पालवी - भाग ३

Simple and innocent girl from Mumbai, Madhu falls in love with charming young man Ashish from Pune! Though these two are sure about their future together, will their families accept their love?

आशिष गेल्यावर मधु हॉस्पिटलच्या कॅन्टीनमध्ये येऊन बसली. संध्याकाळपर्यंत सगळं किती नॉर्मल चालू होतं, आणि अचानक हे सगळं झालं. अण्णांच्या वेळेला पण असच झालं होतं. मधु ऑफिसमधून घरी यायला निघाली आणि वसुधा ताईंचा तिला फोन आला, "अगं मधु अण्णा काही बोलतच नाहीयेत गं. तू लवकर घरी ये मला फार काळजी वाटतेय". त्या फोननंतर तिने वाटेतच डॉक्टरांना फोन केला. ते दोघं एकदमच घरी पोचले. डॉक्टरांनी लगेच अण्णांना हॉस्पिटल मध्ये शिफ्ट केलं. रात्रभर ट्रीटमेंट चालू होती पण पहाटे अण्णा गेले. त्या रात्रीही मधु अशीच कॅन्टीन मध्ये बसली होती. पण तेव्हा तिच्या बरोबर वसुधा ताई होत्या. मधुची परिस्थिती बघून त्यांनी स्वतःला खूपच सावरलं होतं. त्या तिला धीर देत होत्या. सकाळी डॉक्टर अण्णा गेल्याची बातमी घेऊन आले तेव्हा वसुधा ताईंच्या डोळ्यात काहीवेळासाठी पाणी तरळलं पण मधु मात्र पुरती कोलमडून गेली. लहानपणापासूनच ती अण्णांना खूप क्लोज होती. कुठलीही गोष्ट ती सगळ्यात आधी त्यांना सांगायची. तिच्या मैत्रिणींना त्यांच्या वडिलांबद्दल कायम भीती असायची पण मधुला मात्र अण्णांबद्दल फक्त नितान्त आदर आणि प्रेम होतं. त्यांच्या जाण्याच्या एवढ्या मोठ्या धक्क्यातून ती फक्त वसुधा ताईंमुळेच सावरू शकली होती. आणि आज हे असं झालं. तिने आत्तापर्यंत आणलेलं सगळं उसनं अवसान गळालं. त्या रिकाम्या कॅन्टीनमध्ये बसून ती हमसून हमसून रडायला लागली.

"मधु..", नुकत्याच परतलेल्या आशिषने मधुच्या खांद्यावर हात ठेवला. त्याच्या आवाजानं ती खूप हळवी झाली आणि कसलाही विचार न करता त्याच्या मिठीत शिरून रडायला लागली. तिला तसं रडताना बघून आशिषची अवस्थाही केविलवाणी झालेली. बराचवेळ ते दोघं काही न बोलता तसेच उभे राहिले. थोडं सावरल्यावर मधु पटकन बाजूला झाली. काही तासांपूर्वी ज्या माणसाला आपण नावाने हाक मारायला लागलो, आत्ता चक्क त्याच्या मिठीत शिरून आपण रडत होतो या विचाराने तिची तिलाच लाज वाटली. तिचा लालबुंद झालेला चेहरा बघून आशिषला हसावं कि तिच्याकडे बघत राहावं ते कळत नव्हतं. पटकन विषय बदलायला तो म्हणाला, "चला जेवण गार होतंय, भूक आहे ना अजून? का रडून पोट भरलंय?". मधु ने मान डोलावली. दोघं एकमेकांशी काही न बोलता जेवले. आशिष मध्ये मध्ये तिच्याकडे बघत होता पण मधु मात्र अजूनही झाल्या प्रकाराने अवघडली होती आणि आशिषची नजर चुकवत होती. जेवण झाल्यावर दोघं परत आय.सी.यु. पाशी आले आणि रात्रीच्या नर्सकडे आशिषने आणलेली औषधं दिली.

"तू नक्की एकटी राहशील का इथे? नाहीतर मी थांबतो", आशिष वसुधा ताईंना बघून पुन्हा रडवेल्या झालेल्या मधुकडे बघून म्हणाला.

"नाही नाही, तू जा घरी. तू आधीच खूप दगदग केली आहेस. मी सांभाळेन इकडे सगळं", ती म्हणाली.

"ओके, पण तुला काहीही लागलं तर कसलाही संकोच न करता मला लगेच कॉल कर", आशिष तिच्या खांद्यावर आश्वासक हात ठेवत म्हणाला आणि मधुच्या गालांवर पुन्हा लाल छटा पसरली. यावेळी मात्र आशिषला हसू आलं आणि तिच्या निरागसतेचं अप्रूपही वाटलं. 

सकाळी वसुधा ताईंच्या आवाजाने मधुला जाग आली. "आई.. कसं वाटतंय आता? तू माझ्याशी बोलूच नकोस, काय करून ठेवलंस हे? डॉक्टर म्हणाले तुझं बी.पी खूप हाय झालं होतं. एवढं कसलं टेन्शन घेतलंस गं? माझ्या चिडचिडीचा त्रास होतो ना तुला? मला कळलंय आता. मी खरंच परत नाही करणार गं. पण तू टेन्शन नको घेत जाऊस", मधु वसुधा ताईंना बिलगत रडत म्हणाली. लेकीला एवढा व्याकुळ झालेलं बघून वसुधा ताईंना पण भरून आलं.

तिला उराशी कवटाळत त्या म्हणाल्या, "नाही गं बाळा, तुझ्यामुळे काही नाही झालं. या वयात होतं थोडं कमी जास्त. मी कुठे जात नाहीये इतक्यात. अजून तुझं लग्नं, बाळंतपण सगळं करायचंय ना मला. मग आजारी पडून कसं चालेल. एक दोन दिवसात पुन्हा कशी ठणठणीत होते बघ".

"आई तुला या अवस्थेत पण माझ्या लग्नाचं सुचतंय का गं. मी कुठे जाणार नाहीये तुला सोडून. काल झालं तसं पुन्हा झालं तर?", मधु डोळे पुसत म्हणाली.

"हो गं बाई, काल एकदम अंधारीच आली डोळ्यासमोर. पण मला इकडे आणलंस कसं तू?", वसुधा ताईंनी विचारलं.

"अगं आई तो आपल्या शेजारचा आशिष आहे ना तो घेऊन आला तुला इकडे आणि मला फोन पण त्यानेच केला. मी ऑफिसवरून निघतानाच त्याचा फोन आला आणि मी इकडेच आले सरळ. बरं झालं तो वेळेवर घरी पोहोचला ते नाहीतर काय झालं असतं याची कल्पनाही करू शकत मी", कालच्या प्रकारानंतर आशिषचं नाव घेताना पण मधुला आपला चेहरा लाल होतोय असं वाटत होतं.

"माझ्याबद्दल बोलताय का तुम्ही?", मागून आलेल्या आवाजाने दोघींनी दरवाजाकडे बघितलं.

हातात चहाचा थर्मास घेऊन आशिष हसऱ्या चेहऱ्याने उभा होता. "म्हंटलं तुम्हा दोघी मायलेकींसाठी खास माझ्या हातचा चहा घेऊन यावा. काल हॉस्पिटल मधला चहा प्यायलो मी तर नुसतं साखरपाणी होतं ते. असा चहा पिऊन पेशंट बरोबर त्याचे नातेवाईक पण आजारी पडायचे", आशिष बेडच्या बाजूच्या टेबलवर थर्मास ठेवत हसत म्हणाला.

"हो रे, अगदी खरं बोललास. घरच्या चहासारखं सुख नाही", वसुधा ताई हसत म्हणाल्या.

"बरं तुमच्या गप्पा चालू द्या, मी हा थर्मास इथे ठेऊन जातो. यात बराच चहा आहे, लागेल तसा घ्या. आणि काकू काळजी घ्या. मी संध्याकाळी ऑफिसमधून येताना एक चक्कर टाकतो. डॉक्टरांशी बोललोय आत्ताच, रिपोर्ट्स नॉर्मल आले तर तुम्हाला कदाचित आजच घरी सोडतील", आशिष बॅग उचलत म्हणाला.

वसुधा ताई काही बोलणार तेवढयात मधुच बोलली, "हे काय? लगेच निघतोयस? आत्ताच तर आलास. थांब की जरा वेळ. एवढं काय महत्वाचं काम आहे. आमच्याबरोबर चहा पिऊन जा की". तिचं बोलणं ऐकून आशिष आणि वसुधा ताई दोघांना आश्चर्य वाटलं. 

"अगं नक्की थांबलो असतो पण खरंच खूप महत्वाची मीटिंग आहे. आणि आत्ता निघालो तरच वेळेत पोहोचेन. सकाळी केवढं ट्रॅफिक असतं माहितीये ना तुला. संध्याकाळी येतो ना मी". तिच्या बोलण्याने आता आशिषचा पण पाय निघत नव्हता पण जावं तर लागणार होतं.

"ठीक आहे, मी आपलं सांगायचं काम केलं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या प्रायॉरिटीस माहिती असतात. आपण कोणाला जबरदस्ती थोडीच करू शकतो थांबण्यासाठी", मधुने थर्मासच्या दोरीशी खेळत उत्तर दिलं. आशिष, वसुधा ताई आणि मधुकडे आळीपाळीने बघत होता. शेवटी त्याने उचललेली बॅग खाली ठेवली आणि खुर्ची बेडजवळ आणत म्हणाला, "एक ५-१० मिनिटांत निघालो तरी चालेल. एवढा उशीर नाही झालाय. दे ग मधु मला पण एक कप चहा". त्याच्या बोलण्याने मधुच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू फुटलं आणि ते बघून आशिषचा जीव भांड्यात पडला.  

आशिष निघून गेल्यावर वसुधाताईंनी मधूला विचारलं, "काय गं , एरवी तर माझ्या अंगावर डाफरत असतेस मी त्याच्याशी चांगलं वागले की. मग आता तू कशाला त्याला थांबायला सांगत होतीस? नाही म्हणजे तसा तो चांगला मुलगा आहे, बघितलंस ना काल केवढी मदत झाली त्याची? एवढं तर आजकाल सख्खे नातेवाईक पण करत नाहीत"

"असं काही नाही गं आई, तुलाच तो आवडतो ना. म्हणून म्हंटलं तुला बरं वाटेल तो थांबला तर. काल त्याने खूप दगदग केली आपल्यासाठी म्हणून चहा ऑफर करत होते मी त्याला. रात्री जाऊन तुझी औषधं पण तोच घेऊन आला, मला तर काही सुचतच नव्हतं. आणि आता मी तुला प्रॉमिस केलं आहे ना चिडचिड करणार नाही म्हणून", मधुने चहा ओतायचं कारण करून वसुधा ताईंकडे पाठ फिरवली. नाहीतर तिचा लालबुंद झालेला चेहरा पाहून ती खोटं बोलतेय हे त्यांना लगेच कळलं असतं. 

क्रमशः..!

🎭 Series Post

View all