Mar 04, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला..! भाग -5

Read Later
पाहिले न मी तुला..! भाग -5

पाहिले ना मी तुला..!
भाग - पाच.

तिचा हुंदका दाटून येत होता. 'आसावरी डोन्ट बी पॅनिक! साधाच ताप असेल. काळजी करू नको. ऑल इज वेल!'  ती स्वतःलाच समजावत होती.
छवीशेजारी ती पहुडली.
उगवणाऱ्या उद्याकडे तिचे डोळे लागले होते.


"काय गं? रात्री झोपली नाहीस का? डोळे का सुजलेत तुझे? आणि छवीची शाळा नाहीय का?"

"काकू रात्री तिच्या अंगात ताप होता म्हणून आज शाळेला सुट्टी. तिला दवाखान्यात घेऊन जाते."

"आठ दिवसांपूर्वीच तर गेला होतात ना? सारखं सारखं काय होतंय लेकराला?"

"हं, तसेही आज जायचं होतंच." ती.

"एकदा चांगल्याने चेकअप करून घे गं बाई. वारंवार त्रास होतोय माझ्या गुलाबाला." रजनीताईंचा चेहरा काळजीने ओढल्यासारखा झाला.

"हम्म!" तिने बळेच ओठांवर हसू आणले.

"आणि ऐक, तू आधी फ्रेश होऊन ये तोवर मी चहा टाकते. स्वयंपाकाच्या मागे लागू नकोस, मी करते."

"काकू कशाला? मी पटापट आवरते ना." ती.

" रात्रभर काळजीत होतीस हे तुझ्या डोळ्यांवरून कळतं बरं का मला. जा तुझे आवरून ये."

*******

" काय गं पिल्लू आता कसं वाटतेय?" छवीसाठी गरम दूध आणत रजनीताईंनी विचारले.

" आजी मी बरी आहे गं, फक्त पाय तेवढे दुखत आहेत." कोमेजल्या चेहऱ्याने छवी.

"हे गरम गरम दूध पी मग बरं वाटेल माझ्या बाळाला."
त्यांनी तिच्यापुढे दुधाचा ग्लास ठेवला.

" आजी दुध नको गं. मला ना काही खायची ईच्छाच नाहीये."

"अरे मग माझे बाळ स्ट्रॉंग कसे होईल? तुला दुसरे काही खायचे आहे का? सांग. मम्मा लगेच बनवून देते." तिच्याजवळ येत आसावरी.

"नाही गं आशू. मला ना बेडवरच रहावंस वाटत आहे."

"बरं तू आणखी थोडावेळ आराम कर. मग मी छान काजू, बदाम टाकून तुला आवडणारा गूळ घातलेला शिरा करते हं. आज आपल्याला डॉक्टर काकांकडे जायचे आहे ना?"
तिच्या अंगावर चादर टाकत आसावरी.

"परत? नको ना गं मम्मा. प्लीsज?"
तिच्याकडे आपले घारे डोळे वळवून ती.

" अगं राणी. आपण फक्त त्यांना भेटून येऊया. माझ्या गोडुलीला कोणते जर्म्स त्रास देतात ते कळायला नको का?" तिच्या डोक्यावर हात फिरवत आसावरी.

"हम्म! ओके."

"डोन्ट वरी! मी आहे ना." आसावरीने तिच्या गालावर पापी दिली.

********

" आसावरी मी येऊ का गं तुमच्या सोबतीला? घरी राहून मला चैन पडणार नाही गं."
छवीला घेऊन निघालेल्या आसावरीला रजनीताई विचारत होत्या.

"काकू, तुमच्या मनाची काळजी मला कळतेय हो. पण नका येऊ ना. काही असेल तर मी कळवेन ना तुम्हाला. हं?" तिने त्यांचा हात हातात घेतला.

"हूं." त्यांनी मान हलवली. "डॉक्टरांना नीट सांगायचं रे पिल्ल्या. मम्माला त्रास नाही द्यायचा." त्या आपल्या गुलाबाला सांगत होत्या.

"हो गं आजी. मी आता मोठे झाले ना. सांगेल सगळं नीट. बाय!"
कारमध्ये बसत छवीने त्यांना बाय केले.

त्यांनीही आपले हात हलवले. कार पुढे निघून गेली तरी त्या तिकडे पाहतच होत्या.


"देवा, माझ्या गुलाबाला सदैव टवटवीत राहू दे रे आणि आसावरीच्या आयुष्य थोडेतरी सुख येऊ दे."
निरंजनातील वात नीट करत रजनीताईंनी देवापुढे साकडे घातले.

*******

"गुडमॉर्निंग दादू."

"गुडमॉर्निंग पल्ली! एवढ्या सकाळी सकाळी माझ्या खोलीत काय करते आहेस?" डोळे मिटून त्याने विचारले.

"डिअर ब्रो, सकाळचे अकरा वाजलेत. अजून उठला नाहीस म्हणून मामीने मला तुझ्याकडे पाठवले."

"अकरा वाजलेत?" डोळे उघडून तो उठून बसला
.
" आणि हे काय? एवढी नटून कुठे निघालीस? " तिच्याकडे त्याने आश्चर्याने बघितले.


पायात जीन्स आणि त्यावर गडद निळ्या रंगाची फुलांची प्रिंट असलेला पांढऱ्या रंगाचा टॉप तिने घातला होता. चेहऱ्यावर हलकासा मेकअप, हातात ब्रेसलेट येवढया साध्याशा तयारीत सुद्धा ती सुंदर दिसत होती.

पल्लवी गोड हसली.

"एकटी नाही, तुला सोबत घेऊन जाणार आहे. चल लवकर आटप."

" अगं पण कुठे?"

"हॉटेलिंग ला!"

"नको गं, प्लीज!"

"दादू प्लिsज? आज माझ्याकडून तुला ट्रीट समज. आता नाही म्हणू नकोस. तुझे आवरून पंधरा मिनिटात खाली ये."  ती बाहेर जात म्हणाली.


शेखरला कुठे जायची ईच्छा नव्हती पण नाईलाजाने तयार होऊन दिलेल्या वेळात तो हॉल मध्ये आला.

"वॉव! दादू काय हँडसम दिसतो आहेस? सगळ्यांच्या नजरा तुझ्याकडेच असणार बघ." घराबाहेर पडता पडता ती हसत म्हणाली.

स्मिता आणि नयनाताई दोघीही त्याच्याकडे बघत होत्या.

"स्मिता, बघतेस ना किती गोड दिसतोय तो. त्याच्याच आयुष्यात असं का व्हावं गं?" त्यांनी डोळ्याला पदर लावला.

"वहिनी तू अजिबात काळजी करू नकोस गं. तो इथे आलाय ना परत, आता बघ कशी वर्षभरात त्याचं लग्न लाऊन देते ते." स्मिता.

"पुन्हा तुम्हा दोघींचा तोच विषय झाला का सुरु?" बाजूला पेपर वाचत असलेले विनायकराव.

" दादा तू गप रे. तुला काही कळत नाही. एकदा लग्न झाले ना की मग बघ कसा खुश असेल तो. " स्मिता.

" स्मिता योग्य तेच बोलतेय हो "  नयनाताई.

"तुम्हा दोघींना जे करायचे ते करा पण एक लक्षात ठेवा की इतक्या दिवसांनी लेकरू घरी परतलाय आता पुन्हा त्याला हरवायची हिंमत माझ्यात नाहीय."   विनायकराव.

********

"मॅडम तुमचा नंबर आलाय. सरांनी आत बोलावलंय." रिसेप्शनीस्ट नर्स.


"ओके, थँक यू." म्हणून आसावरी छवीला डॉक्टरांच्या केबिनमध्ये घेवून गेली.

'डॉक्टर निशांत!' शहरातील एक नामांकित बालरोगतज्ञ. एकदम कूल अँड काम असे व्यक्तिमत्व. बुद्धीने तेवढेच तल्लख!

आत गेल्यावर आसावरीने त्यांना आधीची फाईल आणि रेफरिंग लेटर दाखवले. त्यांनी एकवार सगळ्या रिपोर्ट्स वरून नजर टाकली.

"हॅलो छवी! काय झालंय बाळा तुला?"
त्यांनी छवीकडे हसून बघून विचारले.

"डॉक्टर अंकल तुम्ही मला इंजेक्शन तर देणार नाही ना? "
आपले घारे डोळे त्यांच्यावर रोखत तिने विचारले.

" नाही गं, फक्त चेक करणार हं. इथे झोप बघू. "


आसावरीने तिला एक्झामीन टेबलवर झोपवले.


"वाह! डोळे कसले भारी गं तुझे? घारे घारे! अगदी मनीमाऊसारखे हं!
मियाँव मियाँव.."
तिचे डोळे चेक करत डॉक्टर बोलले आणि ती खुदकन हसली.

"जीभ दाखव.. मला चिडवू नकोस हं.
चला मानेजवळ काही आहे का?"  त्यांनी तिथल्या ग्रंथी तपसल्या.

"छोटूशा छवीचे छोटूसे लंग्स तिला नीट ऑक्सिजन देतात की नाही? बघायला हवे." म्हणून त्यांनी छाती तपासली.

नंतर त्यांनी आपला स्टेथो तिच्या पोटावर ठेवला.
" अरे, पोट काय म्हणतंय? पिझ्झा.. बर्गर..? काय गं आवडते नं तुला? "
तिच्याकडे बघून डोळे मिचकावत त्यांनी विचारले.

"हो. मला खूप आवडतं. पण आधीचे डॉक्टर बोलले होते की हे नाही खायचे तेव्हापासून मम्मा ना टिफिनला पण हेल्दी फूड देते."

" अरे व्वा! हुशार आहेस गं तू. तसे तुझे पोट सांगतोय मला की छवी आता फक्त हेल्दी फूड खाते."

खरंच तुम्हाला हे कळतं?"
त्यांच्याशी बोलतांना तिला मजा वाटत होती.

" हो तर!" त्यांनी मग हाताने तिचे पोट तपासले.
" दुखते का रे बाळा इथे? "

"हं. थोडंसं. माझे पाय ना लवकर थकतात आणि मग दुखायला लागतात. मी खूप मस्ती करते म्हणून का?" निरागसपणे ती.

"हम्म! त्याचं कारण तर आपल्याला शोधावे लागेल." तिला खाली घेत ते म्हणाले.

बेल वाजवून त्यांनी नर्सला आत बोलावले. रक्ताच्या तपासणीसाठी छवीच्या रक्ताचा नमुना घ्यायचा होता.


" डॉक्टर अंकल, तुम्ही मला इंजेक्शन देणार नाही म्हणालात ना? " नर्सच्या हातातील सुई बघून ती म्हणाली.


"इकडे ये. हे बघ मी तुला एक गंमत दाखवतो." आपल्या लॅपटॉपवर एक अनिमेटेड व्हिडीओ सुरु करत ते म्हणाले.

"काय आहे हे? " डोळे मोठे करून ती.

हे ना तुझ्या बॉडीमधील ब्लड वेसल्स म्हणजे पाईप आहेत. त्यात तुला ह्या लाल रंगाच्या पेशी दिसत आहेत? त्या ना तुझ्या बॉडी पार्ट ला ऑक्सिजन पोहचवतात आणि हे बघ ह्या पांढऱ्या रंगाच्या पेशी. ह्या आहेत तुझ्या शरीरातील सोल्जर्स! तुला कसले इन्फेक्शन होऊ नये म्हणून त्या तुझ्यावर हल्ला करणाऱ्या जर्म्ससोबत लढाई करतात."

"माझ्या बॉडीमध्ये एवढंss काही आहे हे तर मला माहीतच नव्हतं." माहितीचा खजिना मिळाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आश्चर्यबरोबर आनंद होता.

डॉक्टर तिच्याशी बोलत असतांना नर्सने कधी रक्त काढले तिला कळले नाही. तिचे आणि डॉक्टरांचे बॉण्डिंग बघून आसावरीला हायसे वाटत होते.


" डॉक्टर, यू आर अमेझिंग. किती छान हॅन्डल केलंत छवीला. थँक यू सो मच!"
आसावरी.

"त्यात थँक्स कसले? इट्स माय ड्युटी. पुढे जर कधी हॉस्पिटलला यायचे झाले तर भीती वाटायला नको ना.
काय गं परी? तुला आता भीती वाटत नाहीये ना? "

"नो डॉक्टर. तुम्ही खूप चांगले आहात."
ते हसले.

" बरं तुम्ही थोडावेळ बाहेर बसा. अर्ध्या तासाने रिपोर्ट्स आले की परत बोलवेन." डॉक्टर.

त्या दोघी बाहेर वेटिंग रूममध्ये जाऊन बसल्या.
*******


"दादू, बोल तू काय खाणारेस? "
त्याच्यापुढे मेनुकार्ड ठेवत पल्लवी.

"तू जे ऑर्डर करशील ते चालेल."

"काय रे दादू तू पण."

तो निर्वीकार हसला.

तिने जे ऑर्डर केले ते त्याने निमूटपणे खाल्ले. त्याच्या वागण्यातला रुक्षपणा तिला नकोसा झाला होता.

"कॉफी घेशील?" पल्लवी.

"हं?" तो.

"कॉफी घेशील काय असं विचारतेय. कारण तू उठला आहेस पण तुझा मेंदू अजूनही झोपेतच आहे."

"चालेल."

दोघांनी कॉफी पिल्यावर तिने विचारले,
" सांग दादू आज काय स्पेशल आहे? "

त्यानं प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे पाहिले.

कॉफी पिऊनदेखील तुझा मेंदू झोपलेलाच आहे ना?" खट्टू होत ती.
"नाही गं आठवत. " तो.

"दादू अरे आज माझा हॅपीवाला बर्थडे आहे. विसरलास ना?" ती नाराजीच्या सुरात म्हणाली.

"पल्ली यार, एक्सट्रीमली सॉरी गं! माझ्या लक्षातच राहिले नाही."
आपले कान पकडत तो.

"इट्स ओके ब्रो! ह्या वेळेस सोडले. पण नेक्स्ट टाइम चालणार नाही हं." पल्लवी.

"तुझा बर्थडे ना?मग मी बिल पे करणार." वेटरने आणून ठेवलेला बिलाचा कागद हातात घेत तो.

नाही दादू. मी तुला ट्रीट दिलीय, मीच पे करणार." त्याच्या हातातील कागद खेचत ती.

त्या पकडापकडीत पल्लवीचा हाताने टेबलवरचा काचेचा ग्लास खाली पडला.

"ओह! सॉरी!" म्हणून ती ते उचलायला गेली तर काचेचा मोठा तुकडा तिच्या हातात रुतला.
" ऑ ss!" ती वेदनेने कळवळली.

"पल्ली, हाताला किती रक्त येतेय. पटकन काहीतरी करायला हवे."
आपल्या रुमालाने तिचा हात बांधत तो.

"चिल ब्रो, इतका पॅनिक होऊ नकोस. एक इंजेक्शन नी बँडेज केले की होऊन जाईल." ती.


बिलाचे पैसे देऊन शेखर तिला घेऊन बाहेर आला.
" चल, पटकन कारमध्ये बस. आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया." तो.

" दादू, समोर बघ केवढं मोठ्ठ हॉस्पिटल आहे. तिथेच जाऊया. " समोरच्या हॉस्पिटलकडे बोट दाखवत ती.

"हातासोबत तुझ्या डोक्याला पण लागलं काय गं ? ते चाईल्ड हॉस्पिटल आहे." तिच्या डोक्याला एक टपली मारत तो.

अरे तर काय झालं? तिथे काम करणारी एक नर्स माझ्या मैत्रिणीची मैत्रीण आहे. तिथेच जाऊयात."
त्याचा हात खेचत ती.

"मला वाटले की तिथले डॉक्टर तुझ्या ओळखीचे आहेत." कपाळावर हात मारत तो.

"डॉक्टर तसे ओळखीचे नाहीत. पण खूप चांगले आहेत, असे ऐकून आहे. वन ऑफ द बेस्ट पेडियाट्रीशियन! 'डॉक्टर निशांत..' बस नाम ही काफी है!"

बोलत बोलत दोघे आत पोहचले. तिच्या ओळखीची नर्स तिला भेटली आणि त्याला तिथेच थांबवून ती तिच्यासोबत मलमपट्टी करायला गेली.
.
.
.
क्रमश :
**********
वाचक मित्र मैत्रिणींनो कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर कमेंटसोबत लाईक देखील करा.
तुमचे लाईक्स आणि कमेंट म्हणजे लिखाण आवडल्याची पोचपावती असते. ती पोचपावती मिळाली की पुढे लिहायला पुन्हा हुरूप येतो. तेव्हा खुप सारे लाईक करत रहा. कथा शेअर करावीशी वाटली तर फेसबुक पेजची लिंक शेअर करू शकता.
धन्यवाद!

साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेखक आपल्या कल्पनांना आकार देऊन कथा लिहीत असतात. त्यामागे त्यांचा वेळ, मेहनत असते. त्यामुळे कथेतील प्रसंग, पात्र यांचा कुणीही गैरवापर करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
धन्यवाद!
**********

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//