पंखातील बळ भाग 2

Pankhatil bal

पंखातील बळ भाग -२                                                                     त्या दिवशीही सकाळी अण्णा नेहमी प्रमाणे ७.३५ ची लोकल पकडण्यासाठी पार्ले स्टेशनवर आले आणि लोकसत्ता वृत्तपत्र घेण्यासाठी फलाटावरच्या बुक स्टॉल वर थांबले. "अरे साहेब तुम्ही? काय पाहीजे?" एक ओळखीचा आवाज अण्णांची समाधी भंग करून गेला. चटकन पाहताच त्यांना विश्वासच बसेना की विनू बुक स्टॉलवर पेपर विकत होता. "अरे विनू तू इथे कसा? एक लोकसत्ता दे." उन्हाळा सरून पाऊस जसा सुरु झाला तसा बीचवरचा लोकांचा आणि फेरीवाल्यांचा लोंढा कमी झाला. कधी कधी दिसणारा हा विनूही दिसेनासा झाला.                                                                                                         तो पुन्हा कधी भेटेल अशी कल्पनाही नव्हती आणि तोच विनू आज समोर उभा होता. "साहेब प्रमोशन झाल माझ. आता भटकंती करत काही विकायची गरज नाही. या साहेबांनी दया दाखवली आणि इथे काम दिल. नाही तर पावसात कसे दिवस काढायचे हा मोठा प्रश्न होता". बुक स्टॉलच्या मालकाकडे बोट दाखवत विनू म्हणाला. "खूप हुशार पोरग आहे साहेब. माझ भाग्य म्हणून मला मदत करण्यासाठी भेटला. हिशेबात एकदम चोख. खूप वाईट वाटत याच्याबद्दल. नशिबाची थट्टा तर पहा, एका क्षणात भूकंपान सगळ्या कुटुंबाचा घात केला आणि याला मात्र धक्के खाण्यासाठी मागे सोडला." मालकाने हळहळून विनूबद्दल अनपेक्षित माहिती दिली.                                                                                                                         विनू हा उस्मानाबाद जवळच्या खेड्यातला. शिक्षणात हुशार, नावा प्रमाणे याच्या आचरणातही विनय. आठवीत असताना, विनू एका सुट्टीत मामाकडे दुसऱ्या गावी गेला असताना भूकंपान विनूच्या साऱ्या कुटुंबाला गिळल आणि विनूच आयुष्यच उध्वस्त झाल. काही दिवस लोकांनी विनूला सहानुभूतीने मदत केली पण स्वाभिमानी विनूला लवकरच कळून चुकल की स्वःताच विखुरलेल भविष्य आता त्याला स्वत:लाच जुळवायच आहे. त्यासाठी तो मुंबईला रोजगारी शोधण्यासाठी आला.                                                                     धारावीला झोपडपट्टीत एक विधवा बाईने इतर अनाथ मुलांसोबत त्याला आसरा दिला आणि त्याने विविध गोष्टी विकण्यास सुरवात करून चार पैसे जोडण्यास सुरवात केली. विनूला वाचनाची भयंकर आवड, त्या ओढीनेच त्याला फलाटावरील बुक स्टॉलवाल्या मालकाला रोजगारासाठी विचारण्यासाठी प्रेरित केले आणि नशिबाने त्याला ती नोकरी मिळाली. गिऱ्हाईकांना विक्री करता करता विनूने कित्येक मासिक आणि पुस्तकांचा फडशा पाडला असेल हे फक्त त्यालाच माहीत. विनूची कहाणी ऐकून अण्णांच्या काळजात कालवाकालव झाली. साध्या, सरळ आणि मायस व्यक्तिमत्तवाचे अण्णा कुणी मदतीसाठी हाक मारण्याआधीच हजर असत. त्यात लहानमुलांप्रती त्यांना विशेष ओढ. निपुत्रिकतेचा शाप आशीर्वाद मानून अण्णांनी किती गरजू मुला मुलींना मदत केली असेल त्याचा हिशोब नाही. त्यांनी विनूला बाहेर बोलावल आणि त्याच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवून विचारल "विनू तुला मोठा होऊन काय व्हायचय?" "ज्यांच्या भविष्यात फक्त अंधार आहे त्यांना स्वप्न पाहण्याचा अधिकार नसतो साहेब. उगाच ज्या गोष्टी नशिबात नाहीत त्यांची आस का धरावी? दोन वेळेची भाकरी आणि शरीर टेकायला कोपरा मिळाला कि भाग्य मानायच." कोरड्या आवाजात विनूने उत्तर दिल.                                                                            "तस नाही रे पोरा. अंधाऱ्या रात्रीतही कधी चंद्र तर कधी काजवे प्रकाश घेऊन येतात आणि त्या प्रकाशानेच न थांबता मार्ग शोधात राहिल की पहाट येतेच. बर.. एक सांग. शाळेत असताना तुझी मोठेपणी काय होण्याची इच्छा होती?" अण्णांनी भरल्या डोळ्यांनी विनूला विचारल. "मला पंख पसरून उडायचं होत. पायलट व्हायच होत. पण दैवानं पहा कसे माझे पंख छाटले".                                                                        विनून आभाळाकडे पहात सांगितल. या पोराला कशी मदत करावी याच विचारात अण्णांनी ऑफिससाठी प्रस्थान केल. दुपारी जेवणाच्या वेळी वर्तमानपत्र चाळताना अण्णांची नजर एका अनाथालयाच्या जाहिरातीवर पडली आणि अण्णांना जाणीव झाली की त्यांचा एक जवळचा मित्र सदानंद एका अनाथालयाचा अध्यक्ष आहे. अण्णा बरेचदा तिथे मुलांना शिकवण्यासाठी आणि मदतीसाठी जात. अण्णांनी तडकाफडकी सदानंदला फोन केला आणि विनूबद्दल विचारणा केली. सदानंदने विनूला रविवारी घेऊन ये म्हणून सांगितल. रविवारी विनूला घेऊन अण्णा अनाथालयात पोचले. सदानंदने पूर्णपणे चौकशी करून अण्णांना सांगितल की विनूला दाखल करून घेण्यात काही हरकत नाही. आम्ही त्याला शाळेतही पाठवू पण त्याला इथले सर्व नियम पाळावे लागतील आणि अनाथालयात लागेल ती कामे करून मदत करावी लागेल. विनूच्या आनंदाला पारावर उरला नाही. दुसऱ्याच दिवशी अण्णा विनूला अनाथालयात सोडून आले. अण्णा निघताना विनूने अण्णांचे पाय धरले आणि म्हणाला "साहेब या अनाथाला आज पुन्हा छत्र लाभल. तुमचे उपकार कसे फेडू?". "विनू शिकून मोठा हो, पंखात बळ आण आणि उंच भरारी घे. त्यातच सार काही आल". अण्णा निरोप घेऊन बाहेर पडले. वाढत्या वेलीला आधार मिळाला कि ती वेल आकार घेते आणि गगनाकडे धाव घेते. विनूची झेपही तशीच होती. थोड्याच काळात अनाथालयात विनूने सर्वांना आपलस केल आणि शाळेतली त्याची प्रगतीही उल्लेखनीय होती. अण्णाही नियमित त्याची विचारपूस करायला जात. काय हव, काय नको त्याची चौकशी करत. तो उदास असला की त्याला सोबत घेऊन फेरफटका मारत आणि त्याचा मूड बदलायचा प्रयत्न करत. हळू हळू विनू नावाच रोपट तरुण झाल आणि शिक्षणाची अनेक शिखर पार पडत विमानशास्त्रात इंजिनीअर झाल. त्याचा हा प्रवास सहज आणि सोपा जरी नसला तरी विनूने वाटेवर आलेल्या अनेक अडचणींवर मात करत ध्येयावरच लक्ष ढळू दिल नव्हत. विनूने आग्रहाने पदवीदान संमारंभाला अण्णांना बोलावलं. विनूला पदवी स्वीकारताना पाहून अण्णांचा उर स्वाभिमानानं भरून आला होता.                                                                                      स्वतःची मुलं नसली म्हणून काय झालं विनूसारख्या कित्येक मुलांनी अण्णांना त्यांच्या यशात भागीदार बनवून असे अनेक सुखाचे क्षण त्यांच्या पदरी घातले होते. समारंभानंतर विणून अण्णांच्या हाती एक पत्र दिल ..                                                        'आदरणीय साहेब,                                                                               खरं तर हे मी तुम्हाला तोंडान सांगायला हवं पण भावनांना लगाम घालता आला नाही तर हे सार सांगू शकणार नाही म्हणून हे पत्र लिहिल. तुमचे उपकार कसे फेडू हे मला माहित नाही पण कुणी तरी सांगितलय की देव दगडात नाही तर माणसांतच असतो. तो देव मला तुमच्यात लाभला. तुमच्या सहवासात आल की देवळात आल्यासारख वाटत. साहेब, तुम्ही माझ्या जीवनाच्या वाळवंटात 'कल्पतरू' बनून आलात. विघ्न कोणतही असो, माझ्या सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही सदैव तुमच्या छायेसोबत हजर. माझ्या एकाकी वाटेवर वाटाड्यासारखी तुमची सोबत.                                                                        जे स्वप्न एका भूकंपाने उध्वस्त केल होत, ते आज सत्यात आल. याच एकमात्र कारण म्हणजे तुम्ही. या मोडक्या पिलाच्या पंखांत उडण्याच बळ आणण्यासाठी तुम्हाला कोटी कोटी प्रणाम. नशीब एका बाजून घात करत आणि दुसऱ्या बाजून जखमांवर फुंकर मारत. दैवाच्या अश्याच लीलेन बरच काही हरवल आणि बरच काही लाभल. आज माझ एक स्वप्न पूर्ण झाल. पण दुसर अजून बाकी आहे.. ते पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या.'                                                                            तुमचा, विनू'                                                                           "अरे विनू हे सार यश तुझच आहे. मी एक निमित्तमात्र. तुझ्या आनंदातच सार काही आल. असाच मोठा हो". गहिवरल्या अण्णांनी विनूच्या डोक्यावर हात ठेवला.                                        क्रमशः 

🎭 Series Post

View all