पाहिले न मी तुला..! भाग -7

लढाई.. छवीच्या जीवघेण्या आजाराशी!

पाहिले न मी तुला..! भाग - सात."काकू अहो, इथे पेशंट जवळ जास्त लोकांना जमण्यास मनाई आहे. नका येऊ ना." त्यांना समजावत ती.

"जास्त वेळ नाही थांबणार गं बाई. पण माझ्या गुलाबाला एकवार बघायचे आहे. येते ना गं." त्यांच्या आवाजातील आर्जव थेट तिच्या काळजाला जाऊन भिडले.

"ठीक आहे पण छवीपुढे आसवं गाळायची नाहीत हं."
या अटीवर तिने त्यांना यायला होकार दिला.

रिसेप्शनवरदेखील तिने सांगून ठेवलं, "छवीची आजी आली तर छवीला काय झालेय हे सांगू नका."

रजनीताईंना हा धक्का सहन होणार नाही हे तिला चांगलेच ठाऊक होते.

*******

"दादू, मघापासून बघतेय, फ्रेश दिसतोहेस. काही स्पेशल?"


कार चालवत असलेल्या शेखर कडे बघून पल्लवी विचारत होती. तिचे म्हणणे खरे होते. शेखरचा चेहरा सकाळपेक्षा बराच खुलला होता." हम्म! स्पेशल तर आहेच. आज माझ्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आहे ना! पल्लवीच्या वाढदिवसाने माझ्याही मनाला प्रसन्नतेची पालवी फुटलीय."  हसून तो.


"चल, खोटं बोलू नकोस हं! माझा बर्थडे तर तू विसरला होतास आणि जेव्हा कळले तेव्हाही काही फारसा हॅपी नव्हतासच. हॉस्पिटल मध्ये कोणीतरी भेटलं, ज्यामुळे तू आनंदी आहेस. हो ना?" त्याच्याकडे बघत ती.

नकळत त्याच्या ओठांवर स्मित फुलले.

" हं. यू आर राईट! माझी एक फ्रेंड भेटली तिथे." तो.


" खरंच? कोण? ती रिसेप्शनीस्ट?" आश्चर्याने ती.


" नाही गं. तिच्यासमोर बसलेली ती छोटूशी गोड मुलगी होती ना? ती."


" काहीही हां ब्रो! मी लहान आहे म्हणून मला उल्लू बनवू नकोस. एवढी छोटी मुलगी तुझी मैत्रीण कशी असणार?" पल्लवी.


" पल्ली, मैत्री काय कुणाशीही होऊ शकते. ती मला कालच भेटली होती."


" काल? कुठे एअरपोर्टला? " ती.


"नाही गं. एका पार्क मध्ये." हसून तो.


" "काल तू पार्कमध्ये गेला होतास? एकट्याने?" तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य.


"हम्म! एअरपोर्टवर उतरल्याबरोबर वाटलं जिथे अनु आणि मी पहिल्यांदा डेटवर गेलो त्याच ठिकाणी पुन्हा जाऊन इथले आयुष्य सुरु करावे. म्हणून गेलो होतो." त्याचा आवाज हळवा झाल्याचे तिला जाणवले.


" सॉरी दादू! मला तो विषय नव्हता काढायचा. " ती.


" नाही गं, तू का सॉरी म्हणतेस? त्या बागेमध्ये आमच्या आठवणींच्या काही पाऊलखुणा सापडतील म्हणून गेलो होतो, त्या तर सापडल्या नाहीत पण ती गोंडस परी भेटली आणि पहिल्या भेटीतच माझी मैत्रिण झाली. "


छवीबद्दल बोलतांना त्याच्या डोळ्यात  वेगळीच चमक तिला जाणवत होती.


ती त्याच्याकडे तल्लीन होऊन पाहत होती. हा आनंद, ही चमक कालपासून पहिल्यांदा अनुभवत होती.

त्याने ब्रेक मारला तशी ती भानावर आली.

" बहिणीसाहेब उतरा!"

" काय झाले? " गोंधळून ती.

" डफर, तुझे डेस्टिनेशन आलेय. ह्याच हॉटेलमध्ये तुम्हा फ्रेंड्सची पार्टी आहे नं?" तो.


" ओह! इतक्यात आले पण? दादू तू सुद्धा चल ना. आमच्यासोबत जॉईन हो."


" नको गं. मी घरी जाऊन झोप काढतो. तुझं आटोपले की कॉल कर, मी घ्यायला येऊन जाईन."


"नक्की?"


" हो, बाय! अँड एन्जॉय!" त्याने घराच्या दिशेने कार वळवली.

*******


"माझा गुलाब किती सुकलाय गं!"

कितीही प्रयत्न केला तरी रजनीताईंच्या डोळ्यातून दोन अश्रू बाहेर डोकावलेच.


"अगं आजी, एवढं काही नाही झालेलं. आय एम अ स्ट्रॉंग गर्ल!" छवी.


"हो, आहेच माझं पिल्लू स्ट्रॉंग!"
त्यांनी स्वतःला सावरले. काही वेळ तिथे थांबल्यानंतर इच्छा नसतानाही घरी परतल्या.


"बाळकृष्णा, एवढ्याशा जीवाला का रे त्रास सहन करायला लावतो आहेस? कसल्या चुकीची तिला ही शिक्षा?


आणि आसावरी? तिच्या मागे कसली रे ससेहोलपट लावली आहेस. ती काही सांगत नसली तरी पोर दुःखात आहे रे. तिची पुन्हा परीक्षा घेऊ नको ना रे!"

आपल्या बाळकृष्णापुढे बसून रजनीताई आसवं गाळत होत्या. देव्हाऱ्यातील ती प्रतिमा दिव्याच्या स्निग्ध प्रकाशात उजळून निघाली होती. तो लबाड बाळकृष्ण आपल्याकडे बघून हसतोय असे त्यांना वाटले.

" तुला माझी अवस्था बघून हसायला येतेय? हस बाबा! पण लक्षात ठेव, मी अशी सहजासहजी हार मानणारी नाहीये. एवढा दुःखाचा डोंगर पार केलाय. आता कितीही संकट आले तरी आसावरीच्या पाठीशी भक्कमपणे मी उभी राहीन. अशी रडत नाही बसणार!"

त्यांनी आपले डोळे पुसले. तसेही तिन्ही सांजेचे रडू नये म्हणतात. त्यांनी दिव्यात तेल घातले आणि आपले हात जोडले.

" शुभं करोती कल्याणं
आरोग्यम धन संपदा..!"

आज त्या एकट्याच 'शुभं करोती'  म्हणत होत्या. कुठूनतरी लाडका गुलाब येईल आणि आपल्या सुरात सुर मिसळेल ही वेडी आशा होती. तसे काही झाले नाही.

******

"गुडमॉर्निंग! डिअर छवी. बरे वाटतेय ना आता?"


डॉक्टर निशांत सकाळच्या राऊंडला आले होते.
तिने त्यांच्याकडे बघून आपले ओठ रुंदावले."मग आज घरी जायचेय ना?" डॉक्टर.


"हो. पण डॉक्टर अंकल मला परत यावे लागेल आहे का?"
आपले घारे डोळे त्यांच्यावर रोखून तिने विचारायला लागली.


"हम्म! पण आत्ताच नाही. पुढल्या आठवड्यात यावे लागेल." ते.

"आसावरी मॅडम, थोडयावेळाने तुम्ही घरी जाऊ शकता. त्यापूर्वी मला एकदा भेटा."


एवढं बोलून ते खोलीबाहेर जाणार तोच छवीच्या निरागस आवाजाने त्यांना थांबण्यास भाग पाडले."डॉक्टर अंकल, मला काय झालेय ते सांगा ना."

हा प्रश्न मात्र निशांतला अनपेक्षित होता. ल्युकेमियाची पेशंट असणारी कितीतरी छोटी मुलं त्यांनी हाताळली होती, त्यामध्ये असे प्रश्न विचारणारे विरळेच!

तो तिच्या बाजूला येऊन बसला.


" ह्या गोड परीच्या रक्तातील पांढऱ्या पेशी ना जरा जास्तच वाढल्या आहेत. त्या कमी व्हायला हव्यात ना म्हणून आपली ट्रीटमेंट सुरु आहे. " तिचे गोबरे गाल हलकेच ओढत तो म्हणाला.


"पांढऱ्या पेशी म्हणजे सोल्जर्स ना? मग ते वाढले तर चांगलेच तर आहे. माझ्या बॉडीतील जर्म्स सोबत 'ढिशुम ढिशुम' करून फायटिंग खेळतील ना. मग हे मॅजिक औषध कशाला?"


तिचे प्रत्येक बोल, प्रत्येक वाक्य, प्रत्येक प्रश्न आसावरीच्या हृदयाला घरे पाडत होते.


"छवी, किती गं प्रश्न विचारशील? डॉक्टर अंकलना इतर पेशंट देखील तपासायचे असतील ना?" आणखी पुढे काही विचारणार म्हणून आसावरीने तिला मध्येच थांबवले.


"विचारू द्या हो. तिच्या शंकेचे निरसन करणे माझे कामच आहे.
तुला वाटतेय ना की त्या पेशी सोल्जर्स म्हणजे सैनिक आहेत?"

तिने होकारार्थी मान हलवली.


" खरं आहे ते. त्या पेशी म्हणजे सैनिकच. पण अर्धवट प्रशिक्षण घेतलेले सैनिक! मला सांग, एखाद्या युद्धामध्ये असे अर्धवट शिकलेले सैनिक 'ढिशुम ढिशुम'  करू शकतील काय?"

तिने नाही म्हणून मान हलवली.

"करेक्ट! एक तर हे सैनिक पूर्ण ट्रेनिंग न केलेले, त्यात त्यांची संख्या खूsप जास्त! मग काय होईल?"


" काय होईल? " डोळे विस्फारून ती.


" तर या चिमुकल्या छवीच्या रक्तातील ट्रेंड झालेल्या चांगल्या सोल्जर्सना रहायला जागाच उरणार नाही. मग चांगले सोल्जर्स 'ढिशुम ढिशुम' करू शकतील काय?"

त्याने तिच्यासमोर हात केला.


" नाही!" छवीने त्याला टाळी दिली.

"गुड! तुला जे मॅजिक औषध दिले ना त्यामुळे प्रशिक्षण नसलेल्या सैनिकांची संख्या कमी होईल. आता कळले ना पुढल्या आठवड्यात का यायचे आहे ते?"


तिने "हो!" म्हणून मान डोलावली.

तो जायला निघाला तसे तिने पुन्हा आवाज दिला.

"डॉक्टर अंकल! यू आर सो स्वीट!"


" थँक्यू लिटल!"
निशांतचे पाय त्याच्या केबिनकडे वळले.

******

"आसावरी मॅडम, तुम्हाला मी आधीही सांगितले आहे आणि आतादेखील परत तेच सांगतोय, ह्या आजाराशी एकट्याने लढणे सोपे नाहीय. आजारी व्यक्ती आजारपण सहन करतो, अनुभवतो. सगळ्या वेदनादायी उपचारांना सामोरे जातो पण हे सर्व तो एकटयाने करत नसतो. आपल्या माणसाच्या आधाराने अर्धी लढाई तर सहज जिंकल्या जाते. आजारी व्यक्तीसोबत भरडल्या जातात ते त्यांची काळजी घेणारी माणसं.
छवीच्या आजारपणात लढताना तुम्ही आजारी पडायला नको. तुम्ही खंबीर रहायला हवे. छवी खूप गोड मुलगी आहे. शिवाय ती शूर देखील आहे, अगदी तिच्या मम्मासारखी!
हा शूरपणा तुम्हाला टिकवावा लागेल." तिच्या डोळ्यात बघत निशांत सांगत होता.


"हो डॉक्टर! काही झाले तरी मी खचणार नाही. हे माझे प्रॉमिस आहे स्वतःशीच."
आसावरी.


" गुड! तुम्ही आता तिला घरी घेऊन जाऊ शकता. "

डॉक्टर निशांत ने हिरवा कंदील दिला तशी ती केबिनमधून बाहेर आली.

******

"आजी.."
कारमधून उतरल्याबरोबर छवीने धावत जाऊन रजनीताईंना मिठी मारली.


"अरेच्चा! माझा गुलाब आला होय!" त्यांनी तिला आलिंगन दिले.


"आजी मला तुझी खूप आठवण येत होती." पिटुकला चेहऱ्याने छवी.


"मलापण! आता आलीहेस ना, बघ तुला कसं छान छान खाऊ घालते." त्या तिला आत घेऊन गेल्या.


" काकू डॉक्टरांनी हा डाएट चार्ट दिलाय. त्यानुसार तिला खायला द्यायचे आहे."  त्यांच्यापुढे दवाखान्यातील आहारतज्ञानी बनवून दिलेला तक्ता देत आसावरी.


"बरं बाई. मी त्यानुसार जेवण बनवणार. ठीक आहे ना?"

आसावरी मान डोलावून आपल्या खोलीमध्ये निघून गेली.

*******


"मम्मा! मी तुला खूप त्रास देते ना गं? "

रात्री आसावरीच्या मांडीवर डोके ठेऊन झोपतांना छवी तिला विचारत होती.


" नाही रे सोन्या. कोण बोलले असं?"

तिच्या केसातून हात फिरवत आसावरी.


"मला कळतं. माझ्यामुळे दोन दिवस तुझ्या ऑफिसला दांडी झाली ना? उद्या गेल्यावर तुला किती काम पडेल." चिमण्या चेहऱ्याने छवी.


"त्याचं काय गं? तुझी मम्मा सुपरवूमन आहे. ऑफिसमधील काम लगेच संपवेल. ऑफिसला दांडी झालेली चालेल पण तुला काही झालेलं नाही चालणार ना?
माझी प्रॉयारिटी आहेस तू. ऑफिस सारखे ऑप्शन नव्हे. कळतंय का?"
तिची पापी घेत ती.


" नाही गं नाही कळले." तिने आपली मान हलवली.


"म्हणजे माझ्या वेड्या कोकरा, यू आर सो प्रेशिअस फॉर मी! माझे प्लॅटिनम आहेस तू. त्यापेक्षा खूप जास्त मौल्यवान आहेस. मम्माची स्पेशल गर्ल आहेस. मम्मा लव्ह यू सो सो सो ss मच!"


"छवी अल्सो लव्ह यू सो सो सो ss मच!"
तिने मांडीवरून उठून आसावरीला मिठी मारली.


"सॉरी मम्मा! मी मघा तुला तसे म्हणाले." ती.


"नुसते सॉरी म्हणून काम नाही चालणार. तुला पेनल्टी द्यावी लागेल, माहिती आहे ना?" लटक्या रागाने आसावरी.


"हो माहितीय. पेनल्टी म्हणजे गोड गोड किशी!" तिने आसावरीच्या गालावर पापी दिली.
"आय लव्ह यू मम्मा!"

"आय लव्ह यू टू बच्चा! चला झोपायचे?" छवीला बिछान्यावर सरळ ठेऊन ती थोपाटू लागली.


"मम्मा तू किती छान आहेस गं! माझे किती लाड करतेस. तू छोटी असतांना तुझी मम्मासुद्धा असेच लाड करायची?"


" हूं!" आसावरी बोलली.


" पण तू आजीला काकू का म्हणतेस? 'आई' किंवा माझ्यासारखं  'मम्मा' का नाही म्हणत?"


"अगं माझे राणी, आईला कोणत्याही नावाने हाक मारली तरी तिचे प्रेम कमी - जास्त नाही होत गं.
ती माया, ते प्रेम सगळे सेमच असते! झोप आता." ती तिचा गालगुच्चा घेत म्हणाली.

थोड्यावेळात छवी झोपी गेली.


आसावरीच्या डोक्यात मात्र तिच्या प्रश्नांचा भुंगा गोल गोल फिरत होता.

"..तू छोटी असतांना तुझी मम्मासुद्धा असेच लाड करायची?" एक निरागस प्रश्न!

त्या प्रश्नाने तिच्या डोळ्यासमोर उभे राहिले तिचे बालपण..
तिचे करपलेले बालपण!!
.
.
.
क्रमश :

पुढील भाग लवकरच.

********
काय दडलेय आसावरीच्या बालपणात? कळण्यासाठी वाचत रहा, कथामालिका..
पाहिले न मी तुला..!


छवीला झालेला आजार आणि त्यावर आलेल्या तुमच्या प्रतिक्रिया.. काय उत्तर द्यावं मला सुचेना. अँपवर तर मी कोणालाच उत्तर देऊ शकले नाही, त्याबद्दल सॉरी! खरे तर मला ह्या प्रतिक्रिया अपेक्षित होत्या. एवढ्याशा मुलीला हा आजार! का? कशी लढेल ती? कशी सामोरी जाईल?
त्याचे उत्तर आज देतेय. ती सामोरी जाईल, नक्कीच जाईल. तुम्हा सगळ्यांचे प्रेम सोबत आहे ना!
खरं तर लहान मुलांना एवढे प्रश्न पडत नाहीत जे आपल्या मोठया माणसांना पडतात. ह्या आजाराची भव्यता त्यांना माहीत नसते. पुढे होणारे कॉम्प्लिकेशन्स, त्रास.. त्यांना नाही कळत.

देवाने किंवा निसर्गाने म्हणा पण या चिमण्या लेकरांना भविष्याचा तेवढा विचार न करण्याचे एक वरदान दिलेय असं समजूया. ते फक्त वर्तमानात जगतात. भविष्याशी त्यांचे काही देणेघेणे नसते. कदाचित म्हणूनच एखादी मोठी व्यक्ती आजारी पडेल आणि लहान मुलाला सारखाच आजार असेल तरी लहान मुल लवकर बरे होतो कारण त्याला त्या आजाराची भीती नसते, चिंता नसते.
निशांत आणि छवीचा वरचा संवाद ऐका (वाचा ) त्याने किती सोप्या शब्दात तिला समजावले आणि ती सुद्धा समजली.
मोठी माणसं वागतील का अशी?कथेचा हा भाग कसा वाटला ते आवर्जून सांगा. कंमेंट तर तुम्ही करताच त्यासोबत आपल्या फेसबुक पेजवर लाईक सुद्धा करत रहा. तुमचे मिळणारे एक लाईक सुद्धा पुढे लिहायला मला प्रेरणा देते. तेव्हा असेच लाईक करत रहा आणि कंमेंट करत रहा. कथेचा भाग आवडला तर फेसबुक पेजची लिंक शेअर करू शकता. धन्यवाद!

साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेखक आपल्या कल्पनांना आकार देऊन कथा लिहीत असतात. त्यामागे त्यांचा वेळ, मेहनत असते. त्यामुळे कथेतील प्रसंग, पात्र यांचा कुणीही गैरवापर करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
धन्यवाद!
**********


🎭 Series Post

View all