पाहिले न मी तुला..! भाग -17

छोट्या छवीची हळवी कथा!


पाहिले न मी तुला..!
भाग -सतरा.



"बरं बाई. राहिला तो विषय. खूष?"  रजनीताई.
तिने हसून मान डोलावली.

"हॉस्पिटलमध्ये काय झाले ते तरी सांगशील? डॉक्टर काही सिरियस बोललेत का?"  त्यांनी विषयात हात घातला.


"नाही, तसे काही विशेष नाही." नजर चोरत ती.

"मग एवढया उन्हाचे बागेत का गेला होतात? माझ्या गुलाबाने सांगितले मला."  रजनीताई.

"सहजच हो. कधीकधी वाटतं, ज्या कस्तुरीच्या सुगंधात मी न्हाऊन निघतेय, तिच्या आठवणीत परत जगून यावं. ती व्यक्ती परत येणार नाही हे माहिती असते. तरी पटायला मन तयार होत नाही ना. काकू, त्या बागेत आनंदाचे खूप क्षण जगलेय मी. मनाला मरगळ आली की तिथे गेल्यावर थोडा उत्साह मिळतो."  आसावरी बोलत होती.


"म्हणजे डॉक्टरांनी नक्कीच काहीतरी सिरीयस सांगितले आहे, हो ना? अशी उगाच तुला तुझ्या कस्तुरीची आठवण नाही व्हायची."   त्यांनी काळजीने विचारले. स्वर भिजला होता. 

"तसेच काही नाही अगदी. कधीतरी वाटतं पूर्वीचे ते दिवस परत जगून यावेत, बस्स! आणखी काही नाही. कितीही प्रयत्न केला तरी आपण आपल्या माणसांना विसरू शकत नाही ना. तुम्ही तरी कुठे काही विसरलात?"  त्यांच्या खांद्यावर डोके ठेवत ती म्हणाली.

"हो गं आसावरी. खरे आहे."  त्या डोळे पुसत म्हणाल्या.
 "माणूस किती स्वार्थी असतो ना गं? काही वर्षांपूर्वी मलाही माझ्या डोळ्यासमोर छवी नको होती आणि आता बघ, आज तीच जगण्याचं बळ देतेय. आसावरी,माझ्या गुलाबाला काही होणार तर नाही ना? तू माझ्यापासून काही लपवत तर नाही आहेस ना?"  त्यांनी हळवे होत विचारले.


"नाही, तिला काहीच होणार नाही."  आपले अश्रू लपवत आसावरी उत्तरली.


"आशू, तू इथे काय करत आहेस? मी केव्हाची तुझी वाट बघतेय. खूप झोप आलीय ना मला."  स्वयंपाकघरात येत छवी.


"हो रे राजा, आलेच मी." काकूच्या खांद्यावरून डोके काढत आसावरी.


"आशू, आजी तुझे लाड करत आहे का?"  त्या दोघींकडे बघून छवी.


"हूं. तुझी आशू केवळ तुझ्यासोबतच असते ना, मला अजिबात वेळ देत नाही, म्हणून आता लाड करत होते."  रजनीताई हसून म्हणाल्या. त्यावर आसावरीही हसली.


"ही, ही. आशू, एवढी मोठी झालीस तरी आजी तुझे लाड करते. सो फनी!"  छवी हसायला लागली.


"अगं राणी, मोठे होऊनही लाड करून घ्यायला भाग्य लागतं, तुला नाही कळणार."  तिच्या डोक्यावर हात फिरवत आसावरी म्हणाली.
"चला, झोपायला जाऊया. काकू तुम्हीसुद्धा निवांत झोपा हो."
छवीला बेडरूम मध्ये घेऊन जात आसावरी.


"मम्मा, आज मला मांडीवर झोपव ना गं."  आसावरीच्या मांडीवर डोके ठेवून छवी म्हणाली.


"अरे, आज माझ्या पिल्लूला अचानक मम्माची मांडी कशी आठवली?"   तिच्या दाट, काळ्याभोर कुरळ्या केसातून हात फिरवत आसावरी.

"आशू, तुझा छोटुसा पिल्लू आहे ना मी?"  तिने आपले डोळे किलकीले करून म्हटले.


"हो गं राणी, माझे इटुकले पिल्लूच तर आहेस तू."  तिच्या कपाळावर ओठ टेकवत आसावरी.


आसावरी छवीच्या डोक्यातून हात फिरवत होती. तिचे काळे,रेशमी केस. किती मऊशार होते! त्या रेशमी केसांना बघून तिला डॉक्टर निशांतचे बोलणे पुन्हा आठवले आणि एक हुंदका दाटून आला. 'किती सुंदर दिसते माझी लेक या कुरळ्या केसांत! मोकळे केस सोडले तर अगदी दृष्ट लागण्याजोगी भासते आणि जेव्हा उंच अशी पोनी घालते तेव्हा तर घाऱ्या डोळ्यांची बाहुलीच जणू! हे एवढे सुंदर मुलायम केस काही दिवसांनी गळून पडतील, तेव्हा माझी छकुली कशी दिसेल?' नुसत्या विचारांनीच तिला भरून आले.

 'ह्या माझ्या इतक्या गोड फुलराणीच्या आयुष्यात असा वैशाखवणवा का? तिची चूक नसताना कसली शिक्षा ती भोगतेय? देवा, तू आहेस ना रे, मग माझ्या चिमणीचे दुःख तुला कसे पाहवते?'


तिने हलकेच आपले डोळे मिटले. आज झोपदेखील तिच्या आसपास फिरकायला तयार नव्हती. मांडीवर निजलेल्या छवीचे डोके तिने अलगद उशीवर ठेवले. मनात कसलातरी विचार आला. तिने हळूवार उठून कपाटाच्या कप्प्यातून एक डायरी बाहेर काढली. किती दिवसांनी तिने ही डायरी हातात घेतली होती. पहिले पान तिने उघडले. 'मुळाक्षरं मैत्रीची!' मोठया अक्षरात शीर्षक लिहिले होते. ते वाचताच तिचे ओठावर मंद स्मित पसरले. त्या अक्षरांवरून तिने हलकेच आपला हात फिरवला. कित्येक वर्षांपूर्वीचा स्पर्श आजही तसाच जपून ठेवला आहे असे वाटले.

तिने ते पान पलटवले. 'अ अनुचा, आ आशुचा!'  दुसऱ्या पानावरही तीच वळणदार अक्षरं. तिने ती डायरी हृदयाशी धरली. तिचे मन चिंब होऊ लागले होते.

थोड्यावेळाने तिने पुन्हा पुढचे पान उघडले.
"मैत्री म्हणजे काय हे शिकवणाऱ्या माझ्या प्रिय मैत्रिणीच्या वाढदिवसाला ही छोटीशी खास भेट!"
खाली लिहिले होते, 'आशुची अनू.' बाजूलाच दोन हार्ट ईमोजी आणि हसरे चेहरे रेखाटले होते.

कितीतरी वेळ आसावरी ते हस्ताक्षर आणि हसरे चेहरे पाहण्यात गुंतली होती.

'अनू, तू आता सोबत हवी होतीस ना गं. बघ ना, तुझी आशू किती एकटी पडलीय.
छवीच्या आजाराने मी खचले नाही गं. थकलेही नाही. तुटले तर अजिबात नाही, तरी तुझी गरज आहे गं. तू सोबत असलीस की सगळया गोष्टी कशा सोप्या होऊन जायच्या. प्रत्येक प्रॉब्लेम असा चुटकीसरशी सोडवायचीस. एवढी जगावेगळी मैत्री आपली, मग का असे मला मागे ठेऊन अर्ध्या वाटेतून तू पूढे निघून गेलीस?'

'काकूंना त्यांच्या गुलाबाबद्दल कळेल तर त्या पार खचून जातील. कसे सांभाळू मी त्यांना? हे सर्व कसे सांगू? माझा धीरच होत नाही गं.'


तिने डोळे पुसून डायरी बंद केली. डायरी ठेवताना त्यातून एक लिफाफा खाली पडला. त्या लिफाफ्यातून बाहेर डोकावणारा फोटो तिने हाती घेतला. गोऱ्यापान चेहऱ्याची अनू तिच्याकडे बघून हसतेय असे तिला वाटले.

'अनू, तुझ्याशिवाय माझी लढाई अपूर्ण आहे गं. का सोडून गेलीस? ये ना यार परत.' आसावरीने डोळे गच्च मिटले.


"आशू ऽऽ" एक मधुर आवाज आसावरीच्या कानावर पडला.

तिने मिटलेल्या पापण्या अलगद वर केल्या. कोणीतरी उभे असल्याचे तिला धुसरसे जाणवले. डोळे चोळून तिने पुन्हा एकदा पाहिले.. समोर अनू उभी होती. ओठावर नेहमीचे खट्याळ हसू घेऊन.


"अनू? तू? कधीची तुला शोधतेय? किती साद घालतेय? कुठे होतीस तू? मी किती एकटी पडलेय, तुला कळत नाही का गं?" आसावरीने रडतच विचारले. तिच्याजवळ जायला ती उठू लागली.


"शूऽऽ! उठू नकोस. तिथूनच बोल नाहीतर तुझी छवी उठायची.
 आणि अशी वेड्यासारखी काय रडतेस गं? मी तुझ्याजवळच तर आहे. तुला असे एकटे सोडून मी तरी राहू शकेल काय?" तिचा चेहरा तसाच हसरा होता.


"अनू, तुला कळतेय का आपल्या छवीला.."

तिचे बोलणे मध्येच तोडून अनू पुढे बोलू लागली, "आशू, तू आहेस ना मग मला कसली चिंता? तुला आठवते? परीक्षेच्या वेळी तू पूर्ण अभ्यास करून पेपर सोडवायचीस. मी मात्र गेस केलेले निवडक प्रश्नच तेवढे वाचायचे. दरवेळी तुलाच जास्त मार्क्स पडायचे आणि मी कसेबसे पास व्हायचे. जीवनाची परीक्षा देखील मी असेच काठावर पास झालेय. पण ह्या परीक्षेचा तुझा अभ्याससुद्धा माझ्यापेक्षा दांडगा आहे, तू छवीला नक्कीच तारुन नेशील. तेवढा विश्वास आहे तुझ्यावर." प्रसन्न चेहऱ्याने अनू बोलत होती.

तिचे प्रसन्न वदन बघून आसावरी थोडी खुलली. "अनू, मी हरले नाहीच गं. ही लढाई लढेन आणि नक्कीच जिंकेन." ती तिला म्हणाली.

अनू जवळ येतेय असा तिला भास झाला. तिला मिठीत घेण्यासाठी आसावरीने हात पसरले. अनू मात्र मिठीत न येता तिच्या कानाशी येऊन हलकेच कुजबुजली, " ये हुई ना बात! आणि काळजी नको. मी आहेच तुझ्यासोबत. कायमच! इथे असले आणि नसले, तरीसुद्धा."
आसावरीचे डोळे हळूहळू जड होऊ लागले आणि काही कळायच्या आत ते मिटले सुद्धा.

"अनू ऽ!" म्हणून तिने डोळे उघडून साद घातली. बघितले तर तिथे कोणीच नव्हते. बाजूला अनुचा हसरा फोटो पडला होता.


"आशू ऽ! झोप ना गं." झोपेत छवी चुळबुळत होती.

"हो, रे राजा." म्हणून आसावरी छवीच्या शेजारी पहुडली.


'मी आहे तुझ्यासोबत. कायमच!' अनुचे शब्द कानात फिरत होते. तिने छवीच्या मस्तकावर आपले ओठ टेकवले.  'अनू, तू आहेस गं माझ्यासोबत. माहीतीये मला.'  ती मनात म्हणाली.


निद्रादेवीच्या प्रसन्नतेची आसावरी वाट पाहू लागली पण आज ती प्रसन्न होईल असे चिन्ह काही दिसत नव्हते. तिने आपली कुस बदलली. 'अनू, आय मिस यू यार!' अनुच्या आठवणीत ती पुन्हा व्याकुळ झाली.


"आशू!" झोपेत बडबडणाऱ्या छवीचा हात तिच्या मानेवर आला. तो छोटुसा नाजूक हात तिने आपल्या ओठांना लावला.


मनाच्या दारात भूतकाळ हळूच डोकावू पाहत होता. इतक्या दिवसांनी तीही त्यात अलगद हरवून गेली.
.
.
क्रमश :

********
कोण आहे ही अनू? आसावरीला तिची एवढी आठवण का येतेय? कळण्यासाठी वाचत राहा कथामालिका,
पाहिले न मी तुला..!

पुढील भाग लवकरच. तोवर हा भाग कसा वाटला ते सांगा आणि सोबत अधीर मन झाले! ह्या कथेचा देखील आस्वाद घ्या.
*********

     * साहित्यचोरी गुन्हा आहे.*


🎭 Series Post

View all