पण वेळ आली नव्हती!

Memory of a bus accident


गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय - काळ आला होता -

शीर्षक - पण वेळ आली नव्हती.

काळ आला होता पण वेळ आली नव्हती हे वाक्य ऐकल्यावरती प्रत्येक वेळी अंगावर शहरा आणणारा माझा एक अनुभव मला नेहमी आठवतो.
खरंच आहे , "जाको राखे साईयाँ, मार सके ना कोई " म्हणतात ना तसाच काहीसा प्रत्यय मला बरेच वेळा आलेला आहे.
हा अपघाताचा प्रसंग आज लिहावासा वाटला. बऱ्याच वर्षांपूर्वीचा अनुभव आहे, एप्रिल 1995 म्हणजे लग्नानंतर साधारण वर्षभरानंतर आम्ही मी व माझे पती संतोष एका ट्रॅव्हल्सच्या बसने हैदराबाद हून जालनासाठी निघालो होतो. माझंया माहेरी बहिणीच्या मुलीचे बारसे होते. त्या वेळेला व्हिडिओ कोच ट्रॅव्हल्स हा नवीन प्रकार होता.

हैदराबाद ते जालना या रूटवर त्यावेळी जास्त ट्रेन्स नव्हत्या, व सलग तर नव्हतीच. म्हणजे नांदेडला उतरून ट्रेन बदलावी लागायची. ब्रॉड गेज चे काम चालू होते.

आमचे अचानक जायचे ठरल्यामुळे ट्रॅव्हल्स चे तिकिट बुक केले होते. बाय रोड हैदराबाद हून जालन्याला जाण्यंचा नवीनच रस्ता होता. आम्ही रात्री निघालो. प्रवास सुरू झाला मग काही वेळातच बस मध्ये व्हिडिओ वरती सिनेमा चालू झाला. सगळेजण आवडीने पहात होते पण त्यावेळी दिवसभराच्या थकव्याने मी झोपी गेले होते आणि नेमका सिनेमा संपला त्यावेळी मला जाग आली.

संतोषही तितका वेळ पिक्चर पहात होते व संपल्यावर ते पण गाढ झोपी गेले. मला काही झोप लागेना. बस मध्ये सगळेजण झोपलेले होते. मध्यरात्रीची वेळ असावी.
खूप अंधार होता आणि ड्रायव्हर ज्या स्पीडने गाडी चालवत होता ते पाहून माझ्या मनात उगीचच धुकधुक व्हायला लागली.
त्यामुळे तेव्हा तर मला पुन्हा झोप लागलीच नाही आणि मी सावध होऊन बसलेली होते.
अचानक तासाभरात एक दोन वेळेला जोरात खराब रस्त्यामुळे बस जोरात उडाली. मी अक्षरशः सीटवर अादळलेच. त्यातून सावरे पर्यंत काही क्षणातच प्रचंड आवाज आला. व बस कशाला तरी धडकतीय असं कळालं अन आवाजाने मी खूप घाबरले . जोरात ओरडले. काहीतरी होतंय हे समजेपर्यंत खडखड आवाज करून आमची बस पुलाच्या सगळ्या दगडांना टक्कर मारून दोन पलट्या घेऊन खाली कुठेतरी पडली. ती आदळली तेव्हा प्रचंड आवाज झाला. कल्पनाच करू शकता की पुढचा प्रसंग काय होता!
आरडाओरडा. . . गोंधळ !

अंधारात कुठे पडलोय काही कळायला मार्ग नव्हता . आमच्या सीटखाली डिजेल टँक होता. बस उलटी पडली होती. छत खाली व चाके वर. डिजेल अंगावर सांडलं वास यायला लागला. त्यातल्या बर्‍याच प्रवाशांची ढाब्यावर जेवायला थांबलो तेव्हा ओळख झाली होती. दोन जोडपी त्याच्या लहान मुलांसाोबत मागच्या सीटवर बसलेले होते. बस पडल्यावर त्यांच्या प्रचंड विव्हळण्याचा आवाज यायला लागला.
मी पाहिलं की हाताला काहीतरी मार लागलाय व दुखतंय. . मिट्ट अंधार व काहीच दिसत नव्हतं. हाताला बहुतेक बांगड्या घुसून जखम झाली होती. आम्ही पुलावरून नदीच्या कोरड्या पात्रात पडलो होति.
नदीत पाणी असतं तर काय ? या कल्पनेने पण जीव घाबरतो अजूनही.
बस उलटी आदळल्यानंतर बराच वेळ हलत होती , पुन्हा पलटेल असं वाटत होतं.
जेव्हा बस हलायची थांबले तेव्हा माझे मिस्टर संतोषनी मला आवाज दिला आणि विचारलं की "तू आहेस ना?" मी हो म्हणाले.
त्यानंतर ते म्हणाले "हात पाय ठीक आहेत का पाहून घे." मी हात पाय हलवून पाहिले, ठीक होते. त्यानंतर थांब घाई करू नको आपण बाहेर पडूयात म्हणाले.

सगळीकडे काचा फोडण्याचा, लोकांच्या ओरडण्याचा , आपल्या लोकांना बोलावण्याचा प्रचंड कोलाहल व लहान मुलांच्या रडण्याचा वगैरे आवाज येऊ लागला .
त्या गोंधळात मला कळेच ना की उठायचे कसे आणि बाहेर निघायचे कसे ?
बस ऍक्च्युली पूर्णतः उलटी झाली होती छत खाली होतं , दरवाजा तर कामाचा नव्हता. सीट लटकलेले वर, तशा अवस्थेत आम्ही पडलेलं होतो. अंधारात काहीही दिसत नव्हतं.
इतक्यात कुणीतरी माझ्या बाजूची खिडकी फोडलेला आवाज आला (त्या बस च्या खिडक्यांना सळया नव्हत्या ते बरं, त्यामुळे बाहेर निघणं सोपं होतं )

कुणीतरी वाचवायला आला असेल किंवा संतोषचाच हात असेल असा विचार करून दिलेला हाताला पकडून मी बाहेर आले आणि पाहते तर ज्या माणसाने मला बाहेर काढला तो मला म्हणाला \" माफ करा दिदी , तुम्ही दूर जावून थांबा."
तो त्याच्या बायकोला सदोधत होता बहुतेक.

त्यावेळेस मदत मिळाली पण मला एक पाच मिनिट काहीच कळालं नाही . चप्पल व सामान कुठे ?आपण कुठे आहोत आणि माझी नजर संतोषला शोधायला लागली. इतक्या अंधारातही लांबून त्यांनी मला पाहिलं व अंदाजानेच आवाज दिला आणि मी पळत जाऊन त्यांना बिलगले. खूप घाबरले होते. मी बाहेर निघाल्यानंतर ते आवाज देत होते व मी उत्तर दिलं नाही म्हणून ते घाबरून गेले होते.
मी त्यांच्या बाजूला थांबले व पाहिलं तर त्यांच्या डोक्याला मार लागला होता , रक्त चेहर्‍यांवर आलेले दिसत होते अंधारातही. रुमाल बांधला. माझ्या हाताला मार लागलेला होता. दोघांच्याही पायामध्ये बूट चप्पल नव्हती म्हणजे एक एक बूट चप्पल नव्हती.
त्या परिस्थितीचे इत्थंभूत वर्णन करेन तर कदाचित खूप मोठी कथा होईल , तो अनुभव तसाच लक्षात राहिलेला आहे.

पुलाखाली पडलेल्या बसला रस्त्यावरून जीपमध्ये शिरडीला जाणार्‍या काही तरूणांनी पाहिलं . गोंधळ व आरडाओरड ऐकून मुलांनी गाडी थांबवली व त्यातले काहीजण मदतीसाठी धावून आले होते.

बस उलटी पडली होती आमची सीट डिझेल टॅंक च्या वरती होता आणि बस उलटी झाली तेव्हा लीक झालेलं सगळं डिझेल सांडलं होतं.

आम्ही दोघांनी आमचं सामान शोधण्यासाठी म्हणून दुसर्‍यांचं बरंच सामान काढून दिलं. त्यात एका नवर्‍या मुलीचे सोन्याच्या दागिन्यांची ब्रीफकेस संतोषने शोधून मुलीच्या वडिलांच्या हातात दिली तर तो अक्षरशः हात जोडून रडायला लागला होता. त्या नवरीच्या चेहर्‍यां मधे काही काचा घुसल्या होत्या. सगळं भयानकच होतं. दुसऱ्यां बर्‍याच लोकांना आम्ही वाचवण्यासाठी मदत केली. आमची फक्त एक सुटकेस सापडली . पण काही लोक त्यांच्या घरच्यांना शोधण्यासाठी काडीपेटी पेटवून उजेडात पाहण्याचा प्रयत्न करू लागले.

बस पेट घेईल या भीतीने सगळ्यांनी आक्रोश केला त्यात आम्ही तर डिजेल अंगावर पडलेले होतो. जिवाच्या अकांताने ओरडलो होतो. मग ते थांबवलं.

त्यात एका परिवारामधली दोन लहान मुलं खूप रडत होती. मी जवळ जवळ अर्धा तास त्या मुलांना लांब नेवून सांभाळलं कारण दोन जोडप्यांपैकी एकीच्या बायकोला मार लागला होता व एका जोडप्यातल्या नवर्‍याच्या कंबरेच्या हाडाला दुखापत झाली होती.
अर्ध्या पावून तासात परिस्थिती हातात आली त्यावेळी साडे चार वाजले होते. म्हणजे बस साडे तीनच्या आस पास पडली होती. ड्रायवरचा डोळा लागला होता. सिंगल रोड होता व कच्चा पुल होता. नशीबाने खालच्या नदीला उन्हाळयामुळे पाणी नव्हतं .
त्यानंतर मग काही लोकांनिो व त्या तरूणांनी रस्त्याने जाणाऱ्या एका ट्रॅव्हल्सच्या बसला थांबवलं. ड्रायव्हर - कंडक्टर ने सगळ्यांना विनंती करून सरकारी दवाखान्यात रवाना केलं.
केवळ सामान शोधण्यासाठी सकाळ पर्यंत तिथे थांबण्याचा विचारही डोक्यात आला नाही. खूप घाबरलो होतो. जीव वाचला ते खूप होतं.
आमची प्रवासातली फक्त एक बॅग घेवून निघालो बाकीच्या दोन बॅग शोधल्या नाहीत.
ती वेळ नव्हती व कुणाला पेशंसही नव्हता.
बस पेट घेण्याची भीती किंवा रिस्क होती ,ती नको म्हणून आम्ही तशा अवतारामध्येच निघालो.

ट्रॅव्हल्सची बस सोडून जवळच्या एका सरकारी दवाखान्यात गेलो , तिथे आमचे नाव- पत्ते नोंदवून घेतले.
प्रथमोपचार केला गेला आणि सकाळी सकाळी दुसर्‍या ट्रॅव्हलच्या बसने जालन्याला पोहोचलो.

माझ्या पांढरा ड्रेस वर पूर्ण डिझेलचे डाग , ओढणी नाही हाताला लागलेले तर पट्टी आणि माझ्या पायात चप्पल नाही. संतोषच्या डोक्याला पट्टी बांधलेली व कपड्यांवर सगळे डाग व पायात बूट नाहीत. माझ्या हाताला पाठी बांधलेली अन बेल वाजवली अशा अवस्थेत आईने जेव्हा दरवाजा उघडला तर आम्हाला पाहिलं अन रडायलाच लागली.

तेच सगळं वर्णन दोन दिवस पर्यंत सांगणं चालत राहीलं

सगळ्यात जास्त मनातली भीती होती की त्यावेळी मला दिवस गेले होते. तिसरा महिना चालू असेल व या अपघाताने नको त्या गोष्टीची भीती जास्त होती.
२०-२५ फूट खाली पडलो म्हणजे शंका होती. अगोदर डॉक्टर ला भेट दिली. काळजीचे कारण नाही म्हणल्यावर जीव भांड्यात पडला.
आम्हाला त्या दिवशी काहीच कळालं नाही.
तिसऱ्या दिवशी पेपर मध्ये बातमी आली म्हणून कुणीतरी सा्गितलं .
पाहतो तर काय त्याच अपघाताबद्दलची बातमी व त्या बसचा फोटो आणि बरंच काही लिहून आलं होतं.
बातमी मध्ये असं लिहिलं होतं की " अपघात खुिपच भयानक होता व बसची अवस्था पाहता त्यातील कोणी जिवंत राहिलं असेल अशी शक्यता वाटत नाही, असं दर्शनी लोकांनी सांगितलं होतं."
त्यातले सहा प्रवाशी दगावले अशी बातमी दोन दिवसांनी आली होती.

अक्षरशः देवाच्या कृपेने वेळ आली नव्हती असं समजून त्याचे धन्यवाद मानले.
त्यानंतर जवळजवळ दहा ते पंधरा वर्षे मी बस मध्ये बसलेच नाही. अजूनही मी ट्रॅव्हलच्या बसने प्रवास टाळते.
ट्रॅव्हल्स काय मी कुठल्याच बसने प्रवास करत नाही. वेळ पडलीच तर दिवसाच्या बसने जाते किंवा ट्रेनने जाते.
एका माणसाच्या हातात सगळ्या प्रवाशांचे जीव आहेत ही कल्पनाच मला सहन होत नाही. ड्राइवर चं चुकलं किंवा त्याचा डोळा लागला तर त्या निष्पाप प्रवाशांनी मरायचं का ?

अपघाताबद्दल वाचणं टाळते व बसने फिरणं शक्यतो टाळते असं आहे पण कुठेही काळ आला होता असं वाचलं की अजूनही तोच प्रसंग आठवतो अन अंगावर कल्पनेनेच काटा येतो.

दिनांक १८. १२. २२
©® स्वाती बालूरकर, सखी