Login

पाहिले न मी तुला..! भाग - एक.

सुरुवात नव्या कथेची. सुरुवात मैत्री, प्रेम आणि संघर्षाची!


आजपासून सुरु होतेय..
मैत्री, प्रेम, संघर्ष यांची तिहेरी सांगड घातलेली नवी कथामालिका..
पाहिले न मी तुला..!

*********


पाहिले न मी तुला..!
भाग - एक.



"मम्माss कॅsच! धिस इज फायनल राऊंड."

आसावरीकडे चेंडू फेकत तिची पाच वर्षांची चिमूरडी म्हणाली.


"ओह! शीट. निसटला ना बॉल."
मुद्दाम कॅच सोडत आसावरी.

शहरातल्या एका मोठया बागेमध्ये त्या दोघींचा खेळ रंगात आला होता.

आठवड्यातून दोनदा तरी दोघी इथे येत असत. लेकीचे मनसोक्त खेळून झाले की आसावरीच्या चेहऱ्यावर समाधानाची लकेर उमटायची.

आजही त्यांचा खेळ सुरु होता.
मागच्या दोन महिन्यापासून हल्ली तिला लवकर थकवा यायचा म्हणून मग कधीकधी आसावरी मुद्दाम हरून तिला जिंकू देत होती.



"येस्स! आय एम अ विनर, मम्मा इज अ लूजर!!"
आपल्या इटुकल्या हातांनी टाळ्या वाजवत ती आनंदाने नाचत म्हणाली.


तिच्या पिटुकल्या चेहऱ्यावर किती तो आनंद! तो आनंद बघून आसावरीची कळी खुलली.

"येस, माय डिअर! तुला तर जिंकायलाच हवे. हाच नाही आयुष्यातील खूप मोठा डाव तुला जिंकायचा आहे."
मनात तिचं चाललं होतं त्याचबरोबर तिच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या.


"येsय आशू.. हरली तर रडायला आलं? नको ना गं रडू. आपण पुन्हा खेळूया मग तू जिंक. ओके?"
तिचे डोळे पुसत निरागसपणे ती चिमणी म्हणाली.

"अगं,मी कुठे रडत आहे? हे तर आनंदाश्रू आहेत."   मंद हसत आसावरी.

"म्हणजे गं?"
त्या चिमणीच्या चेहऱ्यावर मोठ्ठा प्रश्नचिन्ह.

"म्हणजे आत्ता माझा लाडोबा जिंकला ना तर मम्मा हॅपी झाली आणि डोळ्यात पाणी आलं. त्याला म्हणायचं आनंदाश्रू!"
तिची पापी घेत ती उत्तरली.

"इट मिन्स हॅपी टीअर्स?"  ती चिमणी.

"येस हॅपी टीअर्स!"  ती.

"तरी पण आशु, ह्यापुढे नो मोअर टीअर्स! तू मला न्हाऊ घालतेस तेव्हा शाम्पू करतांना म्हणतेस ना तसंच.. नो मोअर टीअर्स! मग ते हॅपीवाले असू दे नाहीतर सॅडवाले. नो मिन्स नो. आशु, यू नो ना, आय हेट टीअर्स!"
तिने आपले हात तिच्या गळ्यात गुंफले.

तिचे "पुष्पा आय हेट टीअर्स!" ह्या तालावरचे बोलणे ऐकून आसावरीच्या ओठावर खुदकन हसू आले.


"येस माय प्रिन्सेस! नो मिन्स नो टीअर्स! चला निघूया आता?" तिच्या नाकाला आपले नाक घासत आसावरी.

"ओके." म्हणून ती उठली तोच तिच्या पायाजवळचा चेंडू जरा दुरवर गेला.

"थांब मी आणते." म्हणत आसावरी उठणारच तर तिने तिला अडवले.

"नो आशु, मीच आणते. तू बस." ती निघालीही.

"हळू गं." आसावरी.

"येस मॉम. डोन्ट वरी!" जाताजाता वळून ती.


"मुलगी का गं तुझी?"
इतका वेळ दोघींचे निरीक्षण करत असलेल्या बाजूच्याच बाकावर बसलेल्या एका आजीने आसावरीला प्रश्न केला.

"हम्म!" तिने हसून मान डोलावली.

"अशी गं कशी हल्लीची पिढी? मोठ्यांना काही मान द्यायचा नसतो का? ती तुला सारखी नावाने बोलावते आणि तू देखील तिला काहीच बोलत नाहीस."  आजी.

"तिला आवडतं हो असं बोलायला आणि मुख्य म्हणजे तिच्या तोंडून  \"आशु\" असं ऐकायला मलादेखील आवडतं.


एक सांगू का आजी, ती मला नावाने हाक मारते त्यामुळे आमच्या नात्यातील रिस्पेक्ट कमी होत नाही हो. उलट आमचं नातं अधिक घट्ट होतेय."


आसावरी हसून म्हणाली तसे त्या आजी तिथून बडबडत निघून गेल्या.


हातातील मोबाईलकडे आसावरीने नजर टाकली. साडेसहा वाजले होते.
आज लेकीसाठी पालकसूप करायचे ठरले होते. उद्या सकाळी गाजराचा हलवा आणि बीटपासून तयार केलेला पराठा हा मेनू होता. घरातील बीट संपलेत हे तिला आठवलं.  परततांना बीट घ्यायचे असा मनात विचार करून तिने हातातील मोबाईल बाजूला ठेवला आणि आपल्या गोडुलीची वाट पाहत बसली.

*******

"एक्सक्यूज मी अंकल, धिज इज माय बॉल!"
हातात चेंडू पकडून उभ्या असलेल्या तरुणाकडे येत ती चिमूरडी म्हणाली.

तिच्या हातून निसटलेला चेंडू त्याच्या पायाला येऊन धडकला म्हणून त्याने तो उचलून धरला आणि तेवढ्यात ती तिथे पोहचली होती.

तिच्या गोड आवाजाने तो तिच्याकडे वळला.

गोबऱ्या गालाची गोऱ्या वर्णाची ती सानुली त्याच्यासमोर उभी होती.डोक्यावर कुरळे काळेभोर लांब केस, त्यांच्या दोन पोनी घातलेल्या. केसांच्या काही बटा कपाळावर आलेल्या. त्याखाली काळ्याभोर रेखीव भुवया आणि टपोरे डोळे, त्या घाऱ्या डोळ्यातील स्थिर नजर त्याच्यावर रोखलेली. ती गोडुली त्याला एखाद्या सुंदर बाहुलीसारखी वाटली. खूप जुनी ओळख असल्यासारखी!

" हेय डॉली! टेक युअर बॉल!"  तिच्याकडे चेंडू फेकत तो म्हणाला.


" ईss! आय एम नॉट डॉली."  आपला चेंडू घेत ती नाक मुरडत म्हणाली.


"ओके लिटल, देन टेल मी व्हाट्स युअर नेम?"  त्यानं चटकन विचारलं.


"माझी मम्मा म्हणते की अनोळखी लोकांना नाव सांगायचं नसतं."

त्याच्याकडे तशीच बघत आपल्या गुलाबी ओठांचा चंबू करून ती म्हणाली.


"ओके, फाईन!"  तो कोरडे हसून जायला वळला.


" पण तुम्हाला बघून असं वाटतंय की मी ओळखते तुम्हाला."
तिच्या शब्दांनी तो थबकला.

"हॅलो! इट्स मी.. छवी!"
त्याच्या पुढ्यात येऊन ती.


"वॉव! खूप सुंदर नाव आहे गं."  हसून तो.


"मला माहितीये."  आपले पिटुकले नाक चोळत ती म्हणाली.


"तुमचे नाव काय?"   आपली घारी नजर त्याच्यावर रोखून तिनं विचारलं.


" मी शेखर!

फ्रेंड्स? "

खाली गुडघ्यावर बसत त्याने तिच्यापुढे हात केला.



"नो!" छवीने जोरात मान हलवली.
"मम्मा म्हणते, अनोळखी लोकांशी फ्रेंडशिप करायची नाही." ती ठामपणे म्हणाली.


"हो गं, तुझी मम्मा खरं तेच सांगते पण आता आपण एकमेकांना ओळखतो ना?" शेखर हसून म्हणाला.

त्याचे ते हसू तिला आवडत होते. हसतांना त्याच्या गालावरची खळी एका अनामिक ओढीने तिला त्याच्याकडे ओढत होती.


"हो, ते पण खरंय. तुम्ही खरंच माझे फ्रेंड बनणार?"  काहीसा विचार करून ती म्हणाली.

" हो पण एका अटीवर हं."  तो.


" अट? ती कसली? "  तिच्या ओठांचा परत चंबू झाला.

तिचे ते गोबरे गाल, गुलाबी ओठांचा चंबू, घाऱ्या डोळ्यातील प्रश्न.. हे सगळे बघून त्याला तिचे लाड करावे वाटले पण त्यानं स्वतःवर आवर घातला.


"अट ही की तू मला अंकल म्हणायचे नाही, फक्त फ्रेंड म्हणायचं."  आपले हसू कायम ठेऊन तो तिला म्हणाला.

ती थोडीशी विचारात पडली.

"का गं, तुला अट मान्य नाही का?"  शेखर.


" तसं नाही पण लोक काय म्हणतील? "  तिच्या ओठांचा परत चंबू झाला. घारे डोळे मोठे झाले.


"काय?"
तिला तसे बघून त्याला हसू येत होते.


" हेच की येवढया छोट्याशा छवीचा एवढाss मोठ्ठा फ्रेंड!"  ती आपल्या हातांनी मोठा आकार करत म्हणाली.


" छे गं असं काही नसतं. फ्रेंडशिप तर फ्रेंडशिप असते. कुणीही एकमेकांचे मित्र होऊ शकतात." तिच्याशी बोलतांना त्याला गंमत वाटायला लागली.

"खरंच?" ती त्याच्याकडे आपले टपोरे डोळे पुन्हा मोठे करून म्हणाली.


"अगदी खरं!" शेखर.


" ठीक आहे मग. पण माझीदेखील एक अट आहे." आपले घारे डोळे मिचकावत ती म्हणाली.

" अरे बापरे! तुझी पण अट आहे होय. बोल तरी." तो.

"माझी एक फ्रेंड आहे ना निशू .. म्हणजे ती फ्रेंड होती. तर तिने ना माझ्याशी कट्टी घेतली आणि ना फ्रेंडशिप पण तोडली. तुम्ही तसे नाही ना करणार?"
त्याच्याकडे इवलेसे तोंड करून बघत ती.


"अजिबात नाही. पण काय गं तिने कट्टी का घेतली?" उत्सुकतेने तो.


"मी ना लास्ट मन्थपासून टिफिनमध्ये फक्त हेल्दी फुड घेऊन जाते तर तिला ते आवडत नाही, म्हणून."
ती काहीशा नाराजीच्या सुरात म्हणाली.

"अरे, मग मला तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी देखील हेल्दी फूड खातो."  तो तिच्या निरागसतेच्या प्रेमात पडत होता.


"होss?" तिच्या पिटुकल्या चेहऱ्यावर केवढा तो आश्चर्य!


"मग फ्रेंड्स?" त्यानं आपला हात पुढे केला.

"पण कायम माझा फ्रेंड राहशील ना? प्रॉमिस तोडणार नाहीस ना?"
तिच्या डोळ्यातील प्रश्न कायम होता.

" नाही गं. पक्का प्रॉमिस. आपली फ्रेंडशिप कायम असेल. कधीच तुटणार नाही. " तो म्हणाला.

तिचा चेहरा फुलला. गोबरे गाल अधिकच गोबरे दिसायला लागले. आपल्या नाजूक हाताने तिने त्याचा हात घट्ट पकडला.


"थँक यू! फ्रेंड."   आनंदाने ती.


शेखरच्या मजबूत हातात छवीचा नाजूक हात होता. तो कोवळा मखमली स्पर्श त्याला आपलासा वाटत होता. ती इवलीशी परी कुणीतरी खूप ओळखीची, जवळची वाटत होती.


"फ्रेंड माझ्या मम्माला भेटशील?"  त्याच्या हातात आपला हात तसाच ठेऊन छवीने विचारलं.


" हो नक्कीच! कुठे आहे माझ्या चिमण्या फ्रेंडची मम्मा?" शेखर.

"चल, मी तुला तिच्याकडे घेऊन जाते." त्याला खेचत ती म्हणाली.

*******

छवी अजून परतली नाही म्हणून तिला आवाज द्यायला आसावरी उभी झाली.
तिच्याकडे नजर गेली तर एका परक्या माणसाचा हात हातात घेऊन छवी काहीतरी बोलत असल्याचे दुरूनच तिला दिसले. ते बघून तिच्या मनात काळजीने कालवाकालव सुरु झाली.

"छवी ss!"

तिने घातलेली साद छवीच्या कानापर्यंत जाऊन पोहचली.

"ये फ्रेंड लवकर चल ना रे, मम्मा बोलवतेय." ती.

शेखर तिच्यासोबत जाणार नेमके त्याच वेळी त्याचा मोबाईल वाजला.

"एक मिनिट हं." असे बोलून त्याने कॉल उचलला.
"काय? आईला ऍडमिट केलंय? कुठे? मी निघालोच."

त्याच्या चेहऱ्यावरचे झरझर बदलणारे भाव ती टिपत होती.

"सॉरी बेटा. मला निघायला हवे. एक इमरजन्सी आहे."
तिचा हात सोडत तो म्हणाला.


"इट्स ओके फ्रेंड! घाबरू नकोस. तुझ्या हार्टवर हात ठेव आणि म्हण,  \"ऑल इज वेल!\"  मग सगळं ठीक होईल."
आपले गुलाबी ओठ रुंदावत छवी.


कुणास ठाऊक का पण तिला मिठी मारण्याचा मोह शेखरला आवरला नाही.

"थँक यू! बाळा. ऑल इज वेल!"

तिच्या गळ्यात आपल्या हातांचा विळखा घालून त्याने तिला पटकन एक आलिंगन दिले.


"निघतो मी. सी यू सून!" म्हणून तो निघालाही.


"बाय-बाय फ्रेंड!" ती हात हलवत जाणाऱ्या त्याला तशीच पाठमोरे बघत उभी होती.

क्रमश :

************
पुढील भाग लवकरच!

कोण आहे ही पिटुकली छवी? कसा असेल तिचा प्रवास? कळण्यासाठी वाचत रहा माझी नवी कथामालिका..
पाहिले न मी तुला..!

नव्या कथेची ही सुरुवात. पारिजात प्रमाणे ही कथा देखील तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.

ह्या कथेची ही सुरुवात, हा पहिला भाग कसा वाटला कमेंट आणि लाईक करून नक्की सांगा. आपल्या फेसबुक पेजवर देखील लाईक करायला विसरू नका.
धन्यवाद!

*********
वाचक मित्र मैत्रिणींनो, साहित्यचोरी हा गुन्हा आहे. कोणतेही लेखक काही लिहितात तेव्हा त्यांचा वेळ, त्यांची विचारशक्ती, कल्पनाशक्ती ह्या सगळ्यांचाच कस लागत असतो. मी एखादी मुरलेली लेखिका नाहीये तरीदेखील एक आवड म्हणून वेळात वेळ काढून लिहितेय आणि आपण लिहिलेले लेख कोणीतरी दुसरेच जेव्हा त्यांच्या नावाने पोस्ट करतात तेव्हा मनाला खूप वेदना होतात. मी नुकतीच लिहिलेली पारिजात ही कथामालिका तुम्हाला आवडली त्याबद्दल सर्वांचेच आभार. पण इतक्या मेहनतीने लिहिलेल्या माझ्या ह्या कथेत काही बदल करून त्याची तयार केलेली लघुकथा नुकतीच माझ्या वाचनात आलीय. हे चुकीचे आहे. तुम्हाला पोस्ट किंवा शेअर करावेसे वाटले तर मूळ लेखकांच्या ओरिजनल पोस्टची फेसबुक लिंक शेअर करा, त्याचा मलाही आनंदच होईल पण कृपया साहित्यचोरी करू नका नाहीतर त्याविरुद्ध ऍक्शन घेण्यात येईल.
धन्यवाद!
**********************************

🎭 Series Post

View all