Oct 16, 2021
बालकथा

पहुंचे हुए बाबा..

Read Later
पहुंचे हुए बाबा..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
पहुंचे हुए बाबा


फार जुनी गोष्ट आहे.एका गावात एक म्हातारे जोडपं रहात होत.त्यांना मुलाबाळ नव्हते. त्यामुळे ते दोघंच एकमेकांचा आधार होते.


म्हातारा रोज जंगलात जाऊन लाकडं तोडून गावात विकत असे. त्यांत मिळणाऱ्या तुटपुंज्या पैशातुन त्यांचा घर संसार चाले.
एक दिवस म्हातारी बोलली अहो! या इतक्या कमी पैशात मी घर कस चालवू? आपला राजा अतिशय दयाळू आहे अस म्हणतात .तुम्ही जा ना त्यांच्याकडे एकदा आणि आपल्यासाठी थोडीफार मदत मागा. अग! राजा कडे जाण इतके सोप नाही. अस कुणालाही भेटु देत नाही सहजा-सहजी. तरी पण तूझा आग्रहच आहे तर निघतो उद्या सकाळी.
दुसऱ्या दिवशी सकाळीच म्हातारा बायकोने दिलेली शिदोरी घेऊन प्रवासाला निघाला. राजधानीचा प्रवास फार दूरचा होता. बराच वेळ चालल्यानंतर तो एका नदीकाठी उंबराच्या झाडाखाली न्याहारी करायला बसला. न्याहारी करता करता त्याची नजर आजूबाजूला फिरत होती. समोर नदीत त्याला चार म्हशी आणि त्याची दोन पिले (पारडु) मनसोक्तपणे आंघोळ करतांना दिसली.बाजुलाच मोठ वडाचे झाड होते. त्याच्या पारंब्या सर्वदूर पसरल्या होत्या.सगळं निरीक्षण करता करता त्याने न्याहारी आटोपली.
न्याहारी करुन तो पुढच्या प्रवासाला निघाला.प्रवासात तो एका गावाजवळ आला. गाव मोठ होत. एव्हाना चालुन चालुन त्याला खुप तहानही लागली होती. तो एका घरा शेजारी थांबला.घरात कोणी असेल तर पाणी मागू व राजधानीचा पत्ता विचारू या उद्देशाने त्याने खिडकीच्या फटीतून हळूच आतमध्ये पाहिले तर एक बाई चुलीवर भाकरी भाजत होती. चार भाकऱ्या सुपात व एक भाकरी तव्यावर होती. त्याने दरवाज्या जवळ जाऊन हाक मारली. कोणी आहे का घरात?. तशी ती बाई पिठाचे हात तसेच घेऊन घाई घाईत दरवाज्यात आली .कोण ?तिने विचारले. पोरी! तु भाकरी भाजतेस ना? म्हाताऱ्याने विचारले. तिने होकार दिला. त्यांवर म्हातारा म्हणाला चार भाकऱ्या सुपात आणि एक भाकर तव्यावर आहे ना? तीन आश्चर्याने म्हाताऱ्या कडे पाहुन मान हलवली. मी राजाकडे निघालो आहे.तहान लागली म्हणून हाक मारली.
त्या बाईने ओळखले की, हा कोणी साधा सुधा म्हातारा नसुन अतिशय पोचलेला बाबा दिसतोय. तिने लगेच त्या म्हाताऱ्याला घरात बोलावले व त्याला बसायला दिले व पाणीच काय? लगेच चहा देखील टाकला.म्हातारा तसा हुशार होता तो समजला हा सगळा भाकरीच्या भविष्यवाणीचा प्रताप आहे.
कालपासून आमच्या म्हशी सापडत नाही. माझे पति सकाळीच गेलेत त्यांना शोधायला ते अजुन परत आले नाहीत बाई अस सांगत असतानाच तिचा नवरा आला. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. म्हणजे म्हशी अजुन सापडल्या नाहीत हे म्हाताऱ्याने ताडलं.नवऱ्याला बाजुला घेऊन बाईन त्याला म्हाताऱ्या विषयी संगितले तसं त्याने म्हाताऱ्याला विचारले बाबा!आमच्या म्हशी कालपासून घरी आलेल्या नाहीत. तुम्ही शोधून द्याल का? काळजी करू नका तुमच्या म्हशी सापडतील... जरा मला सुपात तांदूळ आणुन दया मी दाणे पाहुन सांगतो..बाईने सुपात तांदूळ आणले व प्रथा म्हणुन सुपात काही पैसे टाकले. म्हाताऱ्याने सुप हातात घेतल व सुपातील तांदूळ फिरवून स्वतःलाच ऐकू येईल इतक्या हळू आवाजात मंत्र बोलायला सुरवात केली. ..अटक मटक चवळी चटक म्हशी मिळाल्या नाही तर माझा चहा जाईल फुकट!,.. अटक मटक चवळी चटक म्हशी नाही मिळाल्या तर माझा चहा जाईल फुकट!!.. मंत्र पुटपुटत तो म्हणाला चार म्हशी आणि दोन पारडु आहेत बरोबर ना? त्या दोघांनीही आश्चर्ययाने होकारार्थी मान हलवली. पोरा!तु आताच उत्तर दिशेने जा वाटेत एक नदी आहे. त्या नदीकाठी एक मोठ वडाचे झाड आहे. त्याच्या बाजूला एक उंबराचे झाड आहे. तेथील डोहात ती सध्या पाण्यात खेळत आहेत लवकर जा.
लगेच बाईच्या नवऱ्याने त्या दिशेला धाव घेतली.. काही काळाने त्याला नदी जवळचे ते उंबराचे व वडाचे झाड दिसले. बरोबर त्याच ठिकाणी ती पारड पाण्यात खेळत होती. त्यांना पहिल्या बरोबर त्याला खुप आनंद झाला. त्याने म्हाताऱ्याचे मनातल्या मनात आभार मानले.
आपल्या म्हशीना घेऊन तो घरी आला. म्हातारा वाट पाहतच होता. म्हाताऱ्या जवळ जाऊन तो पाया पडला.बाबा! खरंच तुम्ही आंतर्ज्ञानी आहात. मी राजा कडे द्वारपालाचे काम करतो. चला महाराजांना आपल्या ज्ञाना बद्दल सांगतो. ते तुम्हांला नक्कीच मोठ बक्षिस देतील. म्हाताऱ्याचे आयते काम झाले. तो द्वारपाला सोबत राजमहालात गेला.द्वारपालाने त्या म्हाताऱ्याची कीर्ती महाराजांना भर दरबारात सांगीतली तसे महाराज व दरबारी खूष झाले. . बाबा!.. माझ एक काम आहे तुमच्याकडे महाराज म्हणाले. आज्ञा असावी महाराज म्हाताऱ्याने जरा भीत-भीत संगितले. चार दिवसांपूर्वी आमच्या महाराणीचा अतिशय मौल्यवान चंद्रहार चोरीला गेला आहे. मला खात्री आहे तो हार महालातील एखाद्या सेवकानेच चोरला आहे. पण नक्की कोणावर संशय घ्यावा हे समजत नाही..त्यांवर म्हातारा चरकला. थोड घाबरून म्हणाला. महाराज! आता संध्याकाळ झाली आहे मी उद्या दाणे पाहुन सांगतो. त्याने वेळ मारून नेली..ठिक आहे जशी तुमची इच्छा! आज तुम्ही आमच्या अतिथिग्रूहात थांबा मग उद्या सकाळीच दाणे पाहुन सांगा .म्हाताऱ्याची राहण्याची सोय अतिथिग्रूहात करण्यात आली. उद्या काय करायचे याचा विचार करत करत बरीच रात्र झाली. उद्याच्या भितीने त्याला झोपच लागत नव्हती.कारण तो खरा बाबा किंव्हा आंतर्ज्ञानी नव्हता हे त्याला माहित होत.उद्या आपली पोल खोल होऊन आपल्याला शिक्षा होईल. या विचाराने तो फारच बेचैन झाला... इतक्यात दारावर ठक-ठक झाली. म्हातारा दचकला कोण असेल बरं इतक्या रात्री? त्याने दरवाजा उघडला तर एक बाई व पुरुष घाई घाईत आत शिरले व त्या दोघांनीही म्हाताऱ्याच्या पायांवर लोटांगण घातले. बाबा! आम्हांला माफ करा आम्हीच तो चंद्रहार चोरला आहे. आम्ही या पुढे कधीही अस करणार नाही. क्रुपया आमचे नाव उद्या सांगु नका तुम्हांला काय हवे ते आम्ही देतो. पण आम्हांला वाचवा. हे सगळं ऐकताना म्हाताऱ्याच्या मनात गुदगुल्या होत होत्या. तरी मुद्दाम तो काहीश्या रागात म्हणाला. ठिक आहे!.. ठिक आहे!!.. पण आता परत करणार नाही ना अस? दोघांनीही मान हलवली.
तर मग आता मी सांगतो तसं करा बाहेर बागेत एक आंब्याचे मोठे झाड आहे. त्या झाडाखाली असणाऱ्या मोठ्या दगडाखाली तो हार आताच लपवून ठेवा. व मला उद्या तुमचे नाव न सांगण्याचे पाच हजार रुपए दया. आणि हो! असली काम परत करू नका नाहीतर गाठ माझ्याशी आहे. म्हाताऱ्याने एकदम दणकट आवाजात दम भरला. लगेच त्यांनी म्हाताऱ्याला पैसे दिले व तो हार सांगितल्या प्रमाणे त्या दगडाखाली लपवला.
दुसऱ्या दिवशी सकाळीच उठुन म्हातारा महाराजांकडे मोठ्या ऐटीत गेला. महाराजांनी आदेश दिल्या बरोबर सुपात तांदूळ आणले गेले. सुपातील तांदूळ फिरवून त्याने हळूच आवाजात मंत्र बोलायला सुरवात केली ...अटक मटक चवळी चटक हार नाही मिळाला तर राजा मारील मला चापट! ,...अटक मटक चवळी चटक हार नाही मिळाला तर राजा मारील मला चापट!! .असा मंत्र पुटपुटत तो दाणे पहायच नाटक करू लागला. कोणाला संशय नको म्हणून त्याने बराच वेळ दाणे पाहिले व म्हणाला महाराज आपल्या बागेत मोठ आंब्याचे झाड आहे. त्याच्या मोठ्या दगडाखाली हार आहे. राजाने सेवकाला पाठवले तर खरंच तो हार त्या दगडाखाली होता. राजाने तो हार चोरनाऱ्याचे नाव विचारले तेंव्हा म्हातारा म्हणाला महाराज आपल्या राजमहालात सगळे दास -दासी प्रामाणिक आहेत. त्यामुळे तो हार कोणीही चोरलेला नाही. तो हार तर उंदरानी बिळात नेऊन ठेवला होता. मी रात्री जेंव्हा अतिथिग्रूहात होतो तेंव्हा दोन भले मोठे उंदीर मला फिरताना दिसले होते.म्हाताऱ्याने उंदराचे नाव सांगुन त्या दोघांचे प्राण वाचवले.राजाने लगेचच राजमहालातील उंदराचा बंदोबस्त करण्याचा आदेश दिला व आपल्या लाडक्या राणीचा बहुमुल्य हार शोधून दिल्याबद्दल म्हाताऱ्याला भरपुर धन बक्षिस देऊन त्याचा यथेच्छ सत्कार केला. आणि वेळप्रसंगी कधीही दरबारात येऊन त्याला मदत मागण्याची परवानगी दिली.
बक्षिस मिळालेले सर्व धन घेऊन म्हातारा घरी आला. त्याला पाहुन म्हतारीला खुप आनंद झाला. म्हाताऱ्याने घडलेली सारी हकीकत तिला सांगीतली तसं ती खळखळून हसली व म्हणाली तुम्ही तर फारच पहुंचे हुवे बाबा निघालात. यावर पुन्हा एकदा ते दोघंही खळखळून हसले. नंतर राजाने भेट म्हणून दिलेले सर्व धन त्याने म्हातारीला दाखवले.ते धन पाहुन म्हातारीला फार बरं वाटलं कारण आता भविष्यातील त्यांची काळजी मिटली होती. आता ती दोघं खाऊन पिऊन अगदी सुखात राहतात. गोष्ट होती ती संपली....

(ग्रामीण लोककथेवर आधारीत)

लेखन : चंद्रकांत घाटाळ
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

चंद्रकांत घाटाळ

शेतकरी व विज्ञान लेखक

संचालक: अनुजा अवकाश निरिक्षण केंद कासा, विज्ञान व ललित कथा लेखक