Feb 25, 2024
राज्यस्तरीय करंडक लघुकथा स्पर्धा

पैठणी..

Read Later
पैठणी..


कथेचे नाव: पैठणी
विषय: “स्त्री ला समजून घेणं खरंच कठीण असतं का हो?”
फेरी: “राजस्तरीय लघुकथा स्पर्धा.”

वीस वर्षाच्या मुरलेल्या संसारात अमोल आणि राधा दोघेही खूप खुश होते. एक मुलगी होती. तिचे सेजल नाव होते. सुखी कुटुंब. अमोल आणि राधाचे नाते म्हणजे समाजासाठी एक आदर्शच होते. अबोल राधाला बोलक्या अमोलची साथ लाभली आणि तिच्या आयुष्याला वेगळाच अर्थ मिळाला.

तिच्या देहावर तो स्थिर नजरेने एकटक पाहत होता. अमोलला असं वाटत होतं की, राधाला मिठीत घ्यावं आणि ती मिठी नेहमीसाठी घट्ट धरून तशीच ठेवावी. हे असे एकाएकी ती आपल्याला सोडून जाईल हे स्वप्नातही वाटले नव्हते. सेजल तर अगदी किंचाळत होती. तिला तर आईचा मृतदेह पाहून सतत चक्कर येत होती. अमोलचेही अश्रु थांबत नव्हते. राघव त्याला सांत्वन देण्याचा प्रयत्न करत होता. राघवच्या डोळ्यातही पाणी होते. काळाने घातच केला होता. अमोलला तर आपण स्वप्न पाहत आहोत असे वाटत होते. हातापायातून जीवच निघून गेल्यागत झाले होते.

“बाबा,मला माझी आई हवीय..आई, ये ना गं..”

सेजल अगदी काकुळतीला येऊन बोलत होती. रडून रडून तिचे डोळे सुजले होते. अमोल निःशब्द होता. तो तरी काय करणार? तो स्वतः आतून तुटून गेला होता. राधाचा मृतदेह पाहुन त्याला धक्काच बसला होता. त्यालाच गरज होती कोणीतरी सावरायची.

राधा संसाराचा डाव अर्ध्यावर सोडून गेली होती.

तिचा आवाज कानात घुमू लागला. सकाळीच दोघांनी गप्पा मारल्या होत्या.

ती चहा आणि गरमागरम पोहे देत अमोलला म्हणाली.

“अहो ऐकलंत का? खूप दिवस झाले मी पैठणी नेसली नाही. मला आंबा कलरची पैठणी हवी आहे. अगदी तोच रंग हवा जो आपल्या लग्नात माझ्या शालूचा होता.”

अमोल मुद्दाम तिला चिडवत म्हणाला,

“आज ही अचानक काय पैठणीची फर्माईश? कशाला हवी तुला पैठणी? कपाटात किती साड्या आहेत.. असंही तू कुठे जास्त साड्या नेसतेस? हल्ली तूला पंजाबी ड्रेस आवडतो ना घालायला, म्हणे खूप कम्फर्टेबल वाटतं ड्रेसमध्ये?”

राधाला माहीत होतं की अमोल मस्करी करतो आहे. तिनेसुद्धा जमेल तितका खोटा राग चेहऱ्यावर आणत चहाचा कप तोंडाला लावला. अमोल तिच्याजवळ गेला. तिचा चेहरा निरखून पाहू लागला.

“ही तुमची नेहमीची नाटकं आहेत. असे माझ्या तोंडाकडे पाहू नका. माझा राग अजिबात जाणार नाही. माझी फर्माईश तुम्हाला पूर्ण करावीच लागणार आहे.”

लटक्या रागाने राधा म्हणाली तसं हसतच अमोल म्हणाला,

“तुम्हा बायकांमध्ये एक सुप्त कला दडलेली असते.”

राधा गालातल्या गालात हसू लागली. अमोल म्हणाला,

“सांगू का?”

“हो, सांगा.. मी ऐकतेय.”

राधा त्याच्याकडे पाहून म्हणाली.

“आमच्यासारख्या गरीब, बिचाऱ्या, साध्याभोळ्या नवऱ्याकडून सतत काही ना काही हट्ट करायचे आणि आम्ही नाही म्हटलं की, अलका कुबललाही मागे टाकेल अशी खतरनाक नक्कल करायची.”

अमोल तिला चिडवत म्हणाला. हातांच्या बोटाचा मोर नाचवत राधा म्हणाली,

“काहीही बोलता तुम्ही.. आम्ही बायका काही अशा नसतोच. उगाच काहीतरी आपलं बोलता. आम्ही बायका नवऱ्याकडून हट्ट पुरवून घेणार नाही तर कोणाकडून घेणार? असंही नवऱ्याकडून हट्ट पुरवून घेण्याची मज्जाच भारी.. स्त्रियांचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच आहे.”

अमोल हात जोडतच म्हणाला,

“लवकरच तुमची मागणी पूर्ण करण्यात येईल. आता हा चेहऱ्यावरचा खोटा खोटा राग गेला तरी चालेल तुमचा.”

दोघे हसू लागले. चहा शेवटचा घोट घेत अमोल म्हणाला,
“राधा, आज माझं जेवण बनवू नकोस. राघवचा वाढदिवस आहे. आम्ही मित्र बाहेर जाणार आहोत.”

“बरं.. ठीक आहे..”
चहाचा कप खाली ठेवत राधा म्हणाली. अमोल जुन्या आठवणीत गढून गेला.

“माझा खास मित्र आहे राघव.. खरंच मला आजही आठवतं, आपल्या लग्नात किती राबला होता तो..”

अमोलच्या त्याच्या लग्नाच्या वेळेच्या आठवणी जाग्या झाल्या.

“खरंच खूप दमले होते भाऊ.. तरीसुद्धा धावपळ करत होते. बरं.. आज मी पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे. जाताना त्यांच्यासाठी आठवणीने घेऊन जा.”

राधा चहाचा ट्रे उचलून किचनमध्ये जात म्हणाली.

“कशाला त्रास करून घेते? आम्ही बाहेर जाणार आहोत जेवायला."

अमोल तिच्याकडे पाहत म्हणाला.

“असू द्या ओ.. घरचं ते घरचं. त्यांची बायको सांगायची, ‘त्यांना पुरणपोळी खूप आवडते म्हणून’ आज त्यांचा वाढदिवस.. ते खातील आवडीने.”

चहाचे कप विसळत राधा म्हणाली अमोलचा चेहरा उतरला. त्याचा पडलेला चेहरा पाहून काळजीने राधा म्हणाली,

“काय झालं ? आता का तोंड पाडून बसलात?”

“काही नाही गं.. सुधा वहिनीचा चेहरा आठवला.”

अमोल हळवा होत म्हणाला.

“खरंच किती छान जोडा होता. असं व्हायला नको होतं.”

राधाने त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला.

“राधा,राघव खूप एकटा पडला आहे. वहिनीच्या आठवणीने व्याकूळ होतो. जेव्हा पण भेटतो तेव्हा वहिनीच्या आठवणी सांगत असतो. त्याची अवस्था पहावत नाही. माझा खास दिलदार मनाचा मित्र. खूप वाईट वाटते.”

अमोलला आपल्या मित्राच्या या अवस्थेचं खूप वाईट वाटत होतं. दीर्घ सुस्कारा टाकत राधा म्हणाली,

“जे झाले ते खरंच वाईट झाले. नशिबात लिहिलं असतं ते बदलता येते होय? त्या दोघांची साथ तिथपर्यंतच होती. कधी काय होईल सांगता येत नाही.”

“अगदी खरं आहे तुझं राधा.”

अमोलने विषय बदलत म्हणाला.

“राधा, नवीन लग्न करून आली तेव्हा कशी होती तू? तुझ्या तोंडातुन शब्द ऐकायला मी तरसायचो. आता मात्र..”

राधाने कान टवकारले. भुवया उडवत म्हणाली “आता मात्र? पुढे बोला..”

“आता मात्र तू माझ्यासारखी झालीस. बडबड करणारी..”

अमोल हसून म्हणाला.

“हो का? मी बडबडी?”

कंबरेवर हात ठेवत अमोलकडे रोखून पाहत राधा म्हणाली. अमोल उठून किचनमध्ये गेला. पाठीमागून तिच्या कंबरेला हातांचा विळखा घालत तिच्या कानात पुटपुटला.

“हो तर, आहेसच बडबडी.. तू कायम अशीच राहो हीच माझी इच्छा आहे.गोड माझी बायको..”

अमोलने प्रेमाने तिला जवळ घेतलं. त्याच्या कवेतून आपली सुटका करून घेत हसून राधा म्हणाली,

“पुरे आता.. किती ते कौतुक, इतकं गोड बोलाल तर माझी डायबिटीस वाढेल.”

“राधा.. मस्करीतही असं बोलू नकोस प्लिज..”

अमोलचा चेहरा तिच्या काळजीने भरून गेला.

“काय हो, उगाच काळजी करता.. अशी तशी साथ सोडणार नाही मी.. साताजन्माच्या गाठी बांधल्यात ईश्वरानं.. अश्या कश्या सुटतील? मी कायम तुमच्या सोबतीला असणार आहे. समजलं?”

अमोलचा चेहरा आपल्या दोन्ही हातांच्या ओंजळीत घेत राधा म्हणाली.

“बरं.. आता गप्पा खूप झाल्या. आवरा.. तुम्हालाही जायचे आहे. मलाही जरा सामान आणायचे आहे. मी बाजारात जाऊन येते.

टेबलवर ठेवलेली पर्स उचलत राधा म्हणाली.

“ठीक आहे राणीसरकार..जशी आपली मर्जी.. सावकाश जा आणि लवकर घरी या.. हा सेवक आपल्यात सेवेत हजर असेल..”

मान खाली झुकवून मोठ्या अदबीने अमोल म्हणाला.

“नौटंकी..”

राधा त्याच्याकडे पाहत हसून म्हणाली. थोड्या वेळात राधा तयार झाली आणि बाजारात गेली. अमोलने नवीन शर्ट घेतला होता. आज राघवचा वाढदिवस म्हणून त्याने विचार केला की, तोच नवीन शर्ट घालावा. कपाट उघडून तो शर्ट शोधू लागला तोच त्याच्या हाताला राधाची डायरी लागली. डायरी वाचण्याचा मोह काही त्याला आवरला नाही. त्याला माहीत होतं,असं दुसऱ्यांची डायरी वाचणं चुकीचं आहे पण त्यात नक्की काय लिहिले आहे हे वाचल्याशिवाय त्याला चैन पडणार नव्हते.

राधाचे अक्षर म्हणजे मोत्याचा सडाच जणू. खूप सुंदर अक्षर.. पहातच राहावे. अमोलने डायरी वाचायला सुरुवात केली.

“प्रिय आई,

तू गेलीस आणि तुझ्या पाठोपाठ जगण्याची इच्छाही. आधी सर्व तुला सांगायचे. ज्या दिवशी तू गेलीस तेव्हा ‘हे’ माझ्याकडे आले आणि माझा हात अलगद हातात घेऊन म्हणाले,

“राधा, मला माहित आहे, आईची जागा मी घेऊ शकत नाही पण जशी आई तुला समजून घ्यायची तसे मी तुला समजून घेण्याचा नक्की प्रयत्न करेन.”

खरंच खूप भरून आले होते मला. असेही मला हे खूप समजून घेतात. आई, मी मुद्दामच ह्यांना चिडवते आणि अगदी तोंड पाडूनही बसते. मी रागावले की, ह्यांचा चेहरा बघण्यासारखा होतो. सर्व काही सुरळीत आहे. कमी आहे ती तुझी.. तुझ्या कुशीत यावंसं वाटतं. आई, खरं तर तू जावई सोन्यासारखा शोधुन दिला आहेस. अगदी मनकवडा.. माझ्या मनाला जपणारा..मला नेहमीच समजून घेणारा.. तू नेहमी म्हणायचीस,

“माझा जावई शंभर नंबरी सोनं आहे.”

हे मला तेंव्हा पटलं जेव्हा सासरी सगळे मला मूल होत नाही म्हणून टोचून बोलू लागले पण हे मात्र सर्वांशी नडले. प्रॉब्लेम माझ्यात असताना सर्वांना सांगून मोकळे झाले प्रॉब्लेम राधामध्ये नाही तर प्रॉब्लेम माझ्यात आहे. तेव्हा कुठे सर्वजण गप्प बसले. लग्नाच्या दहा वर्षानंतर मी आई झाले. काय सांगू तुला आई, मुलगी झाली म्हणून मी आणि हे किती खूश झालो होतो! एक तर लग्नाच्या दहा वर्षांनंतर बाळ झालं आणि तीही मुलगी.. घरच्यांनी तोंड पाडलं. तेव्हा देखील ह्यांनी सर्वांना चोख उत्तर दिलं होतं. लक्ष्मीच्या पावलांनी ‘सेजल’ आली. तिचं जोरदार स्वागत केलं होतं. काय ते फोटोशूट केले होते! काय सांगू? हे सर्व हौस भागवत होते. खूप खुश झाले होते ते..

आई, बाबा किती कडक होते. तुमच्या दोघांचे नाते पाहिले की मनात नेहमी प्रश्न पडायचा,
“मला कसा नवरा भेटेल?,मला समजून घेईल का?”
भविष्याची भीतीच वाटायची. कधी कधी वाटायचे लग्नच नको करायला.. हो, नाही करत ह्यांचे स्थळ आले आणि मी माझा होकार कळवला. पहिल्या भेटीतच त्यांनी मला सांगितले होते., ‘लग्नानंतर तू हवे तसे आयुष्य जगू शकते. तुला कसलेही बंधन नाही.’ तरीही धाकधूक लागून होतीच. लग्न झाले. मी सासरी आले. मी शांत असायचे. मला खूप भीती वाटायची. ह्यांच्या प्रेमळ, बोलक्या स्वभावाने ती भीती नाहीशी झाली. कधी ह्यांच्या प्रेमात पडले कळलेच नाही. नवरा कमी आणि मित्र जास्त वाटावे असेच आहेत हे. नशीबवान आहे मी, इतका प्रेम करणारा नवरा मला मिळाला आहे. आत्ताच मी यांना पैठणी मागितली. मला हवी तशी पैठणी ते नक्कीच घेऊन देतील याची खात्री आहे मला. आजवर ज्या ज्या इच्छा त्यांना सांगितल्या त्या नेहमीच पूर्ण केल्या.

आजही आठवते.. सेजल लहान होती. तेव्हा तिचा पहिला वाढदिवस होता. माझी इच्छा होती, सेजलचा वाढदिवस थाटात करावा. तेव्हा ह्यांच्या खिशात पैसा नव्हता. मलाही माहीत होते. मी काहीच बोलले नाही. माझ्या डोळ्यात त्यांनी वाचले. सेजलच्या वाढदिवसासाठी त्यांनी स्वतःची सोन्याची चेन मोडली. तेव्हा म्हणाले ते होते.

“माझी लेकच माझ्यासाठी सोनं आहे. तीच माझी लक्ष्मी आहे."

त्यानंतर महिन्याभरातच त्यांना मोठ्या पगाराची नोकरी लागली. तेव्हा मोठ्या कौतुकाने हे म्हणाले होते

“हे सर्व माझ्या सेजलमुळे..”

किती खुश झाले होते हे! तिला डोक्यावर घेऊन किती नाचले होते. खरं सांगू आई, माझी सेजलही नशीबवान आहे कारण इतके प्रेम करणारे वडील तिला मिळाले. एक चांगला नवरा आणि चांगला पिता काय असतो ते ह्यांच्याकडे पाहून समजते. आई, माझ्या बाबांच्या डोळ्यात नेहमी दिसायचे मला. मी मुलगी म्हणून नेहमीच त्यांना ओझे वाटत राहिले. त्यांनी मला कधीच जवळ घेतले नाही. कधी प्रेमाने दोन शब्द बोलले नाही. वडील म्हणजे नेहमीच धाक असेच वाटत राहिले. सेजल आणि तिच्या बाबांचे नाते जेव्हा मी बघते तेव्हा जाणीव होते की, मी खूप काही गमावले आहे. खरंतर तो माझ्या नशिबाचा भाग म्हणून मी केव्हाच सोडून दिलाय. आज माहीत नाही का आई, माझा भूतकाळ मला आठवतोय गं.. खूप रडावेसे वाटतेय. लग्नानंतर पहिल्यांदा इतकी भावुक झालेय मी. मनाची खूप घालमेल होतेय बघ.. असं वाटतेय की, आताच्या आता बाहेर जावून त्यांना घट्ट बिलगावे आणि मनसोक्त रडून घ्यावे. आई ते असे आहेत की मला रडूही देणार नाही. मला खुश कसे ठेवायचे त्यांना छान जमते. म्हणून आज तूला लिहून संदेश पाठवते आहे. कधी कधी रडले की खूप बरं वाटते, मनातल्या भावनांचा निचरा होतो. आई मी लहान असताना मी कधी रडले की तू कशी लगबगीने यायची गं, माझे अश्रु पुसायला.. किती बरं वाटायचे आई! आजही असेच वाटतेय की, कोठून तरी तू येशील आणि मला मिठीत घेशील. माझे सांत्वन करशील.”


अमोल वाचता वाचता थांबला. त्याचेही डोळे भरून आले होते.

“म्हणजे राधाने आत्ताच सर्व लिहिले असावे.. कधी बरं लिहिलं असावं? कदाचित रूममध्ये तयारी करायला गेली तेव्हा लिहिले असावे.”

तो स्वतःशीच बडबडला. त्याने डायरीचे पान पलटले. तो पुढे काही वाचणार तोच बेल वाजली. राधा आली होती. त्याने पटकन डायरी ठेवली. राधा घाम पुसतच म्हणाली

“किती गर्दी होती, माझा जीव घुसमटला.”

“ मी पाणी आणतो.. तू बस.”

असं म्हणून अमोल पाणी आणण्यासाठी किचनमध्ये गेला. पुन्हा बेल वाजली.

“राधा, मी बघतो कोण आहे,तू बस..”

किचनमधून पाणी घेऊन बाहेर येत अमोल म्हणाला. राधा काहीच बोलली नाही. अमोल बाहेर आला. पाहतो तर राधा नव्हती. तो पुटपुटला,

“कुठे गेली? इथेच तर होती?”

त्याने दार उघडले. राघव समोर उभा होता. त्याला दारात पाहून अमोल आश्चर्याने म्हणाला,

“अरे! तू घरी? हॉटेलमध्ये भेटायचं ठरलं होतं ना आपलं?”

राघवचा चेहरा दुःखाने काळवंडला होता. त्याने अमोलच्या खांद्यावर हात ठेवला. त्याला धीर देत म्हणाला.

“अमोल, वाईट बातमी आहे. वहिनीचा अपघात झाला आहे आणि आता त्या आपल्यात नाहीत.”


अमोल राघववर चिडून म्हणाला,

“गप्पं बस राघव.. तू काहीही बोलू नकोस, ती आताच आलीय. हे बघ सोफ्यावर बसलीय. थांब, तिला मी बोलावतो. तुझा नक्कीच काहीतरी गैरसमज झालाय..”

“राधा..राधा..”

आवाज देत अमोल तिला घरभर शोधू लागला पण राधा कुठेच नव्हती. राघवने सांगितलेली बातमी खरी होती. राधा जग सोडून गेली होती. त्याला खूप मोठा धक्का बसला होता. तो बेशुद्ध झाला. सगळे राधाच्या पार्थिवाजवळ रडत होते. थोड्यावेळाने अमोल शुद्धीवर आला, बघतो तर, सर्व माणसांनी घर भरले होते. सेजल आईच्या मृतदेहाला घट्ट बिलगून रडत होती. ते दृश्य पाहून अमोल लहान मुलागत रडू लागला.

एकाएकी अमोल उठला. पैसे घेतले. दुकानात जाऊन आंबा कलरची पैठणी घेऊन आला. तिचा हट्ट पूर्ण करणारा नवरा दुःखात असतांना देखील बायकोची इच्छा पूर्ण करायला विसरला नव्हता. राधाला सुंदर सजवलेलं. अगदी नवीन नवरीसारखी दिसत होती ती.. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते. समाधान होते. अमोलला राधा त्याच्या पाठीमागे उभी असल्याचा भास झाला. त्याने मागे वळून पाहिले पण एक वेगळीच शांतता होती. भरल्या डोळ्याने सर्वांनी राधाला निरोप दिला.

सगळे पाहुणे निघून गेले. राघव थांबला होता. अमोल, लेकीचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न करत होता. शरीरातून आत्मा निघून गेल्याप्रमाणे झाले होते. लेक त्याच्या मांडीवर डोकं ठेवून झोपून गेली होती. त्याला काही झोप येत नव्हती. राधाच्या फोटोकडे पाहून त्याला अजून तुटून गेल्यासारखे होत होते. त्याला आठवले. सकाळी डायरी वाचायची राहून गेली आहे. तो लगबगीने उठला. कपाटातून डायरी काढली. अध्याशासारखा ती डायरी वाचू लागला.

राधाने पुढे लिहिले होते,

“आई, हे मात्र मला नेहमीच खुश ठेवतात. तू जशी प्रेम करायची तसेच हे करतात. हे नेहमी बोलतात

"तुम्हा बायकांना समजणे खूप कठीण आहे."

एक सांगू का आई? जितकं हे मला समजून घेतात तितकं कोणीही समजून घेत नाही. माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहूनच हे ओळखतात की, माझ्या मनात काय चालू आहे. त्यांनी फक्त मला जवळ घेतले तरी खूप छान वाटते. आधार वाटतो. एखाद्या व्यक्तीवर खरं प्रेम केले की आपण त्या व्यक्तीला ओळखायला लागतो. समजायला लागतो. हे सुद्धा तसेच आहेत. मला माझ्या भावना बोलून दाखवण्याची गरज कधीच कधीच पडत नाही. लगेच समजून घेतात मला. देवाकडे एकच प्रार्थना आहे.

“जन्मोजन्मी तुझ्या पोटी जन्म घ्यावा आणि नवरा म्हणून अमोल ह्यांची साथ मिळू दे.”

अमोलच्या डोळ्यातून अश्रु येत होते. शेवटची ओळ वाचून तो थक्क झाला.

“का असे लिहिले राधाने? तिला तिचे मरण जवळ दिसले होते का?”

राधाच्या फोटोकडे पाहत तो दुःखाने कळवळून म्हणाला,

“राधा, साथ आयुष्यभर द्यायची होती. का सोडून गेलीस मला? का वागलीस अशी? जर इतके मनात होते, तर का नाही बोललीस माझ्याशी? घट्ट मिठीत घेतले असते. मी तुला कुठेच जाऊ दिले नसते.”

तो पुन्हा रडू लागला. राधाला आज इतकं भरून आले होते. कदाचित तिला आपल्या मृत्यूची चाहूल लागली असावी. जाता जाता तिने नवऱ्याविषयी भावना व्यक्त केल्या होत्या. ज्याने नेहमीच राधावर मनापासून प्रेम केले. तिचे सर्व हट्ट, लाड पूर्ण केले. जाता जाता शेवटची इच्छा पैठणीचीही हौस देखील पुरवली होती. राघव त्याला सावरत होता.

दुसऱ्या दिवशी एक माणूस पार्सल घेऊन आला. गिफ्ट होते. राधाच्या नावाने. अमोलने गिफ्ट उघडले. पाहतो तर त्याच्यात छानसे शर्ट होते. खास राधाने त्याच्यासाठी घेतले होते. त्याला आठवले आज तर लग्नाचा वाढदिवस.. त्याने शर्ट हृदयाशी घट्ट पकडले. त्या शर्टला त्याच्या राधाच्या हाताचा स्पर्श झाला होता. तिच्या पसंतीचा शर्ट होता. त्याला वेगळीच ऊब जाणवली. अमोलने राधाच्या फोटोकडे पाहिले आणि म्हणाला,

“राधा, मी पहिल्यांदा विसरलो आपल्या लग्नाचा वाढदिवस पण तू नाही विसरलीस.”

त्याने पटकन तो शर्ट अंगावर घातला आणि एकटाच त्या हॉटेलमध्ये गेला, ज्या हॉटेलमध्ये राधा त्याला पहिल्यांदा भेटली होती. आज राधा सोबतीला नव्हती पण तिच्या असंख्य आठवणी तो एक एक करून आठवू लागला आणि त्यातच तो रमून गेला.


स्त्रीला समजून घेणे खरं तर खूप सोप्प असते. तिच्यावर मनापासून प्रेम केले की ती सर्वस्व बहाल करते. तिचे वेगळे असे अस्तित्व नसतेच. ती तर नदीप्रमाणे असते. मुक्तछंद अशी.. प्रेमाचा झरा. तिला जितकं प्रेम द्याल तितकं ती सामावून घेते आणि त्याच्या दुप्पट प्रेम करते. स्त्रीला त्यागाची मूर्ती उगाच म्हणत नाही.

समाप्त.
©® अश्विनी पाखरे ओगले.
जिल्हा - रायगड- रत्नागिरी.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

अश्विनी पाखरे ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..

//