पाहिले न मी तुला..! भाग -2

Heart Touching Story Of A Struggling Mother!

कथेचा पहिला भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा.
https://www.facebook.com/581606972323826/posts/1294434124374437/


**********************************
पाहिले न मी तुला..!


भाग- दोन.

********
कुणास ठाऊक का पण तिला मिठी मारण्याचा मोह शेखरला आवरला नाही.

"थँक यू! बाळा. ऑल इज वेल!"  तिच्या गळ्यात आपल्या हातांचा विळखा घालून त्याने तिला पटकन एक मिठी मारली.

"निघतो मी. सी यू सून!"  म्हणून तो निघाला.


"बाय-बाय फ्रेंड!"  ती हात हलवत जाणाऱ्या त्याला पाठमोरे बघत उभी होती.


"छवी कोणाला गं बाय करतेस? आणि कोण होता गं तो?"
तिच्याजवळ येत आसावरीने विचारले.

" अगं, तो ना माझा नवा मित्र आहे."  तिचा हात पकडत छवी.

" हो? मग मला कसे नाही माहिती? " ती.


छवी हसली.
"तुला गं कसं माहिती असणार? तू कुठे त्याला पाहिलेस? मीच तर त्याला आज पहिल्यांदा भेटले आहे."


ते ऐकून आसावरीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. गुडघ्यावर बसून तिने तिच्या खांद्यावर आपले दोन्ही हात ठेवले.


"राजा, तुला किती गं वेळा सांगितलंय असे अनोळखी लोकांशी बोलायचे नसते."
तिच्या घाऱ्या डोळ्यात बघत आसावरी म्हणाली.


"आशू, मी पण त्याला हेच बोलले. पण तो खूप चांगला आहे गं. मला असं वाटत होते की फार पूर्वीपासून मी त्याला ओळखते."
त्याच्याबद्दल सांगताना तिचे गुलाबी ओठ थकत नव्हते.


"हं, त्याने काही चॉकलेट वगैरे नाही ना दिले तुला?" आसावरी.


"मम्मा! ही इज नॉट अ किडनॅपर. ओके? माझा फ्रेंड आहे तो." तिच्याकडे बघून आपले घारे डोळे मोठे करत छवी.


"ओके! बाबा, सॉरी." आसावरीने आपले कान पकडले तशी छवी खुदकन हसली.


"पण काय गं? तुझ्या मित्रासोबत मला का नाही भेटवलंस?" लटक्या रागाने आसावरी.

 
"अगं भेटवणारच होते पण ना त्याच्या आईला ना ऍडमिट केलंय म्हणून तो निघून गेला. त्याला मी सांगितलं की 'ऑल इज वेल!' म्हणत रहा, काही होणार नाही. आपण हॉस्पिटलला जातो तेव्हा तू हेच म्हणतेस ना?
लहानसा चेहरा करून ती.


"हं, हुशार गं माझी बाळ!" तिची पापी घेत आसावरी म्हणाली.
दोन क्षण दोघीही शांत होत्या.



"ये मम्मा, माझे पाय दुखत आहेत गं. ते डॉक्टर अंकल मला परत इंजेक्शन देणार का गं?" आसावरीकडे बघत ती.


"नाही रे शोनुल्या, ते उगाच परत कशाला इंजेक्शन देतील? पाय खूप दुखत आहेत का गं? मी तुला कडेवर उचलून घेऊ का? "
ओठांवर उसणे हसू आणून आसावरी.


"अगं आपण आपल्या गाडीजवळ पोहचलो देखील. आता नको मला कडेवर घेऊ."  छवी.


"अरेच्चा! आलोच की आपण आपल्या गाडीजवळ. चला पटकन बसा, लगेच घरी जाऊया. रात्री झोपतांना मी पायांची मालिश करून देईन हं."



आसावरीने आपली ऍक्टिव्हा सुरु केली. छवी नीट बसल्याची खात्री झाल्यावर दोघी निघाल्या. समोर गेल्यावर सिग्नल लागले. तिने आपली ऍक्टिव्हा थांबवली पण डोक्यातील विचारांच्या गतीला मात्र ब्रेक लावू शकत नव्हती. 'छवीचे पाय दुखत आहेत' म्हणजे परत हॉस्पिटलला जायचं आहे हे पक्के होते. त्या लहानशा जीवाच्या काळजीने डोळ्यात पाणी हेलकावायला लागले.


" अगं मम्मा, ग्रीन लाईट लागलाय. तुझं लक्ष कुठे आहे?"
समोर बसलेल्या छवीने तिच्याकडे वळून पाहिले.


"हो, हो. माझे लक्ष आहे बरं का. चला."  म्हणून तिने पुन्हा आपली ऍक्टिव्हा सुरु केली.



घराच्या कॉर्नरपुढून गाडी वळली तसे पुन्हा छवीने आसावरीला आठवण करून दिली.


" अगं मम्मा, थांब थांब! आपल्याला त्या काकूंकडून बीट घ्यायचे आहेत, विसरलीस ना?"


आसावरीने आठवल्याबरोबर आपली ऍक्टिव्हा बाजूला लावली.


" विसरलेच होते गं. थँक यू! प्रिन्सेस. तू सोबत आहेस म्हणून बरं झालं."
बीट घेऊन परत गाडीजवळ येतांना ती म्हणाली.


" मम्मा, तुझी मेमरी ना कमी होत आहे. घरी गेल्यावर आजीला सांगणार आहे मी."  छवी.


" काय?"  आसावरीचा प्रश्न.


"हेच की तुला पण ना दुधामध्ये हार्लिक्स टाकून देत जा. मग तू पण माझ्यासारखी स्ट्रॉंग होशील आणि तुझी मेमरी सुद्धा स्ट्रॉंग होईल."


आपल्या हाताचे स्नायू दाखवल्यासारखे करत छवी म्हणाली.


तिचा तो गोड निरागसपणा बघून आसावरीच्या ओठांवर हसू उमलले. हसतच त्या घराकडे निघाल्या.


**********


"हं दादा, बस, इथेच थांबवा. किती झालेत?"
खिशातून वॉलेट काढत शेखर रिक्षावाल्याला म्हणाला.


"सत्तर रुपये."  रिक्शावाला.


शेखरने त्याच्या हातात शंभरची नोट ठेवली.


"अहो साहेब, माझ्याकडे सुट्टे नाहीत." रिक्शावाला.


" असू दे दादा. तू मला वेळेत पोहचवलेस त्याचे एक्सट्रा समज. थँक यू." असे बोलून शेखर धावतच दारापाशी आला. त्याचे हृदय धडधडायला लागले होते.


"ऑल इज वेल! ऑल इज वेल!"
छवीचे बोलणे आठवून नकळत त्याचा हात छातीकडे गेला आणि त्याच्या तोंडून बाहेर पडले.



आत पाऊल टाकणार तोच स्मिताने, त्याच्या आत्याने त्याला अडवले.


"अरे थांब जरा! इतक्या वर्षांनी येतो आहेस. मला ओवाळू तरी दे." आरतीचे ताट घेऊन ती म्हणाली.


"आत्या ते बाजूला ठेव आणि आधी आई कुठल्या हॉस्पिटलला आहे ते सांग मला. आणि मुळात तू मला घरी का बोलावलेस?" अधिरतेने तो.


"हो रे बाबा. तुझी आई घरातच आहे. झालं ओवाळून. ये आता आत."  आत्या हसत म्हणाली.


" पण तू तर मला बोलली होतीस की तिला हॉस्पिटलाईज केलेय?"  तो.


"हो. असं बोलले तेव्हाच तर तू धावत घरी आलास ना? नाहीतर अमेरिकेहून इथे परत आलास, आणि तुला घ्यायला आलेल्या ड्राइव्हर काकासोबत केवळ तुझे सामान घरी पाठवलेस पण तुझा पत्ताच नव्हता म्हणून मला असा कॉल करावा लागला."


आत्याने स्पष्टीकरण दिले.


"आत्या इट इज टू मच हं! तुला माहितीये माझ्या मनात काळजीने काय काय चाललं होतं? कुठे आहे आई?"
त्याच्या बोलण्यात रागाची छटा स्पष्ट दिसत होती.


"वहिनी आतल्या खोलीत आहे. जा भेट तिला." मृदू स्वरात स्मिताआत्या.


"शेखर.."
तिच्या आवाजाने आत जाताना तो थांबला.


"..आणि काळजीचं म्हणशील तर गेल्या साडेचार पाच वर्षांपासून तुझ्या काळजीने वहिनीच्या जीवाला किती घोर लागलाय त्याचा अंदाज तरी आहे का तुला? तीच नव्हे, घरातील प्रत्येकजण तुझ्या काळजीने पोखरलाय."


डोळ्यातील पाणी टिपत ती म्हणाली.


"आत्या, सॉरी गं. काही समजून न घेताच मी तुझ्यावर चिडलो. माफ कर मला."
वळून तिच्याकडे येत त्याने तिला मिठी मारली.



" हं. जा आता. वहिनी केव्हाची तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे. "
त्याच्या डोक्यावर हात ठेऊन ती.


"हम्म!" म्हणून त्याचे पाय आईच्या खोलीकडे वळले.

***********

"आजी ss"


"अरे, आला का माझा गुलाब? चला दोघीही मस्तपैकी फ्रेश होऊन या. आपल्याला  'शुभं करोती'  करायचे आहे."
देवाजवळ दिवा लावत रजनीताई छवीला म्हणाल्या.


"होs! मला म्हणायचंय ना!
ये आजी, पण तू मला गुलाब का म्हणतेस गं?"
आपले ओठ गोलाकार वळवत छवीने विचारले.

"कारण गुलाबाचे फूल किती सुंदर असते. तुला माहितीये? गुलाब ना फुलांचा राजा आहे. तुझे हे गोबरे गाल, हे गुलाबी गुलाबी ओठ! आपल्या बागेतल्या गुलाबासारखीच तू सुंदर आहेस की नाही, म्हणून  'माझा गुलाब' म्हणते तुला."
रजनीताई तिला समजावत म्हणाल्या.


"म्हणून मम्मा मला राजा म्हणते, होय ना? मी राजा! मी राजा!"

छवीच्या उडया सुरु झाल्या. आसावरी मात्र काही न बोलताच आत निघून गेली.


" हो गं, तू राजाच आहेस बघ मम्माचा. पण तिला काय झालंय? ती का अशी निघून गेली? "
त्यांनी काळजीने विचारले.


"अगं आजी, तुला माहीत नाही. ते एक सिक्रेट आहे."
रजनीताईच्या कानाजवळ हळू आवाजात छवी.


"कसलं सिक्रेट?" त्यांचाही आवाज हळू झाला.


" अगं, तिची ना मेमरी वीक झालीय. कसली आठवणच नसते तिला. आणि नीट दिसत पण नाही. आम्ही येत होतो तेव्हा ट्राफिकचा ग्रीन लाईट तिला दिसलाच नाही आणि मग पुढे बीट घ्यायचे आहेत हेसुद्धा ती विसरली होती. तिच्यासोबत मी होते म्हणून बरे झाले."


काहीतरी खूप मोठे गुपित सांगितल्यासारखे ती हळूच सांगत होती.


"आणि एक सांगू का?"   ती.


"आणखी काय गं?"   त्या.


"आत्ता सुद्धा ना तू तिला दिसली नसणार म्हणून काही न बोलता ती आत गेली."
ती डोळे मोठे करून सांगत होती.


"अरे बापरे! एवढी मोठी मी दिसले नाही म्हणजे प्रॉब्लेम जरा गंभीर दिसतोय. आता गं काय करायचं?" रजनीताई.


"माझ्याकडे ना एक सोल्युशन आहे. आजी तू की नाही तिला दुधामध्ये हॉर्लिक्स मिक्स करून देत जा. मग सगळं ठीक होईल. तिलापण मी हेच बोलले." छवी आजीला उपाय सांगायला लागली.



"छवी s! हातपाय धुवायला ये गं बाळा."

"आजी, मी जाते गं. नाहीतर मला कशाला बोलावले तेच मम्मा विसरून जाईल."


आतून आसावरीचा आवाज आला तशी ती पटकन आत पळाली. रजनीताई आसावरीला काय झाले असेल या विचारात अडकल्या.


"पिल्लू, बकेटमध्ये गरम पाणी ठेवलंय. नीट हातपाय धू आणि बाहेर ये. की मी धुऊन देऊ?" आसावरी.


" मम्मा, मी आता मोठी झाले, माझं मीच धुते." छवी बाहेर आली. कपडे चेंज करायचा प्रयत्न करत होती पण डोक्यातून फ्रॉक काही निघेना म्हणून तिने आसावरीला मदतीला बोलावले.
तिला मदत करताना आसावरीला तिच्या फ्रॉकवर एक वेगळाच सुगंध जाणवला.



"छवी, पार्कमध्ये भेटलेल्या मित्राने तुला हग केलं?"  तिच्याकडे बघत आसावरी.


"हो, तुला गं कसे कळले?"  आश्चर्याने ती.


" तुला सांगितले आहे ना, अशा अनोळखी लोकांना आपल्याला टच नाही करू द्यायचे."  काहीशी चिडून आसावरी.


"आशू, रिलॅक्स! अगं तो अनोळखी नाहीच आहे. त्याला भेटशील ना तर तुलाही तो ओळखीचा वाटेल. आता बाहेर चल, आजी वाट पाहत असेल."


ती बोलून बाहेर गेलीदेखील.


आसावरीने पुन्हा तिचा फ्रॉक नाकाशी धरला. तिचे डोळे बंद झाले.. अगदी अलवार! तो परफ्युमचा मंद गंध तिलाही ओळखीचा वाटला.. उगाचच!
.
.
.
क्रमश :


**************
कसा वाटला हा भाग? कथा आवडतेय ना? छवीच्या म्हणण्यानुसार खरंच शेखरला ती ओळखत असेल काय? आणि आसावरीचे काय? तिलाही तो सुगंध ओळखीचा का वाटला असेल? कळण्यासाठी वाचत रहा कथामालिका..
पाहिले न मी तुला..!


भाग आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा. आपल्या फेसबुक पेजवर देखील लाईक करायला विसरू नका. काही सुचवायचे असेल तर तेही सुचवू शकता. तुमच्या सूचना स्वागतार्ह आहेत. कथा शेअर करावीशी वाटल्यास फेसबुक पेजची लिंक शेअर करावी.
धन्यवाद!


साहित्यचोरी हा गुन्हा आहे. लेखक आपल्या कल्पनांना आकार देऊन कथा लिहीत असतात. त्यामागे त्यांचा वेळ, मेहनत असते. त्यामुळे कथेतील प्रसंग, पात्र यांचा कुणीही गैरवापर करतांना आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
धन्यवाद!
***********


🎭 Series Post

View all