पालवी - भाग ६

imple and innocent girl from Mumbai, Madhu falls in love with charming young man Ashish from Pune! Though these two are sure about their future together, will their families accept their love?

सकाळी मधु आवारत असताना आशिषचा मेसेज आला,'खाली वाट बघतोय, ऑफिसला ड्रॉप करतो तुला'. मधु चपला घालत असताना वसुधा ताई तिचा डबा घेऊन आल्या, "हे घे गं, नाहीतर जाशील तशीच. त्या दुसऱ्या डब्यात कोथिंबीर वड्या दिल्या आहेत. मागच्या वेळेला तुला आवडल्या होत्या ना म्हणून परत केल्या. आजकाल जेवणात लक्ष नसतं तुझं. म्हंटलं काहीतरी वेगळं करावं, ते तरी नीट खाशील".

"थँक्स आई. हे काय या वेळेला आशिषसाठी डबा नाही दिलास", मधु वसुधा ताईंचे गाल लाडाने ओढत म्हणाली.

"नाही गं, यावेळेला जरा कमीच झाल्या माझ्याकडून, परत करेन तेव्हा देईन. तुला काय बरंच वाटेल. त्याला दिलं कि तुझ्याच पोटात दुखतं", वसुधा ताई पदराने चेहरा पुसत म्हणाल्या.

"बरं, येते आता. आणि हो संध्याकाळी यायला उशीर होईल मला, ऑफिस च्या मैत्रिणीबरोबर शॉपिंग ला जायचं आहे", मधु वसुधा ताईंची नजर चुकवत म्हणाली. आयुष्यात पहिल्यांदाच ती त्यांच्याशी खोटं बोलत होती, पण खरं काय सांगायचं असा प्रश्न होताच. तिने आणि आशिषने एकमेकांसमोर आपल्या भावना व्यक्तं केल्या असल्या तरी अजून त्यांच्या नात्याला काही नाव दिलं नव्हतं. अजून ते स्वतःच एकमेकांना फारसे ओळखत नव्हते, त्यामुळे बाकी कोणाला इतक्यात काही सांगण्यात अर्थच नव्हता. 

बिल्डिंगच्या गेट पासून थोडं पुढे आशिष बाईकवर मधुची वाट बघत होता. बिल्डिंगमधल्या भोचक लोकांच्या नजरा चुकवण्यासाठी ते दोघं काळजी घेत होते. आईला बाहेर कोणाकडून कळलं तर खूप वाईट वाटेल हे मधुला माहिती होतं.

"हे काय आज बाईक? तुझं बरंय रे, रोज वेगळ्या वेगळ्या गाड्या", मधु बाईकवर मागे बसत म्हणाली.

"हो मग, आज आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचंय ना, उगाच ट्रॅफिक मध्ये अडकायला नको. आणि बाईकवर फिरायची मजाच वेगळी असते गं. तूच म्हणतेस ना कॉलेजमध्ये असताना तुला हे सगळं करायला नाही मिळालं, म्हणजे कोणाच्यातरी मागे बसून घरी खोटं सांगून मस्त फिरायला जायचं. म्हणून म्हंटलं तुझी ख्वाईश पूर्ण करावी", आशिष हेल्मेट घालत म्हणाला.

"एकदम खुश दिसतोयस आज", मधुने बाईकच्या आरशात पाहत विचारलं.

"हो मग, आज पहिल्यांदाच आपण बाल्कनी, घर आणि गाडी सोडून वेगळीकडे कुठेतरी भेटणार आहोत. खरंच सांगतोय मधु कधी एकदा संध्याकाळ होतेय आणि मी तुला पिकअप करतोय असं झालंय मला", आशिष आरशात तिच्याकडे बघत म्हणाला.

"जरा दमानं घ्या रानडे, एवढी एकसाईटमेंट बरी नव्हे", मधु ऑफिसच्या गेटबाहेर उतरत म्हणाली.

"का बरं, माझ्या गर्लफ्रेंडला पहिल्यांदा बाहेर घेऊन चाललोय मी. खूप वाट बघायला लावू नकोस हां, वेळेवर निघ संध्याकाळी प्लिज", म्हणत आशिषने बाईकला किक दिली. काही वेळात दोघं मधुच्या ऑफिसपाशी पोहोचले. मधु गाडीवरून उतरून आशिषच्या समोर उभी होती. एकमेकांना सोडून खरंतर दोघांचाही पाय निघत नव्हता. संध्याकाळ व्हायला अजून अख्खा दिवस मध्ये होता. आशिषची मिश्किल नजर मधुच्या चेहऱ्यावर खिळली होती आणि त्यामुळे मधुच्या गालावर लाजेची लाल छटा पसरत होती. मधुच्या लाजण्याचं आशिषला अप्रूप वाटायचं, आजकालच्या जगातही मुलींना लाजता येतं याचं मधु म्हणजे मूर्तीवंत उदाहरण होती. त्यात आशिष तिच्याकडे बघायला लागला की तर तिची इतकी धांदल उडायची की ते पाहून आशिषला हसायलाच यायचं. आत्ताही अगदी तसंच होत होतं. काहीतरी विषय काढायला मधुने आपल्या बॅगेतून वसुधा ताईंनी तिला दिलेला कोथिंबीर वड्यांचा डबा आशिष समोर धरला. 

"अरे हा डबा घे, आई ने कोथिंबीर वड्या केल्या आहेत. तुझ्यासाठीच दिलाय", म्हणून मधुने आपला डबा त्याला देऊन टाकला. आशिषनेही मुद्दामून तिच्या हातातून डबा घेताना तिचा हात पकडला.

"काय करतोयस, प्लिज माझा हात सोड ना. ऑफिसमधून कोणीतरी बघेल अरे",  मधु त्याच्या हातातून तिचा हात सोडून घ्यायची धडपड करत होती.

"एका अटीवर सोडेन, आज ऑफिसमधून लवकर निघायचंस तू", आशिषची नजर अजूनही तिच्या चेहऱ्यावरच खिळलेली. शेवटी एकदा मधुने त्याची अट मान्य केल्यावरच त्याने तिचा हात सोडला आणि नाईलाजाने तिला बाय करून तो तिकडून निघाला. आशिष गेल्यावर तो नजरेआड होईपर्यंत मधु त्याच्याकडे बघत राहिली. आज तो पहिल्यांदाच तिला गर्लफ्रेंड म्हणाला, मधु स्वतःशीच लाजली. ती ऑफिसमध्ये शिरत असतानाच समोरून अनु आली.

मधुच्या चेहऱ्यावरचं स्माईल बघून, तिला कोपराने धक्का मारत ती म्हणाली, 'हुंsss, अगं स्वतःशीच हसणं बास आता, एकटीला हसताना बघून लोकं वेडं समजतील तुला. प्रेम वगैरे सगळ्यांना कळत नाही. काय आज बाईकवरून वाटतं, बघितलं मी खाली तुझ्या हिरोला. एवढं काय गुलुगुलु बोलत होतात गं?"

"गप गं अनु, तू पण ना, कुठेही काहीही बोलतेस. ही काय जागा आहे का असल्या गोष्टी बोलायची. कोणी ऐकलं म्हणजे? आणि प्रेम बिम काही नाही गं. आम्ही अजून फिगर आऊट करतोय.", मधु आजूबाजूला बघत म्हणाली.

"हो अगदी, फिगर आऊट करतायत म्हणे. त्याचा फोन आला नाहीतर पाण्याबाहेर पडलेल्या माशासारखी अवस्था होते तुझी", अनु आपल्या खुर्चीवर बसत म्हणाली.

"मासा? नको तिकडे बरी चालते गं तुझी क्रीएटिव्हिटी. कामात वापर ना ती जरा", म्हणुन मधुने तिला गप्पं केलं पण मनातून अनुचं आशिषच्या नावाने चिडवणं तिला आवडत होतं. 

अनु आणि मधु कॉलेजच्या मैत्रिणी. अगदी कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांची एकदम घट्ट मैत्री होती. मधु जितकी लाजरी बुजरी तितकीच अनु मनमोकळी आणि बिनधास्त होती. घरच्यांना न सांगता पिक्चरला जाणं, सर्रास लेक्चर्स बुडवणं या सगळ्यात ती पटाईत होती. पण अभ्यासातही तितकीच हुशार होती. कॉलेजमध्ये असताना ती मधुची बॉडीगार्डच होती. कोणी तिला त्रास देत असेल तर अनु त्यांना असं वठणीवर आणायची की पुन्हा कधी ते मधुच्या आसपास पण फिरकायचे नाहीत. कॉलेज संपल्यावर दोघींना नोकरी पण एकाच ठिकाणी लागली. आई आणि अण्णा सोडून मधु फक्त अनुलाच सगळं सांगायची. आशिषच्या बाबतीत पण तिने त्याच्याआधी अनुला सांगितलं होतं. तेव्हाची तिची रिअक्शन मधुला अजून लक्षात होती.

"तूला, म्हणजे मधुमिता गोखलेला, एक मुलगा आवडलाय? शक्यच नाहीये. एक मिनिट आज एक एप्रिल आहे का? नाही.. म्हणजे एप्रिल फूल पण नाही. तुझा काहीतरी गैरसमज होतोय मधु", अनु हात झटकत म्हणाली.

"गैरसमज काय अगं, मी सांगतेय ना तुला. तो समोर असताना मी बावळटासारखी लाजत बसते किंवा त्याच्याकडे बघत बसते. काही कळतंच नाहीये काय होतंय मला", मधु नखं खात म्हणाली.

"बापरे हे गंभीर आहे, पण तू टेन्शन नको घेऊस. फक्त एक कर, यापुढे तो दिसला किंवा भेटला तर जरा भाव खा. लाजत बुजत त्याच्यासमोर उभी राहू नकोस. मुलांना मुलींनी थोडा भाव खाल्लेला आवडतं", अनुने आपला एक्सपर्ट सल्ला दिला आणि दुसऱ्या दिवशी मधुने बरोबर त्याच्या उलटं केलं, तिने आशिषला जाऊन सांगितलं तिने त्याला किती मिस केलं ते.  

संध्याकाळी आशिष ने मधु ला ऑफिसमधून पिक केलं. "ए आपण कुठे चाललोय?", मधुने बाईकवर मागे बसून विचारलं.

"जुहू बीच, आवडतं का तुला तिकडे जायला? मला तर समुद्र पहिल्यापासूनच खूप आवडतो, त्यात पुण्याला समुद्र नाही त्यामुळे मुंबईला आल्यापासून मी समुद्रावर इतकेवेळा गेलो आहे. म्हणून म्हंटलं आपणही आज तिकडेच जावं", आशिषने ट्रॅफिकमध्ये दोन तीन गाड्यांना कट मारत म्हंटलं. काहीवेळाने दोघं जुहू बीचच्या वाळूत बर्फाचा गोळा खात बसले होते.

"आशिष, तुझ्या घरी कोणकोण असतं रे? म्हणजे माझ्या घरी आईला तर तू भेटलाच आहेस. पण मला तुझ्या घरच्यांबद्दल काहीच माहीत नाही", मधुने बर्फाच्या गोळ्यावर ताव मारत विचारलं.

"माझ्या घरी आई, बाबा, अणि दादा वहिनी असतात..आणि..", आशिष बोलताना मधेच थांबला.

"आणि?", मधु नं विचारलं.

"मिता..माझी बायको", आशिषने दुसरीकडे बघत आपलं वाक्य पूर्ण केलं आणि मधुच्या हातातला गोळा खाली पडला. 

क्रमशः..!

🎭 Series Post

View all