Mar 02, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला..! भाग -18

Read Later
पाहिले न मी तुला..! भाग -18


पाहिले न मी तुला..!
भाग -अठरा.निद्रादेवीच्या प्रसन्नतेची आसावरी वाट पाहू लागली पण आज ती प्रसन्न होईल याची चिन्हे काही दिसत नव्हते. तिने आपली कूस बदलली. 'अनू, आय मिस यू यार!' अनुच्या आठवणीत ती पुन्हा व्याकुळ झाली.


"आशू!" झोपलेल्या छवीचा हात तिच्या मानेवर आला. तो छोटुसा नाजूक हात तिने आपल्या ओठांना लावला.


मनाच्या दारात भूतकाळ हळूच डोकावू पाहत होता. इतक्या दिवसांनी तीही त्यात अलगद हरवून गेली.

*********

राणे गुरुजी छोट्या आसावरीच्या आयुष्यात आले आणि तिच्या जीवनाला खरा अर्थ मिळाला. आसावरी चौथा वर्ग पास होणारच नाही हा मंदाला वाटणारा विश्वास खोटा ठरला होता. ती पास तर झाली होतीच, त्यात तिची टक्केवारी सुद्धा चांगली होती. नेहमी तिला पाण्यात पाहणाऱ्या योगेशला देखील आजवर कधी इतके चांगले गुण पडले नव्हते. त्यामुळे मंदाचा चांगलाच तीळपापड उडत होता.


"आजपासून हिचे शिक्षण बंद. ह्यापुढे तू घराबाहेर पडायचे नाहीस." तिने आपले फर्मान सुनावून टाकले.


"का नाही शिकणार ती? चौथी पास होईल तर पुढे शिकणार हे ठरले होते ना?"  मुकुंदा.


"हो, पण आता मी विचार बदललाय. मुलीची जात आहे, थोडे घरातील कामं शिकू द्या. पुस्तकी शिक्षण बास झालं आता." मंदा.

"मंदे, तुझ्या मनात काय चाललेय ते कळत नाही का मला? आपल्या योगेश पेक्षा जास्त मार्क पडलीत म्हणून जळफळाट होतोय ना तुझा? आणि सारखी कामाची काय बोलतेस गं? मी घरी नसलो तर कामाच्या रहाटगाडग्याला कशी जुपतेस ते ठाऊक नाही मला?"  मुकुंदाचा आवाज वाढला होता.

"अच्छा, म्हणजे आता कागाळ्या सुद्धा करायला लागलीस होय? बाई, बाई. आता तर बोलायची सोयच राहिली नाहीय. तू तर गोगल गाय नं पोटात पाय अशी निघालीस गं." आसावरी कडे रागाने पाहत मंदा म्हणाली.


"मंदा, जरा तोंड आवर. ती लहान आहे म्हणून वाटेल तसे बोलू नको. मांजर स्वतः डोळे मिटून दूध पीत असली तरी इतरांना तिचे दूध पिणे कळते. तसंच तुझं झालंय. ह्या लहानगीला तू इतके राबवलेस ना की काही न सांगताही मला कळले ." त्यांच्यातील वाद वाढतच होता.


"मामा, असू दे ना. मामी म्हणते तर नाही शिकणार मी पुढे. पण माझ्यामुळे तुमच्यात वाद नकोत."   आसावरी रडक्या सुरात म्हणाली.


"चिमणे, अगं काय बोलतेस तू? तुझ्या कष्टाचे चीज झाले आहे. आता असे पूढे न शिकण्याची भाषा बोलू नकोस. तुझ्या मामीच्या बोलण्यात अडकलीस तर मग तिच्या जाचातून तुझी कधीच सुटका होणार नाही बघ. खूप शिक, खूप मोठी हो." मामा तिला समजावत म्हणाला.

" हो, खूप शिकवा. घरातील असला नसला पैसा आडका तिच्याच शिक्षणावर उडवा. माझ्या योगेश साठी काहीच नको." मंदा चरफडत म्हणाली.


" एक मात्र खरं, तुझी मामी म्हणते तसे तुझ्या शिक्षणासाठी मी जास्त खर्च करू शकणार नाही. होईल तेवढं करेनच पण तू सुद्धा तुझे प्रयत्न कर. चांगल्या मार्कांनी पास होऊन शिष्यवृत्ती मिळव. तेच पैसे पुढच्या शिक्षणासाठी वापर."  त्याचा आवाज जड झाला होता.

"चिमणे, शिक्षणाशिवाय तरणोपाय नसतो बघ. तुझी मेहनत, तुझी चिकाटी कधी सोडू नकोस. तीच तुला खूप पुढे घेऊन जाईल. इथं राहशील तर गरिबीत पिचत पडशील. ह्यातून बाहेर पडशील तर स्वतःची प्रगती करशील."  तिला जवळ घेत तो म्हणाला. आज मामा भाचीच्या दोघांच्याही डोळ्यात पूर जमा झाला होता.


उन्हाळा सरला, तडा गेलेल्या जमिनीवर मृग नक्षत्राने पावसाचा शिडकाव केला आणि तप्त धरिणी जराशी तृप्त झाली. शेतातल्या पेरण्या आटोपल्या. जमिनीच्या ओल्या गर्भातून दाण्याचे अंकुर बाहेर येऊ लागले.


शाळा सुरु झाल्या. आसावरीचा वसतिगृहात जाण्याचा दिवस उजाडला.


"आजी मी येते गं. आता नवीन शाळेत शिकणार आहे. तालुक्याला राहीन."  तिने आजीच्या पायाला हात लावून नमस्कार केला आणि तिला मिठी मारली.

उत्तरादाखल आजीच्या डोळ्यातून देखील आसवे वाहिली. "खूप मोठी हो. स्वतःच्या पायावर उभी राहा."  असे तिला खूप काही बोलायचे होते पण तोंडातून आवाज निघत नव्हता. तिचा सुरकुतलेला हात आशीर्वाद देण्यासाठी थरथरत होता. आसावरीला ते कळले.


आजीचा हात हातात घेऊन तिने तो डोक्याला लावला. आजी अशी एकच तर व्यक्ती होती जी काही न बोलताही तिच्या मनातल्या भावनांना समजू शकत होती.


"चिमणे, लवकर आवर बरं. निघायला उशीर होतोय."  मुकुंदा तिला म्हणाला.

घरातून निघताना ती मंदासमोर आशीर्वाद घ्यायला वाकली तसे नाक वाकडे करून ती आत गेली.

"बाय तुझं लग्न नाही आहे, की सगळ्यांनाच नमस्कार करायला निघालीस. शिकायलाच निघाली आहेस."
मुकुंदाने तिला जवळ घेतले.

योगेश दुरूनच तिच्याकडे बघत होता. तिच्या जाण्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर ना आनंद होता, ना दुःख! तो आपल्याच दुनियेत मग्न होता. तिच्या जाण्याने त्याला कशाचाही फरक पडत नव्हता.


मुकुंदा आसावरीला तालुक्याच्या शासकीय वसतिगृहात सोडून आला. असे एकटीला बाहेर धाडताना त्याला भरून येत होते.

आसावरी भेदरलेल्या नजरेने बुजगावण्यासारखी वसतिगृहात प्रवेशली. इथे मायेचे असे कोणीच नव्हते, पण मामीसारखा जाच करणारेही कुणी नव्हते. आपली शाळा अन आपला अभ्यास हेच तिचे विश्व झाले. हळूहळू ती तिथे रमू लागली. तिच्या मनात एक आशेचा अंकुर वाढू लागला होता.

शहरातल्या नवीन वातावरणात येऊन आता दोन वर्ष उलटली होती. आसावरीची अभ्यासातील प्रगती दिवासेंदिवस उत्तम होत चालली होती. बुजरा स्वभाव मात्र अजूनही तसाच होता. स्वतःहून कोणाशी चार शब्द बोलनेही तिला फारसे जमत नव्हते. सारखी बुजलेली असायची.


ती शहरात आल्यानंतर वर्षभरातच आजी वारली. आजारी असली तरी हक्काने मिठी मारावी अशी आसावरीच्या आयुष्यातील तीच तर एकमेव व्यक्ती होती. आजी गेली आणि मग सुट्ट्यामध्ये घरी जायची तिची ओढ आपोआप खुंटली. उन्हाळा आणि दिवाळीची सुट्टी असली की मामाचे घर आणि इतर दिवशी वसतिगृह हेच काय तर तिचे हक्काचे ठिकाण. उगीच मामीला बोलायला विषय नको म्हणून मग घरी आली की ती स्वतःला कामात बुडवून ठेवी. वयाने वाढत असताना तिचा कामाचा उरकही वाढत होता त्यामुळे कामावरून काही बोलायला मंदाला कारण सापडत नव्हते. मामी काही बोलत नसली तरी आसावरीची शाळा सुटावी असे राहून राहून मनात मात्र यायचे. त्याचे कारण म्हणजे योगेश. तो आता हाताबाहेर जाऊ लागला होता. पुस्तकाला हात लावायलाही तो धजत नसे. त्याच्या अशा वागण्यामुळे आसावरी घरी आली की मग मंदा मुद्दाम वाद उकरून काढी. तिने शिकू नये म्हणून मुकुंदाच्या मागे तगादा लावायची. नेहमीच्या असल्या वादामुळे सुट्टीत घरी येणे म्हणजे एखादी सजा भोगतेय असे आसावरीला वाटायला लागले होते.


दिवसामाजी दिवस सरत गेले. वर्षे उलटत गेली. आसावरी आता दहावीला गेली होती. दहावीची बोर्डाची परीक्षा. अभ्यासही तेवढाच कठीण! नव्या जोमाने मन लावून तिने अभ्यास केला. पुढे शिकायचे असेल तर चांगले गुण मिळणे आवश्यक आहेत याची जाणीव तिला झाली होती.
दहावीचा निकाल आला आणि मुकुंदाच्या आनंदाला उधाण आले. एवढे कष्ट करून पोरीनं नाव काढले या समाधानाने त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. आसावरीने देवापुढे साखर ठेवली आणि मामाला वाकून नमस्कार केला.


"अगं, असू दे. चिमणे नाव काढलंस बघ. पाहता पाहता दहावीसुद्धा उत्तीर्ण झालीस. अशीच शिकत राहा."  त्याने तिला आपल्या हृदयाशी कवटाळले.

"आज लता असती तर तिलाही किती आनंद झाला असता. तिने तर तुझी दृष्टच काढली असती."  बोलता बोलता डोळ्यातील एक थेंब गालावर आलाच.

ती नेहमीप्रमाणे गप्पच होती. आईच्या आठवणीतील तिचे जळणे तिलाच माहिती होते.


"चिमणे, हे घे. हे माझ्याकडून तुला बक्षीस. आज खूप खूष आहे मी."  डोळे पुसून त्याने तिच्या हातात शंभरची नोट ठेवली.
आसावरी काही बोलायच्या आत मंदाने ती नोट खसकन उचलून घेतली.


"आपल्या पोरावर कधी दोन रुपये उधळले नाही आणि हिला मोठे शंभर रुपये देताय." तिने ती नोट आपल्या साडीत खोचली.

"त्या पोराने असे नाव केले असते तर त्यालाही दिलेच असते की. तिचे पैसे तिला परत दे."  मुकुंदा.


"मामा, असू दे ना. पैसे नको आहेत मला. तुमचे आशीर्वाद हेच माझे खरे बक्षीस आहे."  मुकुंदाकडे पाहून आसावरी म्हणाली.

" मामी तुलाही नमस्कार करते हं."  ती मंदाच्या पायाला हात लावणार तोच मंदा मागे सरकली.

"असू दे गं बाई. दुरून नमस्कार केलास तरी चालेल. आता थोडं मनावर घे आणि हे शिक्षण बिक्षण सोडून टाक."   मंदा.


"मंदा, अगं काय बोलते आहेस?"  मुकुंदा.


"योग्य तेच बोलतेय. तुमची चिमणी, चिमणी नाही राहिलीय आता. आता ती मोठी झालीय. एखादे स्थळ बघून तिला उजवून टाका. नाहीतर बाहेर जाऊन तीच आपलं तोंड काळं करून येईल."
मंदा बोलतच होती की, " सपाऽ क!" तिच्या गालावर मुकुंदाच्या हाताची पाचही बोटे उमटली.

"आज बोललीस ते अखेरचं. ह्यापुढे आसावरीबद्दल असले काही मी ऐकून घेणार नाही." दार आपटून तो रागाने घराबाहेर पडला.

"मामा ऽ" आसावरी दारापर्यंत त्याच्या मागे गेली.


"मामी, मला माफ कर गं. माझ्यामुळे मामाने तुझ्यावर हात उगारला."  ती मंदाजवळ येऊन रडत म्हणाली.

"रडायचे नाटक कशाला करतेस? तुला तर आनंदच होत असेल ना? आसावरी तू म्हणजे माझ्या संसाराला लागलेले ग्रहण आहेस. जेव्हाची या घरात आली आहेस ना, माझे जगणे मुश्किल करून टाकले आहेस."  मंदा रागाने धुमसत आत गेली.

आसावरीचे मन दुःखाने व्याकुळ झाले. आजवर तिला आयुष्यातल्या एकाही आनंदाचा उपभोग घेता आला नव्हता.
ती आसवे गाळत अंगणातील जांभळाच्या झाडाखाली येऊन उभी राहिली. आज तिला प्रकर्षाने आईची आठवण होत होती.

आसावरीचा हा निकाल मंदाच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. कारणही तसेच होते. चार वर्षापासून योगेश दहावीत गटांगळ्या खात होता आणि आसावरी एका झटक्यात चांगल्या गुणांनी पास झाली होती. तोच राग तिला उफाळून येत होता. त्यातच मुकुंदाने आसावरीसमोर तिच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे तिने आता आसावरीशी बोलणे टाकले होते. मंदाच्या वागण्याला कंटाळून कधी एकदाची सुट्टी संपते आणि वसतिगृहात परत जाते असे आसावरीला झाले होते.


पुढच्या शिक्षणासाठी मोठया शहरात जाण्याबद्दल मुकुंदाने तिला सुचवले. मोठे शहर, मोठे कॉलेज,मनात एक वेगळीच हुरहूर निर्माण झाली होती. एका नामांकित महाविद्यालयात तिने नाव दाखल केले. कॉलेज सुरु व्हायला अजून अवकाश होता. त्या कालावधीत तिने मामाच्या मदतीने वसतिगृहात नाव नोंदविले. दहावीला चांगले गुण मिळाल्यामुळे तिची एका चांगल्या दर्जाच्या वसतिगृहात राहण्याची सोय झाली. आता वाट होती कॉलेज सुरु होण्याची!
.
.
क्रमश :

*********
कॉलेजच्या ह्या नव्या प्रवासात भेटणार होती तिला एक नवी साथ! कोणाची? ते वाचा पुढील भागात. तोवर हा भाग कसा वाटला ते कळवा.

पुढील भाग लवकरच.


*साहित्यचोरी गुन्हा आहे.*ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//