Feb 29, 2024
नारीवादी

पाहिले न मी तुला..! भाग -13

Read Later
पाहिले न मी तुला..! भाग -13


पाहिले न मी तुला..! भाग -तेरा.नवीन गुरुजी बघून ती घाबरली. आता हमखास ओरडा नाहीतर छडीचा मार मिळणार हे तिला ठाऊक होते, पण तसे काहीच झाले नाही. गुरुजी तिला काहीच बोलले नाही. गृहपाठ तपासतांना तिची अर्धी कोरी असलेली पाटी बघूनसुद्धा तिला मार खावा लागला नाही. 'शाळेत आलेला नवा मास्तर खुळा आहे का?' अशी दाट शंका तिच्या मनात आली. हा विचार डोक्यात घोळत असतानाच शाळा सुटल्याची घंटा वाजली आणि मुलांचा गलका सुरु झाला. पोरं वर्गातून बाहेर पडताना गुरुजींनी तिला आपल्याजवळ बोलावले. आता छडीचा मार बसणार हे नक्की होते. ती गच्च डोळे मिटून आपले दोन्ही हात समोर करून गुरुजींच्या पुढे उभी राहिली.


त्यांनी त्या कोवळ्या हाताकडे पाहिले. तिचे हात कुठे कोवळे होते? रोज भांडी घासून, विहिरीचे पाणी खेचून, घरातील केर काढून आणि मास्तरांचा मार खाऊन हात कसे निगरगट्ट झाले होते.


त्यांनी अगदी अलवारपणे तिच्या हातावरून आपला हात फिरवला. आसावरीने आपले गच्च मिटलेले डोळे उघडले. हातावर छडीच्या माराऐवजी गुरुजींचा प्रेमळ स्पर्श जाणवत होता. तिने बावरून त्यांच्याकडे बघितले.


"तुझे नाव आसावरी ना?" तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे पाहून त्यांनी विचारले. तिने मान डोलावली.


"मी राणे गुरुजी. तुझे नवे मास्तर. तुझ्या हाताला काय झाले गं? घरी खूप कामं करतेस का?" तिच्या डोळ्यात बघत ते बोलत होते.


आसावरीच्या डोळ्यात टचकन पाणी आले. आजवर येवढया प्रेमाने कोणी तिची चौकशी केली नव्हती. तिचा बुजलेला घाबरट चेहरा त्यांना खूप काही सांगून गेला.


"उद्या शाळेत येतांना तुझ्या पालकांना घेऊन ये. मला त्यांच्याशी थोडे बोलायचे आहे." तिचे हात सोडत ते म्हणाले.


"पालक म्हणजे?" ती.
दिवसभरात तिच्या तोंडून एवढेच शब्द त्यांच्या कानावर पडले होते.


"अगं, पालक म्हणजे आईबाबा. तू कोण्या एकाला सोबत आणलेस तरी चालेल. जा आता." राणे गुरुजी हसून म्हणाले.


"गुरुजी, मला आईबाबा नाहीत. मी मामाकडे राहते." ती जड अंतःकरणाने म्हणाली.


"ठीक आहे, मग मामाला सोबत आणलेस तरी चालेल हं." तिच्यासोबत वर्गाबाहेर येत ते म्हणाले.

*********

"मामा, नव्या गुरुजींनी तुला उद्या शाळेत बोलवले आहे." ती रात्री भीत भीत सांगत होती.


"कशाला गं? आजवर घरापर्यंत तक्रारी येत होत्या, आता शाळेत बोलावण्यासारखं काय केलंस?" मामी रागाने विचारत होती.


" मी काहीच केले नाही. गुरुजींनीच बोलावले." मामीच्या बोलण्याने तिला वाईट वाटले.


"चिमणे, उद्या मला तालुक्याला जायचे आहे. नंतर आलो तर चालेल का?" मुकुंदा.

तिने नेहमीप्रमाणे काही न बोलता मान डोलावली.

आठ दिवस लोटले. मुकुंदा शाळेत जायचे विसरूनही गेला. आसावरीने पुन्हा आठवण करुन दिली नाही.


"तुझे मामा मला भेटायला आले नाहीत गं?" नवव्या दिवशी राणे गुरुजींनी विचारले.


"त्याला वेळ नसतो. " ती खिन्नपणे उत्तरली.


"आणि मामी?" त्यांनी तिच्या वर्मावर बोट ठेवला.

ती काहीच बोलली नाही पण मामीचे नाव ऐकून तिचे बदललेले हावभाव त्यांनी टिपले.

"घरी कामात मदत करतेस का?" ते.

तिने होकारार्थी मान हलवली.

"काय काम करतेस?" त्यांनी पुढे विचारले.


"भांडी घासते, पाणी भरते, सडा घालते, केर काढते.." तिची यादी संपत नव्हती.


"आणि अभ्यास?" तिला मध्येच थांबवत ते.


"वेळच मिळत नाही." ती कशीबशी उत्तरली. डोळे पाण्याने डबडबले होते.


"म्हणजे तुला अभ्यास आवडतो ना? वेळ मिळाला तर करशील का?" त्यांच्या प्रश्नावर तिने परत होकारार्थी मान हलवली.

"ठीक आहे, जा आता." ते म्हणाले तशी ती धावतच पळाली.

********

"येऊ का?" दारातून आलेल्या अनोळखी आवाजाने मंदा बाहेर आली.
दारात राणे गुरुजी उभे होते.


"नवे मास्तर, तुम्ही?" त्यांना पाहून मंदाच्या कपाळावर आठया उमटल्या.


"हं. शाळेत यायला तुम्हाला वेळ नाहीये म्हणून म्हणालो आपणच भेट द्यावी. म्हणून आलोय. प्यायला थोडे पाणी मिळेल का?" घरातील अंदाज घेत ते बोलले. आसावरी आत भांडी लावताना त्यांना दिसली.

"मुकुंदराव कुठे दिसत नाहीत. ते घरी नाहीत का? त्यांच्याशी थोडे बोलायचे होते." राणे गुरुजी.


" हे बघा मास्तर, तुम्हाला काय काम आहे हे मला माहिती नाही. आसावरीबद्दल बोलत असाल, तर तिला पुढे शिकवायला आम्हाला काही जमणार नाही. तेव्हा तिच्याबद्दल न बोललेलेच बरे." मंदा.


"हं, ते माझ्या ध्यानात आलेय. पोरीला अभ्यासाला वेळ मिळत नसेल तर पुढे कशी काय शिकेल ती. बरं येऊ मी?"
ते तिथून निघाले. अंगणात मुकुंदाशी गाठ पडली.

"नमस्कार. मी राणे गुरुजी. आसावरीच्या वर्गाला शिकवतो." गुरुजी.


"हो. आसावरी मला बोलली होती, पण वेळेअभावी मी तुम्हाला भेटायला येऊ शकलो नाही. माफ करा." मुकुंदा ओशाळून म्हणाला.


मी समजू शकतो." राणे गुरुजी मंद हसले.


"आसावरीची प्रगती कशी आहे?" काय बोलावं हे न उमगून मुकुंदाने विचारले.


"पोरगी हुशार आहे. अभ्यासाला पुरेसा वेळ मिळेल तर नक्कीच नाव काढेल." ते.


"अहो, आसावरी म्हणजे भोपळा आहे. ती काय दिवे लावणार?" मंदा बाहेर येत म्हणाली.


"मंदाताई, हिऱ्याची पारख एक जोहरीच करू शकतो. संधी मिळेल तर आसावरी खूप पुढे जाईल." राणे गुरुजी.


"आसावरी आणि हिरा?" मंदा हसली. ती चवथा वर्ग पास होणार नाही हे मी तुम्हाला सांगते." मंदा.


"मी शाळेत नवा उपक्रम सुरु केलाय. वर्गात जेवढी  'भोपळा' मुले आहेत, त्यांच्यासाठी शाळा सुटल्यावर अर्धा तास शिकवणी घेतली जाईल. तेव्हा आता रोज आसावरी घरी उशिरा परत येईल." गुरुजींनी सांगितले.

"असे कसे चालेल? मुलीच्या जातीने उशीरा घरी येणे मला मान्य नाही." मंदा ठामपणे म्हणाली.


"मंदाताई, इतर मुलांप्रमाणे तुमच्या आसावरीलासुद्धा हे अनिवार्य आहे. तेव्हा तुम्हाला मान्य करण्यापलीकडे पर्याय नाहीय." गुरुजी हसून म्हणाले.

त्यांच्या बोलण्यावर काय उत्तर द्यावे, मंदाला काही सुचेना. ती गप्प झाली.

"मुकुंदराव, मला सोडायला बाहेर येता का जरा?" मुकुंदाकडे पाहत गुरुजी.
तो त्यांच्यासोबत निघाला.


"मुकुंदराव, आसावरीच्या आयुष्यात काय घडतेय याची कल्पना आलीय मला. कृपा करून तुम्ही तिला तुमच्या बायकोच्या तावडीतून सोडवा, तेव्हाच ती काहीतरी करू शकेल. नाहीतर पंख कापलेल्या पक्षासारखी तिची अवस्था होऊन जाईल."

" गुरुजी, मला हे समजतेय हो. पण त्यावरचा उपाय मात्र सापडत नाहीय." तो हताश होऊन म्हणाला.


"उपाय आहे." बोलतांना गुरुजीच्या चेहऱ्यावर एक स्मित होते. "पुढच्या वर्षी आसावरीला तालुक्याच्या शाळेत शिकवा. तिला वसतिगृहात दाखल करा."


"पण चौथी पास होईल ना ती?" मुकुंदाने मनातला प्रश्न केला.


"होईल की. तुम्ही फक्त तिला बाहेर पाठवायची तयारी ठेवा." मुकुंदाच्या खांद्यावर हात ठेऊन ते म्हणाले आणि निघून गेले.


राणे गुरुजींनी आसावरीची सायंकाळची शाळा अर्ध्या तासाने सक्तीने वाढवली. आता आसावरीचा उरलेला अभ्यास शाळेत पूर्ण होऊ लागला. गणिताच्या राक्षसाची वाटणारी भीती गुरुजींच्या शिकवणीने कमी व्हायला लागली. काही दिवसांसाठी म्हणून शाळेत आलेले राणे गुरुजी आसावरीच्या जीवनात एक आशेचा किरण फुंकून गेले. शिक्षणाचा पुढचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे दिसू लागली होती. तिचा घाबरट, बुजरा स्वभाव बदलला नव्हता. मामीची चिडचिड, ती परत येईपर्यंत घरातील वाट पाहणारी कामं यात तसूभरही फरक पडला नव्हता, तरी अभ्यास होतोय या आनंदात ती सारे सहन करत होती.


"चिमणे, अभ्यास नीट झालाय ना?" मुकुंदा तिला विचारत होता. चौथीची बोर्डाची परीक्षा आठवड्यावर येऊन ठेपली.
तिने उत्तरादाखल नेहमीप्रमाणे मान डोलावली.


"पुढे शिकायचे असेल तर हा वर्ग पास होणे आवश्यक आहे, माहीत आहे ना तुला?" त्याने विचारले.


"हो." ती.

" चिमणे, तू वसतिगृहात राहू शकशील?" विचारताना त्याला दाटून आल्यासारखे वाटले. तिने परत मान हलवली.


"मामी जाऊ देईल ना?" तिने विचारले.


"तू पास तर हो, वसतिगृहाचे मी बघेन." मुकुंदा.

तिने होकार दिला. 'खूप अभ्यास केला तर पुढे शिकता येईल', हे मनात ठासून भरले होते. ती जोमाने अभ्यासाला लागला.
परीक्षा झाली. पेपर नेहमीपेक्षा बरे गेले होते. आसावरीला निकालाची हुरहूर तर होतीच, पण तिच्यापेक्षा जास्त आतुरता कुण्या दुसऱ्याच व्यक्तीला लागली होती. ती म्हणजे मंदा. आसावरी पास होऊ नये म्हणून तिने देवाला हात जोडले होते.


"मंदाताई घरी आहात का?" राणे गुरुजी दारातून म्हणाले.


"मास्तर, असे अचानक?" आपला पदर सावरत बाहेर येत मंदा.


"हो, हे पेढे घ्या. तोंड गोड करा." त्यांनी पेढ्यांचा पुडका मंदासमोर ठेवला.


"कशाचे पेढे?" मंदा.


"अहो तुमच्या मागची ब्याद लगेच टळणार आहे. आसावरीला घराबाहेर पाठवायला तयार राहा. ती पाचवीला गेलीय. चांगल्या गुणांनी पास झालीय. पुढचे शिक्षण घेण्यासाठी मोठया शहरातील शासकीय वसतिगृहात नाव दाखल करण्याइतपत गुण मिळालेत."


"काय म्हणालात? आसावरी पास झालीय?" तिचा कानावर विश्वास बसत नव्हता. बातमी ऐकून तिचा चेहरा उतरला.


"चिमणी पास झालीय?" शेतावरून घरी परतलेल्या मुकुंदाच्या कानावर मंदाचा आवाज पडला तसे त्याने अत्यानंदाने विचारले.


आसावरीच्या निकालाने मंदाचा चेहरा पडला होता. आसावरी उत्तीर्ण होऊ शकते हेच तिच्या पचनी पडत नव्हते. मुकुंदा आंनदी होता, आपल्या बायकोच्या जाचातून चिमणी आतातरी सुटेल अशी आशा निर्माण झाली होती. राणे गुरुजी समाधानी होते. त्यांच्या पारखी नजरेने ओळखलेल्या हिरा कसोटीवर खरा उतरला होता. त्यांचा विश्वास सार्थकी लागला होता.

आणि आसावरी? केर काढत असताना बाहेर चालू असलेले संभाषण दाराआडून ती ऐकत होती. मनात माजलेल्या वेगवेगळ्या भावनांचा कल्लोळ तिच्या चेहऱ्यावर उमटला होता. काहीतरी मिळाल्याचा आनंद, काहीतरी गवसल्याचे समाधान! आपला आनंद कुणाशी वाटून घेता येऊ नये, या दुःखाची झालर.


"चिमणे, ऐकलेस का? निकाल आलाय तुझा. पास झालीस गं तू." दाराआड उभी असलेली आसावरी मुकुंदाला दिसली. जवळ जात त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातील थेंब गालावर लागले.


"अगं वेडे, कशापाई रडतेस? पास झालीस तरी रडायला येत आहे होय? बाहेर मास्तर आले आहेत. चल त्यांचा आशीर्वाद घे बघू." मुकुंदा तिला बाहेर घेऊन आला.


तिने वाकून गुरुजींना नमस्कार केला.
"अशीच प्रगती करत राहा. खूप खूप मोठी हो." राणे गुरुजींनी तिला पेढा भरवून तोंड भरून आशीर्वाद दिला.

क्रमश:
********

काय होईल पुढे? लहानग्या आसावरीला घराबाहेर पडण्याची संधी मिळेल की मामीच्या जाचात ती परत अडकेल?
कळण्यासाठी वाचत राहा कथामालिका,
पाहिले न मी तुला..!
पुढील भाग लवकरच. तोवर हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


**साहित्यचोरी गुन्हा आहे.*ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//