पराभव

पराभव

        पराभव                                                                       जिल्हा शिक्षणाधिकारी झाल्यानंतर जेव्हा मी कामावर रुजू झालो, तेव्हा असे समजले की, हा जिल्हा शालेय शिक्षण स्तरावर खूपच मागे पडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही सांगितले की "आपण ग्रामीण भागात जास्त लक्ष द्यावे." बस, ठरवून टाकलं की महिन्यातले आठ ते दहा दिवस फक्त ग्रामीण शाळांसाठी काढायचे. लगेचच ग्रामीण भागातल्या दौऱ्याची मोहीम सुरू केली. काही डोंगराळ व जंगली भाग ही होते. एके दिवशी सोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याकडून समजले, की एका डोंगराळ भागात 'बडेरी' नावाचे एक गाव आहे. तिथे कोणीही शिक्षणाधिकारी जात नसत. कारण तिथे पोहोचण्यासाठी वाहन सोडून जवळजवळ दोन-तीन किलोमीटर पर्यंत डोंगराळ रस्त्यातून चालत जावे लागत असे. मग ठरवलं की दुसऱ्याच दिवशी तिथे जायला हवे. तिथे कोणीतरी पि. के. व्यास हे, मुख्याध्यापक होते. खूप वर्षांपासून ते त्या पदावर होते. आणि का कोण जाणे, ते पद सोडायचं ही नव्हते. मी आदेश दिला की "त्यांना कोणीही आगाऊ सूचना देऊ नये. ही अचानक भेट असेल." दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लवकरच निघालो. दुपारी बारा वाजता वाहन चालकाने सांगितले की साहेब इथून पुढे दोन-तीन किलोमीटर डोंगरातून चालत जावे लागेल. मी आणि माझे दोन सहकारी, चालत निघालो. जवळजवळ दीड तास होऊन गेला असेल. डोंगराळ कच्च्या रस्त्यावरून आम्ही वरती गावात जाऊन पोहोचलो.                                                                     समोरच शाळेची पक्की इमारत होती आणि जवळ जवळ दोनशे कच्ची घरे होती. शाळा छान स्वच्छ रंगवलेली होती. फक्त तीनच वर्ग आणि प्रशस्त व्हरांडा. चारी बाजूंनी हिरवीगार वनराई.                                                                          वर्गात गेलो तर तिन्ही वर्गात जवळपास दीडशेमुलं अभ्यासात गर्क होती. खरतर तिथे कोणीही शिक्षक नव्हता. एक वयस्क व्यक्ती व्हरान्ड्यात उभे होते. ते तिथे बहुधा शिपायाचे काम करीत असावेत. त्याने सांगितलं मुख्याध्यापक गुरुजी येतच असतील. आम्ही व्हरांड्यात जाऊन बसलो, तेव्हा बघितलं की एक चाळीस-बेचाळीस वर्षाचे सद्गृहस्थ, आपल्या दोन्ही हातांमध्ये पाण्याच्या बादल्या घेऊन वर येत होते. पायजमा गुडघ्यापर्यंत ओढून घेतला होता आणि वर खादीचा कुर्ता होता.                                                                    त्यांनी येताच आपला परिचय दिला, "मी प्रशांत व्यास, इथला मुख्याध्यापक आहे. इथे या मुलांसाठी प्यायचे पाणी जरा खालून विहिरीतून आणावे लागते. आमचे शिपाई दादा जरा वृद्ध आहेत. आता त्यांच्याच्याने होत नाही म्हणून मीच घेऊन येतो. कसरत ही होते.” ते हसून म्हणाले. त्यांचा चेहरा ओळखीचा वाटला व नाव ही ओळखीचे वाटले. मी त्यांच्याकडे पाहून विचारले, "तुम्ही प्रशांत व्यास का? इंदूरच्या गुजराती कॉलेजमधले का?"मी टोपी काढली. त्याने ओळखून आश्चर्याने विचारले, "आपण अभिनव आहात? अभिनव श्रीवास्तव !" मी म्हणालो, “होय भाऊ, मी तोच आहे."                                                              वीस-बावीस वर्षांपूर्वी इंदूरला आम्ही एकत्र शिकत होतो. तो खूप हुशार आणि अभ्यासू होता. खूप मेहनत करूनही, कधीतरीच मला त्याच्या पेक्षा जास्त गुण मिळाले असतील. आमच्यात नेहमीच एक चढाओढ असायची. ज्यात तोच नेहमी पुढे जात असे.आज तो मुख्याध्यापक होता आणि मी जिल्हा- शिक्षणाधिकारी होतो. पहिल्यांदाच त्याच्या पुढे गेल्याचे, जिंकल्याचे समाधान वाटत होते आणि खरं सांगायचं तर, मनातूनही मी खूप खुष होतो. मी सहजच विचारलं की “इथे कसा काय आणि घरी कोण कोण आहे?"                                                            त्याने सविस्तर सांगायला सुरुवात केली, "एम. कॉमच्या वेळेस वडिलांची मालवा मिलची नोकरी गेली. त्यांना दम्याचा आजारही होता. घर चालवणं खूपच कठीण झालं होतं. कसेतरी शिक्षण पूर्ण केले. मार्क चांगले होते म्हणून सहशिक्षक म्हणून नियुक्त झालो. नोकरी सोडूही शकत नव्हतो. पुढे शिकण्याची आशाही नव्हती आणि परिस्थितीही नव्हती. या गावात बदली मिळाली. आई-वडिलांना घेऊन इथे आलो. म्हटलं गावात थोड कमी पैशात निभावून जाईल.मग तो हसत म्हणाला, "अशा दुर्गम गावात बदली, म्हातारे, आजारी आई-वडील, यांच्याकडे बघून कोणी मुलगी द्यायला तयार होईना. म्हणून लग्न नाही झालं.आणि बरोबरच आहे. कोणतीही शिकलेली मुलगी इथे काय करू शकली असती?                                                                              माझी काही वरपर्यंत ओळखही नव्हती की इथून बदली करून घेऊ. मग इथेच स्थायिक झालो.इथे आल्यानंतर काही वर्षांनी आई-वडील दोघेही देवाघरी गेले. जमले तशी त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न केला.".                                                                 "आता इथे मुलांमध्ये शाळेत मन रमून गेले. सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन आजूबाजूच्या डोंगरांवर वृक्षारोपण करायला जातो.रोज संध्याकाळी शाळेच्या व्हरांड्यात प्रौढांना शिकवतो. आता मी म्हणू शकतो की या गावात कोणीही निरीक्षर नाही. नशा मुक्ती चे अभियान ही चालवतो.स्वतःच्या हाताने जेवण बनवतो आणि पुस्तके वाचतो. मुलांना चांगले मूल्य शिक्षण मिळावे, चांगले संस्कार मिळावे, नियमितता शिकवावी, बस एवढेच माझे ध्येय आहे.                                                                                  मी सी. ए. नाही होऊ शकलो. पण माझे दोन विद्यार्थी सी.ए. आहेत. आणि काही जण चांगल्या नोकरीत ही आहेत."माझा इथे काहीच जास्त खर्च नसतो. माझा पगार जास्त करून या मुलांच्या खेळण्यासाठी व शाळेसाठी खर्च होतो. तुला तर माहीतच आहे. कॉलेजपासून मला क्रिकेटची खूप आवड होती. ती, या मुलांबरोबर खेळून पूर्ण होते. खूप समाधान वाटते."                                                                           मी मधेच म्हणालो, "आई वडील गेल्यानंतर लग्नाचा विचार केला नाहीस का?"तो हसून म्हणाला, "जगातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी बनलेल्या नाहीत. म्हणून जे समोर येते, ते चांगले बनवण्याचा प्रयत्न मी करीत असतो." त्याच्या त्या सहज हसण्याने मला आत खोलवर चिंब भिजवून टाकले.निघताना मी त्याला म्हणालो "प्रशांत! जेव्हा लागेल तेव्हा तुझी बदली मुख्यालयात किंवा तुला हवी असेल तिथे मी करून देईन".तो हसून म्हणाला "आता खूप उशीर झाला आहे. आता इथेच, या लोकांमध्ये मी आनंदात आहे." असे म्हणून त्याने हात जोडले.                                                                  मला, माझ्या यशप्राप्ती मुळे निर्माण झालेला अहंकार, त्याच्यापुढे निघून गेल्याचा गर्व, हा भ्रम, हे सगळे काही क्षणार्धात विरून गेले.तो आपल्या जीवनात, त्रुटी, कष्ट आणि असुविधा असूनही खूप समाधानी होता. त्याचे हे सात्विक समाधान पाहून मी विस्मयचकीत झालो. त्याच्या वागणुकीत कुठल्याही प्रकारच्या दु:खाचा किंवा तक्रारीचा सूर नव्हता.आपण माणसांची पारख, सुख - सुविधा, उपलब्धता, सेवा यांच्या आधारावर करत असतो. परंतु तो, या सर्वांशिवाय सुद्धा, परत मला मागे टाकून पुढे निघून गेला.निघताना, त्या 'कर्मऋषी' ला हातजोडून, भारावलेल्या मनाने मी एवढेच म्हणू शकलो, "तुझ्या या पुण्य कामात, कधी माझी आवश्यकता वाटली, तर माझी आठवण जरूर ठेव, मित्रा!"..