पालवी - भाग ८

Simple and innocent girl from Mumbai, Madhu falls in love with charming young man Ashish from Pune! Though these two are sure about their future together, will their families accept their love?

शनिवारी सकाळी वसुधा ताई किचन मध्ये आल्या तेव्हा मधु तिकडे एप्रन घालून बसली होती.

"आई तुझीच वाट बघत होते मी", स्टूलावरून उठून मधु म्हणाली.

"मधु.. काय गं, सकाळी सकाळी इकडे काय करतेयस? झोपेत चालत बिलत आलीस की काय? तरी अण्णा मला मागे एकदा म्हणालेच होते कि तू झोपेत उठून बसतेस वगैरे", तिला एवढ्या सकाळी किचन मध्ये बघून वसुधा ताईंना धक्काच बसला होता.

"काहीही काय आई, झोपेत मी एप्रन घालून कशाला बसेन? तुझं पण काहीतरीच असतं. आजपासून मी तुझ्याकडून जेवण बनवायला शिकणार आहे",मधु आसपासच्या ड्रॉवर मध्ये काय ठेवलंय बघत होती.

"अरे वा, शिकवेन की मी तुला. तसंही तुझ्या वयाच्या मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे. उद्या लग्नं करायचं झालं तर नवऱ्याला काय मॅगी खायला घालणारेस का?", वसुधा ताई चहाचं भांडं गॅसवर ठेवत म्हणाल्या,"चला कशाने बरं सुरवात करूया आपण?".

"पुरणपोळी", मधु म्हणाली.

"पुरणपोळी? अगं पहिल्या दिवशी जरा काहीतरी सोप्पं शिक. आयुष्यात मॅगी सोडून काही बनवलं नाहीयेस तू आणि आता डायरेक्ट पुरणपोळी बनवायची आहे तुला?", वसुधा ताई आपल्या मुलीकडे बघतच राहिल्या. आत्तापर्यंत कधी किचन मध्ये न येणारी मधु, शनिवारी सकाळी लवकर उठून आवरून पुरणपोळी शिकायचं म्हणतेय याचा धक्काच बसला होता त्यांना.

"ए आई काय गं, तू आता उगाच माझा उत्साह नको घालवूस हां. तू शिकवणार आहेस की नाही मला, नाहीतर मी यु ट्यूब वरून शिकते", मधु वैतागून म्हणाली. शेवटी वसुधा ताई तिला शिकवायला तयार झाल्या. मधुची सक्त ताकीद होती की सगळं ती करणार आहे आणि त्यांनी तिला फक्त काय करायचं ते सांगायचं. चार तासांच्या अथक परिश्रमांनंतर शेवटी एकदाच्या पुरणाच्या पोळ्या तयार झाल्या. पूर्ण घरात घमघमाट सुटला होता. वसुधा ताई आपल्या लेकीच्या पाककलेवर भलत्याच खुश होत्या.

"मी जोश्यांकडे थोड्या पोळ्या देऊन येते गं, ते नेहमी आपल्याला आणून देतात त्यांनी काहीही केलं की", म्हणून वसुधा ताई गेल्या.

मधु स्वतःशीच गुणगुणत उरलेल्या पोळ्या लाटत होती. तिला कधी एकदा आशिषला या पोळ्या खाऊ घालते असं झालं होतं. तेवढ्यात तिच्या कमरेभोवती हातांचा विळखा पडला आणि त्या पाठोपाठ तिला त्याच्या परफ्युमचा ओळखीचा वास आला. काही क्षण त्याच्या मिठीत रमल्यावर तिचे डोळे विस्फारले, "आशिष अरे तू इकडे काय करतोयस? आई येईलच इतक्यात. आणि सोड बघू मला", त्याच्या हातावर लाटण्याने लाडिक फटका मारत ती म्हणाली.

"आज अचानक पुरणपोळ्या? काही खास कारण आहे का?", तिला चिडवत तो म्हणाला. "पण पोळ्या नीट गोल नाही होत आहेत, थांब मी शिकवतो तुला", म्हणून त्याने आपले हात मधुच्या हातांवर ठेवले आणि पोळपाटावरची पोळी लाटायला घेतली. मधुला आशिषचा श्वास तिच्या मानेवर, गालावर जाणवत होता, त्याच्या त्या धाडसाने ती सुखावली पण होती आणि घाबरली पण होती.

"आशिष, कोणीतरी येईल रे. सोड ना मला प्लीज", तिचं काकुळतीला येऊन बोलणं ऐकून आशिषला हसू येत होतं.

"चालेल सोडतो, पण एका अटीवर. आधी मला सांग की आज मध्येच पुरणपोळ्या का बनवल्यास", आशिष म्हणाला.

"असंच, मला खाव्याश्या वाटत होत्या म्हणून", मधु त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं टाळत होती.

"चालेल, मग काकू येईपर्यंत असेच उभे राहू आपण. त्यांना आपल्याबद्दल अशा पद्धतीने कळावं असं वाटत नव्हतं मला पण आता काय तू खरं उत्तर देत नाहीस तोपर्यंत मला तुला सोडता पण नाही येणार", आशिष तिच्या भोवतीची आपली पकड घट्ट करत म्हणाला. शेवटी मधुने हार मानली, "काल कोणीतरी मला म्हणालं की त्याला पुरणाच्या पोळ्या आवडतात. म्हणून बनवल्या. आता प्रेमात काय लोकं काहीही करतात ना", ती लाडिकपणे म्हणाली. तिच्या त्या शब्दांनी आशिष पूर्णतः विरघळला.

"आय लव्ह यु मधु, आय लव्ह यु अ लॉट!", तिच्या गालांवर आपले ओठ टेकवत तो म्हणाला. त्याच्या स्पर्शाने मधु जागच्या जागी फ्रीझ झाली. प्रेम या एका भावनेने तिचं पूर्ण मन व्यापून गेलं. आयुष्यात पहिल्यांदाच ती कोणातरी दुसऱ्यासाठी एवढं प्रेम अनुभवत होती. आशिष कधी तिकडून निघून गेला हे कळायचं भानही तिला राहिलं नव्हतं.

"मधु, अगं पोळी करपून चालली आहे. अशी भूत बघितल्यासारखी का उभी आहेस", वसुधा ताई तिच्याकडे बघून बोलत होत्या. पण मधु आपल्याच तंद्रीत तिच्या रूम मध्ये गेली आणि आरशासमोर जाऊन उभी राहिली. लाजेने लाल झालेल्या तिच्या गालांकडे बघत. अजूनही आशिषच्या परफ्युमचा मंद वास तिच्या श्वासात दरवळत होता. स्वतःच्या आरशातल्या प्रतिमेकडे बघतानाही तिला लाज वाटत होती. त्या एका क्षणात आशिष तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला होता.

"मधु सगळ्या पोळ्या झाल्या आहेत आणि आशिष पण आलाय जेवायला, बाहेर येतेस ना?", वसुधा ताईंनी बाहेरून आवाज दिला. काही वेळापूर्वी झालेल्या प्रकारानंतर त्याच्या समोर कसं जायचं तेच मधुला सुचत नव्हतं. कशीबशी ती बाहेर आली.

"अगं मधु, काय म्हणतेस? बाहेर काकू भेटल्या. त्या म्हणाल्या मला आज पुरणाच्या पोळ्यांचा बेत आहे. त्यांनीच बोलावलं मला जेवायला", वसुधा ताईचं लक्ष नसताना मधुला डोळा मारत आशिष म्हणाला. मधुने डोळे वटारून त्याला गप्प बसायची खूण केली. जेवणाची तयारी करत असताना वसुधा ताईंना त्यांच्या बहिणीचा फोन आला म्हणून त्या आत गेल्या.

"आशिष तू पण ना, आई समोर काहीही काय करतोस, तिला कळलं असतं म्हणजे?", मधुने विचारलं.

"अगं कळलं तर कळलं. कधी ना कधी तर सांगायचं आहेच ना. बरं मधु आता एवढ्या पुरणपोळ्या बनवल्याच आहेस तर तुझ्या हाताने खाऊ पण घाल ना. म्हणजे खरी चव कळेल मला. नाहीतर परत मगाशी केलं तेच करावं लागेल हं मला", आशिष तिच्याकडे खट्याळपणे बघत म्हणाला. मधुने काहीच न बोलता पुरणपोळीचा तुकडा तोडून त्याला भरवला.

"छान , खूपच छान", तिच्या चेहऱ्यावरून नजर न हटवता आशिष म्हणाला.

जेवणं झाल्यावर निघताना आशिष वसुधा ताईंना डबे देताना म्हणाला,"काकू कोथिंबिरीच्या वड्या मस्त झाल्या होत्या हां. थँक यु! मधुने दिला डबा मला काल". वसुधा ताई क्षणभर गोंधळल्या आणि अचानक सगळं त्यांच्या लक्षात आलं. तेवढ्यात मधुही बाहेर आली.

"काय गं मधु, हा डबा तर मी तुला दिला होता ना. मग तो आशिषकडे कसा गेला", वसुधा ताईंनी काही कळत नसल्याचा भाव आणत विचारलं, पण मनातून त्यांना आशिषसारखा मुलगा आपल्या मुलीच्या आयुष्यात आल्याचा खूप आनंद होत होता. मधुलाही कळून चुकलं की आता खोटं बोलण्यात काही पॉईंट नाहीये. तिने वसुधा काकूंना सगळं खरं खरं सांगून टाकलं.

मधु आणि आशिष दोघं वसुधा ताईंसमोर बसून त्यांच्या बोलण्याची वाट बघत होते. त्या पण मुद्दाम विचार करत असल्याचं भासवत होत्या, प्रत्यक्षात मात्र त्यांना कधी एकदा त्या दोघांना भरभरून आशिर्वाद देत्ये असं झालं होतं. पण आई म्हणून त्यांना आपल्या मुलीचं आयुष्य योग्य हातांत आहे याची पण खात्री करायची होती.

"आशिष, मधु माझा तुमच्या दोघांच्या नात्याला काहीच आक्षेप नाही. पण आशिष तू मधुच्या बाबतीत मनापासून सिरिअस आहेस? तिच्याशिवाय मह्त्वाचं माझ्या आयुष्यात काहीच नाही. मला तुझ्याकडून वचन हवंय की तू तिला कायम सुखात ठेवशील. वरवर कितीही दाखवत असली तरी मनाने खूप हळवी आहे ती. तिला त्रास झालेला मला सहन नाही होणार", त्या आशिषकडे बघून म्हणाल्या.

"काकू तुम्ही काही काळजी करू नका, मधु माझ्याही आयुष्यातही तितकीच महत्वाची आहे. तिला कधीही कसलाही त्रास मी होऊ देणार नाही ", आशिषने त्यांचा सुरकुतलेला हात हातात घेत वचन दिलं. मधु कोपऱ्यात उभी राहून सगळं ऐकत होती, तिच्याकडे बघुन वसुधा ताई म्हणाल्या,"मधु , बाळा, इकडे ये, बस इकडे". मधु त्यांच्याजवळ आली. त्यांनी तिला आणि आशिषला बाजू बाजूला बसवलं.

"अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटतोय. मधु एकदम योग्य निवड केली आहेस तू .मला खात्री आहे आशिष तुला खूप सुखात ठेवेल. माझे तुम्हाला दोघांना खूप आशीर्वाद आहेत", त्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवत त्या म्हणाल्या. मधुने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत वसुधा ताईंना मिठी मारली.

"आशिष, तू ही तुझ्या आई वडिलांना बोलावून घे. आता पुढची सगळी बोलणी सुरु करावी लागतील", वसुधा ताई म्हणाल्या. त्यांच्या त्या वाक्याने आशिषच्या चेहऱ्यावरचा रंग उडाल्याचं त्या दोघी मायलेकींच्या लक्षात नाही आलं.

क्रमशः..!

🎭 Series Post

View all