"पालकत्व"

Woman called Sonal, from a well to do family, does something for the two roadside girls for their upbringing and wellbeing! And accepts indirect motherhood of those two sisters..

    "पालकत्व

 "आज ही छाया दिसत का नाहीये? तिची छोटी बहीण पण दिसत नाहीये. काय झालं कुणास ठाऊक?" सोनल हा विचार करत सारखी वरच्या खिडकीतून समोरच्या रस्त्याकडे बघून अस्वस्थ होत होती. सोनल ढमढेरे आणि श्रीकांत ढमढेरे दोघेच रहायचे नाशिकच्या एवढ्या मोठ्या 'ढमढेरे हाऊस' मध्ये. बंगला तसा नाशिक गावापासून बाहेर होता पण छान दुमजली होता. त्यात किलबिलाट करणारी चिमुरडी आता आपापला दाणापाणी करायला तिच्या घरट्यात उडून गेली होती. सायली त्यांची लेक तिच्या-तिच्या घरी सुखाने अमेरिकेत नांदत होती. सोनल आपला छान जीव रमवत असे. घरात पूर्णवेळ कामाला एक बाई होत्या. त्यामुळे बराचसा वेळ हिला घरातील बागकाम करणे, झाडांशी हितगुज करणे, वेगवेगळे पदार्थ करून श्री ला खाऊ घालणे, बाजूच्या पराडकर बाईंशी गप्पा मारणे, गावात रपेट मारणे आणि इतर कामात जायचा. गेल्या चार पाच महिन्यांपासून मात्र तिला सकाळी ९ ते १२ किंवा साधारणपणे १ पर्यंत वेळ कसा जायचा कळायचं नाही. तिच्या गल्लीतल्या समोरच्या रहदारीच्या रस्त्यावर रोज एक १०-१२ वर्षांची मुलगी आणि दुसरी साधारण ४-५ वर्षांची मुलगी तिच्या कडेवर असायची. ती कधी गजरे, कधी फुलं, कधी डस्टबिन बॅग विकायची. आणि विकून झालं की निघून जायची. हे सगळं घराच्या वरच्या खिडकीतून पहाणं हा सोनलचा रोजचाच छंद झाला होता. एकदा तर सोनल बाहेर जाऊन मुद्दाम तिच्याशी बोलली, "काय ग ए मुली, तू एवढीशी आहेस. दुसरं कुणी नाही का तुझ्यासोबत?" तेव्हा ती हसून तिचे विस्कटलेले केस बाजूला करून म्हणाली, "हाय की ही माझी भन." सोनलने समजवणीच्या स्वरात विचारलं, "अग तसं नाही मोठं नाही का कुणी आई वगैरे? " तेव्हा ती म्हणाली, "हाय की ती पुढच्या सिग्नल ला खेळणी इकते आन म्या हिथं. पन तुमी का ईचारताय?" तेव्हा सोनलने बोट दाखवून म्हंटल, "हे बघ समोर तो पांढऱ्या रंगाचा बंगला दिसतोय न तिथे मी रहाते. तिथून मी तुला नेहमी बघते. म्हणून आज मुद्दाम तुझ्याशी बोलायला आले." "अच्छा. हो का? बरं. चला म्या जाते. आता सिग्नल लागेल मला हे गजरे ईकायचे हायेत. तुमाला हवाय का? घ्या न एक ताई." सोनल ने का कुणास ठाऊक दोन गजरे घेतले. एक तिथेच समोर माळला आणि एक देवाला घरी घेऊन गेली. तिला तेव्हापासून जास्तच ओढ लागली त्या मुलीची. तिची हळूहळू ती वाटच बघायला लागली. एकदा उन्हाळा प्रचंड होता आणि सोनल घरातल्या कामात व्यग्र होती. अचानक बंगल्याचं फाटक वाजलं. कोण आलं म्हणून सोनल लगेचच गेली तर तीच चिमुरडी उभी होती. सोनल विचारात पडली आज ही कशी इथे आली. ती पण दात दाखवत चाचरतच म्हणाली," ताई मला न खूप तहान लागली हाय. आज भन पन नाय आली सोबत आन सकाली म्या घाईघाईने निघाली म्हनून पानी पियाची बाटली बी इसरली. ऊन लई हाय न? थोडं पानी द्याल का पियाला? मी हिथं कुनाला वळखत नाय. मग तुमी त्या दिशी दिसला व्हता ते आठवलं आणि आले हिथ." सोनल ला तिचं आश्चर्यच वाटलं. ही एवढीशी पोर बाटली वगैरे घेऊन येते?छान आहे. तिने तिला आत नेलं. भांडभर पाणी ती अगदी गटागट प्यायली. "काय नाव ग तुझं? आणि आजचे गजरे विकून झाले का तुझे?" "मी छाया. आणि मी आता गजरे नाय आणत. डष्टबीन बॅग इकते. गर्मीत गजरे टिकत बी न्हाईत आन महाग बी पडत्यात." सोनलने अजून उत्सुकतेने विचारलं, "तू शाळेत नाही जात का? हे काम करण्यापेक्षा शाळेत जाऊन लिहायला वाचायला शिक. तुझाच फायदा होईल." ती थोडा विचार करून रडवेलं तोंड करत म्हणाली, "जात हुते पण पैकं नव्हते. बाप एक वर्षापूर्वी दारू पिऊन पिऊन गेला. आईचा जीव सुटला. ती बी आजारीच असते. मग काय मी बी लागले काम करायला. साळची आवड हुती पन काय करनार न? पण आता ठरिवलं हाय माझ्या छोट्या भनला घालनार हाये साळंत. तिला खूप शिकवणार. मोठं कुणीतरी होयला पाहीजेल ती. मी खूप मेहनत घेनार त्यासाठी. आईला बी आराम देनार दोन चार वर्षांनी." ती बोलतच होती. सोनल मात्र तिच्या १० वर्षांच्या डोळ्यातली पुढच्या १०० वर्षातली मोठी मोठी स्वप्न बघत होती. किती समज आहे हिला. एवढ्याश्या वयात स्वतः न शिकता बहिणीला शिकवण्याचं सामंजस्य कुठून आलं असेल हिच्यात. ती मुलगी नंतर गेली खरी पण सोनल मात्र तिच्याच विचारात होती. रोज ती त्या मुलीला म्हणजे छायाला बघत होती. कायम छाया त्याच प्रसन्न चेहऱ्याने आपलं काम इमानदारीत करत असायची. तिच्या डोळ्यातल्या मोठ्या स्वप्नांना साकार करायला आपण काही मदत करू शकतो का हा विचार सारखा सोनलच्या मनात येत रहायचा. आणि आज अचानक ती दिसतच नव्हती. सोनल बेचैन झाली. नंतर सोनल कडे दोन दिवस रहायला तिची नणंद आली आणि ती पण कामात गुंतली. दोनचार दिवसांनी पुन्हा रिकामपण आल्यावर तिची नजर छाया ला शोधत होती. पण आजही ती दिसेना. मग शेवटी तिने घरच्या कामवाल्या बाईंना सांगून पर्स घेतली आणि सरळ बाहेर पडली. अकरा वाजले होते तरी ही दिसत नाही म्हणून ती जिथे विक्री करायची तिथल्या समोरच्या दुकानात विचारलं तर त्यांनी सांगितलं ती मुलगी आलीच नाहीये तीन चार दिवस झाले. ती कुठे रहाते विचारल्यावर त्यांना तिची काहीच इतर माहिती नव्हती. माहीत असणं तसं पाहिलं तर कठीणच होतं. आता सोनल अस्वस्थ झाली. कुठे गेली असेल? काय झालं असेल? आणि आपल्याला इतकी का ओढ लागली आहे तिची? सगळ्या विचारांनी ती ग्रासून जाते. श्री ला सुद्धा ती सगळं सांगते. श्री पासून ती कधीच काही लपवत नाही, मग हे कसं लपवणार. आणि तिच्या चेहऱ्यावरून नाराजी स्पष्ट दिसत सुद्धा होती. श्री ने तिला समजावलं. "अगं बरं नसेल तिला किंवा तिच्या आई बहिणीला! येईल एक दोन दिवसात. नको तिचा विचार करुस आता." दुसऱ्या दिवशी छाया च्या जागी कुणीतरी एक मुलगा दिसला तशी परत सोनल निघाली आणि थेट त्या मुलाला प्रश्न विचारला, "काय रे ती मुलगी येते न इथे ती कुठे गेली? तू कोण आणि कसा आलास?" तेव्हा त्या मुलाने पाहून न पाहिल्यासारखं करत, "ती न्हाय येनार आता. आता मीच हिथं येनार कायम..." गुर्मीत उत्तर दिलं. सोनल म्हणाली, "का काय झालं तिला? बरी आहे न ती." असं विचारल्यावर तो मुलगा चिडला, "तुमाला काय कराचं हाय. मला धंद्याच्या टायमाला का डोक्याला शॉट लावताय. चला जा ना मावशी हिथून! मला काम करु दे माझं." "बरं बरं. मला ती कुठे रहाते सांगशील का?" सोनल ने कळकळीने विचारलं. "ती आता घरी नाय. तिची आय गेली चार दिसांपूर्वी. मंग तिची मावशी तिला आन तिच्या भन ला घेऊन गेली काही दिस. म्हनून तर म्या आलोय हिथं. ती आली की म्या जाईन माझ्या सिग्नलपाशी. हिथ चांगली कमाई व्हते न?" हे ऐकल्यावर सोनल च्या पायाखालची जमीनच सरकली. आईविना पोरी कशा असतील? काय झालं असेल तिच्या आईला? आता कसं होणार त्या बहिणींचं? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिच्या डोळ्यातल्या स्वप्नांचं काय? आता येईल ती परत की नाहीच येणार? सगळ्या प्रश्नांनी तिला भंडावून सोडलं. रात्री ती श्री शी पण बोलली. श्री म्हणाला तिला, "जाऊदे ग. का तू एवढा विचार करतेयस? एवढी कशाला गुंततेयस तिच्यात? आपला काय संबंध तिच्याशी? अशी कितीतरी मुलं आहेत जगात अनाथ. आपण त्यांचा विचार करत बसलो तर कसं होणार आपलं." तिला श्री चा रागच आला. रात्रभर तिला तिचाच चेहरा दिसत होता. आणि तिने मनाशी एक विचार पक्का केला. चारच दिवसांनी छाया तिला परत दिसली. मुरझलेली, डोळ्यात खूप काही गमावल्याचे भाव असलेली. तेव्हा तिचा मनाशी केलेला विचार आणिकच पक्का झाला. दोन तीन दिवस मध्ये गेल्यावर ती छायाकडे गेली आणि तिला व तिच्या बहिणीला बळं-बळं घरी घेऊन आली. तिला समजावलं प्रेमाने जवळ बसवलं आणि हलकेच तिला विचारलं, "तुझ्या आईचं काय झालं मला माहित नाही. आणि मी त्याबद्दल विचारणार पण नाही.पण तुला एक विचारू का?" छाया म्हणाली, "इचारा न माई." तेव्हा सोनल ने समजवायला सुरुवात केली, "बघ हं, आता तुम्ही दोघीच आहात. तुम्हाला कोण बघणार? तर मी असं केलं तर! तुला शिकायची इच्छा आहे का? तुझ्या बहिणीला असंही तुला खूप शिकवून मोठं करायचं होतंच. तू ही शिक. मी तुला चांगल्या ठिकाणी ठेवेन आणि तिथे तुम्ही दोघी शिका. मात्र हे आत्ता करत असलेलं काम पूर्ण बंद. चालेल का तुला?" छाया चा चेहरा खुलला. शिकायला मिळणार म्हंटल्यावर तिला बाकी कुठलेच प्रश्न पडले नाहीत. अशी ही ती बाकी काही प्रश्न विचारायला खूप लहान होती. मग काय सोनल ने आधीच मनाशी ठरवल्याप्रमाणे त्या दोघींना वसतिगृहात ठेवलं. तिथल्याच सरकारी शाळेत घातलं आणि सगळा खर्च स्वतः करायचा निर्णय घेऊन वसतिगृहातल्या लोकांना यांची आबाळ होणार नाही. मी यांचा शिक्षणाचा आणि रहाण्याखाण्याचा सगळा खर्च करेन. असं आश्वासन दिलं. शिवाय छायाकडून भरपूर अभ्यास करण्याचं वचन ही घेतलं. सगळं श्री ला कळलं तेव्हा त्याने थोडासा त्रागा करतच विचारलं. "अग आता आपण ५०च्या पुढे म्हणजे म्हातारे होत चाललो. आपण असेपर्यंत नाही झालं त्यांचं शिक्षण तर काय करायचं?" त्यावर सोनल खंबीरपणे म्हणाली, "होईल रे. देव बरोबर त्याची सोय करेल. आणि मी ही याचा विचार केलाच असेल न? तू मागच्या वेळी जो त्रागा केलास न त्यावरूनच मला ही कल्पना सुचली. जगात अशी बरीच मुलं आहेत मान्य आहे. पण सगळ्यांनी असाच विचार केला तर या मुलांचं भविष्य आणि पर्यायाने देशाचं भविष्य अंधारातच ना? प्रत्येकजण आपलाच विचार करतो. शिवाजी व्हावा पण तो शेजारी ही प्रत्येकाची वृत्ती. आपण आर्थिकदृष्ट्या चांगले सधन आहोत. काही कमी नाही. आपली चिमुरडी पण आता मोठी होऊन अमेरिकेत सुखात आहे. आपल्याकडून त्या दोन मुलींचं भलं झालं तर पुण्याचं काम होईल. त्यांच्या ही नकळत आपण त्यांचे आईबाबा होणार आहोत या पालकत्वानेच मी भारावले आहे. मला खूप बरं वाटतंय श्री. माझ्या आनंदासाठी तरी ही जबाबदारी आपण स्वीकारूयात." श्री ला पण सोनल चं म्हणणं पटलं होतं. आता त्याला सोनल चा अभिमान वाटत होता. सोनलच हे करू जाणे आपल्याला हे कधीही सुचलं नसतं. आणि वातावरण हलकं करण्यासाठी तो हसत म्हणाला "ओके बाईसाहेब. आपली आज्ञा शिरसावंद्य. आणि काय ते नवीन नाटक निघालय न त्याच्याच भाषेत सांगायचं तर, " तू म्हणशील तसं!" त्यावर दोघेही मनमुराद हसले आणि सोनल ने देवासमोर साखर ठेवली व मनापासून हात जोडले. जे दिलं आहेस ते खूप आहे ते अखंड राहो ही प्रार्थना करत डोळे मिटून घेतले.

।।शुभम् भवतु।।

✍️ सौ. अतुला प्रणव मेहेंदळे

(कृपया पोस्ट शेअर करावयाची असल्यास नावासकट करावी ही विनंती.????)