पाहिले न मी तुला..! भाग -6

लहानग्या छवीला झालाय गंभीर आजार!


पाहिले न मी तुला..!
भाग - सहा.


"मला वाटले की तिथले डॉक्टर तुझ्या ओळखीचे आहेत." कपाळावर हात मारत तो.

"डॉक्टर तसे ओळखीचे नाहीत. पण खूप चांगले आहेत असे ऐकून आहे. वन ऑफ द बेस्ट पेडियाट्रीशियन! \"डॉक्टर निशांत..\" बस नाम ही काफी है!"

बोलत बोलत दोघे आत पोहचले. तिच्या ओळखीची नर्स तिला दिसली तशी त्याला तिथेच थांबवून तिच्यासोबत पल्लवी मलमपट्टी करायला गेली.

******

डॉक्टर निशांतच्या केबिनमधून रिसेप्शनवरचा फोन खणखणला.

" मॅम, सरांनी तुम्हाला आत पाठवायला सांगितलेय. तुमचे रिपोर्ट्स आलेत."
रिसेप्शनिस्ट नर्स आसावरीकडे बघून म्हणाली.

छवीचा हात पकडून ती आत जायला निघाली तर नर्सने थांबवले.

"मॅम, पेशंटला सोबत पाठवू नका असे सर बोलले. तुम्हीच जाऊन या. मी लक्ष ठेवेल हिच्यावर. डोन्ट वरी." छवीच्या हातात एक टेडी देत नर्स.

" इथेच थांब हं. मी लगेच येते." तिला आश्वस्त करून आसावरी डॉक्टरांच्या केबिनमध्ये गेली.

"हो गं मम्मा!" असे म्हणून छवी टेडीसोबत खेळण्यात गुंग झाली.


शेखर पल्लवीची वाट बघत वेटिंग एरियात उभा होता की अचानक टेडीशी खेळणाऱ्या गोबऱ्या गालाच्या छवीकडे त्याचे लक्ष गेले.


"हॅलो लिटल फ्रेंड! तू इथे कशी?"
तिच्याजवळ जाऊन तो उभा राहिला.

"शु ss! हळू बोल. आणि तू इथे कसा?" तिने अगदी हळू आवाजात पण मुखावर आश्चर्याचा भाव घेऊन विचारले.

त्याने नजरेनेच  'का?' म्हणून विचारले. तर तिने समोरचा 'सायलेंस प्लिज!' चा बोर्ड दाखवला.
छवीचे ते मोठयासारखे वागणे बघून त्याला तिचे कौतुक वाटले.


"अगं मी माझ्या बहिणीसोबत आलोय. तुला काय झालेय नी तुझी मम्मा कुठे आहे?" तो तिच्याशी हळुवारपणे खुसरफुसर करू लागला.


" मी देखील म्म्मसोबत आलेय. ती आत डॉक्टरांशी बोलतेय." केबिनकडे बोट दाखवत ती त्याच्या कानाशी पुटपुटली.


तिच्याशी बोलत असतांना त्याचा मोबाईल दोन तीनदा वाजला. शेवटी त्याने तो उचलला.



"हॅलो दादू कुठे आहेस तू? चल ना लवकर. मला माझ्या फ्रेंड्ससोबत पार्टी करायला जायचं आहे."  पल्लवी त्याच्याशी बोलत होती.


अगं येतोय."  म्हणून त्याने तिला हात दाखवला.

" बरं छवी. बाय. भेटू."  बोलत तो पल्लवीच्या दिशेने गेला.
ती परत हातातील टेडीशी खेळायला लागली.

"ऑल इज वेल!" क्षणभरात शेखर पुन्हा तिच्या पुढ्यात उभा राहिला.

"फ्रेंड तू परत कसा आलास?"  ती.

"हे बाकी राहिलं होतं ना म्हणून! जादू की झप्पी!"  तिला मिठी मारून तो हसून म्हणाला.
"चल. निघतो मी. नाहीतर माझी बहीण ओरडेल."

छवी जाणाऱ्या त्याला न्याहाळत राहिली.

********

" तुम्ही एकट्याच आलात? आय मिन तुमचे हजबंड? "
बोलायला सुरुवात करत डॉ. निशांत आसावरीला विचारत होते.

" आय एम अ सिंगल मदर!"
ती उत्तरली.

"ओह! पण मग तुमच्या सोबतीला कुणी घरचे वगैरे?"  डॉक्टर.

"डॉक्टर, मी एकटी पुरेशी आहे. माझ्या लेकीला काय झालंय? तुम्ही सांगा ना."
तिच्या डोळ्यात काळजी, अगतिकता जाणून घ्यायची घाई.. सर्व स्पष्ट झळकत होते.

" हो, हो! रिलॅक्स. ते सांगायलाच तुम्हाला बोलावलेय. हे बघा आसावरी मॅडम, आपल्या शरीरात लाल रक्त पेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी असतात. त्यांचे कार्य काय असते ते तुम्हाला ठाऊकच असेल. तर.. "

" डॉक्टर, प्लीज! माझ्या अंत पाहू नका. असं कोड्यागत न बोलता मला स्पष्ट सांगा ना, छवीला काय झालेय?"  ती काकूळतीने म्हणाली.

" तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय." त्यांनी एक पॉज घेतला.

"तुमच्या छवीला ल्युकेमिया झालाय. साध्या सोप्या भाषेत सांगायचे तर.. तिला रक्ताचा कॅन्सर झालाय."
आसावरीकडे बघत डॉक्टर बोलले.


"काय म्हणालात?"  ती गोंधळून म्हणाली.

" ब्लड कॅन्सर! तिच्या रक्तातील पांढऱ्या पेशीचे प्रमाण खूप जास्त वाढलेत. अवास्तव! लाखाच्या वर. नार्मली त्या पाच ते अकरा हजाराच्या आकडयात असतात, त्या लाखाच्या घरात पोहचल्या आहेत "

निशांत तिला समजावून सांगत होता पण काय बोलतोय हे आसावरीला कळत नव्हते. 'ब्लड कॅन्सर' हा शब्द ऐकूनच ती एकदम स्तब्ध झाली. डोळयांपुढे अचानक अंधारून आल्यागत झालं. भोवतालचे जग गोल गोल फिरत आहे असं वाटायला लागले. डोके गच्च पकडून तीने टेबलावर मान टाकली.


"मॅम, मॅम अहो, शांत व्हा. हे पाणी घ्या." तिथल्या नर्सने तिला पाणी प्यायला दिले.

" मॅम, आल यू ऑलराईट?" काळजीने नर्स.
"हो मी ठिक आहे." आसावरीने आपल्या चेहऱ्यावरचा घाम टिपला.


"डॉक्टर, ती बरी तर होईल ना?" डोळ्यातील पाणी डोळ्यातच हेलकवत कातर स्वरात आसावरीने विचारले.

" हे बघा मला तुम्हाला अंधारात नाही ठेवायचेय. हा आजार असा आहे की ह्याचे नाव ऐकूनच आपण घाबरतो. सुदैवाने ती लहान आहे या आजाराची गंभीरता तिला नाही कळायची. पण तुम्हाला खंबीर राहायला हवे.
स्पष्टच बोलायचे तर ती बरी होईल हे नव्वद ते पंच्याण्णव टक्के खरे असले तरी पूर्ण शंभर टक्क्यांची खात्री  मी देऊ शकणार नाही . पहिले आपण ट्रीटमेंट तर सुरु करूया. तिचा प्रतिसाद कसा आहे यावरून पुढील निष्कर्ष काढता येईल." डॉ. निशांत.


आसावरीने एक लांब श्वास घेतला. आधीच्या डॉक्टरांनी डॉ. निशांत कडे छवीला रेफर केले तेव्हाच काहीतरी गडबड आहे याची जाणीव तिला झाली होती. पण आपलं लेकरू मृत्यूच्या दाढेत अडकतंय याची पुसटशी कल्पना तिला नव्हती.


"आत्ता छवीला ऍडमिट करूया. दोन दिवस किमोथेरपी दिल्यानंतर डिस्चार्ज होईल."
" मी त्या तयारीनीशी नाही आलेय." आपला हुंदका आवरून आसावरी.


" डोन्ट वरी मॅम! तुम्ही ऍडमिटची प्रोसिजर करून घ्या. नंतर ती थोडी स्टेबल झाली की तुम्ही घरी जाऊन येऊ शकता." नर्स.

" ठीक आहे. आपण ट्रीटमेंट सुरु करूया." तिचे म्हणणे आसावरीला पटले.

"आसावरी मॅडम!"

ती बाहेर जायला निघाली तसे डॉ.निशांत तिला थांबवत म्हणाले.


"ह्या आजाराशी एकट्याने लढा देणे सोपे नाहीय. तुम्हाला  आणखी थोडे मजबूत बनावे लागेल. शक्य असेल तर घरातल्यांशी बोला. एकटीने सामोरे जाऊ नका. आणि मुख्य म्हणजे छवीपुढे रडू नका.
मला काय म्हणायचे आहे ते तुम्हाला कळत आहे ना? "  डॉ. निशांत.

तिने मान हलवून होकार दिला.

" हो. कळतंय मला. छवीपुढे नाही रडणार मी. " बाहेर ओसंडू पाहणाऱ्या डोळ्यातील पाण्याला तिने तिथेच अडवले.

येस दॅट्स स्पिरिट! हा आशावाद कायम ठेवा कारण उपचाराचा हा प्रवास थोडंथोडका नाही तर जवळपास दोन ते तीन वर्ष चालेल. तुमच्या अंगी असलेले हे बळ तुम्हाला तरुन काढेल.
तुम्ही थोडावेळ बाहेर थांबा.मी सिस्टरांना कॉल करून कळवतो. त्या तुम्हाला बाकीची प्रोसिजर समजावून सांगतील." डॉ. निशांत.


" मम्मा काय म्हणाले डॉक्टर अंकल? मी खूप बोअर झालेय गं. घरी जाऊया ना. " केबिनमधून बाहेर आलेल्या आसावरीला बघून छवी तिला बिलगून म्हणाली.

"हो रे बाळा. आपल्याला तर घरी जायचेच आहे. पण थोडावेळ थांबावं लागेल."

" कशासाठी?? मला घरी जायचे आहे ना!" ती.

" तुझ्या पिटुकल्या बॉडीमध्ये दुष्ट जर्म्सनी एंट्री केलीय ना त्यांना मारण्यासाठी आपल्याला औषधं द्यावी लागतील म्हणून थांबायचे आहे." आसावरी.

"मी घरी गेल्यावर खाईन ना. "

"काही जर्म्स खूप स्ट्रॉंग असतात. त्यांना मारण्यासाठी जे मॅजिक औषध असतात ना ते फक्त हॉस्पिटलमध्येच देऊ शकतो. म्हणून इथे थांबावे लागेल." तिच्याजवळ येऊन नर्स म्हणाली.

"मॅजिक औषधं? ते कसे असतात?" तिला कुतूहल वाटलं.

" माझ्यासोबत चला. मी सांगते." असे बोलून नर्स त्यांना ऍडमिट रूम मध्ये घेऊन गेली.


" मॅजिक औषधंसासाठी ना तुला ऍडमिट व्हावे लागेल."


"म्हणजे सिस्टर तुम्ही मला इंजेक्शन देणार? मला इंजेक्शन नको आहे."


"अगं बाळा, केबिनमधले डॉक्टर अंकल आहेत ना त्यांनीच सांगितलं आहे आणि मला एक सांग, मघाशी रक्त घेतलं तेव्हा तुला काही त्रास झाला का?"


छवीने नाही म्हणून मान हलवली.


" तसाच आतादेखील तुला त्रास होणार नाही. येवढया गोड मुलीला मी त्रास का देऊ बरं? फक्त जर्म्सना पळवण्यासाठी तर मी प्रयत्न करतेय." नर्स.


छवीने आसावरीच्या कुशीत तोंड लपवले.
"मम्मा मला इंजेक्शन नकोय ना गं." ती गोडुली स्फून्दू लागली.

" पिल्लू,मम्मा तुझ्यासोबत आहे ना गं. तुला काही होणार नाही. तू माझी खूप खूप खूप स्ट्रॉंग गर्ल आहेस. आहेस ना?" तिला धीर देत आसावरीने बोलण्यात गुंतवले.

"हो मी तुझी स्ट्रॉंग मुलगी आहे." ती हसून म्हणाली.

"छवी,हे बघ. तुला सलाईन लाऊन सुद्धा झाले. सांग बरं काही त्रास झाला का?"
नर्स.

"थँक यू सिस्टर! तुम्ही खूप छान आहात." छवी नर्सकडे बघून हसली.

******
"काय रे पिल्ल्या? मी डॉक्टरांना भेटायला गेले तेव्हा तू टेडीसोबत खेळत होतीस ना?"
आता छवी थोडी स्थिरावली होती.

"होs!"

"तुला तो टेडी आवडला?" आसावरी.

"फारसा नाही गं. मला आपल्या घरचाच टेडी हवा." ती.
अगं मम्मा मी तुला तर एक गंमत सांगितलीच नाही!" काहीतरी आठवून छवी.

"कसली गंमत?"

"अगं, बागेमध्ये मला तो न्यू फ्रेंड भेटला होता ना, तो इथे पण मला भेटला. त्याच्या बहिणीसोबत आला होता.
त्याला तुझ्याशी भेटताच नाही आलं, तो घाईत होता ना.. " ती खट्टूपणे म्हणाली.

"अच्छा! पुढच्या खेपेला दिसला की मला नक्की भेटवशील हं." हसून आसावरी.

बोलता बोलता थोड्यावेळाने छवी झोपी गेली. सगळ्या गडबडीत काकूंना फोन करायचे राहून गेले होते. तिने पर्समधून मोबाईल काढला, बघते तर रजनीताईंचे चार कॉल येऊन गेले होते.

"हॅलो काकू.."

तिने कॉल करायचा अवकाश की त्यांचाच काळजीचा स्वर कानावर पडला, "आसावरी, अगं अजून कसे नाही आलात? डॉक्टरांशी बोलणे झाले ना? काय म्हणाले?"
त्यांच्या प्रत्येक प्रश्नागणिक काळजी जाणवत होती.

तिचा आवाज जागीच थिजला. डोळ्यातून एक सर गालावर येऊन विसावली.

"आसावरी, हॅलो ss! अगं ऐकत आहेस ना? तुझा आवाज येत नाहीये अगं."


तिने मोबाईल दूर सारून लांब लांब श्वास घेतले. रुमालाने डोळे व नाक पुसून परत मोबाईल कानाला लावला.


" काकू, आपल्या छवीला थोडा अशक्तपणा आलाय आणि रक्तात इन्फेक्शन झालेय त्यामुळे इथे दोन दिवस भरती करायला सांगितलेय." स्वतःला सावरत कसेबसे ती बोलली.

"माझ्या गुलाबाला भरती केले आणि हे आत्ता सांगते आहेस?" त्यांनी डोळ्याला पदर लावला.


" काकू असे काय छोट्या मुलीसारखं करताय? रडू नका बरं.


आणि ऐका ना, छवीचे एकदोन ड्रेस आणि माझा एखादा ड्रेस आणि तिला खायला काहीतरी हलकं फुलकं.. एवढं पॅक करून ठेवाल काय? तासाभरात मी जमेल तसे घरी येवून घेऊन जाईन."

"आसावरी, अगं इतकी म्हातारी नाही झालेय मी. तू छवीला सोडून येऊ नकोस सगळे सामान घेऊन मीच येते. तू पत्ता तेवढा कळव."

"काकू अहो, इथे पेशंट जवळ जास्त लोकांना जमण्यास मनाई आहे. नका येऊ ना." त्यांना समजावत ती.

"जास्त वेळ नाही थांबणार गं बाई. पण माझ्या गुलाबाला एकवार बघायचे आहे. येते ना गं." त्यांच्या आवाजातील आर्जव थेट तिच्या काळजाला जाऊन भिडले.

"ठीक आहे पण छवीपुढे आसवं गाळायची नाहीत हं."
या अटीवर तिने त्यांना यायला होकार दिला.

रिसेप्शनवरदेखील तिने सांगून ठेवलं, 'छवीची आजी आली तर छवीला काय झालेय हे सांगू नका.'
रजनीताईंना हा धक्का सहन होणार नाही हे तिला चांगलेच ठाऊक होते.
.
.
.
क्रमश :
पुढील भाग लवकरच!

**********
काय होईल पुढे? छवीच्या आजारपणाबद्दल रजनीताईंना कळेल का? ह्या सर्वांना आसावरी कशी सामोरी जाईल? कळण्यासाठी वाचत रहा कथामालिका..
'पाहिले न मी तुला..!'

कथेचा हा भाग कसा वाटला ते आवर्जून सांगा. कंमेंट तर तुम्ही करताच त्यासोबत आपल्या फेसबुक पेजवर लाईक सुद्धा करत रहा. तुमचे मिळणारे एक लाईक सुद्धा पुढे लिहायला मला प्रेरणा देते. तेव्हा असेच लाईक करत रहा आणि कंमेंट करत रहा. कथेचा भाग आवडला तर फेसबुक पेजची लिंक शेअर करू शकता. धन्यवाद!

साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेखक आपल्या कल्पनांना आकार देऊन कथा लिहीत असतात. त्यामागे त्यांचा वेळ, मेहनत असते. त्यामुळे कथेतील प्रसंग, पात्र यांचा कुणीही गैरवापर करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
धन्यवाद!
**********

🎭 Series Post

View all