Jan 19, 2022
नारीवादी

पहिलीच वेळ..!

Read Later
पहिलीच वेळ..!

राजसीची धावपळ चालू होती... उद्या पहाटेच्या flight ने ती ऑफिसच्या कामासाठी दोन दिवसांसाठी कानपुरला जाणार होती. बॅग भरता भरता एकीकडे तिचं सोहमला सुचना देणं चालु होती...

"मी नाहीए.. नीट राहा... मालूताई रोजचं जेवण, कचरा, लादी, भांडी करतील. पण बाकी सगळं तुलाच करायचंय.." 

"आणि हो साहीला सांभाळून घे.. भांडू नकोस तिच्याशी.."

"हो हो.. आई किती सूचना?दरवेळी मीच करतो ना सगळं..? बाबा अमेरिकेत जाऊन वर्ष झालं आता.. तो येईपर्यंत तरी मलाच जबाबदारीने वागायला हवं ना..." डोळे मिचकावत सोहम म्हणाला.

"हो..हो.. कळलं बाळा.. मी पहाटे जाताना उठवत नाही तुम्हाला.. झोपा आता.. Good Night.."

पहाटे ४ वाजता उठून राजसी एअरपोर्टला गेली. सकाळी साहीचं आणि स्वतःचं सगळं आवरुन सोहमने साहीला शाळेत सोडलं... आणि तो पुढे कॉलेजला गेला.
 
सोहम बारावी सायन्सला होता. सगळा पोर्शन झाल्याने आज फक्त प्रॅक्टिकल होतं ते करून तो लवकर घरी येणार होता. 

साही तिच्या मैत्रिणीच्या आई सोबतच घरी येणार होती.
त्यामुळे तो निवांत होता. मालूताई बाकी सगळं जेवण वगैरे आवरुन गेल्याच होत्या. त्यामुळे फ्रेश होऊन तो स्टडी रूममध्ये बसला. परीक्षा जवळ येत होती त्यामुळे सगळी सबामिशन्स आ वासून उभी होती. थोड्याच वेळात डोअर बेलच्या आवाजाने त्याची अभ्यासाची तंद्री भंगली.

"साही आली वाटतं.. दोन वाजले पण??" असं म्हणत तो दार उघडायला आला.. पण दारात नेहमीची हसरी साही न दिसता थोडी नर्व्हस साही बघुन त्याला प्रश्न पडला..
"काय गं?? चेहरा का पडलाय..?? काय घोळ घातलास शाळेत?"

"काही नाही रे दादूस.. थोडं पोटात दुखतंय.."

"अरे?? काही खाल्लं वगैरे होतंस का??"

"नाही रे दादूस.."

"बरं.. मग उलट भुकेने असेल.. चल हात पाय धुवून घे.. आपण जेऊन घेऊ.."

पण आज डायनिंग टेबल वर नेहमीची बडबडी साही नसते.. ना शाळेतल्या गमती-जमती, ना भाजीला नावं ठेवणं.. काहीच नाही.. मुकाट्याने जेवण करुन साही तिचा होमवर्क पुर्ण करायला स्टडीरुम मध्ये गेली.. किचन मधलं आवरुन सोहम ही तिच्या पाठोपाठ आलाच.. एक- दोन तासात तिचा अभ्यास करून साही तिथेच झोपते.

सोहम तिच्या चेहऱ्याकडे बघत असतो..

"किती निरागस आहे ना अजून ही.. तशी लहानच आहे अजून..पण आता सहावीला जाईल.."

सोहम आणि साहीमध्ये सात वर्षांचं अंतर होतं. सोहम खुप समजूतदार होता पण साही म्हणजे लाडावलेलं शेंडेफळ. आता दहा वर्षाची झाली पण अजून पाच-सहा वर्षांचं असल्यासारखी वागायची.

थोड्यावेळाने साहीला जाग आली.. सोहम त्याचे जर्नल्स पुर्ण करत तिथेच बसलेला होता.. साही ला उठलेलं बघुन सोहम ने विचारलं.. "कॉफी घेणारेस??" 

साहीने होकार दिल्यावर तो कॉफी करायला किचन मध्ये आला तोच साही रडत रडत आली.

"दादूस हे बघ ना.. हे रक्त कसं येतंय?" 

तिचा रक्ताळलेला फ्रॉक बघुन तो जरा भांबावला. पण दुसऱ्याच क्षणी त्याच्या लक्षात आलं. 
तो अभ्यासात हे सगळं शिकला होता पण प्रत्यक्षात ही अशी वेळ कशी हाताळावी हे त्याला माहीतच नव्हतं.

कसं असेल म्हणा..?? राजसी एक सॉफ्टवेअर इंजिनिअर होती.  त्यामुळे सतत कामाच्या मागे पळत होती.. आणि त्यामुळेच इतक्या महत्वाच्या विषयावर ती कधी साहिशी बोलली ना ही सोहमशी. 

खरंतर तिच्यामते साही अजुन खुप लहान होती आणि सोहम तर मुलगा होता त्याच्याशी बोलून काय करावं?

सोहमने आधी साहीला शांत केलं..

"हे.. हे बघ साही.. तु रडू नको.. काहीही झालेलं नाहीए.. हे खुपच नैसर्गिक आहे..."

"तु.. तु बस बघु इथे आधी.."

त्याने लागलीच राजसीला कॉल केले.. पण ती कॉलला रिस्पॉन्स करत नव्हती.. शेवटी त्याने तिला मेसेज करुन घडलेलं सगळं सांगितलं... आणि 'फ्री झालीस की कॉल कर.." असा ही मेसेज केला..

पण साही काही शांत व्हायचं नाव घेत नव्हती.. नुसती रडारड करत होती.

"आईला बोलाव.. मला.. मला तुझं काही नाही ऐकायचंय.."

साहीच्या रडण्याने सोहम अजुन गोंधळत होता.. पण तरी शांतपणे त्याने साहीला सांगितलं..

"हे बघ साही आईला यायला अजून दोन दिवस आहेत.. ती कानपुर वरुन लगेच नाही येऊ शकत.. मी आहे.. तु नको काळजी करुस.."

"तु माझं ऐक.. आधी तु आंघोळ करुन कपडे बदल.. जा.. मी गिझर चालु करुन देतो तुला.."

आपल्या दादाच्या थोड्याश्या आश्वासनाने साही शांत झाली..

साहीची आंघोळ होई पर्यंत सोहमने नेटवरून सर्व माहिती गोळा केली.. मासिकपाळी कशी येते..? का येते?? येते तेव्हा कोणते शारिरीक बदल होतात..? स्वतःची काळजी कशी घ्यावी? सॅनिटरी पॅड कसे वापरावे..? याचे सगळे व्हिडीओ त्याने साहीला दाखवायला आणि तिला समजवायला डाऊनलोड करुन घेतले. आईच्या कपाटातून शोधुन सॅनिटरी पॅड ही काढुन ठेवले.

साही आंघोळ करुन.. कपडे बदलुन आली..

"साही.. ये.. गरम कॉफी घे.. बरं वाटेल.."

कॉफी पिता-पिता त्याने ते सगळे व्हीडीओ साहीला दाखवले... मासिक पाळी बद्दल जुजबी पण महत्वाची माहिती त्याने साहीला समजावली...

"प्रत्येक मुलीला एक ठराविक वयात म्हणजे ११-१६ या वर्षांत ही Menstruation Cycle सुरु होते. आणि ती 50-55 पर्यंत असते याला Monopause म्हणतात. शरीरातील संप्रेरकांच्या बदलामुळे हे घडत असते. योग्य वयात असे होणारे बदल योग्यच असत. यात वाईट, अपराधी वाटणं, चूक, किंवा घाण अस काहीही नाही.. खरंतर ती खूप चांगली गोष्ट आहे.. थोडा त्रास होतो.."

"ऐक आता तुला स्वतःची नीट काळजी घ्यायचीय आणि स्वच्छताही ठेवायची आहे.. आई नसली तरी मी आहे."

साहीने सगळे व्हिडीओ पाहिले.. सोहमचं बोलणं ही नीट समजावून घेतलं.. आताच्या टेक्नोसॅव्ही मुलांचं हेच आहे.. तुम्ही त्यांना २० मिनिटं बसुन लेक्चर दिलं तर त्यातलं त्यांना काही समजत नाही.. पण तीच गोष्ट जर २० सेकंदाच्या व्हिडीओने त्यांना समजावुन दिली तर मात्र लगेच त्यांना कळते.. आणि पटते पण.. साहीचं ही तसंच काहीसं झालं..

सोहम तिला समजावत असताना तिला आठवलं या सॅनिटरी पॅडची जाहिरात टी व्ही वर पाहून तिने कितीदा तरी राजसी ला विचारलेलं "हे काय आहे..?" पण राजसीने नेहमी उत्तर देणं टाळलं. 

पण सोहम ने दाखवलेले व्हिडिओ पाहून आता साहीला बरंच कळलं होतं. पण ती आईवर रागावली होती.. "यातलं तिने मला काहीच सांगितलं नाही??" 

सोहमला ही आईची चुक लक्षात आली.. त्यालाही असंच वाटत होतं की आईने साहीला आधी सांगितलं असतं तर ती आता गोंधळ न करता आत्मविश्वासाने वावरली असती.

तितक्यात सोहमचा फोन वाजला.. 

"आईचाच आहे" 

"सोहम सॉरी.. अरे मी आता मोबाईल पाहतेय.. कसं काय करशील तु सगळं? साही कशी आहे? मला खुप टेन्शन आलंय.. मी इथे लांब.. घरी तुम्ही दोघंच..."

सोहमने फोन उचलल्या उचलल्या राजसीने प्रश्नांचा भडिमार केला..

"आई नको काळजी करु.. मी सगळं समजावून सांगितलंय तिला.. आणि तिनेही घेतलंय समजून.."

सोहमचं बोलणं ऐकुन राजसीच्या जिवात जीव आला.. 

"ऐक ना.. सोहम.. साहीला फोन दे जरा.."

सोहम साहिकडे फोन दिला..

"हॅलो, कशी आहेस बेटा.. सॉरी मी आता तुझ्याजवळ नाहीय.."

आईवर रागावलेली साही त्या रागातच बोलते..

"पण तू आधी मला सगळं नीट सांगून तर ठेऊ शकत होतीस ना..का नाही सांगितलंस.."

"हो बच्चा.. चुकलं माझं.. पण आता माझं काम होत आलंय.. उद्या दुपारी पर्यंत परत येईन.. यावेळी मिटिंग लवकर झाली.."

"हं.." एवढंच बोलुन साही ने फोन परत सोहम कडे दिला.. राजसीने सोहम ला अजुन सगळं नीट समजावलं.. काही लागलंच तर मालूताईंना बोलाव असं ही सांगितलं..

"हो आई.. तु शांतपणे काम कर तुझं.. साहीची काळजी घ्यायला आहे मी"

राजसी विचार करत होती. किती लहान समजत होते मी साहीला अजून.. तशी लहानच आहे ती अजून.. पण आजकाल हे packed food , preserved food, फळं, भाज्यांवरचे केमिकल्स, गायी म्हशींनी जास्त दुध द्यावं म्हणून त्यांना दिली जाणारी संप्रेरकं.. आणि परिणामी ती आपल्या शरीरातही जातातच.. त्यामूळे पुर्वी जे शारिरीक बदल १२-१३ व्या वर्षी   व्हायचे ते आज अगदी ९व्या-१० व्या वर्षीही होतायत. 

पण हे सगळं माहित असूनही मी साहीच्या बाबतीत का नाही जागरूक राहिले? 

माझ्या लहानपणी मलासुद्धा माझ्या आई आणि आजीचा असाच राग आला होता. तेव्हा तर आधी सोडा पण त्यानंतरही मला काही सांगितलं नाही की हे नेमकं काय होतंय?? 

उलट हे सगळं इतकं अपवित्र, घाण आहे असं समजावुन चार दिवस वेगळं बसवून जो काही Guilt द्यायचे ते वेगळंच..!!

आता राजसीला घरी जायची ओढ लागली होती.. आता साही तिची फक्त मुलगी नाही.. तर मैत्रीण झाली होती.. जिच्याशी राजसीला तिच्या मनातलं सगळं शेअर ही करता येणार होतं.. आणि जिच्या मनातलं सगळं जाणुन ही घेता येणार होतं..

घरी आल्यावर फक्त साहीशीच नाही तर सोहमशी सुद्धा सगळं बोलायचं ठरवलेलं तिने. त्यालासुद्धा pcos, pms हे सगळं काय आहे..?? ह्याचं डिटेल सांगणं गरजेचं होतं.. हे आता वेळेत कळलं तरच त्याने आज साहीची जशी काळजी घेतली तशी बायकोचीसुद्धा घेईल.. तिने सॅनिटरी पॅड आण म्हटलं कधी, तर त्याला आणताना लाज वाटू नये, तिचे त्यावेळेचे मूड स्विंग ही त्याला झेलता आले पाहिजेत.. कारण त्या दिवसांत एका स्त्रीला गरज असते ती सोबतीची ना की वेगळं राहण्याची..!!!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now