पाहिले न मी तुला..!
भाग -पंधरा.
छवी तिच्याचकडे पाहत होती. दोघींची नजरानजर झाली तशी तिच्याकडे बघून ती गोड हसली. पल्लवीने सुद्धा एक छानसे स्मित केले आणि ती हॉस्पिटलकडे वळली. आसावरीने पार्किंगमधून कार काढली आणि छवीला सोबत घेऊन तिची कार हॉस्पिटलच्या आवाराबाहेर निघाली.
हॉस्पिटलच्या आत पाय टाकताना बाहेर भेटलेली छवी पल्लवीच्या मनात रेंगाळली आणि तिचे घारे डोळे आपल्याकडे बघून हसत आहेत असे वाटले. तिच्या ओठांवर आपसूकच स्मित आले.
कार चालवत असताना डोके कितीही शांत ठेवू म्हटले तरी डॉक्टर निशांतचे बोललेले प्रत्येक शब्द आसावरीच्या डोक्यात गोल गोल फिरत होते. लहानपणापासून एवढया यातना सहन केल्या, नि आत्ता कुठे जरासे काही चांगले घडते आहे असे वाटत होते तर छवीचा हा जीवघेणा आजार समोर आला होता. डॉक्टर निशांतचे बोलणे तिला टोचल्यासारखे वाटत होते. का तर म्हणे, की छवीच्या वडिलांशी बोलून घ्या.
"आशू, आपण घरी जात नाही आहोत का?" आपल्या गोड आवाजात छवीने विचारले.
"नाही गं राणी, जरा वेळ पार्क मध्ये बसुयात का?" नेहमीच्या बागेकडे कार वळवत ती म्हणाली.
"मला माहितीये ना, तुला टेंशन आले की तू इथेच येतेस. आशू, खरं खरं सांग, माझ्यामुळे काही टेंशन नाहीये ना?" तिच्या डोळ्यात आपली घारी नजर रोखून छवी.
"नाही रे राजा. उलट तू तर जादूच्या छडीने माझे सगळे प्रॉब्लेम्स दूर करणारी गोड परी आहेस." तिची पापी घेत आसावरी.
"मम्मा, होईल गं सगळं नीट. तू काळजी करू नकोस. 'ऑल इज वेल!' हे तुला ठाऊक आहे ना?" छवी.
"हो रे बाळा. चला, आता घरी जाऊया. आजी आपल्या लाडक्या गुलाबाची वाट बघत असेल ना?" आसावरी उठत म्हणाली.
"आपण पार्क मध्ये का गेलो होतो?" कारमध्ये छवी परत तोच प्रश्न विचारत होती.
"अगं, हॉस्पिटलमध्ये गेलो होतो ना, तिथे कसं इन्फेक्टेड वातावरण असते. म्हणून गेलेलो. पार्क मध्ये केवढी झाडं होती. तिथे फ्रेश हवा असते. आता बघ, कसे फ्रेश वाटत आहे. तुला वाटत आहे ना?" आसावरी.
"नाही गं माझ्या कस्तुरी. तू सोबत असलीस की कसले टेंशन?" हसून आसावरी.
"कस्तुरी म्हणजे?" ती.
"पण आजी तर मला गुलाब म्हणते, तो पण तर सुगंधी असतो." तिच्या चेहऱ्यावर मोठा प्रश्नचिन्ह.
"हो, तू तर आहेसच आजीचा सुगंधी गुलाब! जगात जे जे चांगले आहे ना ते सर्वच तर तू आहेस." कार थांबवत आसावरी म्हणाली. "घर आलेय.चला, उतरा आता."
आसावरीच्या उत्तराने तिची खळी खुलली.
*******
"सिस्टर, मला ना एका पेशंटबद्दल थोडी माहिती विचारायची आहे." रिसेप्शनवरच्या नर्सशी पल्लवी बोलत होती.
"नाव?" नर्स.
"सॉरी मॅम, असे कोणीही इथे ऍडमिट नाही आहेत." नर्स.
"ऍडमिट नसेल, पण चेकअपला तर आली असेल ना? आठ दिवसांपूर्वी आली होती, बघा नं जरा. बहुतेक आजदेखील आली असेल. तिचे डोळे बघा घारे आहेत. एकदम गोड अशी मुलगी." बाहेर भेटलल्या घाऱ्या डोळ्याच्या छवीला आठवून ती म्हणाली.
"अच्छा! ती छोटी होय? काय बरं नाव तिचं? हं, छवी. ती तर आत्ताच काही वेळापूर्वी तिच्या आईसोबत परत गेली." नर्स.
"हां, तीच ती. तिला काय झालेय ते कळू शकेल काय?" अधीरतेने पल्लवी.
"सॉरी मॅम, असे आम्ही कोणालाही पेशंटबद्दलची खाजगी माहिती देत नाही."
"मी 'असे कोणीही' नाहीये. आय एम अ डॉक्टर." पल्लवी.
"सॉरी मॅम, तरीही मी तुम्हाला नाही सांगू शकत. इट्स अगेन्स्ट रुल." नर्स.
"मला तुमच्या डॉक्टरांशी भेटायचे आहे." पल्लवी.
"हो, भेटू शकता पण थोडावेळ थांबावे लागेल. सरांचे पेशंट संपले की तुम्ही आत जाऊ शकता." नर्स.
"ये बाई, मी डॉक्टर आहे. डॉक्टर -डॉक्टर काही इथिक्स आणि एटीकेट्स असतात, ते तुला ठाऊक नाही आहे का? बऱ्या बोलाने आत सोडतेस की मीच जाऊ?" पल्लवीने आक्रमक पवित्रा घेतला तशी नर्स वरमली.
"आतले पेशंट बाहेर आले की जा तुम्ही. पण फक्त पाचच मिनिट हं. इतर पेशंट वेटिंग मध्ये आहेत." नर्स.
"हम्म." तिच्या उत्तराने पल्लवी शांत झाली.
"हं,बोला." समोर बसलेल्या पल्लवीला निशांत म्हणाला.
"सर, तुमची एक पेशंट आहे, छवी नाव तिचं. इनफॅक्ट काही वेळापूर्वीच ती येऊन गेलेली. तिला काय झालेय हे मला कळू शकेल काय?" ती आता बऱ्यापैकी सावरली होती.
"तुम्ही तिच्या कोण? म्हणजे त्यांच्या बोलण्यात तुमचा कधी काही उल्लेख आला नाही म्हणून विचारतोय. तिची आई आणि ती, नेहमी दोघीच येत असतात." तिच्याकडे रोखून बघत डॉ. निशांत.
"ऍक्च्युअली ती माझ्या दादाची मुलगी आहे, म्हणून विचारतेय." तिने खडा लागतोय का ते मारून बघितला.
"ओह! बरं झालं तुम्ही आलात ते. द्याट स्वीट लिटल गर्ल इज सफरिंग फ्रॉम ल्युकेमिया. तुम्ही डॉक्टर आहात, तेव्हा याचं गांभीर्य काय आहे हे नव्याने सांगायला नको. तिची आई एकट्याने लढायची म्हणतेय. त्यांच्यात आणि तुमच्या दादामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत ते मला ठाऊक नाही, पण या वेळी तरी आपापले इगो दूर ठेऊन दोघांनी एकत्र यावेत असं वाटतं. सिंगल पॅरेंटिंग सोपं नाहीये ना?" निशांत तिला सांगत होता.
"अं? काही नाही. मी बोलेन दादाशी. मी इथे आले होते हे तुम्ही मात्र वहिनींना सांगू नका. उगाचच काही प्रॉब्लेम व्हायला नको." ती खुर्चीवरून उठत म्हणाली.
"हम्म! या तुम्ही. " निशांत.
तिच्या समोर काही वेळापूर्वी तिला भेटलेली, गोड हसलेली छवी उभी राहिली. तिचे टपोरे घारे डोळे मनात घर करत आहेत असे वाटले.
शेखर, घाऱ्या डोळ्यांची ती परी आणि सोबत असलेली तिची आई..! तिचा मेळ काही जुळत नव्हता. भरधाव वेगाने कार पळवत ती घराकडे निघाली.
.
क्रमश :
*******
पाहिले न मी तुला..!
*साहित्यचोरी गुन्हा आहे.*
*************
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा