पाहिले न मी तुला..! भाग -4

कथा मैत्रीची.. कथा प्रेमाची.. कथा आसावरीच्या संघर्षाची!!


पाहिले न मी तुला..!
भाग - चार.


"इथल्या आठवणींचा विसर पडावा म्हणूनच तू अमेरिकेला गेला होतास ना? मीही इथे तुझा भूतकाळ मिटवायचा प्रयत्न केला. शेखर तुझ्या भूतकाळातून तुला आता बाहेर पडायला हवे. पुन्हा पहिल्यापासून नवी सुरुवात करायला हवी."
त्याच्या केसातून हात फिरवत त्या बोलत होत्या.


"आई ज्या व्यक्तीसोबत मी माझा आनंद वाटला, जिच्यासोबत मी आयुष्य जगलो तिला विसरणं खरंच सोपं आहे का गं?" डोळे मिटून तो.


"सोपे नाहीच आहे बाळा. पण कुठूनतरी सुरुवात करायला तर हवीच ना? हे सगळे विसरायला एवढी वर्ष परदेशात राहिलास आणि इथे परतल्यावर पुन्हा तेच दुःख उगाळू नको ना."
प्रेमाने त्या समजावत होत्या.


"मग मी काय करू गं?"  हाताशपणे तो.

"लग्न!"   त्या उत्तरल्या.

"काय? आई काय बोलतेस अगं?" त्याने झटक्याने मान वर केली.


"योग्य तेच बोलतेय. शेखर, तू उमदा तरुण आहेस. त्यात वेल सेटल्ड! कोणतीही मुलगी सहज लग्नाला तयार होईल."  त्या.


"आई मला लग्न नाही करायचेय गं. प्लीज ट्राय टू अंडरस्टॅंड!"


" तिनेच आणखी कुठवर समजून घ्यायचं? आता तू सुद्धा थोडे समजुतीने घे ना."
आत येत स्मिताआत्या.

"शेखर, जरा विचार तर कर. वहिनीची ही अवस्था झालीय. दादा एकटा अजून किती सांभाळणार? तू या घराचा एकुलता एक वारस आहेस त्याचे तरी थोडे भान ठेव.
ह्या सगळ्यांनी तुझ्याकडून नाहीतर आणखी कोणाकडून अपेक्षा ठेवायच्या?"

"आत्या तू म्हणतेस ते पटतेय गं. मी आलोय ना आता? आईची बाबांची सगळी जबाबदारी मी घेईन पण लग्नाचे तेवढे तुम्ही डोक्यातून काढून टाका."
अगतिकतेने तो.


"शेखर अरे पस्तीशी ओलांडलीय तुझी. देखणा आहेस. जवळ पैसा आहे तेव्हा तुला चांगली बायको नक्की मिळेल. इनफॅक्ट मी माझ्या नात्यातील एका मुलीला बघितलेसुद्धा. त्यांना तुझ्याबद्दल सगळे माहीत असूनही ती लोकं तयार आहेत. तू मध्ये मोडता घालू नकोस."  आत्या. 
 
"आत्या, वाटेल तेव्हा,  वाटेल त्या मुलीशी लग्न करायला माझे लग्न म्हणजे तुम्हाला पोरखेळ वाटतो का गं?
जिच्याशी माझे लग्न झाले होते ना, तिच्यावर माझे प्रेम होते. आता पुन्हा लग्न नकोय मला. रॅदर हा विषयच नको."  तो जरा मोठ्याने बोलला.


त्याचा मोठा आवाज ऐकून विनायकराव आणि पल्लवी आत आले.

" स्मिता अगं काय चाललंय तुम्हा दोघींचे? आल्या आल्या का त्याच्या मागे लागलात?"  बाबा.


"राहिलं. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं!" त्यांच्याकडे तिरका कटाक्ष टाकत स्मिता.


"आई अगं मामा बरोबर बोलत आहेत. का दादूच्या मागे लागली आहेस?"  पल्लवी.


"आता तूच अक्कल शिकवायची बाकी होतीस. त्यापेक्षा जाते इथून. तेच बरं."  स्मिता पाय आपटत निघून गेली.

विनायकरावांनी शेखरला थोपटले आणि नयनाताईना घेऊन गेले.

"दादू, आईचा स्वभाव जरा फटकळ आहे रे, पण तिचा हेतू चुकीचा नाहीये. प्लीज असा त्रागा करून घेऊ नको ना." त्याच्याजवळ येत पल्लवी.


"पल्लवी, मला एकटे सोडशील? डोके खूप दुखतेय गं. झोपायची गरज आहे."   तो.


"हं. टेक केअर!" म्हणून ती निघून गेली.


ती गेली नी परत त्याचे डोळे वाहू लागले. काही क्षण तो तसाच बिछान्यावर पडून होता. थोड्यावेळाने उठून त्याने तोंडावर पाण्याचा हबका मारला. हातात टॉवेल घेऊन तो आता आरशासमोर उभा होता.

त्याचा गोरा वर्ण, ट्रिम केलेली शेविंग, रडल्यामुळे वर आलेले गोरे गाल आणि सुजलेले बदामी घारे डोळे! स्वतःच्या चेहऱ्याकडे तो अनोळखीपणे पाहत होता. त्याची नजर त्याच्याच घाऱ्या डोळ्यावर खिळली आणि अचानक सायंकाळी पार्कमध्ये भेटलेली त्याची छोटी मैत्रिण आठवली. डोळे मिटून त्यानं तिचे नाव आठवायचा प्रयत्न केला.


"इट्स मी.. छवी!" तिचा तोच गोड स्वर कानावर पडल्याचा त्याला भास झाला.


'छवी..! किती गोड परी होती ती! थोडयावेळासाठी भेटली पण असे वाटत होते जणू खूप जुनी ओळख आहे.'

त्याचा मनाशी संवाद सुरु होता. इतका वेळ कोमेजलेल्या त्याच्या मुखावर तिच्या आठवणीने एक स्मितहास्याची लकेर उमटली.

छवीचा गोड चेहरा काही केल्या त्याच्या डोळ्यासमोरून हटत नव्हता. तिचे टपोरे घारे डोळे कुठेतरी स्वतःच्या घाऱ्या डोळ्यांशी जुळतात का याचा तो विचार करायला लागला.


"..पण तुम्हाला बघून असं वाटतंय की मी ओळखते तुम्हाला."
तिचे बोलणे त्याला आठवले.


'मला जे जाणवले तेच तिलाही वाटले असेल का? मलासुद्धा ती खूप ओळखीची वाटत होती. इतक्या वर्षांनी इथे परतलो आणि पाहिली चक्कर त्या बागेत टाकली. तिथे ही इवलीशी परी मला भेटली. हा निव्वळ योगायोग असावा का? की आणखी काही?'

त्याला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरं सध्यातरी त्याच्याजवळ नव्हती.

तिच्या विचारात तो पहुडला खरा पण झोप काही येईना. मिटल्या डोळ्यासमोर सारखी तीच गुलाबी ओठांची बाहुली येत होती.

'आमचे काही नाते असावे का? माझी मुलगी असेल का ती?'

'छे! कसं शक्य आहे? तिची आई सोबत होती ना तिच्या?'

डोक्यात फक्त प्रश्नांचा भुगा! उत्तरं मात्र कशाचीच नव्हती.

दुसऱ्याच्या मुलीला स्वतःची मुलगी म्हणताना त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली.


त्याने पुन्हा आपले डोळे गच्च मिटले. मन परत भूतकाळात गेले.


"..तुम्हाला मुलगी झालीय!" डॉक्टर त्याला सांगत होते.

"वजन फार कमी आहे तेव्हा तिला हॉस्पिटलाईझ करावं लागेल."


" त्या मुलीशी माझा काहीच संबंध नाहीये. तुम्हाला जे वाटेल ते करा." तो रडत रडतच त्यांच्यावर ओरडला होता.


पाच वर्षांपूर्वीचा हा प्रसंग त्याला जशाचा तसा आठवला.

चिमण्या बाळाचे रडण्याचे केविलवाणे स्वर कानावर आदळत आहेत असे त्याला वाटले. दोन्ही कानावर उशी दाबून त्याने आपले कान झाकून घेतले, तरीही रडण्याचा तो आवाज कमी होईना. आपला चेहरा उशीमध्ये खुपसून शेखर एखाद्या लहान लेकरासारखा रडायला लागला.
हुमसून हुमसून!!


" अनू.. मी चुकलोय गं. तू मला माफ करणार नाहीस एवढा मोठा गुन्हा केलाय मी. पण तूच सांग ना त्या वेळी का एकटं पाडलंस मला?  का अशी अर्ध्यावर डाव टाकून निघून गेलीस?"
आपल्या वॉलेटमधून काढलेला फोटोकडे बघत तो बोलत होता.


"मला प्रायश्चित्त घ्यायचंय. माझी चुक निस्तारायची आहे. आय प्रॉमिस यू! आकाशपाताळ एक करेन पण शोधेन मी तिला." हातातील फोटोकडे तो एकटक पाहत बोलत होता.

गोऱ्या वर्णाची, रेखीव काळ्या डोळ्यांची अनू फोटोतून त्याच्याकडे बघून हसत आहे असे त्याला वाटले. किती गोड हसू!
पहिल्यांदा पाहताक्षणी तिच्या मोहक हास्यानेच तर त्याची विकेट गेली होती. तिचे लांबसडक काळेभोर केस, गालावर आलेली बट..
फोटोतून बाहेर येऊन त्याला मिठी मारेल तर किती बरं होईल असा विचार डोकावून गेला.


'..आणि आल्या आल्या तिने विचारले, "कुठाय माझी लेक?" तर काय उत्तर देऊ? कुठे आहे म्हणून सांगू?'
त्याचे डोळे पुन्हा भरून आले.


'माय प्रिन्सेस! मी कधीच पाहिलं नाही गं तुला. तू ही मला पाहिलं नाहीस पण कधी आपण भेटलोच तर ओळखशील का गं मला? तुझ्या या अभागी बाबाला?'


आजवर त्याला असे कधी झाले नव्हते. अनुच्या आठवणीच्या आगीत तर तो रोजच पोळत होता, आज मात्र पहिल्यांदाच न पाहिलेल्या लेकीसाठी त्याचा जीव तुटत होता. अपराधीपणाचे शल्य हृदयात रुतून बसले होते.


'आय मिस यू अनू.. आय नीड यू!'

हातातील फोटोवर त्याने आपले ओठ अलगद टेकवले.

*******

"..मग ना कावळा त्या मडक्यामध्ये खूप सारे छोटे छोटे दगड टाकतो त्यामुळे पाणी वर येतं आणि कावळा पाणी पिऊन भुर्रकन उडून जातो!
सांग कशी वाटली तुला कावळ्याची गोष्ट?"

छवीला झोपवतांना तिच्या मऊशार केसातून हात फिरवत आसावरी गोष्ट सांगत होती.

"ऊहूं.. मला नाही आवडली कावळ्याची ही आयडिया!" ती.


" का गं? "


"आशू, एवढे सारे दगड टाकण्यापेक्षा तो स्ट्रॉ यूझ करू शकला असता ना गं? मी कसं नारळ पाणी पितांना स्ट्रॉ वापरते?"


" हो गं! त्या कावळ्याला हे कसं सुचलं नसेल बरं?" आसावरी डोके खाजवत म्हणाली.


"कारण ना त्याची मम्मा माझ्या मम्मासारखी हुशार नसणार! तिने त्याला स्ट्रॉ कसा पकडायचा तेच शिकवलं नसणार." तिच्या गालावर गोड देत पापी देत छवी उत्तरली.

तिच्या उत्तराने आसावरीच्या ओठांवर हसू आले.


"असं आहे होय? चला झोपा आता. गुड नाईट!"  तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत आसावरी.


ते गोडुलं पिल्लू लगेच झोपी गेलं. तिला झोप येईना.तिने उठून कपाटातून एक फाईल बाहेर काढली.

आठ दिवसांपूर्वी ताप होता म्हणून ती छवीला दवाखान्यात घेऊन गेली होती, त्याची ती फाईल होती.मागच्या चार पाच महिन्यापासून छवी सारखी आजारी पडत होती. कधी खोकला, सर्दी तर कधी जेवायला कुरबूर करणे सुरु झाले होते. हल्ली पाय फार दुखतात असे पण सांगत असायची. सुरुवातीला वायरल इंफेक्शन म्हणून आसावरीने तेवढा ताण घेतला नाही.


"छोटी मुलं लवकर आजारी पडतात गं." रजनीताई म्हणायच्या ते पटायचं तिला.

पण इतक्यात ती वारंवार आजारी पडू लागली होती म्हणून डॉक्टरांनी तिला परत एकदा रक्ताच्या पूर्ण तपासण्या करायला लावल्या. रिपोर्ट म्हणावा तसा चांगला नव्हता. त्यांनी काही इंजेक्शन्स आणि गोळ्या दिल्या होत्या आणि त्यानंतर आठ दिवसांनी दुसऱ्या नामांकित डॉक्टरांचा पत्ता देऊन तिला तिथे घेऊन जायला सांगितले होते.

आता उद्याला छवीला दवाखान्यात घेऊन जायचे म्हणून आज मुद्दाम तिला ती बागेत घेऊन आली होती. तिथे तिला खेळायला खूप आवडायचं.
हे आठ दिवस तिला खूप कठीण गेले होते. छवीला नेमके काय झालेय हे तिलाच ठाऊक नव्हते तर ती रजनीताईला काय सांगणार होती?

आपले ओले डोळे पुसून तिने फाईल परत कपाटात ठेवली. छवीच्या अंगावरचे पांघरून नीट करतांना हाताला अंग जरा गरम लागले. तिने थर्मामीटर लाऊन ताप तपासून पहिला.

"शंभर डिग्री.." तिचा जीव कासावीस झाला.

'काय होतंय माझ्या पिल्लूला? का सारखी आजारी पडतेय? आत्तापर्यंत तर बरी होती?'

बाजूच्या रॅकवर तापाचे औषध होते ते झोपेत असलेल्या छवीला तिने पाजून दिले.

तिचा हुंदका दाटून येत होता. 'आसावरी, डोन्ट बी पॅनिक! साधाच ताप असेल. काळजी करू नको. ऑल इज वेल!'
ती स्वतःलाच समजावत होती.

छवीशेजारी ती पहुडली. उगवणाऱ्या उद्याकडे तिचे डोळे लागले होते.

.
.
.
क्रमश :
*********
वाचक मित्र मैत्रिणींनो कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करा.
तुमचे लाईक्स आणि कमेंट म्हणजे लिखाण आवडल्याची पोचपावती असते. ती पोचपावती मिळाली की पुढे लिहायला पुन्हा हुरूप येतो. तेव्हा खुप सारे लाईक करत रहा. कथेत काही सुचवायचे असेल तर तेही सुचवू शकता. तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत. कथा शेअर करावीशी वाटली तर फेसबुक पेजची लिंक नक्की शेअर करू शकता.
धन्यवाद!

साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेखक आपल्या कल्पनांना आकार देऊन कथा लिहीत असतात. त्यामागे त्यांचा वेळ, मेहनत असते. त्यामुळे कथेतील प्रसंग, पात्र यांचा कुणीही गैरवापर करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
धन्यवाद!
**************

🎭 Series Post

View all