पाहिले न मी तुला..! भाग -12

छोट्या छवीची हृदयस्पर्शी कथा..!


पाहिले न मी तुला..! भाग - बारा.



'छे! हे असले विचार करण्यात मला माझी ऊर्जा वाया घालवायची नाहीय. माझं लक्ष्य माझी छवी आहे. तिच्याशिवाय काहीच नको. अगदी काही काही नको.'
छवीचा हसरा चेहरा नजरेसमोर आला तसा सागरचा विचार तिने मनातून काढून बाहेर फेकला.

******


"शेखर, इथे येऊन तुला आज आठ दिवस होत आहेत. एकदातरी तू आपल्या ऑफिसला जाऊन आला आहेस का?"
जेवण करताना नयनाताई शेखरला विचारत होत्या.



"आई, मला वेळ थोडा हवाय गं." तो.


" आणखी किती वेळ? हे बघ शेखर, परदेशात एवढी वर्ष तू तुझा वेळ घेतलासच की. आता इथली जबाबदारी तुला तुझ्या खांद्यावर घ्यायला हवी ना?"
नयनाताई.


"जोपर्यंत माझे डोके आणि चित्त एकत्र येऊन कौल देत नाहीत तोपर्यंत." तो शांत स्वरात म्हणाला.


"हा असा दिवस उगवेल का?"
स्मिता आत्या.


"हं. बघूयात." तो.


"त्याला नीट जेवू तरी देत." विनायकराव स्मिता आणि नयनाताई कडे बघून म्हणाले.

शेखर काही न बोलता कसबसा जेवून तिथून उठून गेला.


" त्याच्या मागे तुम्ही दोघी पुन्हा सुरु झालात ना? अगं, त्याला थोडे समजून घ्या. एवढया वर्षांनी पोरगा परत आलाय, तूमच्या दोघींमुळे पुन्हा निघून जाईल." विनायकराव त्यांना समजावत होते.


"दादा, प्रत्येकवेळी आम्हालाच बोल देऊ नकोस. आपला बिझनेस बघण्याबद्दलच आम्ही बोलत होतो ना? त्याच्याच भल्यासाठी सगळी धावपळ चाललीय. तू तरी समजून घे ना." स्मिताआत्या.


"मी त्याचा बाप आहे. मलाही कळतेच की. त्याच्या मनात काय चाललेय हे आपणदेखील समजायला हवे ना." विनायकराव.


"शेखर येऊन आठ दिवस लोटलेत. आणखी किती दिवस समजून घेऊ?" नयनाताई.


"जोपर्यंत तो स्वतःहून काही निर्णय घेत नाही तोपर्यंत. तुम्ही दोघी लक्षात ठेवा मला माझा मुलगा पून्हा गमवायचा नाहीये." विनायकराव उठत म्हणाले.


********

"दादू, अरे असा काय करतोस तू. मामी आणि आईंना तुला दुखवायचे नव्हते."

गॅलरीत खिन्न मनाने उभा असलेला शेखर पल्लवीच्या नजरेतून सुटला नाही. ती त्याच्याजवळ येऊन उभी राहिली.


"त्यांचा हेतू वाईट नाही हे मलासुद्धा कळतेय गं. पण माझा कशातच इंटरेस्ट वाटत नाहीये त्याला तरी काय करू?" तो.


"तुला एक सुचवू?" ती.


"काय?" तो.


"काही दिवस ना हा बिझनेस, आपल्या घरातील माणसं ह्या सगळ्यांचा विचार करणं सोडून दे. इथे आल्यापासून एखादी छोटीशी जरी गोष्ट असेल ज्याने तुला आनंद मिळाला असेल त्या गोष्टीचा विचार कर. स्वतःला हॅपी ठेवण्याचा विचार कर." त्याच्याकडे बघत पल्लवी.


"हूं." तो.


"केवळ 'हूं' करू नकोस. इकडे परतल्यापासून तुला मी एकदाच प्रसन्नपणे हसताना पाहिलंय तेसुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये. तेव्हाचे तुझ्या ओठांवरचे ते हसू मला पुन्हा बघायचे आहे."
ती.


"हम्म!" तो.

" मी एकटी बडबडतेय नी तुझं केवळ 'हूं',  'हम्म'  चाललंय. काहीतरी बोल ना यार."  पल्लवी.


"पल्ली, तुला ती मुलगी आठवतेय?" तिच्याकडे बघत शेखर म्हणाला.


" कोण?"  ती.


"तीच गं, हॉस्पिटल मध्ये भेटलेली गोड परी."
छवीची आठवण काढत तो म्हणाला.


"नाही रे. मी तिला नीट बघितले नव्हते. तिचे काय?" पल्लवी.


"ती म्हणाली होती की ती नेहमीच त्या पार्कमध्ये येते." तो.

"तर?" ती.


" मी रोज तिथे सायंकाळची चक्कर मारतोय पण मला ती दिसलीच नाही गं. तिला काही झाले तर नसेल ना?"
तो विचारत होता. पल्लवीला त्याच्या डोळ्यातील काळजी स्पष्ट दिसत होती.


" नाही रे. तिची परीक्षा असेल किंवा दुसरे काही कारण असू शकते ना."  त्याला समजावत ती.


"पल्ली, ऐक ना, तू ते हॉस्पिटल जॉईन कर ना. म्हणजे ती तिथे कधी आली तर कळेल तरी."
तिच्याकडे आशेने पाहत तो बोलला.


" नाही हं ब्रो! मला पेडियाट्रिक्स मध्ये ना काही एक आवड नाहीये. पुढे जाऊन मला रेडिओलॉजिस्ट बनायचे आहे."
ती नकार देत म्हणाली.

"आणि मला सांग, त्या छोटीत तुला एवढा इंटरेस्ट का आहे?" ती.


"माहिती नाही गं. तिला बघितले ना की खूप छान वाटतं. तिचे ते घारे डोळे.. त्यात पाहिलं की वाटतं माझेच डोळे आहेत ते. आणखी असं वाटतं की.." तो बोलता बोलता थांबला.


"काय?" तिची उत्सुकता वाढली.


"असं वाटतं की ती माझीच तर मुलगी नसेल ना?"
एक लांब श्वास घेऊन तो उत्तरला.


"दादू..?" पुढे काय बोलावे तिला काही सुचेना.


"तुला माहीत आहे पल्लवी, जिथे अनुची डिलिव्हरी झाली होती ना त्या डॉक्टरांना मी भेटून आलोय. शहरातील सगळी अनाथाश्रम धुंडाळून काढली पण हाती काहीच लागलं नाही गं." त्याचा स्वर गोठत होता.


"दादू, जेव्हा ते बाळ जन्माला आलं तेव्हा तूच तर दूर लोटले होतेस ना? मग आता अचानक तुला एवढी आठवण का होतेय? इतका त्रास का करून घेतो आहेस?" कातर स्वरात तिने विचारले.


"माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती ती. आता मला सगळं व्यवस्थित करायचं आहे. माझ्या मुलीला माझ्यासोबत ठेवायचे आहे." डोळे पुसत तो.


"पण ती छोटी तुझी मुलगी असेल हे कशावरून म्हणतोस?" तिने प्रतिप्रश्न केला.


"ती माझीच मुलगी आहे असे नाही गं. पण तिला भेटलो ना की माझ्या न पाहिलेल्या मुलीची आठवण होते यार. मला काहीच सुचत नाही, फक्त तिचा चेहरा.. तिचे ते डोळे सतत माझ्यासमोर येत राहतात. त्या डोळ्यात काहीतरी ओळखीचे आहे जे यापूर्वी कुठेच जाणवले नाही, असे सतत मला वाटत असते गं."
बोलताना त्याचे श्वास जड होऊ लागले.


"रिलॅक्स ब्रो! इतका पॅनिक होऊ नकोस. तुला त्रास होतोय."

त्याला खुर्चीवर बसवत ती म्हणाली.

"पाणी.. पाणी हवंय का तुला?" ती म्हणाली.


"पाणी नको गं. पल्ली, मला भेटायचं आहे गं तिला. प्लीज काहीतरी कर ना." तो काकूळतीला आला होता.


"हं. बघते मी. जमलं तर उद्याच तिथल्या डॉक्टरांना भेटते. ठीक आहे? तू काळजी करू नकोस." ती त्याला आश्वस्त करत म्हणाली.

*******

"मम्मा! शाळेत खूप मज्जा आली. तुला ती निशू माहीत आहे ना? तिने आज माझ्या डब्यातले थालीपीठ खाल्ले."
झोपताना उत्साहाने छवी शाळेतल्या गमतीजमती सांगत होती.


"अरे वाह! तुमच्यातले भांडण मिटले म्हणायचे? "
तिला हलके थोपटत आसावरीने विचारले.


"हो. तिला आता कळलंय की हेल्दी फूड सुद्धा चांगलं असतं. मम्मा, तुला माहितीय? तो शुभम आहे ना, त्याला टीचरचा ओरडा मिळाला." सांगताना तिचा चेहरा छोटुसा झाला होता.


"का गं?" आसावरी.


"अगं त्याला वन टू नंबर काउन्ट करताच येत नव्हते." छवी.


"मग?"


"मग टीचर म्हणाल्या की छवीकडे बघा, ती इतके दिवस शाळेत आली नाही तरी तिला सर्व येतं. मग सर्वांनी माझ्यासाठी टाळ्या वाजवल्या." ती सांगत होती.


"हं! माझं पिल्लू आहेच गुणाचं!" आसावरीने तिची एक मुका घेतला.


"सर्वांनी टाळ्या वाजवल्या तर मला खूप छान वाटलं पण शुभम बद्दल वाईट वाटलं. नंतर माहितीये काय झाले?" ती आपले डोळे मोठे करून म्हणाली.


"काय?" आसावरीनेही आपले डोळे मोठे करत कुतूहलाने विचारले.


"अगं, क्लास संपल्यावर टीचरनी त्याला जवळ बोलावून प्रेमाने विचारले आणि त्याचा सगळा प्रॉब्लेम छू मंतर झाला. त्याला सर्व आलं सुद्धा. मला ना आमच्या टीचरचे काही कळतच नाही. कधी ओरडतात पण आणि कधी लाड पण करतात."


तिच्या चेहऱ्यावर शुभमसाठी आनंद तर तिच्या शिक्षिकेसाठी आश्चर्य असे मिश्र भाव होते.


"मम्मा, तुझे टीचरसुद्धा असेच होते का गं? तुला कधी ओरडा मिळाला होता का?" तिने आसावरीला प्रश्न केला.


"हो रे शोन्या, मलाही ओरडा मिळायचा आणि त्यांच्यामुळेच माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन मिळाले. आपण आपली अडचण त्यांना सांगायला हवी, हो की नाही? बरं आता झोपायचे? उद्याला डॉक्टर अंकल कडे जायचे आहे ना?"
आसावरी.


"हो गं मम्मा. तू गोष्ट सांग ना, मग मी झोपी जाते." डोळे मिटत छवी.


"हम्म, ऐक…"
आसावरीने गोष्ट सांगायला सुरुवात केली आणि काही वेळातच छवी गाढ झोपली.


'एवढेसे पिल्लू, तरी तिला सगळ्यांची किती काळजी? टीचरने शुभमचा प्रॉब्लेम समजून घ्यायला हवे होते हे तिला कळले. त्यांनी शुभमला प्रेमाने सांगितले तर तिलाही आनंद झाला. आपल्या आयुष्यात पालकांनंतर एक शिक्षकच तर असतो जो मुलांना योग्य दिशा दाखवतो. बालपणी माझ्याही बाबतीत हेच घडत होते ना. मला समजून घ्यावे असे कोणाला कधी वाटलेच नाही. मी कशी 'ढ' आहे हेच सर्वांना वाटायचे. माझ्या आयुष्यात राणे गुरुजी आले नसते तर आज मी कुठे असते?'

झोपलेल्या छवीच्या शांत मुद्रेकडे पाहून आसावरीच्या डोळ्यासमोर राणे गुरुजींची प्रतिमा उभी राहिली आणि आपसूकच तिचे ओठ रुंदावले.


आसावरी चौथ्या वर्गात होती. नेहमीच तिच्या दावणीला जुपलेली कामे, मामीकडून होत असलेली पिळवणूक.. लहानसा जीव थकून जाई.

शाळेचा सतत मागे पडणारा अभ्यास अन त्यामुळे शिक्षकांच्या घरी येणाऱ्या तक्रारी. मामी तर तिची शाळा बंद करण्याच्या निर्णयावर आली होती.

अचानक एकदा तिला शिकवणाऱ्या शिक्षकांचा अपघात झाला आणि त्यांना सहा महिन्यांची रजा घ्यावी लागली.

नेहमीप्रमाणे आसावरीला शाळेत यायला आजही उशीर झाला होता. काल तर ती आलीच नव्हती.

"गुरुजी, आत येऊ? "
तिच्या आवाजाने शिकवत असलेल्या गुरुजींचे तिच्याकडे लक्ष गेले.

जरासे विस्कटलेले केस , मळकट गणवेष. धावत आल्याने आणि मास्तरांच्या भीतीने वाढलेला श्वास!

गुरुजींनी तिच्याकडे बघून खुणेनेच आत यायला सांगितले.

नवीन गुरुजी बघून ती घाबरली. आता हमखास ओरडा नाहीतर छडीचा मार मिळणार हे तिला ठाऊक होते, पण तसे काहीच झाले नाही. गुरुजी तिला काहीच बोलले नाही. गृहपाठ तपासतांना तिची अर्धी कोरी पाटी बघूनसुद्धा तिला मार खावा लागला नाही.

'शाळेत आलेला नवा मास्तर खुळा आहे का?' अशी दाट शंका तिच्या मनात आली. हा विचार डोक्यात घोळत असतानाच शाळा सुटल्याची घंटा वाजली आणि मुलांचा गलका सुरु झाला.

पोरं वर्गातून बाहेर पडताना गुरुजींनी तिला आपल्याजवळ बोलावले. आता छडीचा मार बसणार हे नक्की होते. ती गच्च डोळे मिटून आपले दोन्ही हात समोर करून गुरुजींच्या पुढे उभी राहिली.

.
.
.
क्रमश :
काय होईल पुढे? शाळेत आलेल्या नव्या गुरुजीमुळे आसावरीच्या आयुष्याला कलाटणी मिळेल का? कळण्यासाठी वाचत राहा कथामालिका..
पाहिले न मी तुला..!
पुढील भाग लवकरच. तोवर हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


**साहित्यचोरी गुन्हा आहे.*

********


🎭 Series Post

View all