पंखातील बळ भाग १

Pankhatil bal

जलद लेखन                                                                                                                                         विषय:-पंखातील बळ भाग १                                                                                             "या वर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावायच ठरवलेल दिसतय". जूनच्या पहिल्या आठवड्यातच ढगांचा गडगडाट ऐकून अण्णा स्वतःशीच पुटपुटले. "गेल्या काही वर्षांपासून उशीरा येणाऱ्या पावसाने या वर्षीच का बर लवकर हजेरी लावावी?" चौपाटीवर फेरफटक्याला जाण्याची त्यांची पूर्ण तयारी झाली होती. निवृत्ती नंतरचा अण्णांचा हा रोजचा उपक्रम. संध्याकाळ झाली की हाकेच्या अंतरावर असलेल्या समुद्राला भेटायला त्यांचे पाय आपोआप वळत.                                                                                                          निवृत्ती पूर्वीही ऑफिसमधून परतताना रोजची भेट ही ठरलेली. मावळत्या सूर्यासोबत किनारी बसून अथांग सागरासोबत हितगुज करण हा त्यांचा नेहमीचा कार्यक्रम. त्यात बीचवर आलेल्या असंख्य पर्यटकांचं निरीक्षण करण्यात वेळ कसा जायचा ते कळायचच नाही. पण आज १० जून आणि त्यामुळे काहीही झाल तरी बीचवर जायचच. कपाटातून छत्री काढून अण्णा कधी सटकले ते घरच्यांना कळलं पण नाही. नेहमी खचाखच भरलेल्या बीचवर आज पावसाच्या लक्षणांमुळे फारशी वर्दळ नव्हती. काही पोर टोर आणि प्रेमी युगुल मात्र पहिल्या पावसाच्या आशेने रेंगाळत होती. एक मोकळी जागा शोधून अण्णांनी फतकल मारली.                                                                                                         वारा हळू हळू जोर पकडत होता. लाटांच तांडव सुरु झाल. अण्णांनी ध्यान लावून डोळे मिटले, भवतालाशी संबंध तोडला आणि पंधरा वर्षांपूर्वीच्या आठवणींशी संवाद चालू केला. उन्हाळ्याच्या सुट्टी चालू होऊन काही दिवसच झाले होते. बीच वर येणाऱ्यांची गर्दी रोज वाढतच होती. तोही असाच एक दिवस. अण्णा नेहमीप्रमाणे कामावरून परत येताना बीचवर पोचले. "साहेब गरमागरम शेंगदाणे घेणार का?" बसण्यासाठी जागा शोधताना अण्णांच्या कानावर शब्द पडले. कोण विचारात आहे याकडे दुर्लक्ष करून अण्णांनी हातानेच नको म्हणून सांगितले. "एकदम बेस्ट आहेत साहेब. थोडे घेऊन तर पहा?" पुन्हा आलेल्या प्रश्नाने त्रासून अण्णांनी कोण आहे म्हणून पाहिले तर समोर                                                                                                  एक १२-१३ वर्षांचा युवक गळ्यात टोपली घालून उभा होता. सावळा वर्ण, मळकट कपडे, शिडशिडीत बांधा, कपाळावर रुळणारी कुरळ्या केसांची झुंबरं आणि डोळ्यात एक वेगळच तेज. अण्णा क्षणभर पहाताच राहिले. खरं तर अण्णांची शेंगदाणे खाण्याची अजिबात इच्छा नव्हती पण का कोण जाणे, अण्णा त्याला नाही म्हणू शकले नाहीत. "दे दोन रुपयांची पुडी." अण्णांनी खिशातून काही चिल्लर काढून मोजून त्याच्या हातावर ठेवली. त्यानेही सफाईने पुडी बांधून अण्णांच्या हातावर ठेवली आणि धन्यवाद म्हणून तो निघून गेला. अण्णा शेंगदाणे खाता खाता आजूबाजूची दृश्य टिपण्यात मग्न झाले. "साहेब किती वेळ झाला तुम्हाला शोधात होतो" अंधार पडायला लागला म्हणू अण्णा उठून निघणारच होते की त्यांच्या कानावर पुन्हा एकदा मगाचाच आवाज पडला. "हा पुन्हा का बर आला?" या विचाराने अण्णांनी त्याला काही विचारण्याच्या आधीच त्याने हात पुढे करून अण्णांच्या हातावर १ रुपयाचे नाणे टेकवले. "मगाशी तुम्ही एक रुपया जास्त दिला साहेब. परत द्यायला आलो." अण्णांनी वर पाहण्याआधीच स्वारी पसार.                                                                                                 एका गरीब मुलाच्या या कृत्याने अण्णांना क्षणभर विश्वासच बसेना. "गरमागरम शेंगदाणे देणार का?" बऱ्याच दिवसांनी अण्णांना तो पुन्हा एकदा भेटला. गेले काही दिवस अण्णांनी त्याला शोधण्याचा प्रयत्नही केला. पण कधी कधी दुरून जरी तो दिसला, तरी अण्णांच्या हाती मात्र लागत नव्हता. अण्णा मात्र दुरूनच त्याचा उत्साह, चालण्या बोलण्याच्या लकबी न्याहाळून पाहायचे. या मुलात काही वेगळी बात आहे हे त्यांच्या अनुभवी नजरेने केव्हाच पारखल होत. "देणार ना साहेब. कितीचे हवेत?" त्याने नेहमीच्या उत्साहाने विचारले. "३ रुपयांचे दे. आणि नाव काय तुझ?". "विनय - विनू म्हणून बोलावतात मला". त्याने पुडी बांधून अण्णांच्या हाती ठेवताच अण्णांनी ५ रुपयांचे नाणे त्याच्या हाती दिले आणि सांगितले "विनू, उरलेले तुझ्या खरेपणा बद्दल बक्षीस". तो ही थोड्या अचंब्याने अण्णांकडे पाहात राहिला आणि मग स्वतःला सांभाळून लगबगीने अण्णांच्या हातावर दोन रुपये ठेवून म्हणाला "मेहनतीचं फळ गोड असत साहेब. असे उपकाराचे पैसे नकोत". अण्णांनी काही बोलण्याआधीच विनू पुन्हा पसार.                                                                            क्रमशः 

🎭 Series Post

View all