Feb 28, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला..! भाग -9

Read Later
पाहिले न मी तुला..! भाग -9

पाहिले न मी तुला..!  भाग - नऊ.तिचं रडू काही थांबेना. रडता रडता अचानक तिला आईने दिलेला कागदाचा चिटोरा आठवला.


"मामा आईने जाण्यापूर्वी ना तुला हे द्यायला सांगितले होते." फ्रॉकच्या खिशातील कागद काढून तिने त्याच्या हाती दिला.


त्याने तो कागद डोळ्यासमोर धरला आणि डोळ्यात आसवांची गर्दी व्हायला लागली.

"दादा, तुझी लता फुटक्या नशिबाची निघाली रे. नवरा गेला अन सगळ संपलं. तुझ्या संसारात आम्हा दोघींची भर पडलीय. तुझीही चादर फाटलेली, त्यात आमचा भार! तू काही बोलत नसलास तरी कळते ना. म्हणून मी जात आहे. कुठे? ते नाही माहीत. पण आता परत येणार नाही. उगाच शोध घेत फिरू नकोस. आसावरीला जीव लाव. योगेशच्या घासातील अर्धा घास तिला दिलेस तरी पुरे! मी येईल ही वेडी आशा त्या चिमणीला दाखवू नकोस. आता कधीच नाही यायची मी.

 वाचता वाचता त्याचे डोळे काठोकाठ भरून वाहू लागले. समोरची अक्षरं धुसर झाली.


"काय हो? काय लिहिलेय त्या कागदावर?" मंदा जवळ येत म्हणाली.

खाटेवरची म्हातारी आई त्यांच्याकडे आशेने पाहत होती. मुकुंदा काही न बोलता बाहेर आला. बाहेर आकाशात तांबडे फुटत आले होते. पक्षांचे चिवचिवत उडणारे थवे सकाळ झाल्याची ग्वाही देत होते.

पायात वहाणा चढवून त्यानं सायकल काढली.


"अहो, उठल्या उठल्या कुठं निघालात?" पाठीमागून मंदा विचारत होती.


"मामा, आई कुठे आहे?" त्याच्या मागोमाग आलेल्या निरागस आसावरीचा निष्पाप प्रश्न त्याच्या हृदयाचा ठाव घेत होते.

तो काही बोलणार तोच एकच गलका कानावर आला, "राम्याच्या आडात उडी मारून लतिनं जीव दिलाss."

त्या गलक्यानं पोटात एकदम धस्स झाले.


"काही काय बोलताय?"  मुकुंदा त्यांच्याजवळ येत बोलला.


"खरं तेच बोलतोय मुकुंदा, मी आपल्या डोळ्यांनी पाहिलंय." गर्दीतून कोणीतरी म्हणाले.

त्यांच्याकडे लक्ष न देता सायकल घेऊन तो रामाच्या शिवारात गेला. शेतातील विहिरीपाशी गर्दी जमली होती. त्या गर्दीला बाजूला सारत तो जवळ गेला. आत डोकावून पाहिलं तर पाण्यावर एक मृतदेह तरंगत होता. त्याचा डोळ्यावर विश्वास बसेना, खरोखरीच ती लता होती. त्याने एक पाऊल मागे टाकले आणि मटकन खाली बसला.

 "लता, का केलेस असं? लहानग्या आसावरीचा तरी विचार करायला हवा होतास ना!" मुकुंदा रडत होता.


गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली

 पोलीसपाटलाच्या साक्षीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. तोवर तालुक्यातील पोलीस आले. घटनेचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी लताचा देह सरकारी रुग्णालयात हलविण्यात आला.


ह्या घटनेने छोट्या आसावरीच्या आयुष्याला जणू ग्रहण लागले होते. आधी बाबा आणि नंतर पंधरा दिवसात आई तिला सोडून गेली. आईच्या आठवणीने व्याकुळ झालेला छोटा जीव तिच्या अंत्यदर्शनाने मात्र घाबरून गेला. रात्रभर पाण्यात राहिल्यामुळे लताचा देह पाण्याने फुगला होता.एरवी किडमिडीत असणाऱ्या लताचा चेहरा तिला वाजवीपेक्षा मोठा आणि भयंकर दिसला. ते बघून तिने एक आर्त किंकाळी मारली आणि मामाच्या मागे जाऊन दडून बसली.


लोक लाजेखातर मामीने डोळ्यातून चार अश्रू ढाळले पण आसावरीचे लोढणे आता कायमचे आपल्या मागे लागलेय या विचाराने रागाने तिच्या अंगाची लाही होत होती. मामामागे दडलेल्या आसावरीकडे तिने रागाचा एक कटाक्ष टाकला तशी ती बिचारी चिमणी अजूनच बावरून गेली.


रात्री डोळे पुसून मुकुंदाने पुन्हा तो कागदाचा चिटोरा डोळ्यापुढे धरला. आपली बहीण किती हतबल झाली होती याची जाणीव त्याला होत होती. 'योगेशच्या घासातील अर्धा घास तिला दिलेस तरी पुरे!' तिने लिहिले होते. त्या अक्षरावरून नजर फिरली आणि त्याने आसावरीकडे पाहिलं. आपल्या लहानशा शरीराचं मुटकुळं करून ती एका कोपऱ्यात निजली होती. रडून रडून तिचा चेहरा पार सुकून गेला होता.


"आसावरी, ए चिमणे ऊठ! थोडे जेवण कर रे बाळा." तो तिला उठवत होता.


"जाणारे तर आपल्या जीवानिशी गेले आणि आमच्या गळ्यात मात्र ही ब्याद बांधून ठेवली." मंदा जरा मोठयानेच पुटपुटली.


"अगं थोडे तरी भान ठेव, लता जाऊन दोन दिवस होत नाहीत तर तू अशी वागायला लागलीस?" मुकुंदा तिच्यावर खेकसला.


"कशी वागतेय? आणि मी चुकीचे असे काय बोलले? आधीच म्हातारी खाटेवर पडलीय आणि वर हिची जबाबदारी. नाही होणार माझ्याच्याने. हे लोढणं मला गळ्यात अडकवता नाही यायचे." तिचा आवाज चांगलाच वाढला होता.


सपाकss!

तिच्या गालावर मुकुंदाची पाचही बोटे उमटली.

"लोढणं, ब्याद.. काय काय बोलतेस गं? तुझ्या लेकावर अशी वेळ आली असती तर तेव्हाही हेच बोलली असतीस का?"


"ह्या दिडदमडीच्या जीवासाठी माझ्यावर हात उगारला ना? पाहिलंत, इथे आल्याबरोबर आपल्यात कशी भांडणं लाऊन स्वतः खुशाल झोपली आहे? आणि माझ्या मुलाला मध्ये आणायचे नाही आधीच सांगून ठेवते. हिच्या आईसारखी भ्याड नाहीये मी. माझ्या मुलाला सांभाळायला समर्थ आहे.

हिच्या आईने काय केलं? सासरी सगळ्यांना जीव लावला आणि स्वतःच्या संसाराची राख रांगोळी करून टाकली. तेवढ्यावरच ती बया कुठे थांबणार? माझ्या संसारात विष कालवायला हिला ठेवलेच की मागे. आता मी हिच्यावर जीव लाऊ आणि माझ्या संसाराचं वाटोळं करू?" मंदा रागाने तोंडाला जे येईल ते बोलत होती.


तिचे ते रूप पाहून तो वरमला. "मंदा, अगं काही काय बोलतेस? तसेही आपल्याला मुलगी नाही आहे तेव्हा हिलाच आपली लेक मानून केलं तर काय बिघडेल? झाली तर तुलाच मदत होईल. थोडी मोठी झाल्यावर तुझ्या कामात हातभार लावेल, अंगणात सडा घालेल, धुणी भांडी करू लागेल.

आपला योगेश हिच्यापेक्षा चार वर्षांनी मोठा, पण त्याची काही मदत आहे का? साधा पेलाभर पाणी देखील स्वतःहून घेत नाही का दुसऱ्याला देत नाही. ही पोरीची जात, तुझ्या नक्कीच उपयोगी पडेल. बघ, हिला इथे ठेवायचे की नाही याचा आता तूच विचार कर." त्यानं हुशारीने हळूच चेंडू तिच्या दिशेने भिरकावला.

मुकुंदा बोलत होता. मंदा मात्र आपल्या विचारात गुंतली होती. तिच्या डोळ्यापुढे तिला आवडणारे चित्र उभे होत होते..

.. सकाळ झालीय. आसावरी घर अंगण झाडून स्वच्छ करतेय. सगळ्यांच्या आंघोळी आटोपल्यात, आता धुणी धुतेय.

.. दुपार झालीय. मंदा आपले जेवण उरकून निवांत बसलीय, आसावरी सगळी उष्टी खरकटी साफ करतेय.

 'अगं ये, हात चालव ना भरभर. माझे पाय केव्हा चेपणार आहेस?' तिच्याकडे मोठे डोळे करून मंदा ओरडतेय. ती देखील भित्र्या मांजरासारखी पटापट भांडी उरकून तिचे पाय चेपायला आलीय.

 'अहाहा! तिच्या छोट्या छोट्या हातांचा कसला मुलायम स्पर्श! असं वाटतंय की दिवसभर हिच्या हातांनी मसाज करून घ्यावी.'  मंदाचा चेहरा त्या विचारानेच फुलला. चेहऱ्यावर एक हसू उमटले.. छद्मी हसू!


"काय गं? मी म्हणतोय ते तुला पटतेय ना?" मुकुंदाच्या बोलण्याने ती आपल्या कल्पनाविश्वातून परत आली. तिची मुद्रा प्रसन्न दिसत होती.


"ठीक आहे, एवढे म्हणताय तर राहू देत इथे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझ्या मुलासोबत हिची बरोबरी करायला जाऊ नका." ती म्हणाली.


मंदाचा होकार ऐकून मुकुंदाला बरे वाटले. तिच्या दुष्ट मनसुब्याची त्याला कुठे कल्पना होती?


******

लताला जाऊन आता आठवडा लोटला होता. अंगाची काहीली करणारा मे महिना सरला होता. मृगाच्या वाटेवर सगळ्यांच्या नजरा लागून होत्या आणि एक दिवस धरणीला तृषार्त करणाऱ्या जलधारा बरसू लागल्या. शेतकरी सुखावला. आता शेतीची कामं जोर धरू लागली होती. वेळेवर कोसळलेल्या पावसाने सगळीकडे आनंद होता. ह्या सुखद वातावरणात मात्र एक कोवळा जीव भरडला जात होता. एक बालपण करपत होते!


भल्या सकाळीच मुकुंदा शेतीच्या कामाला निघून जायचा, आजदेखील तो गेला होता. छोटी आसावरी चटईवर निजली होती. अचानक तिच्या चेहऱ्यावर पाण्याची धार कोसळली. ती कावरीबावरी होऊन उठून बसली. चेहरा पूर्णपणे ओला झालेला होता. कपड्यावर पाणी उडाले होते. तिला वाटले पाऊस आला की काय? बघते तर समोर मामी उभी! हातात पाण्याचा रिकामा तांब्या. ओठांवर तेच छद्मी हसू!


"मामी.. माझ्या अंगावर तू पाणी का टाकलेस? मी झोपले होते ना." तिचा चेहरा रडवेला झाला होता.


"म्हणूनच तर तुला उठवत आहे ना? आणखी किती वेळ झोपणार आहेस? ऊठ मला कामं करायला मदत कर."


आसावरीला आईची आठवण झाली. तिला हाका मारून लता थकून जायची, आसावरी डोळे मिटून राहायची पण हाकेला काही 'ओ' द्यायची नाही.

'लबाड गं माझं बाळ! नीज गं चिमणे थोडावेळ!'  म्हणून लता मग तिच्या अंगावरची गोधडी नीट करून पुन्हा काहीवेळ झोपू द्यायची.


आई आणि मामीतील फरक त्या जीवाला कळत होता. ती उठून उभी राहिली. ओला झालेला चेहरा हाताने पुसून काढला. तिचे डोळे पाणवले. तिची अवस्था बघून योगेश फिदिफिदी हसत होता.

.

.

.

क्रमश :

*******


नियतीने आसावरीच्या आयुष्यात आणखी काय वाढून ठेवलंय? कळण्यासाठी वाचत रहा कथामालिका, पाहिले न मी तुला..!


कथेचा हा भाग कसा वाटला ते आपले कंमेंट आणि लाईक द्वारे नक्की कळवा. आपल्या ईराच्या पेजवर लाईक करायला विसरू नका.साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेखक आपल्या कल्पनांना आकार देऊन कथा लिहीत असतात. त्यामागे त्यांचा वेळ, मेहनत असते. त्यामुळे कथेतील प्रसंग, पात्र यांचा कुणीही गैरवापर करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

धन्यवाद!ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//