पाहुणे येती घरा.. भाग २

कथा नवराबायकोच्या आंबटगोड भांडणाची
पाहुणे येती घरा.. भाग २


मागील भागात आपण पाहिले की सुमेधा आणि प्रणवचे भांडण होत असताना कोणीतरी येते. बघूया कोण आहे ती व्यक्ती..


" अरे किती वेळ?" दरवाजात प्रणवचे दूरचे काका सुधाकरराव आणि त्यांची बायको सुधाताई होत्या.

" अहो.. हळू बोला. सूनबाई काय म्हणेल?" काकूंनी काकांना खुणावले.

" ती काय बोलणार? लहानपणी मी तिला मांडीवर खेळवले आहे. आणि दोघांचेही लग्न जुळवण्यात माझाच हात आहे. हो की नाही?" काकांनी परत त्यांच्या गडगडाटी आवाजात विचारले.

सुमेधा कसनुशी हसली. त्यांच्यासोबत असलेल्या मोठमोठ्या बॅगा बघून ती घाबरलीच. तरिही काकाकाकूंना नमस्कार करायला पुढे झाली. पुढे होताना प्रणवकडे बघून नाक मुरडायला विसरली नाही. तिचे बघून नमस्कार करायला प्रणव पण वाकला.

" काय ग दरवाजा उघडायच्या आधी एवढे आवाज कसले येत होते घरातून? भांडत बिंडत होता की काय?" काकूंनी विचारले.

" नाही ओ काकू.. भांडण कसले? टिव्ही चालू होता.आणि टिव्हीवरच्या मालिका तर तुम्हाला माहित आहेतच." सुमेधा बोलली.

" बरं झालं बाई.. नाहीतर मी एवढी घाबरले. यांना म्हटलं आल्या पाऊली परत जाऊ, नाहीतर एअरपोर्टवर जाऊन राहू."

" अरे काहिही हां काकू. तुम्ही कधी आम्हाला भांडताना पाहिले का? सुमेधा फक्कडसा चहा कर ग.. बोलून बोलून घसा कोरडा पडला माझा. दिशा पाणी आण काकाकाकूंना." घरात सगळं सुरळीत असल्याचा देखावा करत प्रणव बोलला.

" हो आणते हं.." ठेवणीतला आवाज काढत सुमेधा बोलली. या काकाकाकूंसमोर तिला काही बोलताही येत नव्हते कारण ते तिचेही दूरचे मामा लागत होते. त्याहून धोकादायक गोष्ट म्हणजे त्यांच्या तोंडात तीळ भिजत नसे. घरातल्या भांडणाचा त्यांना जरा जरी सुगावा लागला असता तरी सगळ्या नातेवाईकांमध्ये सुमेधा आणि प्रणव कसे भांडतात याच्या मीठमसाला लावून सुरस कथा ऐकवल्या गेल्या असत्या. ती गप्पपणे आत गेली. ती जाताच प्रणवने आवाज दिला.

" चहात थोडं आलं सुद्धा घाल गं.. "

" हो.."

" थोडा गवती चहा.."

" बररर."

" वेलची पण टाक कुटून."
सुमेधाला आलेला राग तिच्या आलं आणि वेलची कुटण्याच्या आवाजावरूनच मुलांना आणि प्रणवला समजला. मग मात्र त्याने तोंडाला कुलूप लावले. फायनली चहा आला. चहा घेत सुमेधाने विचारले.

" मग काय काकू, सहजच का फेरी?"

" सहज नाही ग.. गेले काही दिवस चालले होतेच आज मुहूर्त मिळाला."

" कसला?" हे महिनाभर राहणार की काय? ही भिती तिला सतावू लागली.

" अग लेकाकडे जायचा. उद्या पहाटेची फ्लाईट आहे. पुण्याहून निघायचे, मग ट्रॅफिकमध्ये उशीर झाला तर विमान चुकायचे. मग म्हटलं काढू एक दिवस तुमच्याकडे. देऊ तुम्हाला सरप्राईज. चालेल ना?"

" त्यात काय काकू.. तुमचेच घर आहे. कधीही या.." सुमेधा बोलली. पण हे बोलताना तिने सोडलेला सुस्कारा थेट परदेशी असलेल्या काकूंच्या मुलांपर्यंत पोहोचला असावा..


" बरं.. तुम्ही बसा गप्पा मारत. मी स्वयंपाकाचं बघते. दिशा चल आत."

"आई, मी काय करू?"

" तू डाळतांदूळ धुवून कुकरला लाव. कणिक भिजव. मी भाजी करायला घेते.\"

" आई, कारलं आणि वांग?? बाबांना दोन्ही भाज्या आवडत नाहीत." दिशाने विचारले.

" असू देत.. मगाशी नाही का, चहात आले टाक, वेलची टाक सुरू होतं. खाऊ दे बिन आवडीची भाजी. तसेही मगाशी चालू असलेले भांडण मिटले कुठे आहे?"


काय वाटतं, भांडण मिटेल की वाढेल? बघू पुढच्या भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all