पानिपत : एक मुक्तचर्चा ! पार्ट 3

.
७) दिल्ली ताब्यात घेऊन विश्वासरावांना गादीवर बसवले याबद्दल काही विशेष माहिती.

विश्वास राव हे बादशहाच्या गादीवर बसले नाहीत. तश्या अफवा मुद्दाम नजीबाने पसरवल्या. दिल्लीत दरबार भरला होता. विश्वास राव यांच्या हातून सर्वाना नजराणे दिले गेले. सर्वांचा सत्कार करण्यात आला. पण हो जर पानिपत जिंकलो असतो तर कदाचित भाऊ बादशाही उलथवून लावून विश्वास रावांनाच बादशहा घोषित करू शकले असते. उदय कुलकर्णी सारखे अनेक इतिहासकार भाऊंची ही छुपी महत्वकांक्षा होती हे मान्य करतात.

८) दिल्लीकडून युध्दाकडे वाटचाल व युद्धपुर्व परिस्थिती काय होती?

पडतुरहुन 14 मार्च 1760 रोजी फौज निघाली. सिंदखेड इथे जावून अतिरिक्त फौजेची जमवाजमव झाली. सिंदखेडराजा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ यांचे माहेर. राष्ट्रमातेचे आशीर्वाद घेऊन राष्ट्ररक्षणार्थ महाराष्ट्र निघाला. मग बुऱ्हाणपूर मार्गे हांडीयाचा घाट ओलांडून भोपाळ-सिरोंज-नरवरच्या घाटाने फौज ग्वाल्हेरहून धौलपुर इथे पोहोचली. या वाटेतल्या चंबळ खोऱ्यात काही दरोडेखोरांनी थोडा त्रास दिला पण त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात आला. धौलपुरला शिंदे-होळकर यांच्या फौजा मिळाल्या. धौलपुरजवळ मुचुकुंद तीर्थ आहे तिथे काही यात्रेकरू गेले. तर सध्या बेत असा शिजू लागला की यमुना ओलांडून दुआबात घुसावे आणि तिथे जाऊन युध्द करावे. पण गंभीर नदी उतार देईना. गंभीर नदी दूधडी भरून वाहू लागली. मग भाऊंनी मथुरा करत दिल्लीकडे कूच केले. भरतपूरचा जाट राजा सुरजमल पण मराठी फौजेला मिळाला. मथुरेहुन काही फौजा आधीच पुढे पाठवल्या. त्या फौजांनी किल्ल्यात प्रवेश करताच प्रवेशद्वार उघडायचे सोडून लुटालूट करायला प्रारंभ केला. परिणामी सर्वजण कापले गेले. मग इब्राहिम गारदी यांच्या तोफखाना दिल्लीत आल्या. लाल किल्ल्यावर तोफांचा मारा झाला. मराठे आत घुसले. मराठ्यांनी लाल किल्ला जिंकला. तिथे भाऊंना पैश्याची आणि रसदेची चणचण भासू लागली. शेवटी दिवाणएखासचे चांदीचे छत मराठ्यांनी उकरून काढले. भाऊंनी शहाजहान तृतीय याला हटवून शाहआलम द्वितीय याला बादशहा म्हणून घोषित केले. पण शाहआलम बिहारला होता. त्यामुळे शाहआलमच्या एका शेहजाद्याला युवराज घोषित करून काझीकडून खुतबा पढविला. नारोशंकरला किल्ल्याची जबाबदारी दिली. दिल्लीला खूप जणांनी लुटले होते त्यामुळे तिथे काहीच शिल्लक नव्हते. जनानात खजिना होता पण भाऊंना जनाना लुटणे योग्य वाटले नाही. कुणीतरी बातमी आणली की अब्दालीने त्याच्या लुटीचा काही हिस्सा जवळच्या कुंजपुरा इथे ठेवला आहे. मग नारोशंकर याच्यावर लाल किल्ल्याची जबाबदारी देऊन मराठे कुंजपुराकडे रवाना झाले. कुंजपुरापण मराठ्यांनी सहजपणे जिंकला. तिथे मराठ्यांच्या हाती कुतुबशहा सापडला. या कुतुबशहानेच दत्ताजी शिंदे यांचे मुंडके छाटले होते. त्यामुळे भाऊंनी पण त्याचे मुंडके छाटण्याचा आदेश दिला. कुंजपुराला बरीच रसद हाती सापडली. शिवाय जनावरे , खजिना सापडला. कुंजपुऱ्यात मराठ्यांनी विजयादशमी साजरी केली. जवळच कुरुक्षेत्र असल्यामुळे यात्रेकरू तिथेही गेले. यावेळी अब्दाली यमुनेच्या पलीकडच्या तीरावर होता. मराठ्यांनी जेव्हा दिल्ली जिंकली तेव्हा पण तो नदीच्या पलीकडच्या तीरावर होता. पुढे त्याला नदी पार करून कुंजपुरा वाचवायचा होता पण त्याला उतार भेटला नाही. शेवटी बागपत इथे त्याने एका वाटाड्याच्या मदतीने यमुना ओलांडली. ही बातमी भाऊंना समजताच त्यांनी तडक पानिपत गाठले. अब्दालीचे लष्कर आणि भाऊंचे लष्कर समोरासमोर आले. अब्दालीचा अफगाणिस्तानकडे जायचा मार्ग मराठ्यांनी अडवला आणि मराठ्यांचा दिल्लीकडे जायचा मार्ग अब्दालीने अडवला. सुरुवातीला अब्दालीकडे अन्नाची टंचाई होती पण त्या मानाने मराठ्यांकडे कुंजपुराहून रसद येत असल्यामुळे अन्नाची टंचाई नव्हती. पण नंतर पारडे फिरू लागले. अब्दालीने छावणी यमुनेच्या तीराजवळ हलवली. अब्दालीला दुआब आणि शूजाच्या मूलखातून रसद भेटू लागली. याउलट मराठ्यांवर उपासमारची वेळ आली. दोन महिने फौज समोरासमोर होती. खूपदा चकमकी घडत. एका चकमकीत जनकोजी शिंदे यांनी पराक्रम गाजवला. त्यात नजीब मरता मरता वाचला. नंतर एका पौर्णिमेच्या रात्री मोठी चकमक उडाली. त्यात महत्वाचे सरदार मेहेंदळे मारले गेले. त्यांची पत्नी सती गेली. मराठ्यांच्या वतीने रसद मिळवण्याचे आणि शत्रूंची रसद मारण्याचे काम गोविंदपंत बुंदेले करत होते. ते वयाने वृद्ध होते. ते बाजीरावांच्या समकालीन होते. दुर्दैवाने रसद मिळवताना ते पकडले गेले आणि गिलच्यांनी त्यांचे शीर कापले. हे शीर भाऊंच्या गोट्यात पाठवण्यात आले. तिकडून भाऊंच्या मदतीसाठी नानासाहेब पेशवे निघाले होते. पैठण इथे त्यांनी एका नऊ वर्षाच्या मुलीसोबत लग्न केले. पुढे भेलसा इथे मुक्काम पडला. गोविंदपंत बुंदेले यांच्या हत्येनंतर भाऊंनी सर्व सरदारांना छावणीत बोलावले आणि अंतिम युद्धाचा निर्णय सांगितला.

🎭 Series Post

View all