परत चावडी

Chawdi back

परत चावडी

"निल्या हल्ली फेसबुकावर नाही का? त्याला परवा टॅग करायचा होता तर सापडलाच नाही."

"अरे जाम घोळ झाला रे. निल्या त्याच्या जर्मन साहेबाच्या बायकोच्या बरियलला गेला होता त्याचे रिकामटेकडे रुममेट घेऊन.त्याला ग्रुप टिकेट काढून पैसे वाचवायचे होते.तर म्हणाला तुम्हीपण चला. त्यांना तिथे काही उद्योग नव्हता त्यांनी त्या रम्य दफनभूमीत पंचवीसेक फोटो काढले आणि त्यात टॅग केला ना निल्याला 'फिलींग हॅप्पी अ‍ॅट रोझेनहाईम ग्रेव्हयार्ड' म्हणून. त्याला २५० लाईक मिळाले आणि निल्याचा साहेबच होता फ्रेंडस लिस्ट मध्ये. निल्याने आता कानाला खडा लावून फेसबुक संन्यास घेतलाय काही दिवस."

"आपल्या निकीचं तेच झालं ना, तिची पहिली मंगळागौर, संध्याकाळचं हळदीकुंकू, सकाळची पूजा, दुपारचं अमुक तमुक होतं. आणि त्या दिवशी नेमका एशिया पॅसिफिकचा डायरेक्टर आला म्हणून सुट्ट्या घ्यायच्या नाहीत असा अचानक फतवा निघाला. आता निकीने सासूला बरंच सांगितलं की आपण शनीगौरी किंवा रवीगौरी करुया म्हणून, पण सासूने आधीच बराच बाहेरगावचा गोतावळा सोमवारीच बोलावून ठेवलेला, म्हणून म्हणाली 'काय मेली मोठी रॉकेटं सोडायची असतात, एक दिवस नवऱ्याच्या सौभाग्यासाठी सुट्टी घेता येत नाही म्हणजे काय' वगैरे वगैरे..मग निकीने सकाळी साहेबाला आवाजात एकदम वीकनेस आणून अजिबात बरं वाटत नाहीये वगैरे फोन केला आणि नंतर मंगळागौरीचे खेळांचे फोटो टाकले ना सगळ्यांनी धबाधबा फेसबुक वर. आता बिचारी खरीखुरी आजारी पडली आणि तिने येत नाही म्हणून फोन केला तर साहेब विचारतो, 'श्युअर ना? या कोई फॅमिली फंक्शन है घरपे?'"

तितक्यात तिथे लावण्ण्या(हिचं नाव मला 'लावण्या' असं लिहायचं होतं पण ते उच्चाराप्रमाणे लावण्ण्याच लिहायचं अशी हिची सगळ्यांना ताकीद असते.) आणि संकेत ईश्वरचंद आले. आता आधी याचं नाव चांगलं 'केदार बाळकृष्ण पोखरकर' असं होतं पण याला संकेतच म्हणतात सगळे.

"काय रे संक्या, अजून मेसचे पैसे नाही भरलेस? त्या काकू परवा मला बरंच विचारत होत्या 'नवी मेस लावणार आहे का तो' वगैरे वगैरे."

"काय सांगू तुला? परवा मी चादरी कपाटात ठेवत होतो तर मोठी बॅग डोक्यात पडली.नंतर शर्ट हँगर वरून काढायला गेलो तर त्या हँगरला अडकून विंटर जॅकेटचा हँगर खाली पडला. नंतर ऑफिस मध्ये गेले दोन दिवस ओळीने रांगेत माझ्या पुढे तो ट्रॅव्हल टिम वाला नरेश होता. यात नक्की काहीतरी ईश्वरी संकेत आहे.उगीच मेस चे पूर्ण महिन्याचे पैसे भरायची घाई नको करायला."

"संक्या, हे सगळे तू कपाटातला पसारा आतातरी नीट आवरायला पाहिजे हे सांगणारे ईश्वरी संकेत आहेत. त्यासाठी त्या गरिब मेसकाकूंना का लटकवून ठेवतो?"

हा प्राणी एक लॉजिकल प्रोसेसर आहे. त्याचा जोडधंदा चार माणसांसारखा नोकरी करून पोटापाण्याची व्यवस्था करणे आणि मुख्य धंदा प्रत्येक गोष्टीमागे ईश्वरी संकेत शोधणे हा आहे. नुकताच त्याच्याबरोबर आजींकडे गणपतीच्या दिवशी गेलेला असताना पूजेत गंगाजलाचा छोटा कलश पाहून "हा गंगाजलाचा कलशच आज तुम्ही पूजेत आधी का उचलला? यामागे नक्कीच काही ईश्वरी संकेत आहे" हे ऐकून आजींनी उकडीचे मोदक न देता खडीसाखर हातावर ठेवून केलेली पाठवणी आठवून सगळे कळवळले.

"तू काय सांगतो रे मला? गेल्या पाच वर्षापासून सगळ्या इंटरव्ह्यूला तो गुलाबी मळका आणि मागे एक छोटं होल असलेला टीशर्ट घालून जातोस ना स्वतः? त्या टीशर्ट मध्ये गूगलच्या शेवटून तिसऱ्या राऊंड पर्यंत पोहचला होतास म्हणून? मला मिळत असलेल्या ईश्वरी संकेतामुळे परवा तुम्ही त्या मोठ्या मेगा ब्लॉक मधून ५ मिनीटं आधी सुटलात.. थँक्यू म्हण्णं तर लांबच."

तितक्यात हिम्याच्या मोबाईलचा व्हॉइस रिमाईंडर ओरडायला लागला आणि सगळे नेहमीच्या वादातून सुटले. "युवर काँटॅक्ट पाईलवॅन ठुक्बा मॅनमोड हॅज बर्थडे टुडे..".

"हिम्या, पैलवान तुकबा मानमोडे चा बर्थडे रिमाईंडर तुझ्या फोन मध्ये कशाला? तू ओळखतो?"

"अरे यार. तुकबा मानमोडे च्या बर्थडे ची बॅनर गेला एक महिना लागलीयत. आज मनी लिऑन येऊन नाचणार आहे. ती येईपर्यंत जय प्रह्लाद सिरीयल मधली तुळसा, माझी सासू तुझी झाली सिरीयलमधली ओवी, माझ्या नवऱ्याची बायको सिरीयलमधली तिसरी बायको हे येऊन एक एक आयटम साँग करणार आहेत. म्हणजे आज ट्रॅफिक तीन किलोमीटर आधीपासून तुंबलेला असेल. मी तुकबा मानमोडे च्या इव्हेंटची वेळ, सर्व प्रोग्रामचा चार्ट घेऊन ठेवलाय. मनी लिऑन येण्याच्या २० मिनीट आधी आणि तुळसा गेल्यानंतर १० मिनीटांनी, म्हणजे मधल्या सात मिनीटाच्या विंडोमध्ये त्या चौकात असलो तर अजिबात ट्रॅफिक लागणार नाही.. "

"ए मलापण पिंग कर हां, एकाच वेळी निघू सगळे."

लावण्ण्या हातात धरलेल्या फोनकडे बघत पिंजऱ्यातल्या वाघासारखी येरझाऱ्या घालत होती.

"आता हिला काय झालं? हिची बायको डिलीव्हरी रुम मध्ये आहे का?"

या भयंकर जोकचा वचपा पुढच्या मीटिंगमध्ये काढला जाणार होता हा 'ईश्वरी संकेत' संकेतभाऊंना नेमका मिळाला नव्हता.

"माझा रोजचा ८५५० पावलांचा वसा आहे. ८५५० इज एक्झॅक्ट फिगर. मसल डॅमेज होत नाही, घाम येऊन फ्री रॅडिकल स्किनचं नुकसान करत नाहीत, हवेतले पुरेसे अँटी ओक्सीडंट मिळतात आणि कार्डिओचे सगळे बेनेफिट पण मिळतात. आता अजून ३३४ पावलं झाली की ८४०० होतील, उरलेली १५० मध्ये ग्रीन टी ला उठेन तेव्हा संध्याकाळी घरी जायला."

लावण्ण्याचा जोड धंदा प्रोग्राम लिहीणे आणि मुख्य धंदा रोज वेगवेगळे लेख वाचून 'काय करून परफेक्ट अँटी एजिंग इफेक्ट मिळेल' या गणिताची उत्तरं शोधणं हा होता. "सकाळी उठल्यापासून ९.५ मिनीटाच्या आत ३० कॅलरी असलेलं फळ कोवळ्या उन्हात पूर्वेकडे तोंड करून अनशापोटी खावे", "हसताना गाल ११.३ मीलीमीटरच वर येतील अशा बेताने हसावे. त्याने चेहऱ्याच्या स्नायूंना योग्य मसाज मिळून टर्की नेक आणि क्रोफिट येत नाही", "रात्री झोपताना ७ सेंटीमीटर रुंदीच्या उशीवर ११ सेंटीमीटरचा तक्क्या कलता ठेवून झोपावे म्हणजे ब्लड सर्क्युलेशन सुधारते आणि केस सुंदर होतात", "रोज खाली बसून विळीवर स्वतः खोबरे खोवावे, त्यातले अर्धे घराजवळचा गोठा शोधून गायीला खायला द्यावे आणि त्या गायीचे दूध सूर्योदयानंतर १६.८ मिनीटांनी तोंड २ मीलीमीटर उघडून प्यावे, आणि उरलेले अर्धे दिवसातून आठवेळा अर्धा अर्धा चमचा एकांतात १३ मिनीट चावून खावे, अजिबात ऍब फॅट येत नाहीत" या गोवेकर बाईंच्या पुस्तकातल्या सर्व टिपा ती न चुकता पाळत असे.

नेहमीप्रमाणे लावण्ण्याचे फिटनेसचे रम्य चऱ्हाट चालू होऊ नये म्हणून सगळे नव्या विषयाच्या विचारात पडले. मागच्या वेळी एकाच्या वाढदिवसाचा पिझ्झा पार्टीला केक कापायच्या वेळी तिने "ट्रान्स फॅट, पाच पांढरी विषे, एंप्टी कॅलरी, कॅफिन, एल डी एल,फ्री रॅडिकल" बद्दल सांगून सगळ्यांची डोकी इतकी फिरवली होती की सगळ्यांनी फक्त एक एक बोट आयसिंग खाऊन पळ काढणे आणि बाकी सगळा पिझ्झा आणि केक चॉकलेट क्रिम विथ प्लम जेली केक हिम्या, संक्या आणि निल्याला चट्टामट्टा करायला मिळणे हा एकमेव भूतकाळातील फायदा सोडल्यास लावण्ण्याला 'फिटनेस, आहार, स्कीन केअर' या विषयावर चावी कोणीही देत नसे.

तेवढ्यात समोरून सपना एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हातात कुल्फी घेऊन घाईत आली.

"कुल्फी? आता थंडीच्या दिवसात?"

"खाणार नाही, फक्त फोटोला. माझं डार्क चॉकलेट डायट चालू आहे. रोज फक्त तीन बार डार्क चॉकलेट. हे आता पुढच्या वीक मध्ये एच आर वाले 'सेल्फी विथ कुल्फी' ची काँपीटीशन ठेवणार आहेत त्याच्या बेस्ट अँगल ची प्रॅक्टिस करतेय. यावर्षी बेस्ट सेल्फी विथ कुल्फी मलाच मिळणार."

यावर संकेत, हिम्या, लावण्ण्या, परश्या या सगळ्यांनी एका दयार्द्र नजरेने सपनाकडे पाहिलं.

"नयी है यह. एच आर वाले ज्या काँपीटीशन ठेवतात त्याची बक्षीसं फक्त एच आर वाल्यांनाच मिळतात हा अलिखीत नियम आहे."

"तुम्ही सगळे प्रीज्युडाइस्ड आहात. असं बिसं काही नसतं हां!! मला ट्रॉफी मिळाल्यावर बघाच."

विषय वाढवायचा नाही म्हणून सगळे गप्प बसले. लावण्ण्या पण दोन वर्षापूर्वी असंच म्हणायची. पण दोन तास आधी 'पायरेट ऑफ कॅरेबियन डे' जाहिर होऊन त्यात पूर्ण पायरेट ऑफ कॅरेबियन ची वेषभूषा करून दोन एच आर चे 'परे' जिंकलेले पाहिल्यापासून तिचा माणुसकीवरचा विश्वास उडाला होता.

"परश्या तुझं नवं घर कसं आहे? सामान लावून झालं का? "

"घर छानच आहे रे, पण त्यात राहणारी माणसं समजूतदार नकोत का? ज्युलियट स्टाईल बाल्कनी, इटालियन डोअर, इंडोनेशिअयन स्टाईल किचन ओटा म्हणून फुकटच चालू रेटच्या शंभर जास्त मोजले, आणि आता ज्युलियट बाल्कनी मध्ये आई वाळवणं घालते आणि इटालियन दारात लिंबू मिरची लावते आणि गोपद्माची रांगोळी घालते.बायको इंडोनेशियन ओट्यावर लिंबाचे डाग पाडते.त्यांना सांगितलं तर म्हणतात की "रोज त्या घरात सर्वात जास्त वेळ आम्ही काढतो, कधीकधी असं होणार ना? अगदी घरावर एक धुळीचा कण नको असेल तर बुजगावणी आणून ठेव घरात.""

"चालायचंच रे, आपण घर बांधताना जी व्हिजन असते ती कायम थोडीच राहते?आधीच्या अनुभवातून ठेचा खात खात काही वर्षांनी आपल्याला काय हवं ते कळतं, मग काही गोष्टी मनासारख्या आणि काही पैशासाठी कॉंप्रोमाइज करत करत एक राहणेबल आणि मनातलं छान घर बनतं."

"चला रे चला, ख्रिसमस ट्री खाली गिफ्टा ठेवायच्यात २ च्या आत."

"तुला कोण मिळालंय सिक्रेट सांटा मध्ये?"

"मला तो पहिल्या मजल्यावरचा बंटू मिळाला होता पण मी लावण्ण्याशी चिठ्ठी बदलून घेतली आणि ती लांब केसवाली फ्रेशर आहे तिच्या नावाची चिठ्ठी मिळवली."

"अरे पण हिम्या, सिक्रेट सांटा आहे ना, मग तिला कोणीही गिफ्ट दिली काय, काय फरक पडतो?"

"तीच तर मजा आहे ना!! तिला २०० चे क्लीपकार्टचे गिफ्ट पासेस घेतलेत, त्याच्यावर सेंडर मध्ये माझा इमेल पत्ता आहे आणि इमेल पत्ता म्हणजे माझं पूर्ण नाव आडनाव!"

"तुस्सी ग्रेट हो जहांपनाह!! , मी पण माझा बॉस मागून घेतलाय सिक्रेट सांटा मध्ये, आता त्याला पण क्लिपकार्टचं ५०० चं गिफ्ट कार्ड घेतो. चला मला पटकन घ्यायला पाहिजेय!! बाय बाय!! "