पंखात बळ तुझ्या!

पंखात बळ तुझ्या




गोष्ट छोटी डोंगराएवढी
विषय- आकाशी झेप घे

शीर्षक- पंखात बळ तुझ्या!


पुढचा पेशंट पाठवण्यासाठी डॉ. रुपालीने टेबलवरची कॉल बेल वाजवली. रिसेप्शनिस्टने दार उघडलं आणि पुढची पेशंट आत पाठवली. डॉ. रुपाली पेशंट दारातूनच आत येताना तिचं निरीक्षण करत होती.


"बसा." पेशंटच्या हातातली फाईल घेत डॉ.रुपालीने समोरच्या खुर्चीकडे हात दाखवला. साधारण चाळीस ते पंचेचाळीस वर्षांची एक स्त्री आणि पन्नाशीच्या आसपासचा पुरुष असे दोघेजण समोरच्या खुर्चीवर बसले. 


"मिसेस अर्चना, बोला कशा आहात?" फाईलवरचं नाव वाचत डॉ. रुपालीने स्मित करत विचारलं.


"बरं असतं तर इथं आलो असतो का?" समोरचा पुरुष तिरकस बोलला.


"नक्कीच नाही. हा संभाषण सुरू करायचा एक प्रकार… बोला." रुपाली


"या पाच-सहा महिन्यांत ही नुसती चिडचिड करते बघा. काही झालं की राग आपला नाकावरच! कुठं जाणं नाही, येणं नाही… बरं, घरात काही कमी नाही. पैसा-अडका सगळा आहे. दिमतीला नोकर-चाकर आहेत; पण हिचं आपलं भरल्या घरात रड गाऱ्हाणं… डोकं दुखतंय म्हणून सारखं झोपून राहायचं… आजारी माणसासारखी मरगळ नुसती… ते वाताचा काही त्रास वगैरे आहे का बघून घ्या." सोबतचा पुरुष अगदी उद्विग्नपणे बोलत होता.


"मी थोडं त्यांच्याशी बोलू?" डॉ. रुपाली त्या पुरुषाकडे बघत बोलली आणि त्यावर त्याने मान डोलवली.


"मिसेस अर्चना, तुम्ही सांगा, काय त्रास होतोय तुम्हाला?" डॉ.रुपाली.


"सतत डोकं दुखत राहतं. काही करावसं वाटत नाही. छोट्या छोट्या गोष्टींसाठी चिडचिड होते. काहीच नको वाटतं." ती


"वय बेचाळीस, हो ना? मुलं-बाळं किती?" रुपाली


"एक मुलगा आहे. इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला आहे. ते टेक्सटाईल इंजिनिअरिंग का काय, ते करोतोय. पुढे कपड्याचा कारखाना टाकायचा म्हणतोय." मुलाबद्दल बोलताना तिच्या डोळ्यांत चमक होती.


"अरे वा छानच की! बाकीच्या मुलांपेक्षा वेगळं काहीतरी करायची इच्छा आहे त्याची… गुड! बरं, घरी अजून कोण कोण असतं? मिस्टर काय करतात?" डॉ.रुपाली


"आमचे…." तिचा नवरा बोलणार तेवढ्यात रुपालीने त्यांना थांबवलं आणि अर्चना बोलायला लागली.


"आमचं कपड्यांचं मोठं दुकान आहे. गावी शेतीवाडी आहे. तीन वर्षांपूर्वी सासू-सासरे दोघे वारले. मुलगा बाहेरगावी शिकायला आहे. हे दिवसभर दुकानात असतात. रात्री उशिरा घरी येतात. दिवसभर घरी मी एकटीच असते." अर्चना एका दमात बोलली.


"अच्छा, दिवसभर काय करता मग?" रुपाली


"काहीच नाही. घरीच असते. टी. व्ही. तरी किती पाहणार? मग झोपून जाते." अर्चना


"एवढा वेळ मिळतो तर काही छंद वगैरे? शिक्षण किती झालंय?" रुपाली


"बी. ए. मराठीच्या दुसऱ्या वर्षाला होते. तेव्हा लग्न झालं. पुढे शिकायला सासरी परवानगी नव्हती म्हणून मग शिकलेच नाही. छंद वगैरे असा काही नाहीये." अर्चना


"काही तर असेल ना… जे आधी आवडायचं; पण नंतर जबाबदाऱ्या, रीती-रिवाज सांभाळत करायचं राहून गेलं असेल?" रुपाली


"हो.. म्हणजे… तसं आहे… माझ्या माहेरी माझी आई आणि आजी दोघी गोधडी करायच्या. मी पण त्यांना मदत करायचे. गोधडीत नवीन नवीन डिझाइन टाकायचे. सर्वांना खूप आवडायच्या त्या डिझाइन! नंतर सासर श्रीमंत भेटलं. सासरी गोधडी करायचं म्हटलं की सगळे चिडायचे… जुन्या चिंध्यात रमते म्हणून… मग सोडून दिलं सगळं. मुलगा लहान होता, सासू-सासरे होते तर सगळं सांभाळण्यात वेळ जायचा. आता सासू-सासरे नाहीत, मुलगाही बाहेर शिकतोय… वेळच वेळ आहे पण वेळ जात नाही." अर्चना


"वेळ जाईल ना… त्या वेळेचा योग्य वापर केला तर… म्हणजे बघा.. तुमचं कपड्यांचं दुकान…. तुमचा मुलगा पुढे कपड्यांचा कारखाना काढणार… तुम्हालाही गोधडी शिवायची आवड… तुमच्या कल्पना शक्तीचा त्याला चांगला उपयोग होऊ शकतो… आणि जुनं ते सोनं म्हणतात तसं आता परत गोधडीची मागणी वाढली आहे, अगदी महागात मिळतात गोधड्या… बघा विचार करा तुम्ही पण… चला तुम्हाला तपासते. या टेबलवर झोपा." डॉ.रुपाली खुर्चीवरून उठत म्हणाली. अर्चना तिच्या मागे गेली. रुपालीने अर्चनाला तपासलं आणि औषधी लिहून दिल्या. दोघे नवरा-बायको बाहेर जायला निघाले. रुपालीने अर्चनाच्या नवऱ्याला आत थांबवलं आणि अर्चनाला बाहेर पाठवलं.


"हे बघा, गोष्ट सहज घेण्यासारखी नाहीये. मी तपासलं आहे, काही गंभीर मानसिक आजार होईल असं वाटतंय, दोन महिन्यांची काही औषधं लिहून दिलीयेत. औषध चुकवायचं नाही आणि दोन महिन्यात काही फरक पडला नाही तर आपण पुढे काही तपासण्या करु. तोपर्यंत त्यांना हवं ते अगदी मनमोकळं करू द्या. काळजी घ्या. औषधं संपली की दाखवायला या." रुपाली बोलली आणि चिंतेतच तो बाहेर गेला.


अडीच महिन्याने दोघे परत आले.


"डॉक्टर, अहो पंधरा दिवस झाले हिच्या गोळ्या संपल्यात पण ही काही दवाखान्यात यायला तयार नव्हती. आज जबरदस्ती घेऊन आलोय." तो काळजीत होता. डॉ. रुपालीने अर्चनाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिचा चेहरा मागच्या वेळेपेक्षा यावेळी प्रसन्न दिसत होता, आत्मविश्वास वाढलेला होता.


"काय म्हणता अर्चना ताई… सगळं मजेत ना?" डॉ. रुपाली


"मस्तच मॅडम! इथून गेले आणि नवीन एक ऊर्जा मिळाली… जुन्या आवडीवर, छंदावर बसलेली धूळ तुम्ही झटकली. इथून गेले आणि छोटीशी, बाळाला पांघरता येईल एवढीच एक गोधडी शिवली आणि यांच्या दुकानावर लोकांना दाखवायला ठेवली आणि त्यानंतर तर कमालच झाली. एका पाठोपाठ लहान-मोठ्या गोधड्यांच्या ऑर्डर यायला लागल्यात. एवढ्या ऑर्डर येत आहेत की आता वेळ कमी पडतोय." अर्चना आनंदात सांगत होती.


"सगळं तुमच्या औषधांमुळे शक्य झालं मॅडम. अर्चू परत आनंदात, उत्साहात असते. आता पंधरा दिवस झालेत औषधं संपून. किती मागे लागतोय हिच्या की दवाखान्यात चल… औषधांचा परिणाम नको ना कमी व्हायला; पण ही मात्र मुळीच ऐकत नाहीये." त्याच्या प्रेम, काळजी, आनंद, चिंता अगदी सगळंच होतं.


"मल्टी व्हिटॅमिन अणि कॅल्शियमच्या गोळ्या होत्या बाकी काही नाही. पुढे घेतल्या नाही तरी चालेल." डॉ.रुपाली हसत बोलली.


"मग हे सगळं? आणि तुम्ही तर म्हणल्या होत्या ना की सगळं गंभीर आहे…" तो चेहऱ्यावर एवढं मोठं प्रश्नचिन्ह घेऊन विचारत होता.


"कुठे जायचं हे तुम्हाला माहिती होतं, मी फक्त दिशा दाखवली. पंखात बळ होतं, मी फक्त भरारी घेता येते याची जाणीव करून दिली आणि हो गंभीर आहे असं म्हणाले नसते तर तुम्ही याचा गंभीरपणे विचार केला नसता म्हणून… बाकी काही नाही." रुपाली बोलली आणि दोघे समाधानाने तिथून जायला निघाले.


"एक मिनिट अर्चनाताई… माझी पण दोन गोधड्यांची ऑर्डर घेऊन ठेवा बरं." रुपाली बोलली आणि दोघांनी हसून होकार भरला आणि आनंदात बाहेर गेले. रुपालीनेदेखील समाधानाने पुढच्या पेशंटसाठी कॉलबेल वाजवली.



समाप्त.

© डॉ. किमया मुळावकर