाही." मिस्टर इनामदार बोलले.


"ठीक आहे सर." मिहिर बोलून निघून गेला.

जाताना परत त्या फाऊंटन जवळ जाण्यावचून तो स्वतः ला रोखू शकला नाही. मिस्टर इनामदार आणि त्यांच्या सोबत अजून एक व्यक्ती वरून हे सगळं बघत होते.


काय होईल पुढे? सांगेल का मिहिर विशालला आजच्या आणि उद्याच्या मीटिंग बद्दल? मिस्टर इनामदार सोबत अजून कोण होतं? आणि त्यानी मिहिरच्या समोर का नाही आली? फाऊंटनचे काही रहस्य आहे की, मिहिरच्या मनाचे खेळ आहेत? जाणून घेण्यासाठी वाचत रहा परतुनी येईल मी.


क्रमशः


©वर्षाराज


🎭 Series Post

View all