पालक+विद्यार्थी+शिक्षक

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पालक शिक्षक योगदान काय असायला हवे ते लिहीले आहे.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात पालक आणि शिक्षकांचं योगदान

अध्ययन आणि अध्यापन हे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात चालणारं प्रत्यक्ष कार्य असतं.या कार्याचा एक साक्षीदार असतो तो म्हणजे पालक. त्याचा या कार्यात प्रत्यक्ष सहभाग नसतो परंतु तो या कार्याचं मूल्यमापन करू शकतो आणि वेळ पडल्यास त्यात हस्तक्षेपही करू शकतो.म्हणून विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासात पालक आणि शिक्षकाच योगदान काय असावं ते थोडक्यात बघू.

पालक---

पालक आपल्या पाल्याला सुशिक्षीत करण्यासाठी शाळेत पाठवत असतात.त्याआधी ते पाल्याला घरीच अनौपचारिक शिक्षण देत असतात.औपचारिक पद्धतीनं म्हणजे अध्ययनानंतर परीक्षा घेणारी औपचारिक पद्धत जिथं अस्तित्वात आहे तिथं म्हणजेच शाळेत पाठवत असतात.
पाल्याला शाळेत पाठवून पालकांची जबाबदारी संपते का?.नाही.शिक्षणतज्ञ म्हणतात,की पालकांनी ८०% पालक आणि २०% शिक्षक व्हावं.काय अर्थ असावा या वाक्याचा. पालकांनी पाल्यांशी वागतांना शिक्षक म्हणून थोडी शिस्तही लावावी. उदाहरणार्थ- शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात लावलेली शिस्त लाड करून पालकांनी बिघडवू नाही.मुलांनी जरा चेहरा वाकडा केला कि पालक शरणांगती पत्करतात.मुलांना हे चांगलं माहिती असतं.अशा वेळी पालकांनी शिक्षकाच्या भूमिकेत शिरून शाळेचं कामं शिस्तीनं करून घ्यावं.पाल्य जरावेळ रडतील,गोंधळ करतील पण ही शिस्त पाल्यांच्या पुढल्या आयुष्यासाठी फायद्याची ठरेल.याचबरोबर मुलं अभ्यासात कंटाळा का करीत आहेत याचाही विचार करावा. कंटाळ्यापेक्षा इतर कारणं आहेत का याचा पालक म्हणून शोध घ्यावा. पुष्कळदा शिक्षक आवडीचे नसतात,कधी विषय समजत नसतो, कधी इतर विद्यार्थी त्रास देत असतात. अशी काही कारणं मुलं ब-याचदा पालकांच्या भीतीनं सांगू शकत नाही. त्याकरता पाल्याची कोणतीही अडचण पालक वेळ देवून समजून घेतील हा विश्वास त्यांच्या मनात पालकांनी निर्माण करावा लागेल. संकटाच्या वेळी आई-बाबा हीच मुलांना सुरक्षीत व्यक्ती वाटत असतात. पालकांनी पाल्यांच्या समस्या ऐकण्यासाठी,त्यावर चर्चा,विचार करण्यासाठी वेळा द्यावा. त्या समस्येचं स्वरूप ओळखून वेळ पडल्यास स्वत:ची कामं बाजूस ठेवून मुलांना वेळा द्यावा.
पालकांनी{आई-वडील दोघांनी} शाळेत स्नेहसम्मेलनासाठी अवश्य जावं स्वत:ची मुलं भाग घेत नसतील तरी त्यांच्या मित्रांचे कार्यक्रम बघायला जावं.मुलांच्या दृष्टीन ती मोठी गोष्ट असते. त्यांचे पालक त्यांच्या मित्रांना महत्व देतात ही गोष्ट मुलांच्या मानसिक,भावनिक वाढीसाठी उत्तम औषध असतं. पालक-शिक्षक सभेसाठी वेळोवेळी पालकांनी {आई -वडील दोघेही} जावं.त्यामुळं पालकांना आपल्या पाल्याचा शैक्षणिक विकास कळत राहील.त्याला शाळेत काही समस्या असतील तर शिक्षक वेळीच पालकांना सांगू शकतील. अशा काही समस्या असल्याच तर पालकांनी त्याकडे दुर्लक्ष न करता शिक्षकांशी मोकळेपणान चर्चा करावी.आणि त्या समस्येवर उपाय शोधावा. या मुळे पाल्यांच्या समस्या वेळीच दूर होऊन त्यांच्या शैक्षणिक प्रवासात अडथळे येणार नाहीत.

शिक्षक---

शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी वागतांना शिक्षकाच्या भूमिकेत पालकाची भूमिकाही मिसळावी.शिक्षणतज्ञ म्हणतात,शिक्षकानं ८०% शिक्षक आणि २०% पालक म्हणून वागावं.शिक्षकांनी जर दोन्ही भूमिकांमध्ये सामंजस्य सांभाळल तर विद्यार्थ्यांना योग्य पद्धातीनं घडवणं सोपं जाईल.शिक्षक जितक्या हसत-खेळत विद्यार्थ्याला शैक्षणिक प्रवासात बरोबर घेऊन जाईल तितक्या सहजपणे आणि यशस्वीपणे तो प्रवास पूर्ण होईल.
शिक्षकानं विद्यार्थ्याच्या शैक्षणिक विकासाबरोबरच त्याच्यात लपलेले गुण ओळखण्याचाही प्रयत्न करावा.अभ्यासाबरोबर त्याच्यातील गुणांनाही संधी दिली तर विद्यार्थ्याचे दुसरे लोभस रूप शिक्षकाच्या नजरेस येईल.विद्यार्थ्याचं भविष्य कशात उत्तम घडू शकेल हे शिक्षकच पालकांना सांगू शकतात.
उत्तम माणूस,उत्तम नागरिक होण्यासाठी विद्यार्थ्याला पालक,आणि शिक्षक या दोघांच्या मार्गदर्शनाची गरज असते.पालक आणि शिक्षक या दोघांमध्ये सुसंवाद हवा,तसेच एकमेकांवर विश्वास हवा तेव्हाच देशाचे उज्ज्वल भविष्य असणारा विद्यार्थी उत्तमरीत्या घडू शकेल.

पालक-शिक्षक ---

ज्यावेळेस विद्यार्थ्याशी सुसंवाद साधण जमत नाही असं पालक आणि शिक्षक दोघांच्याही नजरेस आलं तर न संकोचता चांगल्या समुपदेशकाशी बोलावं.शाळेन समुपदेशकाची नियुक्तीच करावी. हा समुपदेशक शाळेशी संबंधीत शिक्षक-पालक-विद्यार्थी या तीनही घटकांशी वेळोवेळी संपर्कात राहू शकेल. यामुळे शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यात त्याच्या कुवतीनुसार प्रगती घडवता येईल.अभ्यास,क्रीडा सांस्कृतिक असा शाळेचा सर्वांगीण विकास होईल.
स्वत:च्या कारीयरचा ताण पालक-आणि शिक्षक दोघांनाही असू शकतो त्याचबरोबर व्यक्तीगत आयुष्यातील प्रसंग मनाचं स्वास्थ्य बिघडवणार असू शकत. असं होतं आहे हे दोघांच्याही लक्षात आलं तर त्याची झळ मुलांना पोचणार नाही याची दोघांनीही दक्षता घ्यावी.त्यासाठी वेळीच समुपदेशकाची मदत घ्यावी. कारण विद्यार्थी पालक आणि शिक्षक या दोघांच्या खांद्यावर विश्वासानं डोकं ठेवत असतो याची दोघांनीही जाणीव ठेवावी.
सध्या प्रगती पुस्तकातील प्रगतीच फक्त बघीतल्या जाते. इतर बाजूनी विद्यार्थ्याचा विकास होत नाही . उत्तम शिक्षण म्हणजे खुप पैसे देणारं शिक्षण असा समज आहे.तो चूक आहे तो बदलावयास हवा.शाळा ही शिक्षक-पालक-विद्यार्थी यांच्यातील परस्पर संबंधानं बहरत असते.
देशाचा विकास करायचा असेल तर विद्यार्थ्यांची फळी मजबूत घडवता आली पाहिजे.त्यासाठी शैक्षणिक क्षेत्राला विद्यार्थ्यांसाठी पूरक आणि पोषक योजना तयार करण्याचं आणि त्या यशस्वीपणे राबाविण्याचं स्वातंत्र्य मिळायला हवं.
-------------------------------------------------------------------------. समाप्त
### मीनाक्षी वैद्य.