पानिपत : एक मुक्तचर्चा ! पार्ट 2

.


२) मराठयांनी लढाईची तयारी काय केलेली होती?

दत्ताजी धारातीर्थी पडले ही खबर जेव्हा दक्षिणेत पोहोचली तेव्हा मराठ्यांनी उदगीरच्या लढाईत निजामावर विजय मिळवला होता. या विजयाचे सूत्रधार सदाशिवराव भाऊ होते. मग परतूरला नानासाहेब पेशवे यांनी सभा बोलावली. तिथे सदाशिव राव भाऊ आणि राघोबा दादा यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे मोहिमेचे नेतृत्व सदाशिव राव भाऊ यांच्याकडे आले. फ्रेंच अधिकाऱ्यांच्या हाताखाली तयार झालेली गारद्यांची म्हणजे इब्राहिम खान गारदी याची पलटण आणि तोफखाना मराठ्यांचा स्ट्रॉंग पॉईंट होता. शिवाय दमाजी गायकवाड , विंचूरकर , मानाजी पायगुडे , बळवंतराव मेहेंदळे , यशवंतराव पवार असे मातब्बर सरदार जमा झाले. 14 मार्च 1760 साली मराठे परतूरहून मोहिमेवर निघाले. तिथून सिंदेखेडला पोहोचले. फौजांची जमवाजमव केली. राष्ट्रमाता जिजाबाईंचे आशीर्वाद घेऊन राष्ट्ररक्षणार्थ महाराष्ट्र निघाला.

३) लढाईमध्ये सोबत कोणी कोणी केली आणि मदत कोणी नाकारली ?

मराठ्यांना मोहिमेत सुरुवातीला मदत सुरजमल जाट या भरतपूरच्या जाट राजाने केली. दिल्ली जिंकेपर्यंत जाट सोबत होते. पण इमाद उल मुलक याला वजीरपद आणि आग्रा शहर जाटांना द्यावे अशी मागणी सुरजमल यांनी केली. काही मराठी कारभाऱ्यांनी लाच घेऊन तसे वचन दिले होते. पण भाऊंना वचन पूर्ण करणे शक्य नव्हते. इमादने बादशहाची हत्या केली होती. त्याला वजीरपद दिले असते तर त्याच्या कृत्याचे समर्थन झाले असते. शिवाय आग्रा देणे पण शक्य नव्हते कारण त्यावर आपला हक्क होता. शेवटी सुरजमल यांनी मोहिमेतून काढता पाय घेतला. पण नंतर त्यांनी पत्र पाठवून फौज पाठवण्याचे वचन दिले. पुढे युद्धातून पळून आलेल्या कित्येक मराठी सैनिकांना आश्रय दिला. राजपूत तटस्थ राहिले. पतियाळा संस्थानचा संस्थापक अलासिंग याला मदत करायची होती पण अब्दालीने शिखांची मदत मराठ्यांपर्यत पोहोचू दिली नाही. रजपूत नाराज होते म्हणून ते तटस्थ होते. एकंदरीत मराठे एकटेच पानिपतवर उभे होते.

४) मराठ्यांसोबत फितुरी कोणी केली आणि अब्दालीला सोबत कोणी केली?

मराठ्यांशी फितुरी कोणत्याच सरदाराने केली नाही. युद्धाची गणिते फिरल्यामुळे बरेच सरदार रण सोडून पळाले पण याला फितुरी म्हणू शकत नाही. पण अब्दालीने आपले हेर बऱ्यापैकी पेरले होते. याउलट सदाशिव राव भाऊ यांना तिकडच्या गोट्यातील बातम्या कळत नसत. अब्दालीला अवधचा नवाब शूजा , नजीब खान रोहिला , बंगश , बलुच नवाब यांची साथ भेटली. शिवाय जयपूरचा रजपूत राजा माधवसिंग संधान बांधून होता.

५) लढाईला जाताना सेनापती, मुख्य अधिकारी, सैन्य संख्या, देवदर्शन होईल यानिमित्ताने सामील नागरिक या सर्वांची संख्या किती होती?

प्रमुख सरदार , कारभारी किमान 35-40 असावेत. एकूण फौज 45 ते 55 हजार असावी. 10 हजार पिंडारीची फौज होती. बाजारबुनगे यात्रेकरू यांची संख्या मात्र खूप होती.

६) सैन्याची सुरुवातीपासून वाटचाल कशी होती ? कोणकोणती संकटे आली ?

पडतुरहुन 14 मार्च 1760 रोजी फौज निघाली. सिंदखेड इथे जावून अतिरिक्त फौजेची जमवाजमव झाली. सिंदखेडराजा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ यांचे माहेर. राष्ट्रमातेचे आशीर्वाद घेऊन राष्ट्ररक्षणार्थ महाराष्ट्र निघाला. मग बुऱ्हाणपूर मार्गे हांडीयाचा घाट ओलांडून भोपाळ-सिरोंज-नरवरच्या घाटाने फौज ग्वाल्हेरहून धौलपुर इथे पोहोचली. या वाटेतल्या चंबळ खोऱ्यात काही दरोडेखोरांनी थोडा त्रास दिला पण त्यांचा वेळीच बंदोबस्त करण्यात आला. धौलपुरला शिंदे-होळकर यांच्या फौजा मिळाल्या. धौलपुरजवळ मुचुकुंद तीर्थ आहे तिथे काही यात्रेकरू गेले. तर सध्या बेत असा शिजू लागला की यमुना ओलांडून दुआबात घुसावे आणि तिथे जाऊन युध्द करावे. पण गंभीर नदी उतार देईना. गंभीर नदी दूधडी भरून वाहू लागली. मग भाऊंनी मथुरा करत दिल्लीकडे कूच केले. भरतपूरचा जाट राजा सुरजमल पण मराठी फौजेला मिळाला. मथुरेहुन काही फौजा आधीच पुढे पाठवल्या. त्या फौजांनी किल्ल्यात प्रवेश करताच प्रवेशद्वार उघडायचे सोडून लुटालूट करायला प्रारंभ केला. परिणामी सर्वजण कापले गेले. मग इब्राहिम गारदी यांच्या तोफखाना दिल्लीत आल्या. लाल किल्ल्यावर तोफांचा मारा झाला. मराठे आत घुसले. मराठ्यांनी लाल किल्ला जिंकला. तिथे भाऊंना पैश्याची आणि रसदेची चणचण भासू लागली. शेवटी दिवाणएखासचे चांदीचे छत मराठ्यांनी उकरून काढले. भाऊंनी शहाजहान तृतीय याला हटवून शाहआलम द्वितीय याला बादशहा म्हणून घोषित केले. पण शाहआलम बिहारला होता. त्यामुळे शाहआलमच्या एका शेहजाद्याला युवराज घोषित करून काझीकडून खुतबा पढविला. नारोशंकरला किल्ल्याची जबाबदारी दिली. वजीराची जागा मुद्दाम रिकामी ठेवली होती. कारण भाऊंना अजूनही शुजा वजीरीच्या आशेने परतेल अशी आशा होती.


🎭 Series Post

View all