पाहिले न मी तुला..! भाग -14

पिटुकल्या छवीची हृदयस्पर्शी कथा!


पाहिले न मी तुला..!
भाग -चौदा.


"चिमणे, ऐकलेस का? निकाल आलाय तुझा. पास झालीस गं तू." दाराआड उभी असलेली आसावरी मुकुंदाला दिसली. जवळ जात त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातील थेंब गालावर ओघळू लागले.


"अगं वेडे, कशापाई रडतेस? पास झालीस तरी रडायला येत आहे होय? बाहेर मास्तर आले आहेत. चल त्यांचा आशीर्वाद घे बघू."  मुकुंदा तिला बाहेर घेऊन आला.


तिने वाकून गुरुजींना नमस्कार केला.

"अशीच प्रगती करत राहा. खूप खूप मोठी हो."   राणे गुरुजींनी तिला पेढा भरवून तोंड भरून आशीर्वाद दिला.

मंदा नाक वाकडे करून आत गेली.


"चिमणे, आता मागे वळून बघायचे नाही. शहरात जाऊन खूप शिक." मुकुंदा तिला जवळ घेत म्हणाला. बोलताना त्याच्या डोळ्यात पाणी का आले, त्यालाच कळले नाही.


"हो, शिकवा. स्वतःच्या पोराचे कधी कौतुक केले नाही आणि हिला डोक्यावर घेऊन नाचा आता."  मंदा स्वयंपाकघरातून कडाडली.


"कौतुक करायला तसे वागावे लागते. तुझा लेक असा पहिल्या टप्प्यात पास झाला होता का गं?"  आत जात मुकुंदा म्हणाला.


"माझ्या लेकाशी हिची बरोबरी नाही करायची हे मी आधीच बोलले होते."  मंदाने भांडणाचा पवित्रा घेतला.

'आज आई असती तर..?'  छोटया आसावरीला उगाचच वाटून गेले. डोळे पुसून ती मामीला स्वयंपाकाच्या मदतीसाठी गेली.


"आशू, झोप ना. इट्स टू लेट!" झोपेत छवीने आसावरीच्या गळ्यात हात टाकला आणि तिला बिलगून पुन्हा झोपली. आसावरीने तिला थोपटले आणि आपले डोळे मिटले.

'जे मी अनुभवले ना, त्याची झळ तुझ्यापर्यंत मी कधीच पोहचू देणार नाही. शोन्या, तू माझ्यासाठी काय आहेस हे या वयात तुला नाही कळायचे. माझ्या आयुष्यात सुगंध पसरवणाऱ्या कस्तुरीचा अंश आहेस तू. मला तुला गमवायचे नाहीये गं. छवी, लवकर बरी हो ना बाळा.'
तिने हलकेच आपले ओठ छवीच्या कपाळावर टेकवले. झोपेतला तो 'गुलाब' आणखी टवटवीत झाल्यासारखा तिला वाटला. तिला कवटाळून तीही झोपी गेली.


********


"हॅलो! लिटल, कशी आहेस?"   डॉक्टर निशांत छवीला तपासत असताना विचारत होते.



"मी मस्त." ती गोड हसली. "यू नो डॉक्टर अंकल? काल मी माझ्या स्कूल मध्ये गेली होती." ती.


"अरे वाह! पण तुझ्या पायांनी शाळेत त्रास तर नाही ना दिला?" तिला उठवून बसवत निशांत.


"अम्म.. थोडुसाच."  तिने उजव्या हाताचा अंगठा व तर्जनी एकमेकांना जोडून आणि डोळे बारीक करून सांगितले. "पण शाळेत खूप मजा आली."' तिच्या ओठांवर पुन्हा हसू उमटले.


"ओके! चला आता थोडावेळ बाहेर बसा. मला तुझ्या मम्माशी थोडं बोलायचं आहे."  तिला टेबलावरून खाली घेत निशांत.


"डॉक्टर अंकल, काही सिरियस मॅटर आहे का?" आपले टपोरे डोळे त्याच्यावर रोखून तिने विचारले.


निशांतने तिच्या केसांत हात फिरवून स्मित केले. "नाही गं. थोऽडेसे मोठ्यांचे डिस्कशन आहे."   आपला अंगठयापासून तर्जनी किंचित दूर करत तो म्हणाला.
"तू लिटल गर्ल आहेस ना, तेव्हा या सिस्टरसोबत बाहेर थांब बघू."

केबिनमधील नर्स तिला बाहेर घेऊन गेली.

"युअर डॉटर इज सो स्वीट!" समोर बसलेल्या आसावरीकडे बघून निशांत म्हणाला.


"हम्म!" तिने बळेच स्मित केले. 'आता डॉक्टर काय बोलणार?' याची चिंता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.


"मी आमच्या व्हिजिटिंग ऑन्कोलॉजिस्टशी छवीची केस डिस्कस केलीय." आसावरीच्या डोळ्यात बघून तो म्हणाला. "त्यांच्या सल्ल्यानुसार आपल्याला पुढच्या आठवड्यापासून किमोथेरपीला सुरुवात करावी लागेल." तो.


नको म्हणत असतानाही आसावरीच्या डोळ्यातून एक थेंब बाहेर डोकावलाच.



"यू हॅव टू बी स्ट्रॉंग!" तिच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवत निशांत.


"हूं. ते उगाचच डोळे भरून येतात. खूप छोटी आहे ना ती. इतकुसा जीव हे सगळं कशी निभावेल, ह्याची काळजी वाटते." आपले डोळे पुसत ती म्हणाली. बोलताना चेहऱ्यावर हसू आणण्याचा केविलवाना प्रयत्न अन दाटून आलेला तिचा स्वर. डॉक्टर असूनही निशांत जरासा भावनिक झाला.


"रिलॅक्स. पाणी घ्या." तो. "शी इज व्हेरी स्मार्ट गर्ल. तुमच्यासारखी खंबीर आई सोबत असेल तर ती सगळ्यातून निभावून विजयी होऊन बाहेर पडेल. तुम्ही तेवढ्या भक्कमपणे तिच्या पाठीशी उभे राहा."


"हो, मी खंबीर आहेच."   एक दीर्घ श्वास सोडून ती.


"पुन्हा एक महत्त्वाचे, किमोथेरपी फार खर्चिक असते. त्या खर्चाच्या भव्यतेनेच सामान्य माणूस खचून जातो, म्हणून विचारतोय प्रायव्हेट हॉस्पिटलचा खर्च तुम्हाला झेपेल ना?"   तो.


"त्या जीवापुढे पैशांचं काय? तिच्यावर उपचार होऊ शकतील एवढा पैसा उभा करण्याची ताकद आहे माझ्यात. त्याची काळजी नको."  ती.


"ओके. पैशांचा भाग वगळला तरी एक इमोशनल सपोर्ट हवा असतो. मी मागे सुद्धा बोललेलो, की ही लढाई एकट्याने लढणे सोपे नाहीय. किमोथेरपीच्या फायद्याबरोबर त्याचे साईड इफेक्ट्स देखील आहेत. माणूस त्यानेच घाबरून जातो. आपल्याला छवीसाठी किमोचे किमान सहा सायकल तरी करावे लागतील. त्यात तिची बॉडी कशी रिस्पॉन्ड करतेय हे बघावे लागेल. तिला आठवडाभर सलग किंवा एक दिवसाआड अशी ट्रीटमेंट प्लॅन करावी लागेल."  डॉ. निशांत.


"डॉक्टर,खूप वेदनादायी असेल का हो हे?"  आसावरी.

"किमोथेरपीची प्रोसेस तशी वेदनादायी नसते. मागच्या आठवड्यात जसे आपण सलाईनद्वारे औषधं दिलीत, त्याचप्रकारे आतासुद्धा देण्यात येतील.  हं, त्यांचा डोज वेगळा असेल. खरे तर ही ट्रीटमेंट वेदनादायक नाहीये, पण त्यानंतर होणारे दुष्परिणाम मात्र त्रास देऊ शकतात.

चक्कर येणे, उलट्या, अशक्तपणा यांना सामोरे जावे लागते. किमोमुळे आजारी पेशीबरोबरच चांगल्या पेशी सुद्धा नष्ट होतात. चांगल्या पांढऱ्या पेशी कमी झाल्या तर पुन्हा इन्फेक्शनची चिंता असते. लाल रक्तपेशी कमी झाल्या तर हिमोग्लोबिन कमी होऊन रक्ताल्पता होते."

निशांत सांगत असताना आसावरीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे भाव टिपत होता.

"हे बघा आसावरी मॅडम, मी तुम्हाला घाबरवत नाहीये. पण हे सर्व तुम्हाला माहिती हवे म्हणून सांगतोय. कारण किमो म्हटले की आपल्याला केवळ केस गळून टक्कल पडणे एवढेच माहिती असते. त्याव्यतिरिक्त इतर दुष्परिणामसुद्धा असतात हे माहिती असायला हवे. केस गळले तर काही दिवसांनी ते परत येतातच, पण त्या काळात गळून पडलेला आत्मविश्वास परत आणणे खूप महत्त्वाचे असते.
ह्या सगळ्यात आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे आपल्या माणसांचा एक भावनिक आधार. तो असला तर आपण कशावरही मात करू शकतो. छोट्या मुलांच्या बाबतीत तो भावनिक आधार त्यांच्यापेक्षा त्यांच्या पालकांना हवा असतो. कारण आपली कोवळी मुलं अशा अवस्थेतून जाताना बघून ते खचून जातात."
हे सगळे ऐकताना आसावरीच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळले.


"मॅडम, ह्या प्रवासात तुम्ही एकट्या नाही आहात. हॉस्पिटलचा पूर्ण स्टॉफ तुमच्या सोबत आहे. तरीही एक सांगावंस वाटतं." बोलता बोलता निशांत थांबला.


"काय?" तिने विचारले.


"छवीच्या वडिलांशी एकदा भेटून बोला. तुमच्यातील भांडण मिटवून मुलीसाठीतरी ही लढाई दोघांनी एकत्र येऊन लढा."


"डॉक्टर, माझ्या मुलीसाठी लढायला मी एकटी पुरेशी आहे." ती शांतपणे म्हणाली.  "ट्रीटमेंटला कधी सुरुवात करायची तेवढे सांगा."  ती.


"आपली ट्रीटमेंट सुरु झालीच आहे. फक्त किमो पुढच्या आठवड्यापासून सुरु करूया. एकदा आहारतज्ञाशी बोलून तिच्या आहाराचे योग्य नियोजन करायला सुरुवात करा." त्याच्या बोलण्यावर आसावरीने मान डोलावली.

"आता तुम्ही जाऊ शकता आणि पॅनिक होऊ नका." निशांत.

"हो." ती उठत म्हणाली.


"मम्मा, किती वेळ लागला गं. मी खूप कंटाळले होते."
आसावरी बाहेर आली तशी तिला मिठी छवी म्हणाली.


"हां रे बेटू, जरा उशीरच झाला. तुला भूक लागलीय का?" आसावरी.

"छे गं. फक्त थोडे बोअर झाले होते." छवी.

"निघूया?" आसावरीने तिचा हात हातात घेत विचारले.

छवीने होकार दिला आणि दोघी जायला निघाल्या.

*********


पल्लवी मैत्रिणीला भेटायला म्हणून बाहेर गेली होती. घरी परत येताना तिची कार डॉक्टर निशांतच्या हॉस्पिटलसमोरून गेली आणि तिला कालचा शेखरशी झालेला तिचा संवाद आठवला. त्याच्या चेहऱ्यावरची काळजी, अपराधीपणाचे भाव, ती अस्वस्थता! सगळे आठवले. डॉक्टर निशांतला भेटून त्या मुलीबद्दल काही माहिती मिळते का? हे जाणून घेण्याबद्दल ती शेखरशी बोलली होती. त्याचा पॅनिक झालेला चेहरा पुन्हा नजरेसमोर आला आणि तिने हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये आपली कार उभी केली.


आसावरी आणि छवी हास्पिटलमधून गप्पा मारत आपल्या कारकडे निघाल्या होत्या. समोरून मोबाईलवर बोलत येत असणाऱ्या पल्लवीच्या हाताला आसावरीचा चुकून धक्का लागला आणि तिचा मोबाईल खाली पडला.


"ओह! सॉरी. ते चुकून धक्का लागला."  आसावरी.


इट्स ओके. माझेदेखील लक्ष नव्हते."  आपला मोबाईल उचलत पल्लवी.

छवी तिच्याचकडे पाहत होती. दोघींची नजरानजर झाली तशी तिच्याकडे बघून छवी गोड हसली. पल्लवीने सुद्धा एक छानसे स्मित केले आणि ती हॉस्पिटलकडे वळली. आसावरीने पार्किंगमधून कार काढली आणि त्या छवीला सोबत घेऊन तिची कार हॉस्पिटलच्या आवाराबाहेर निघाली.

.
.
क्रमशः

पुढील भाग लवकरच. तोवर हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा. सोबतच माझी  'अधीर मन झाले!'  ही नवी कथामालिका सुरु झालीय, तिसुद्धा वाचून बघा.

*साहित्यचोरी गुन्हा आहे.*

****************************

🎭 Series Post

View all