Feb 23, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला..! भाग -3

Read Later
पाहिले न मी तुला..! भाग -3


पाहिले न मी तुला..!

भाग - तीन.


आसावरीने पुन्हा तिचा फ्रॉक नाकाशी धरला. तिचे डोळे बंद झाले.. अगदी अलवार! तो परफ्युमचा मंद गंध तिलाही ओळखीचा वाटला.. उगाचच!"शुभं करोती कल्याणं
आरोग्यं धनसंपदा!
शत्रूबुद्धी विनाशाय
दीपज्योती नमोस्तुते!!"

देवघरातून कानावर आवाज आला तशी हातातील फ्रॉक बाजूला सारून आसावरी तिकडे गेली.


".. दिवा तेवे देवापाशी
उजेड पडे विष्णूपाशी.
माझा नमस्कार सर्व देवदेवतांपाशी!"

आजी आणि नात मनोभावे हात जोडून उभ्या होत्या.


" पुढचा नमस्कार माझ्या आजीपाशी." असे म्हणत छवीने आजीला नमस्कार केला.


"शुभं भवतु! खूप खूप मोठी हो."   रजनीताईंनी तोंड भरून आशीर्वाद दिला.


"त्यानंतरचा नमस्कार माझ्या मम्मापाशी!" असे म्हणत ती आसावरीजवळ आली.

" छवी अगं! तुला कितीदा सांगितले मला असा नमस्कार नको करत जाऊ." आसावरी.

" का पण? आजी तर म्हणते की मोठ्यांना नमस्कार करायचा असतो. मग तू नेहमी नाही का म्हणतेस?"   हिरमुसून ती.


"कारण माझी ही इटुकली परी म्हणजे देवाचे रूप आहे ती मला का नमस्कार करणार? उलट मीच तिला नमस्कार करते." आसावरीने तिच्या पायाला हात लावला.

"शुभं भवतु!"
तिनेही तिला आजीसारखा आशीर्वाद दिला.

"देवाचे रूप म्हणजे काय गं?"  तिचा निरागस प्रश्न.


"देवाला नमस्कार केला, त्याच्यापुढे हात जोडले की कसं प्रसन्न वाटतं ना, तसेच तुला पाहिले की मला प्रसन्न वाटते. कळलं?" तिला मिठीत घेऊन आसावरी उत्तरली.


"मम्मा तू कधी मला देव म्हणतेस, कधी राजा म्हणतेस, कधी परी तर कधी प्रिन्सेस! मी नेमकी आहे तरी कोण?"

तिचे प्रश्न काही संपेनात.


आसावरीने तिला पुन्हा आपल्या मिठीत घट्ट केलं.

"छवी यू आर एव्हरीथिंग फॉर मी! माझं सर्वस्व आहेस गं तू."


"म्हणजे?"  तिचा पुढचा प्रश्न तयारच होता.


"प्रश्न संपले असतील तर हा लाडू खायचा?"

  तिच्यापुढे तिचा आवडता रव्याचा लाडू ठेवत रजनीताई म्हणाल्या.

लाडू बघून तिचे सर्व प्रश्न हरवले आणि ती मिटक्या मारत खाऊ लागली.


आसावरी स्वयंपाकघरात गेली. गॅसवर कुकर चढवताना परत
तो सुगंध तिच्या मनात दरवळला. 
******

"आई s!"
शेखरचा हळवा आवाज कानी आला. नयनाताईंनी आपली व्हिलचेअर दरवाजाकडे वळवली.


"शेखर.. आलास तू? "
भिरभरणाऱ्या नजरेने त्यांनी विचारले. आवाज अगदीच क्षीण झाला होता.


" आई, काय अवस्था झालीय गं तुझी? मला साधं कळवावे हे देखील वाटले नाही का गं कोणाला?"
तिला आलिंगन देत शेखर म्हणाला त्याचे डोळे भरून आले होते.


"कोणाला काय वाटायचे? इथून जाताना तूच तर सर्वांना बजावून गेला होतास ना की ह्यापुढे कोणाशीही तुझा कसलाच संबंध उरणार नाही म्हणून?" त्याच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत त्या म्हणाल्या.

"तू अमेरिकेला गेलास, नी घराचे वासे उलटे फिरायला लागले. दोनच वर्षांनी ऍक्सीडेन्टमध्ये मी माझे पाय गमावले. तुझे बाबा थोडक्यात बचावले. एकमेकांना सावरायला आम्हालाही वेळ लागला रे बाळा. आता हळूहळू होतेय सगळं स्थिरस्तावर. आपला बिझनेसदेखील रूळावर आलाय. घरातील वैभव परत आलंय पण घराला घरपण नाही राहिले रे.

शेखर, तुझ्याशिवाय आमचं आयुष्य म्हणजे शून्य आहे!"
इतक्या वर्षाचे मनात साचलेले मळभ मोकळे होत होते.


"आई, माफ कर मला. मी खूप स्वार्थी झालो होतो गं. स्वतःपुढे मी कोणाचा काही विचारच केला नाही." त्याचा हुंदका बाहेर पडला.


"आता आला आहेस तर मला वचन दे, ह्यापुढे आम्हाला सोडून कधीच जाणार नाहीस."  नयनाताईंनी रडतच आपला हात समोर केला.

"आई.."

"मला वचन हवंय शेखर!"  त्या पुढे म्हणाल्या.

"अरे एकुलता एक मुलगा आहेस तू आमचा. आयुष्याच्या या वळणावर आम्हाला असे एकटे नको रे सोडू राजा."


"आई, मी चुकलो गं." त्यांचा हात हातात घेत तो म्हणाला. ह्यापुढे कधीच असे वागणार नाही. प्रॉमिस!"


नयनाताईंनी त्याला उराशी कवटाळले. साडेचार वर्षांचा विरह संपला होता. दोघे मायलेकरं हूमसून हूमसून रडत होते.


"तुम्हा मायलेकरांचं झाले असेल तर आम्हीही रांगेत उभे आहोत, बरं का!"

आत येत विनायकराव म्हणाले. त्यांच्या सोबत स्मिता आणि पल्लवी दोघी आत आल्या.

"बाबा.. आय एम सॉरी बाबा! मी खूप चुकीचे वागलो हो." शेखर त्यांच्या कुशीत शिरला.

"अरे लेका, ते म्हणतात ना की सुबह का भुला शाम घर लौटे तो उसे भुला नही कहते!"
त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत ते म्हणाले. त्यांच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहत होत्या.

"हो, पण ही  'शाम' डायरेक्ट साडेचार वर्षानंतर उगवली बरं का."  डोळे पुसत पल्लवी, स्मिताची मुलगी शेखरकडे बघून म्हणाली.

"पल्लवी, किती मोठी झालीस यार तू?"
तिच्याकडे येत तो.

"हं. मोठी तर झालेय. तुझ्या म्हणण्याप्रमाणे मेडिकलला ऍडमिशन देखील घेतली. आता फाईनल ईअर ला आहे मी." त्याचा हात हातात घेऊन ती.

त्यानं तिला मिठी मारली.

"आय मिस यू ब्रो! व्हेरी बॅडली मिस यू. आता परत इथून बाहेर जायचं नाव काढलंस ना तर दोरीने तुला गच्च बांधून ठेवेन." त्याला मारत पल्लवी.

"ती वेळच येणार नाही. आपल्या माणसांना सोडून राहणे खूप क्लेशदायक असते, हे माझ्या ध्यानात आलेय."
तो.

"आत्या, तुझ्या पल्लीने माफ केलंय मला, तू नाही का करणार?"  आपले कान पकडून शेखर स्मिताजवळ आला.

"तुझा कान तेव्हाच ओढला असता ना तर ही वेळ आली नसती.
आता फ्रेश हो. दादा आणि पल्लवीने तुझी आवडीची गरमागरम जिलेबी आणलीय, सगळे मिळून तोंड गोड करूया."
त्याचा कान स्मिताने हलकेच खेचला.

फ्रेश व्हायला म्हणून त्याची पावले त्याच्या खोलीकडे वळली.

********

"आसावरी."
ओट्याजवळ आपल्याच विचारात गुंग असलेल्या तिच्या खांद्यावर रजनीताईंनी हात ठेवला.

त्यांच्या अचानक आलेल्या स्पर्शाने ती दचकली.

"काय झालेय आसावरी? आल्यापासून बघतेय, कुठेतरी हरवल्यासारखी दिसते आहेस?"  त्यांच्या नजरेत काळजी होती.


"काकू अहो, कुठे काय ? खिचडी झालीये. छवीचे पालकसूप देखील रेडी आहे. आता तूप गरम केले आणि पापड भाजले की जेवायला बसूयात." सावरासावर करत आसावरी.


"उगाच विषय बदलू नकोस बाळा. तू सांगत नसलीस तरी तुझे डोळे सांगत आहेत की काहीतरी आहे, ज्यामुळे तू बैचेन आहेस."


"नाही हो खरंच तसे काही नाहीये."   ती बळेच हसून म्हणाली.


"छवी मला सांगत होती की सिग्नलवरती तुझं लक्ष नव्हतं, बीट घ्यायला विसरलीस. हेही खोटं आहे का?"
तिच्याकडे रोखून पाहत त्या.


"छवी छोटी आहे हो काकू, तिला काय कळतंय?"   नजर बाजूला करत ती.


"ती छोटी आहे, कळत नाही म्हणून तर तिने मला सांगितले. एरवी मोठी माणसे जी लपवालपवी करतात ती त्या निष्पाप जीवाला नाही जमत गं." त्यांच्या आवाजात एक हळवेपण होते.

आसावरीच्या डोळ्यातून एक मोती घरंगळत गालावर ओघळला.


" काकू.." तिने आपले दोन्ही हात त्यांच्या गळ्यात गुंफले.

"लपवालपवी नाही हो. काही असेल तर योग्य वेळ आली की सांगेनच ना तुम्हाला. शेवटी तुमच्याशिवाय माझे कोणी आहे का?" ती.


"आसावरी, नेहमी अशीच तू मला शब्दांच्या जाळ्यात अडकवतेस आणि मग मला बोलायला काही सुचत नाही बघ. पण कायम एक गोष्ट लक्षात ठेव, आयुष्यात एवढे मोठे दोन धक्के पचवलेत मी. माझं सर्वस्व हरवलेय. आता माझ्याकडे तुम्हा दोघींशिवाय काहीच उरले नाहीये. तू एकटीने झुरत बसू नकोस, कसलेही संकट आले तरी ते आपण दोघी मिळून दूर सारू. मी कायम तुझ्यासोबत असेन बाळा."


त्यांच्या शब्दांनी तिला भरून आले. वाटलं एक गच्च मिठी मारून त्यांचसमोर मन मोकळे करून टाकावे. वाटले तेवढे सोपे नव्हते ते! तिने स्वतःवर आवर घातला.


"काकू, तुम्ही सोबत आहात हे मला माहितीये ना!
चला, आता जेवायला घेऊया नाहीतर तुमचा लाडका गुलाब उड्या मारत यायचा." ती जेवणाची भांडी घेत हसून म्हणाली.*******


शेखर त्याच्या खोलीत प्रवेशला. तब्बल साडेचार वर्षानंतर या खोलीत त्याने पाय टाकला होता.

त्यानं एकवार चौफेर नजर फिरवली. इथून जाताना सोडून गेला तसे आत्ता त्या खोलीत काहीच नव्हते. खोलीचा चेहरामोहरा अगदी बदलून गेला होता.

कॉलेजमध्ये असतांना जशी त्याची खोली असायची तशीच आता दिसत होती. जणू काही तिथला सात वर्षांचा काळ कुठेतरी हरवून गेला होता.

नकळत गालावर उमटलेला थेंब पुसून त्याने बिछ्यान्यावर स्वतःला झोकून दिले.
हा तोच बिछाना, ज्यावर कधीकाळी कित्येक बेधुंद रात्री त्याने जगल्या होत्या. त्या आठवणींनी लगेच तो तिथून उठला आणि बाथरूम मध्ये जाऊन शॉवरखाली उभा राहिला. आता डोळ्यातून बरसणाऱ्या सरींची कसलीच तमा उरली नव्हती!


"दादू ss! येतोस ना? आईने जेवायला पानं घेतलीत. मामा - मामी वाट बघत आहेत." दारावर टकटक करत पल्लवी विचारत होती.

तिच्या आवाजाने तो भानावर आला.

"हो, पाच मिनिटांत आलोच गं. तू हो पुढे!" त्याने आतूनच उत्तर दिले.

तो बाहेर आला. जेवणाच्या टेबलवर सगळे त्याची वाट पाहत बसले होते. काही वेळापूर्वी पोटात भुकेचा डोंब उसळला होता आणि आता पाहिलाच घास त्याच्या घशाखाली उतरत नव्हता. कसेबसे जेवण उरकून तो उठला आणि आपल्या खोलीत निघून गेला.

त्याची ही अस्वस्थता नयनाताईंचे डोळे हेरत होते."शेखर, आत येऊ का?"


"आई अगं परवानगी कसली मागतेस? ये ना. "

पल्लवीच्या मदतीने नयनाताई व्हीलचेअर घेऊन आत आल्या.


"पल्लवी तू जा बाळा. आईला मदत कर. मी जरा ह्याच्याशी गप्पा मारते." नयनाताई.

मामीचे ऐकून पल्लवी माघारी गेली.


"शेखर किती अस्वस्थ आहेस. नीट जेवला देखील नाहीस."


"नाही गं. बाहेर राहून तिखट खाण्याची सवय मोडली ना, म्हणून थोडे कमी जेवलोय. बाकी काही नाही." तो मंद हसून म्हणाला.


"किती फसवशील? खोटं नाही बोलता येत रे तुला." त्याचा हात हातात घेत त्या.


"आई, ह्या खोलीत श्वास गुदमरतोय गं माझा. माझीच खोली अनोळखी वाटायला लागलीय. इथल्या सगळ्या आठवणी का पुसून काढल्यास तू?"
आईच्या मांडीवर डोके ठेऊन तो हुमसू लागला.


"त्या आठवणींचा विसर पडावा म्हणूनच तर तू अमेरिकेला गेला होतास ना? मीही इथे तुझा भूतकाळ मिटवायचा प्रयत्न केला.
शेखर तुझ्या भूतकाळातून तुला आता बाहेर पडायला हवे. पुन्हा पहिल्यापासून नवी सुरुवात करायला हवी."
त्याच्या केसातून हात फिरवत त्या बोलत होत्या.
.
.
.
क्रमश :
********

खरंच आसावरी रजनीताईपासून काही लपवतेय का?

काय दडले आहे शेखरच्या भूतकाळात? कळण्यासाठी वाचत रहा कथामालिका..

पाहिले न मी तुला..!

*******

भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. आपल्या फेसबुक पेजवर देखील लाईक करायला विसरू नका.
तुमचे लाईक्स आणि कमेंट म्हणजे लिखाण आवडल्याची पोचपावती असते. ती पोचपावती मिळाली की पुढे लिहायला पुन्हा हुरूप येतो. तेव्हा खुपसारे लाईक करत रहा. काही सुचवायचे असेल तर तेही सुचवू शकता. तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत. कथा शेअर करावीशी वाटल्यास फेसबुक पेजची लिंक शेअर करावी.
धन्यवाद!

साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेखक आपल्या कल्पनांना आकार देऊन कथा लिहीत असतात. त्यामागे त्यांचा वेळ, मेहनत असते. त्यामुळे कथेतील प्रसंग, पात्र यांचा कुणीही गैरवापर करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
धन्यवाद!

***************


ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//