पंढरीची वारी

वारीचा उद्देश वारीतच गवसतो!



वारी इतकं कुतुहुल मला आजवर कोणत्याच गोष्टीच वाटलं नाही. लोक पिढ्यानपिढ्या जातात म्हणे! हा, त्याचा बाप, त्याचा आजा, त्याच्या बापाचा आजा...अशी काहिकाहींची पूरी वंशावळच ह्यात विलीन झालेली. पिढ्यानपिढ्या चालत आलेले दागिने असावेत तशी ही वारीची प्रथा ही असंख्य कुळं जपतात, आनंदाने आयुष्यभर मिरवतात आणि आठवणीने पुढल्या पिढीकडे सुपूर्त करतात. माणसानेच निर्माण केलेले सर्व भेदभाव माणसानेच विरून टाकून एखादी गोष्ट एवढ्या भव्यतेने साजरी करावी, अशी एवढी सर्वसमावेशकता असलेली दुसरी गोष्ट भारतात सापडणं कठीणच! पण हे सगळं का? पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी! छे! फक्त तेवढंच नक्की नसावं. अस म्हणतात की नर्मदा परिक्रमेत नर्मदा देवी कोणत्या ना कोणत्या रुपात भाविकांना दर्शन देते. इथेही तसच काहीस असत. इथे वारीतल्या प्रत्येक माणसांत प्रत्येक माणसाला विठ्ठल सापडतो. असंख्य विठ्ठल- आयुष्याला नवी उभारी देणारे, हरवलेली वाट शोधून देणारे, दृष्टी असूनही अंधत्व आलेल्यांना डोळे देणारे, आयुष्य समृद्ध करणारे. फक्त शोधायचा उशीर! नकळतपणे सगळेजण ह्याच असंख्य विठ्ठलांच्या शोधात घराबाहेर पडलेले असतात. ह्या सगळ्यांच दर्शन झालं की ती गाभाऱ्यातल्या दर्शनाची फक्त प्रतिकात्मकता तेवढी शिल्लक राहते. देव आधीच सापडलेला असतो. तृप्त होत, नशिबाची झोळी आशीर्वादांनी काठोकाठ भरून ही सर्व कुळं घराकडे परतता, पुढच्या एकादशीच्या ओढीने! आणि ही अशी आषाढी-कार्तिकीची, संतश्रेष्ठांचे शब्द अस्तित्वात उतरवण्याची मोहीम अशीच सुरू राहते.
@shubhamsandeepchavan