Login

पैठणी

Story of a bonding between mother in law and daughter in law...

पैठणी 
सिद्धी भुरके ©®

       ताराबाईंना देवाघरी जाऊन आज तेरा दिवस झाले होते. तेराव्याचे सगळे विधी पार पडले होते. मानसीला आज खूपच ताराबाईंची आठवण येत होती. मानसी आणि ताराबाई यांच्यात सासू सुनेचं नातं नाही तर आई लेकीचं नातं निर्माण झालं होतं. मानसीला ताराबाईंशिवाय घर खायला उठत होतं.त्यांच्या सहवासाची तिला सवय झाली होती. गेल्या वर्षी ताराबाई पाय घसरून पडल्या होत्या.. तेव्हापासून त्यांना चालता येईना.. त्या अंथरुणाला खिळल्या होत्या.. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी त्यांना कॅन्सर झाल्याचे समजले आणि त्या बऱ्या झाल्या नाहीत.ताराबाईंच्या शेवटच्या काही महिन्यात मानसीने त्यांची खूप सेवा केली. त्यांना रोज साडी नेसवण्यापासून ते केसांची वेणी घालून देणे सगळी कामं मानसीच करत होती. त्यामुळे ताराबाईंच्या जाण्याने मानसीला फार वाईट वाटतं होते.

      ती आज फार शांत शांत होती.आज घरातील पाहुण्याची रेलचेल पण कमी झाली होती. बऱ्याच दिवसांपासून रहायला आलेल्या नणंदा सुद्धा दुसऱ्या दिवशी आपापल्या घरी जाणार होत्या. मानसी घरातील आवराआवर करत होती.. तोच तिला धाकट्या नणंदेने आवाज दिला.. तसं मानसी ताराबाईंच्या खोलीत गेली.बघते तर दोघी नणंदांनी तारबाईंचं कपाट उघडलं होतं आणि त्यातील एक एक सामान काढत होत्या.

"वाहिनी हे बघ आम्ही आईच्या काही वस्तू आठवण म्हणून घेऊन जात आहोत.. तुला यातील काही पाहिजे का??"धाकटीने मानसीला विचारले.

"नाही.. नको ताई.. मला काही नको..."मानसी म्हणाली.

"हे बघ हा आईचा दागिन्यांचा डबा.. मी तर आईचा पोहेहार आणि राणी हार घेणार आहे... असं जुन्या पद्धतीचं डिझाईन आता कुठे मिळतं बघायला.."थोरली नणंद म्हणाली.

"ए... ताई.. मला आईच्या पाटल्या, बांगड्या पाहिजे.. मला लग्नात फार साध्या बांगड्या केल्या होत्या..."धाकटी नणंद म्हणाली.
 
    दोघी नणंदांचं बोलणं ऐकून आणि वागणं पाहून मानसीला आश्चर्य वाटलं.. आई जाऊन तेरा दिवसच झाले आणि या दोघी सामान आणि दागिन्यांची वाटणी करायला बसल्या आहेत. मानसीचं मन हळहळलं. ती खोलीतून बाहेर पडणार तोच थोरली नणंद तिला म्हणाली,"मानसी थांब अगं.. काहीतरी घे आईचं तू.. बरं दागिने नको तर एखादी साडी घे.... आता या साड्यांचं तरी काय करणार.. आम्ही काही घेऊन जातो.. तू ठेव एखादी तुला..."

      साडी शब्द ऐकून मानसीच्या डोक्यात ताराबाईंची पैठणी आली.. अतिशय सुंदर पैठणी होती ती.. हिरवागार रंग, त्याला लाल काठ.. साडीवर आकर्षक बुट्ट्या होत्या आणि पदरावर सुंदर मोर होता. ती ताराबाईंच्या लग्नातील पैठणी होती..चाळीस वर्ष होऊनही ती साडी अजूनही नवीकोरी दिसायची. अर्थात ताराबाईंनी ती फार जपून ठेवली होती. मानसीच्या पहिल्या मंगळागौरीला मानसीला त्यांनी ती साडी नेसायला दिली होती. तेव्हापासून ती साडी मानसीच्या मनात भरली होती.

"अगं.. कसला विचार करत आहेस??? सांग ना कोणती साडी पाहिजे तुला??"थोरल्या नणंदेने विचारलं.. तसं थोडंसं बिचकतचं मानसी म्हणाली...
"ताई.. मला आईंची पैठणी द्याल का?? तेवढी एक साडी बास मला.. मला बाकी काही नको..."

मानसीचं बोलणं ऐकून धाकटी नणंद लगेच तावातावाने म्हणाली, "वहिनी आईला ती साडी आमच्या आजीने घेतली होती.. त्यात आजीची पण आठवण आहे.. तुला कशी देऊ आम्ही ती साडी?? ती साडी सोडून दुसरी कोणतीही साडी घे..."

"नको मला बाकी काही... मला काहीच नको.."मानसी खिन्न होऊन म्हणाली. तितक्यात थोरली नणंद ती साडी शोधू लागली.. कपाटात कुठेच नाही सापडली.. मग खोलीत इकडे तिकडे शोध सुरु झाला..आणि ती साडी त्यांना पलंगाच्या शेजारील टेबलवर सापडली. ताराबाईंनी व्यवस्थित सुती कपड्यात गुंडाळून ठेवली होती ती साडी.आईने ही साडी बाहेर का ठेवली असेल? या विचारात थोरलीने ती साडी उघडली तोच त्यातून एक चिट्ठी खाली पडली.तिने ती उचलली तर त्यावर मानसीचे नाव लिहिले होते. थोरलीने आईचे अक्षर ओळखले.. काय लिहिलं असेल आईने यात या विचारात मोठ्या कुतूहलाने  ती मोठ्याने चिट्ठी वाचू लागली....

"प्रिय मानसी,
तुला जर ही चिट्टी सापडली असेल तर मी स्वतःला फार नशीबवान समजेल कारण माझी आणि या साडीची आठवण आल्याशिवाय तुला ही चिट्ठी मिळणार नाही.
कितीतरी बोलायचं आहे तुझ्याशी.. ते म्हणतात ना काळ आलेला समजतो तसचं मलाही शेवटच्या काही दिवसात जाणवत होतं कि माझ्या हातात फार दिवस नाहीत.. नंतर तर बोलायची सुद्धा ताकद नव्हती.. म्हणून एक दिवस राहुलला बोलवून ही साडी काढून घेतली आणि ही चिट्ठी लिहिली.
      पोरी किती गं सेवा केलीस माझी..मला वेळेवर खाऊ पिऊ घालण्यापासून ते मी खराब केलेला बिछाना साफ करण्यापर्यंत सगळं केलंस. कोण करतं आजकाल एवढं?? ते पण सासूचं... सून म्हणून घरात आलीस आणि लेक बनून राहिलीस. तू आणि राहुलने माझ्या आजारपणासाठी किती खर्च केलास.. अगं तू तर तुझे दागिने पण गहाण ठेवलेस... अगं माझ्याकडे इथे दागिन्यांचा डबा पडलाय.. पण ऐकलं नाहीस माझं.. स्वतःचे दागिने गहाण ठेऊन खर्च केलास... जिथे पोटच्या पोरींनी विचारले नाही तिथे तू दिवसरात्र माझ्या उशाशी बसून असायची..
            मला माहित आहे तुला ही साडी फार आवडते.. खरं सांगू तर  तुझ्यावर ही साडी अजूनच खुलून दिसते. तू नेहमी मला विचारायचीस ना कि इतकी कशी जपली आहे मी ही साडी.. तर मग ऐक..अगं काठपदर साडी सुती कापडात घडी करून ठेवायची..नात्यांचं पण तसंच आहे अगदी.. प्रेमाच्या बंधात अलगत जपायची असतात ती.. जसं काही महिन्यांनी साडीची घडी उघडायची असते आणि तिला हवेवर ठेवायचं असते..तसचं कोणत्याही नात्यात मोकळीकही पाहिजे आणि सुखदुःखाची हवा सोसून घ्यायची तयारी पण पाहिजे..जसं साडीच्या जरीला पाणी लागू द्यायचं नाही म्हणजे ती काळी पडत नाही.. तसं नात्याला सुद्धा अहंकाराच पाणी लागू द्यायचं नाही.. असं केल्याने साडी अगदी वर्षानुवर्षे टिकते... आणि नाती सुद्धा....
     जसं मी या साडीला जपलं आहे तसं आपल्या नात्याला तू अगदी या साडीप्रमाणे जपले आहेस... म्हणून ही साडी तुझ्यासाठी काढून ठेवली आहे...खरंतर तू या घरची लक्ष्मी आहेस.. मी तुला काय देणार?? पण माझे कपाटातील दागिने तुझ्यासाठी ठेवले आहेत..माझ्यासाठी पुढचा मागचा विचार न करता तुझे दागिने दिलेस... त्याची ही परतफेड..
      खरंतर मी तुला फक्त ही साडी आणि दागिने देऊ शकते..तू माझ्यासाठी किती काही भरभरून केलं आहेस... याकडे फक्त दागिने आणि साडी म्हणून बघू नकोस बाळा..हे माझे प्रेम आहे ...रक्ताने नाती बनतात पण मायेने,आपुलकीने कधीही न तुटणारे बंधन बनते...रक्ताच्या नात्यांपेक्षा आज तू निर्माण केलेलं आपुलकीचं नातं जिंकलं आहे..ही माहेरची साडी म्हणून जपून ठेव तुझ्याकडे.. एका आईने लेकीला दिलेली साडी..अजून काय सांगू तुला.. तू समजूतदार आहेस.. माझा आशीर्वाद सदैव तुझ्या आणि राहुलच्या पाठशी आहे.. आता निश्चिन्त होऊन मी डोळे मिटेल.... "

       चिट्ठी वाचून नणंदेच्या डोळ्यात पाणी आले आणि तिची चूक तिला उमगली. मानसीने ती साडी उराशी कवटाळली..त्या साडीला स्पर्श करताच तिला स्वर्गीय सुखाचा आभास झाला... मनात तरंग उमटले. सासू सूनेच्या नात्यातील संयम तिला त्या साडीच्या घडीत जाणवत होता..क्षणभर ताराबाईच तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत आहेत असं तिला वाटलं... आईने मुलीला एखादी साडी दिल्यावर  मुलीला जो आनंद होतो, सुख मिळते तेच आज मानसीला जाणवत होते... तिचे डोळे अश्रुंनी भरले.. आता ते आनंदाश्रू आहेत कि विरहाच्या दुःखाचे ते तिला उमगत नव्हतं.. पण त्या साडीच्या निमित्ताने ताराबाई सतत तिच्या सोबत असल्याची जाणीव तिला सुखावून गेली..आणि तिच्या दोघी नणंदा मान खाली घालून खोलीतून निघून गेल्या...

वाचकहो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला नक्की सांगा. आवडली तर like आणि कंमेंट नक्की करा. धन्यवाद.
सिद्धी भुरके ©®