पानिपत : एक मुक्तचर्चा

.
१) पानिपतची लढाईची पार्श्वभूमी काय होती ?

नमस्कार. मराठे दिल्लीच्या रक्षणासाठी पानिपतावर उभे होते. थोडे मागे जाऊया आणि मराठे दिल्लीचे तख्त राखतील इतके सामर्थ्यवान कसे बनले याचा थोडक्यात आढावा घेऊया. 1780 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज गादीवर आले. त्यांनी 9 वर्षे मुघल सिद्धी पोर्तुगीज म्हैसूरचा राजा चिक्कदेवराय यांना झुंजवले. दुर्दैवाने मुघलांनी त्यांना कैद करून त्यांची क्रूर हत्या केली. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांनी मुघलाविरुद्धचा लढा चालूच ठेवला. 1700 ला त्यांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाई या भद्रकाली अवतारात आल्या आणि त्यांनी 7 वर्षे मुघलांना परत झुंजवले. मराठ्यांची एक राजधानी जिंकली की मराठे दुसरी राजधानी बनवत. एक छत्रपती गतप्राण झाले की मराठे दुसऱ्या वारसाला छत्रपती बनवून लढा देत. किल्ल्यावरची रसद संपली की मराठे मुघलांकडून रक्कम घेऊन तो किल्ला विकत. मग त्याच पैशाने नवीन शस्त्रे घेऊन , फौज उभी करून मराठे किल्ला परत जिंकत. स्वतः औरंगजेब हयात असताना महाराणी ताराबाई यांनी स्वतःचे सरदार नर्मदा पार करून उत्तरेला पाठवले. शेवटी हताश होऊन 1707 औरंगजेब दख्खनमध्येच वारला. 27 वर्षे बादशहाला झुंजवत ठेवल्यामुळे मराठ्यांच्या मनात वेगळाच आत्मविश्वास आला. पुढे दुर्दैवाने स्वराज्याच्या दोन गाद्या बनल्या. सातारा आणि कोल्हापूर. साताराची गादी छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र शाहू महाराज यांना भेटली. शाहू महाराज यांनी बाळाजी विश्वनाथ भट यांना पेशवाईची वस्त्रे दिली. बाळाजी विश्वनाथ यांनी हुसेन अलीच्या मदतीने औरंगजेबचा तोतया नातू उभा केला. या तोतयाला हत्तीवरून बसवून मराठ्यांची फौज हुसेन अली सोबत दिल्लीला गेली. ही मराठ्यांची पहिली दिल्ली स्वारी. तिथे बादशहा फरुखसीयर याचे हुसेन अली ( सय्यद बंधू पैकी एक ) याने डोळे काढले. मग दुसऱ्या बादशहाला गादीवर बसवण्यात आले. त्या नवीन बादशहाने मराठ्यांच्या राज्याला म्हणजे स्वराज्याला मान्यता दिली. दक्षिणेतील चौथाईचे हक्क दिले. महाराणी येसूबाई आणि इतर मराठी मंडळी जे कैदेत होते त्यांची सुटका केली. या स्वारीत बाजीराव पण सोबत होता. तीस वर्षे कैद भोगलेल्या महाराणी येसूबाई साताऱ्यात परतल्या. पुढे बाळाजी विश्वनाथ यांचा मृत्यू झाला. बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे भेटली. पेशवे बाजीराव यांनी बंगशचा पराभव करून छत्रसाल राजाचे रक्षण केले. त्या बदल्यात छत्रसाल राजाने स्वतःची पुत्री मस्तानी बाई आणि आपल्या राज्यांचा 1 / 3 हिस्सा पेशवे बाजीरावला पुत्र मानून दिला. पेशवे बाजीराव यांचे भाऊ चिमाजी आप्पा यांनी माळव्यात स्वारी केली आणि बहादूर अमझेरांचा पराभव केला. अश्याप्रकारे माळव्यात मराठ्यांचा शिरकाव झाला. माळव्यात बाजीरावाने तीन सरदार ठेवले होते. होळकर ( इंदौर ) , शिंदे ( उज्जैन ) , पवार ( धार ). गुजरातमध्ये दाभाडे-गायकवाड यांचे वर्चस्व निर्माण झाले. बाजीराव पेशवे यांच्या दिल्ली स्वारीमुळे दिल्ली दरबारात दहशत निर्माण झाली होती. नागपूरकर भोसले म्हणजे रघुजी भोसले यांनी विदर्भ , छत्तीसगड , ओडिशा ते बंगाल सीमेपर्यंत म्हणजे सुवर्णरेखा नदीपर्यंत राज्य वाढवले. 1740 साली दुर्दैवाने बाजीरावांचा रावेरखेडी इथे मृत्यू झाला. मग पेशवाईची वस्त्रे नानासाहेब पेशवे यांना भेटली. तोपर्यंत मराठ्यांचे राज्य चंबळ नदीपर्यंत होते. नानासाहेब यांच्या काळात मराठ्यांचा अजून उत्कर्ष झाला. 1752 साली मराठे आणि मुघल बादशहा यांच्यात "अहमदीया करार " झाला. त्या करारानुसार मराठ्यांना आग्रा , अजमेर , पंजाब हे सुभे भेटले. त्या ठिकाणच्या चौथाईचा हक्क भेटला. त्या बदल्यात मराठे मुघल बादशहाला अंतर्गत आणि बाह्य शत्रूपासून सरंक्षण पुरवणार होते. एकीकडे आपले साम्राज्य कळसाला पोहोचत होते तर दुसरीकडे दुर्दैवी घटना घडत होत्या. जयप्पा शिंदे यांचा नागौर इथे खून झाला. दत्ताजी शिंदे यांनी राजपुतान्यात स्वारी करून याचा वचपा काढला. या आधी कुंभेरीच्या वेढ्यात मल्हार राव होळकर यांचा पुत्र खंडेराव ( अहिल्याबाई होळकर यांचे पती ) तोफेचा गोळा लागून गतप्राण झाला. जयप्पा शिंदे यांनी जाटाना अभय दिले. त्यामुळे शिंदे होळकर यांच्यात वितुष्ट निर्माण झाले. राघोबादादा यांच्या नेतृत्वाखाली अटकेपार मराठ्यांनी झेंडे रोवले. अटक ते कटक श्रींचे राज्य निर्माण झाले. 1759 साली मराठ्यांचे साम्राज्य कळसाला पोहोचले होते. पानिपतची तिसरी लढाई ही मराठी आणि गिलची यांच्यात झाली. तसे पाहिले तर या दोन्ही पक्षांमध्ये आधीपासून काही वैर नव्हते. अब्दाली हा अफगाणिस्तानचा बादशहा होता. स्वतःच्या शुष्क प्रदेशातील अन्नाची गरज भागविण्यासाठी त्याला सुपीक प्रदेश असलेला पंजाब हवा होता. दुआबात ( गंगा यमुना मधला प्रदेश ) नजीब खान रोहिला राज्य करत होता. त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी अब्दालीला भारतावर आक्रमण करायचे आमंत्रण दिले. 1740 साली इराणच्या बादशहाने भारतावर आक्रमण केले. त्या स्वारीत अब्दाली पण सोबत होता. अफगाणिस्तानमध्ये स्वतःचे नवीन राज्य स्थापून त्याने भारतावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली. दिल्लीत कत्तल केली. जनानामधील स्त्रियांची विटंबना केली. पंजाबात शिखांची कत्तल केली. अमृतसर इथले श्रीहरमंदिरसाहेब तोडले. तिथले पवित्र तलावमधील पाणी काढून तिथे माती भरली. तर अश्याप्रकारे अब्दालीने उत्तरेत हाहाकार माजवला होता. मुघलांचे अंतर्गत शत्रू रोहिले आणि बाह्य शत्रू अब्दाली होते. म्हणून मराठे आणि अब्दाली यांच्यात युद्ध होणे अटळ होते. या युद्धाला अजूनही काही कंगोरे आहेत. राघोबादांनी जरी अटक पेशावर पर्यंत मजल मारली तरी तिथली योग्य व्यवस्था न लावता तो परतला. लाहोर , सरहिंद , मुलतान , अटक , पेशावर ही ठिकाणे मराठ्यांच्या ताब्यात होती. पहिल्यांदा कुणितरी दक्षिणेतून येऊन सिंधू नदी ओलांडली होती. असे क्षण इतिहासात प्रदीर्घ काळानंतर शतकात एकदा येतात. या दरम्यान राघोबादादा यांना इराणच्या बादशहाची पत्रे आली की आम्हाला काबुल , कंदाहार जिंकण्यासाठी मदत करा. पण राघोबा दादांनी नकार दिला कारण मराठ्यांना काबुल कंदाहार पण हवी होती.

* राघोबादादाच्या मोहिमेतील काही चुका :

1. दिल्ली जिंकल्यावर नजीबाला जिवंत सोडून देणे ही मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी घोडचूक ठरली.
2. जिंकलेल्या प्रातांची नीट व्यवस्था लावण्यात आली नाही.
3. शिंदे होळकर यांच्यात एकी निर्माण करता आली नाही.
4. अब्दालीचे पूर्ण पारिपत्य झाले नव्हते कारण तो मायदेशी निघून गेला होता.

पेशवाईवरील कर्ज मिटवण्यासाठी नानासाहेब यांनी दत्ताजी शिंदे यांना उत्तरेला पाठवले. श्रीगोंदा इथे भागीरथीबाईसोबत विवाह करून दत्ताजी उत्तरेला निघाले. सुरुवातीला राजपूताना मधून चौथ वसूल करून दत्ताजी दुआबात शिरले. नजीबच्या मदतीने गंगेवर पूल बांधून अवध बंगाल प्रांत जिंकावे अशी योजना आखली. पण नजीबने पूल बांधला पण त्याचा वापर करू दिला नाही. दत्ताजींनी हरिद्वारजवळून गंगा ओलांडली आणि संभलगड जिंकला. तिकडे अब्दालीने आक्रमण केले. दत्ताजी दिल्लीच्या रक्षणार्थ रवाना झाले. बुराडी घाटावर कुतुबशहा याच्या " क्यू पटेल और लढोंगे ?" या प्रश्नाला " क्यू नहीं ? बचेंगे तो और भी लढेंगे " असे बाणेदार उत्तर देऊन दत्ताजी शिंदे यांनी देशासाठी प्राण सोडले. पुढे मल्हारराव होळकर यांनी काही काळ गनिमी काव्याने लढा दिला पण त्यांचा निभाव पण लागू शकला नाही. त्यामुळे अब्दाली या दीर्घ रोगाच्या पारिपत्यसाठी भाऊंच्या नेतृत्वाखाली फौज निघाली. पानिपतला दोन्ही फौजा समोरासमोर आल्या.

तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.

🎭 Series Post

View all